एका रूपयाची आरोग्यसेवा !

फाल्गुनी दोशींचा अनोखा उपक्रम

0

फाल्गुनी दोशी यांनी होम सायन्स इन टेक्स्टाईल डिझाइनिंगची पदवी घेतली होती. त्यांचं लग्न बडोद्याच्या एका उद्योगपतींसोबत झालं होतं. पण फाल्गुनी यांना नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात त्यांना इतका वेळ मिळत नव्हता की त्यांना त्यांची ही इच्छा पूर्ण करता येईल. त्यांची मुलं जेव्हा मोठी झाली, तेव्हा कुठे त्यांना स्वत:साठी थोडाफार वेळ काढता आला. समाजासाठी काहीतरी करण्याच्या त्यांच्या इच्छेसाठी त्यांना या वेळाचा वापर करता आला. आणि त्यांनी त्यांची इच्छा फक्त पूर्णच केली नाही, तर खूप सा-या लोकांना आनंदीही केलं.

फाल्गुनी दोशी
फाल्गुनी दोशी

याची सुरुवात झाली ती फाल्गुनी यांच्या एका मैत्रिणीच्या घरापासून. फाल्गुनी एकदा त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी गेल्या होत्या. सहजच गप्पा मारता मारता त्यांना घराच्या एका कोप-यात थोडं सामान दिसलं. सामानाचा वापर ब-याच दिवसांपासून केला गेला नव्हता हे सहज लक्षात येत होतं. एक व्हील चेअर होती, काठी, चालण्यासाठी मदत व्हावी म्हणून वापरण्यात येणारा वॉकर असं काहीसं सामान तिथे होतं. मैत्रिणीकडे चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की हे सामान तिच्या आजीचं आहे, आणि आजी आता या जगात नाही. या सामानाचं आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्या मैत्रिणीला सतावत होता. आणि अचानक फाल्गुनी यांना एक भन्नाट कल्पना सुचली. हे वापरात नसलेलं सामान पुन्हा वापरात येईल आणि इतरांच्या कामी येईल असं काहीतरी करता येईल का याचा विचार फाल्गुनी करू लागल्या. ज्यांना अशा सामानाची आवश्यकता असेल, त्यांना हे सामान काही कालावधीसाठी मोफत देण्याचा विचार फाल्गुनींनी केला. कल्पना तर उत्तम होती,  आता फक्त अंमलबजावणी करायची होती. फाल्गुनी आणि त्यांच्या मैत्रिणीनं मिळून मग त्यांच्या या कल्पनेविषयी अर्थात ‘फ्री रेंट ऑर्थोपेडिक’विषयी लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांची ही अनोखी सेवा प्रसिद्ध झाली. मग फाल्गुनी आणि त्यांच्या मैत्रिणीनं अजून काही जुनं आणि नवं सामान विकत घेतलं आणि लोकांना त्यांच्या गरजेनुसार काळासाठी मोफत हे सामान द्यायला सुरुवात केली.

ही अनोखी सेवा सुरु केल्यानंतर फाल्गुनी आणि त्यांच्या मैत्रिणीला एक वेगळीच गोष्ट समजली. अनेकदा त्यांनी मोफत वापरण्यासाठी दिलेलं सामान बिघडलेल्या किंवा वाईट अवस्थेत परत यायचं. मग त्यांच्या लक्षात आलं की लोकांना कितीही महाग वस्तू असली, तरी मोफत दिली तर त्याची किंमत रहात नाही. तेव्हापासूनच त्यांनी हे सगळं सामान एक रूपया प्रतिदिन भाड्यानं द्यायला सुरुवात केली. यातून जो पैसा यायचा, त्याचा वापर आणखी नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी केला जात असे. आपल्या या आगळ्या वेगळ्या सेवेची जाहिरात त्यांनी जवळच्या ऑर्थोपेडिक रूग्णालयातही लावली. अधिकाधिक लोकांना या सेवेचा फायदा व्हावा हा त्यामागचा हेतू होता.

एका रूपयाची आरोग्यसेवा !
एका रूपयाची आरोग्यसेवा !

फाल्गुनी यांची मैत्रिण काही खाजगी कारणांमुळे या प्रकल्पामधून बाहेर पडली. मात्र त्यामुळे न थांबता फाल्गुनी यांनी ही सेवा अशीच सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. आज फाल्गुनी यांच्या या समाजसेवी कंपनीमध्ये १०० हून अधिक आरोग्यसेवेशी संबंधित उपयोगी वस्तू आहेत. ज्यामध्ये टॉयलेट चेअर्स, स्टीक्स(काठी), क्रचेस(कुबडी), वॉकर्स, एअर बेड्स, हॉस्पिटल बेड्स अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्यामते या वस्तू त्या कोणत्याही नफ्यासाठी भाड्याने देत नाहीत. तर गरजूंना मदत व्हावी म्हणून देतात. असं केल्यामुळे त्यांना लोकांचे आशीर्वाद मिळतात आणि मोठं मानसिक समाधान मिळतं.

फाल्गुनी म्हणतात, “प्रत्येक वेळी नवीन वस्तू घेण्याऐवजी जर लोकांनी या वस्तू भाड्यानं ठराविक काळासाठी घेतल्या तर त्यांना आयुष्यभर त्या सांभाळाव्या लागत नाहीत. कारण वापर झाल्यानंतर त्या वस्तू लोकं परतही करू शकतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्यावर आर्थिक भारही पडणार नाही.” काहीसं आठवत फाल्गुनी म्हणतात, “जेव्हा माझ्या आईला अशा काही वस्तूंची आवश्यकता होती, तेव्हा माझ्या भावानं माझ्याकडून या वस्तू एक रूपया प्रतिदिन अशा भाड्यानं घेतल्या. माझ्या आईनं या वस्तू दीड वर्ष वापरल्याही, पण दुर्दैवानं माझ्या आईचं निधन झालं.” फाल्गुनी सांगतात की यानंतर त्यांच्या भावानं फक्त भाड्याचेच पैसे दिले नाहीत तर त्यांनी फाल्गुनी यांना २५ हजार रूपये दिले आणि ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणाही दिली.

ही अनोखी पण आवश्यक सेवा पुरवून फाल्गुनी यांनी समाजात स्वत:ची अशी एक ओळख बनवली. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अनेक गरजू व्यक्तींचं प्रेम मिळवलंय..

Related Stories

Stories by Pravin M.