नवऱ्याने दिलेल्या धोक्यातच दडलेला… सुदेशनाचा ‘मौका!’

नवऱ्याने दिलेल्या धोक्यातच
दडलेला… सुदेशनाचा ‘मौका!’

Tuesday October 13, 2015,

4 min Read

कोलकात्यातील शिक्षक कुटुंबात जन्मलेल्या सुदेशना बॅनर्जी आज एका इंजिनिअरिंग कंपनीच्या सर्वेसर्वा आहेत. देशातल्या कितीतरी ख्यातनाम कंपन्यांना सेवा पुरवत आहेत. परदेशातही त्यांच्या कंपनीने चुणूक दाखवलेली आहे. एक सर्वसामान्य गृहिणी ते शिक्षिका आणि शिक्षिका ते आजअखेर… त्यांची कथा महिलांसाठी प्रेरणादायक आहेच, पण अशा महिलांसाठी विशेष प्रेरणादायक, की ज्या आपल्या आत्मसन्मानाशी कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही पातळीवर तडजोड करत नाहीत…

मैत्रिणीशीही अफेअर नवऱ्याचे...

शिक्षण आटोपल्यावर सुदेशना यांचा प्रेमविवाह झाला. प्रेमविवाहाचा हा फैसलाच बहुदा त्यांच्या दैदिप्यमान यशाच्या तळाशी आहे. लग्नानंतर सुदेशना यांना जसे कळले, की पती-पत्नी नात्याचा आधार असलेल्या निष्ठेशी प्रतारणा म्हणजे त्यांच्या नवऱ्याचा ‘छंद’ आहे. अनेक बायकांशी त्याची लफडी आहेत. सुदेशना यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली होती. नवऱ्याचे संबंध आपल्याच (सुदेशना यांच्या) एका मैत्रिणीशीही आहेत, आणि दोघांचे एक बाळही आहे, हे कळल्यावर तर सुदेशना यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. असले कठोर वास्तव त्या कुठल्याही परिस्थितीत स्वीकारू शकत नव्हत्या. अखेर त्यांनी नवऱ्याशी फारकत घेतली.

कुणी घर देता का घर?

गावातल्याच एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली. नवरा आणि त्याचे घर सोडल्यानंतर स्वत:साठी छत शोधणे हे आव्हान होतेच. एकट्या स्त्रीसाठी भाड्याचे घर शोधणे म्हणजे दिव्यच. कसेबसे एक घर मिळाले. संघर्ष आणि परिश्रमाचा अध्यायही सुरू झाला. ते दिवस आठवताना सुदेशना सांगतात, ‘‘त्या काळात एकट्या बाईला घर द्यायला कुणीही तयार होत नसे. कसे तरी मला मिळाले. शाळेतून दहा हजार रुपये पगार मिळायचा. घराचे भाडे दिल्यानंतर शिल्लक थोडीच उरत असे. मी हिंमत हरले नाही. इतक्या विपरित परिस्थितीतही कुणासमोर मदतीसाठी हात पसरला नाही.’’

image


दागिने विकण्याची वेळ...

सुदेशना यांनी कॉलेजात शिकतानाच ‘ऑटोकॅड’ तंत्र आत्मसात केलेले होते. शाळा सुटली, की त्या एका मित्राच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉम्प्युटर शिकवायला पार्टटाइम जाऊ लागल्या. मेहनतीच्या बळावर मित्राच्या या इन्स्टिट्यूटमध्ये पुढे भागीदारीही मिळवली. ‘डीजीटेक एचआर’ असे प्रतिष्ठानाचे नवे नामकरणही केले. त्यासाठी जो पैसा आवश्यक होता, तो त्यांनी आपले दागिने विकून उभारला. सुदेशना सांगतात, ‘‘दागिने असतात कशासाठी. अडचणीत उपयोगात यावेत म्हणूनच ना. असो. तर ‘ऑटोकॅड’ आणि ‘स्टायप्रो ट्रेनिंग’ सुरू करणे हे आमच्या कंपनीचे मुख्य ध्येय होते. ते लवकर साध्य व्हावे म्हणून मी शाळेतली नोकरीही सोडली. पुढे लवकरच एक चांगली संधी चालून आली. आमच्याकडूनच प्रशिक्षण घेतलेल्या काही जणांनी सूचवले, की आम्ही आमच्याकडे उपलब्ध कॅड ड्रॉइंग्सच्या हार्ड कॉपींना सॉफ्ट कॉपीत बदलून घ्यावे. अशा पद्धतीने आम्ही डिजिटायझेशनच्या जगात पहिले पाऊल टाकले.’’

ती एक शक्ती, तिची अनंत ध्येयासक्ती

इंजिनिअरिंगचे प्राथमिक ज्ञान नसतानाही सुदेशना आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नवनव्या गोष्टी शिकत गेल्या. २००८ मध्ये ही साधना फळाला आली. रायपूरला एका प्रशिक्षण सत्राच्या निमित्ताने त्या गेलेल्या होत्या आणि तिथे ‘स्टुव्हर्ट अँड लॉइड कंपनी’साठी ‘डिटेल्ड इंजिनिअरिंग प्रोजेक्ट’ तयार करण्याचे काम त्यांना मिळाले.

सुदेशना सांगतात, ‘‘मी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी हाडाची काडे केली. जीव ओतला. अखेर यशस्वीपणे पूर्ण केला. आमच्या कामाने कंपनी जाम खुश झाली. नंतर आम्हाला ‘मॉनेट इस्पात’, ‘जिंदल स्टिल अँड पॉवर’सह कितीतरी कंपन्यांकडून ‘ट्रेनिंग सेमिनार’ची कंत्राटे मिळाली.’’

२०११ मध्ये सुदेशना यांच्या व्यावसायिक कारकिर्दीने एक सुखद वळण घेतले. आपली कंपनी त्यांनी आता प्रायव्हेट लिमिटेड केली. ‘पीएस डीजीटेक एचआर’ असा नामविस्तार केला. नामविस्तारातले ‘पीएस’ म्हणजे ‘प्रोजेक्ट सॉल्युशन.’ नामविस्तारानंतर लगेचच एसीसी सिमेंटसोबत मॉनिटरिंग पार्टनरशिप कंपनीला मिळाली.

आता नजर सीमापार...

इथेच थांबतील त्या सुदेशना कसल्या! आपल्या कंपनीचा डोलारा त्यांनी वाढवतच नेला. आता नजर सीमेपलीकडे होती. कांगारूंच्या देशापर्यंत त्यांची मजल गेली. कंपनीला अगदी वाळवंटातही नेले. कंपनीने ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुबईतही प्रोजेक्ट पटकावले. शेजारधर्मही निभावला. श्रीलंकेत सुनामी वादळामुळे उद्ध्वस्त झालेली रेल्वे लाइन पूर्ण करण्याचा प्रोजेक्टही यशस्वी केला.

सुदेशना सांगतात, ‘‘कामाचा व्याप इतका वाढलाय, की महिन्यातले २० दिवस तर प्रवासातच जातात. मी आता कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आणि चेअरपर्सन अशी दुहेरी जबाबदारी पार पाडतेय. जीवनच कंपनीला समर्पित केलेय म्हणा. मार्च २०१२ मध्ये कंपनीचे वार्षिक उत्पन्न दीड कोटी रुपये एवढे होते. कंपनीची उलाढाल भविष्यात वर्षाला ६० कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे माझे उद्दिष्ट आहे.’’

‘त्याने’ तोडले मन माझे, मी तुडवत गेले वाटा

कधीकाळी नवरा असलेला ‘तो’च आपल्या यशाच्या मुळाशी आहे, असे सुदेशना यांचे म्हणणे. एक एकटी स्त्री आपल्या पावलांवर अन् बळावर पुढे जाऊ शकते. जग जिंकू शकते, हे मला त्याला दाखवून द्यायचे होते. ती जिद्द नसती तर पुढची वाटचालच झाली नसती. जीवनात आलेल्या इतर अडचणींनीही त्यांना पुढच्या वाटा दाखवल्या. ‘तो’ वा अडचणी कुणीही सुदेशना यांना रोखू शकले नाही. सुदेशना म्हणतात, इतके वाइट अनुभव आल्यानंतरही मी माझ्यातला चांगला माणुस मरू दिला नाही. तो नेहमी जिवंत ठेवला.

‘‘ठरवले असते तर शिक्षिकेच्या नोकरीवर मी जगू शकले असते, पण मला नुसते जगायचे नव्हते. स्वत:च्या जगण्याला मला गौरव मिळवून द्यायचा होता. आज मी जे काही मिळवलेले आहे, त्या-त्या सगळ्याच गोष्टी माझा गौरव वाढवणाऱ्या आहेत. मला वाटते माझी मोहीम फत्ते झालेली आहे. अर्थात यशाचे आणखी टप्पेही गाठायचे आहेतच.’’

व्यक्त होताना सुदेशना यांचा उर भरून आलेला असतो. शब्दा-शब्दातून डोकावत असतो स्वाभीमान ‘शक्ती’चा…