"प्रत्येक तरुणामध्ये एखादे काम उत्तम तर्‍हेने करण्यासाठी जर काही गरजेचे असेल तर ते म्हणजे तीव्र इच्छाशक्ती"

0

“जर तुम्हाला खरेच देशासाठी, समाजासाठी काही करायचे असेल, तर फक्त एकदाच स्वत:भोवती नजर फिरवा. त्यावेळी अनेक समस्या दिसून येतील. त्यापैकीच एखादी समस्या निवडा आणि त्यावर असे काही काम करा की जगाने त्याची नोंद घ्यावयास हवी. मात्र हे काम करतानाही कधीच गुणवत्तेशी तडजोड करु नका. आज येथे उपस्थित असणार्‍या व्यक्तींसोबतच इतरही अनेक गुणवान लोकांच्या कार्यापासून प्रेरणा घ्या. त्या प्रेरणेमधूनच तुम्हाला उत्कृष्ट काम करण्याची दिशा मिळेल.” अशी भावना इंदौर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा.ऋषीकेश कृष्णन यांनी व्यक्त केली.


माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूह व भारत अस्मिता फौंडेशन, पुणेतर्फे दिल्या जाणार्‍या यंदाच्या ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ स्वीकारल्यानंतर प्रा. कृष्णन बोलत होते.

व्यवस्थापन अध्यापनाच्या क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल इंदौर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्रा.ऋषीकेश कृष्णन यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’, पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृती करणारे व सिव्हिल सोसायटी मॅगेझिनचे सह-संस्थापक  उमेश आनंद व श्रीमती. रिटा आनंद यांना ‘भारत अस्मिता जनजागरण श्रेष्ठ पुरस्कार’, आपल्या सुमधुर वीणावादनाच्या माध्यमातून श्रोत्यांना आनंद देण्याबरोबरच ज्ञान आणि मनोरंजनाच्या संगमातून कलाकृती सादर करीत संगीतातून लोकजागृती करणारे सुप्रसिध्द वीणावादक पंडीत विश्‍व मोहन भट्ट यांना ‘भारत अस्मिता जन-जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ आणि विज्ञान-तंत्रज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून समाजविकासाला हातभार लावणारे, मूव्हिंग अ‍ॅकॅडमीचे संस्थापक, कर्करोगतज्ञ व सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. माधव जी. देव यांना ‘भारत अस्मिता तंत्र-विज्ञान श्रेष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. स्मृतिचिह्न व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते.


जगद्विख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर आणि विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या उपस्थितीत भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष व भारत अस्मिता फाऊंडेशनचे समन्वयक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे संचालक प्रा.डी.पी.आपटे, मिटसॉम कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर.एम.चिटणीस, आदि मान्यवर उपस्थित होते.


डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ 2017 हे वर्ष विकासाचे वर्ष म्हणून पाहिले जात आहे. मात्र हा विकास सर्वसमावेशक हवा. सर्वांना सोबत घेऊन चालणारा हवा. 2016 चे वर्ष हे फुटीरतावादी वर्ष राहिले आहे. आज जगात ग्लोबल वॉर्मिंग सारख्या अनेक प्रकारच्या समस्या उभ्या आहेत. त्यासाठी आपल्या मध्ये वैश्‍विक दृष्टीकोन हवा. ”

डॉ. विजय भटकर म्हणाले, “भारत अस्मिता हे एक असे माध्यम आहे ज्याद्वारे अनेक उत्कृष्ट व्यक्तीं एकत्र येतात. आज विद्यार्थ्यांनी या खर्‍या अर्थाने उत्कृष्ट असणार्‍या व्यक्तींच्या मार्गावरुन चालणे गरजेचे आहे. हा मार्ग खडतर असला तरी त्याचा अंगीकार करणे योग्य ठरेल. ”

उमेश आनंद व श्रीमती. रिटा आनंद म्हणाले, “ आज पत्रकार असणे हे जणु बिझनेसमन असल्यासारखेच आहे मात्र मी हाडामांसाचा पत्रकार असल्याचा मला अभिमान आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातून समाजासाठी काहीतरी करावयाच्या उद्देशाने आम्ही सिव्हिल सोसायटी मॅगेझिनची स्थापना केली. पत्रकारिता हे एक विशेष क्षेत्र आहे जिथे तुम्ही लोकांना तसुभरही कल्पना नसलेल्या गोष्टींची माहिती त्यांना देता. तुम्ही या पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांना जागृत करता. आज जग सर्वच क्षेत्रात फार पुढे जात आहे. त्याचा विकास व प्रगती होत आहे. मात्र आजही आपल्या समाजामध्ये ज्ञानाची कमतरता आहे. जेव्हा ज्ञानाची कमतरता घालवण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला जाईल, त्या क्षणी लोकशाही खर्‍या अर्थाने परिपूर्ण होईल. ”


पं. विश्‍व मोहन भट्ट म्हणाले, “ भारत हा आपला देश आहे. तो महान आहे. भारतीय अस्मितेचे रक्षण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपला भारत देश हा परंपरा व संस्कारांचा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो. शिक्षणक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे. त्यामुळे आपला देश जगामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रात चांगल्या स्थानावर आहे. ”आय लव्ह इंडिया या गाण्याने त्यांनी सर्व तरूणांची मने जिंकून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली.

डॉ. माधव देव म्हणाले, “ आजच्या तरुण पिढीने चौकटीबाहेर जाउन विचार करणे गरजेचे आहे. सर्जनशीलता ही नेहमीच ज्ञानापेक्षा उच्च स्तरावर असते. ज्ञान असूनही त्याचा सर्जनशिलतेने वापर न करनार्‍यांच्या ज्ञानाचा उपयोग शून्य असतो. आज समाजात जे काही सुरु आहे त्याच्या विरोधात आपण एकटे लढू शकत नाही. एकटे लढणे म्हणजे आपणं आपला वेळ वाया घालविण्यासारखे आहे. म्हणून आपण संघभावनेने काम केले पाहिजे. स्वत:चे काम व्यवस्थित, प्रामाणिकपणे करा. त्याचा नक्कीच उपयोग होईल. आज आपल्या देशात ज्ञानाचे भंडार आहे. त्यामुळे भारत सर्जनशीलतेची राजधानी बनणे अपेक्षित आहे. मात्र ते जरी आज घडले नाही तरी त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.”


प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाला आपल्या देशात फार महत्त्व आहे. काही लोकांनी त्याकडे पाश्‍चात्यांच्या प्रभावामुळे अंधश्रद्धा म्हणून पाहिले. येथेच आपली मोठी चूक झाली. त्यामुळे किमान आजच्या तरुइणाईने तरी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक असणार्‍या वेद- उपनिषदे-पुराणांकडे अंधश्रद्धा म्हणून पाहू नये. भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कारांच्या द्वारे भारतीय तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागविण्याचा आमचा अल्पसा प्रयत्न आहे. ”