घरगुती कामांकरिता सहाय्यक पुरवणारी ʻHelper4Uʼ

घरगुती कामांकरिता सहाय्यक पुरवणारी ʻHelper4Uʼ

Sunday November 15, 2015,

6 min Read

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।

श्रीमद्भगवतगीतेतील हा श्लोक मीनाक्षी गुप्ता यांच्या सफलतेचा मूलमंत्र आहे. या श्लोकातील साराचे त्या आपल्या आयुष्यात काटेकोरपणे पालन करतात. आपल्या मार्गात येणाऱ्या आव्हानांचा त्यांनी कायम नेटाने सामना केला आहे आणि त्यांना पार करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचे कुटुंब दिल्ली सोडून मुंबई येथे स्थायिक झाले, तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी उद्योग व्यवसायात आपले नशीब आजमाविण्याचा विचार केला. मीनाक्षी सांगतात की, ʻदिल्लीमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा माझा लहान भाऊ कीबोर्ड वाजविण्याचे प्रशिक्षण घेत होता. जेव्हा आम्ही मुंबईत स्थायिक झालो, तेव्हा या नव्या शहरात आम्ही पूर्णतः अनोळखी होतो. अशा परिस्थितीत कीबोर्डचे प्रशिक्षक शोधणे, आमच्यासाठी कठीण काम होते.ʼ मात्र या अडचणीमधूनच त्यांना नव्या व्यवसायाची कल्पना सुचली. सर्व क्षेत्रातील प्रशिक्षकांची माहिती देणारी एक ऑनलाईन डिरेक्टरी त्यांनी तयार केली. अशा पद्धतीने जवळपास दीड वर्षापूर्वी ʻClickForCoachʼचा (क्लिक फॉर कोच) जन्म झाला. या डिरेक्टरीमध्ये शैक्षणिक,क्रीडा आणि छंद वर्गांच्या प्रशिक्षकांचादेखील समावेश करण्यात आला आहे. वापरकर्त्यांना फक्त लॉगिन करायचे असून, त्यानंतर वापरकर्ते आपला परिसर, वेळ, प्रशिक्षण शुल्क आणि अन्य परिमाणांच्या आधारे योग्य त्या प्रशिक्षकाचा शोध घेऊ शकतात. सध्या त्यांनी आपला सर्व वेळ आणि लक्ष ʻHelper4Uʼ (हेल्पर४यू) वर केंद्रीत केले आहे. हे एक असे व्यासपीठ आहे, जे वापरकर्त्यांना आपले घर आणि कार्यालयासाठी सहाय्यक शोधण्यास मदत करते. मीनाक्षी सांगतात, ʻविशेष करुन एबीसीडी म्हणजेच आया, बाई, कूक आणि ड्रायव्हर आणि तेदेखील फक्त इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून. हे तांत्रिक माध्यम समाजातील सर्वात कनिष्ठ स्तरातील लोकांनादेखील कोणा मध्यस्थाशिवाय नोकरी देण्यास मार्गदर्शक ठरते.ʼ वेगळ्या पद्धतीत सांगायचे तर, स्पेक्ट्रममधील दोन टोकांना जोडणाऱ्या एका नलिकेची भूमिका हे माध्यम बजावते.

image


मुंबईतील पवई परिसर हा कायम उंचच उंच इमारतींमुळे प्रसिद्ध राहिला आहे. तेथील स्थानिकांना कायम आपल्या घरासाठी मदतनिसांची गरज असते. नोकरीच्या शोधार्थ वणवण करणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिला पूर्णपणे मध्यस्थ्यांवर अवलंबून होत्या. याशिवाय ओळखीच्या सुरक्षा रक्षकांवरदेखील त्या घरकामासाठी अवलंबून असायच्या. हाच एक मुख्य मुद्दा होता, जो मीनाक्षी यांना कायम त्रस्त करत होता. अशा महिलांना कोणा मध्यस्थ्यांच्या मदतीशिवाय काम मिळवून देण्याची त्यांची इच्छा होती. या दिशेने प्रयत्न करताना त्यांनी ʻMaid4Uʼ (मेड4यू) सुरू केले. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या महिलांनी तेथे नोंदणी केली. मात्र काही काळानंतर यावर नोंदणी करण्यासाठी पुरुषांनीदेखील विनंती केली. अशापद्धतीने शुभारंभाच्या अगोदरच त्यांना ʻMaid4Uʼ कल्पना बदलून तिला ʻHelper4Uʼचे स्वरुप द्यावे लागले.

मीनाक्षी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर हे सर्व साध्य केले. त्यांचे वडिल सशस्त्र दलासोबत अभियंते म्हणून कार्यरत होते. अनेकदा त्यांची बदली अशा ठिकाणी होत होती, जेथे परिवाराला सोबत घेऊन जाणे अशक्य होते. अशा परिस्थितीत त्यांच्या आईने मीनाक्षी आणि त्यांच्या भावाचे पालनपोषण केले. त्या सांगतात, ʻअशा परिस्थितीमुळे लहान वयापासूनच आम्हाला घराच्या देखभालीसाठी आईला मदत करावी लागत असे. त्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो आणि सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम झालो. आम्हाला कधीही असे वाटले नाही की, एखादे काम आम्ही करू शकत नाही.ʼ वडिलांच्या नोकरी निमित्ताने कायम कराव्या लागणाऱ्या स्थलांतरणाने त्यांची नव्या जागेशी आणि लोकांशी ओळख होऊ लागली. त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात त्या यशस्वी होऊ लागल्या. त्यांचे अधिकतम शिक्षण केंद्रीय विद्यालयात पूर्ण झाले आहे. आठवीत असताना पहिल्यांदा त्या खासगी शाळेत दाखल झाल्या. एका इंग्रजी माध्यमाच्या कन्या विद्यालयात मीनाक्षी यांना दाखल करण्यात आले, जेथे अधिकतम विद्यार्थी श्रीमंत कुटुंबातील होते. ʻमला अजूनही तेथे माझा झालेला अपमान आठवतो. मला अस्खलित इंग्रजी बोलता येत नव्हते, त्यामुळे सुरुवातीच्या दिवसात माझा अनेकवेळा अपमान झाला.ʼ, असे मीनाक्षी सांगतात. मात्र त्यांनी या परिस्थितीला एका आव्हानाप्रमाणे घेतले. त्यानंतर खेळ, शिक्षण आणि अन्य उपक्रमांमध्ये आपली चमक दाखवण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्या एक चांगल्या खेळाडू सिद्ध झाल्या आणि बास्केटबॉलच्या संघात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या. त्यामुळे शाळेत त्या लोकप्रिय ठरत होत्या. आता शाळेतील सर्वजण त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी इच्छुक होते. ʻमी शाळेत शैक्षणिकबाबतीत अव्वल विद्यार्थ्यांमध्ये एक होती. त्यामुळे मी माझ्या शिक्षकांचीदेखील आवडती विद्यार्थिनी होती. या अनुभवावरुन मी हे शिकले की, जर तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने केले तर अधिकाधिक लोकांकडून सन्मान मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. आजही माझी हीच उत्कट भावना मला माझे काम अधिक चांगले करण्यासाठी प्रेरणा देते.ʼ, असे त्या सांगतात. फक्त तीन गुण कमी मिळाल्याने दिल्लीतील वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यापासून त्या वंचित राहिल्या. त्यानंतर त्यांना जाणीव झाली की, तुम्हाला जे काही मिळवायचे आहे, त्यासाठी थोडासा अतिरिक्त प्रयत्न करणे किती महत्वाचे आहे. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून भाषा विज्ञान (लिंग्विस्टीक) विषयातून एम.फिल केले. त्यानंतर अनेकवर्षे दिल्लीतील एका शाळेत प्रशिक्षकाचे काम केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट प्रशिक्षक (कॉर्पोरेट ट्रेनर) म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वेळेनुसार आपल्यात बदल करत त्या दिवसेंदिवस अधिक विकसित होत गेल्या आणि एका प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय विस्तार व्यवस्थापक (बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर) म्हणून काम करणे सुरू केले. त्यानंतर त्या एनआयआयटीमध्ये प्रकल्प व्यवस्थापक (प्रोजेक्ट मॅनेजर) म्हणून रुजू झाल्या. टाटा इंटरएक्टिव्ह सिस्टम्समध्ये लीड इन्स्ट्रक्शनल डिझायनर म्हणून त्यांनी अखेरची पूर्णकालीन नोकरी केली. त्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला.

image


ʻHelper4Uʼ वर कुत्रा फिरवणाऱ्यापासून ते अंशकालीन नोकरीच्या शोधार्थ असलेल्या सहाय्यकांसाठी, कुरीयर बॉय, इलेक्ट्रीशियन, रुग्णांची सेवा करणारे तसेच अन्य श्रेणीतील लोकांसाठी नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ʻआज आम्ही अशा प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करण्यासाठी तयार आहोत, जे अशिक्षित आहेत किंवा काही कारणास्तव आपले शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत. किमान पदवीपर्यंतचे शिक्षण किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेल्या लोकांची नोंदणी करुन घेऊन आम्हाला आमचे लक्ष विचलित करायचे नाहीʼ, असे मीनाक्षी सांगतात. वापरकर्ते या संकेतस्थळावर जाऊन नोकरी करू इच्छिणाऱ्या लोकांचे प्रोफाईल पाहू शकतात. या संकेतस्थळावरील कोणाची त्यांना माहिती हवी असल्यास एक निर्धारित शुल्क भरल्यानंतर ते त्या व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवू शकतात. हे शुल्क एकदाच आणि ठराविक वेळेकरिता आकारण्यात येते. नोकरीच्या शोधार्थ असलेल्या लोकांच्या नोंदणीसाठी त्यांनी संपूर्ण शहरात फलक लावले आहेत. याशिवाय स्थानिक युवकांना आपल्यासोबत जोडून अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मीनाक्षी उत्पादनाच्या कल्पनेव्यतिरिक्त संचालन, विपणन आणि प्रसिद्धीचे काम पाहतात. त्यांचे पती जे एक आयआयटी-आयआयएचे पदवीधारक आहेत, ते संघाची रणनीती आणि दिग्दर्शनाचे काम पाहतात. त्यांचा उर्वरित संघ मुक्त कर्मचाऱ्यांच्या (फ्रीलान्सर) विश्वासावर चालतो, जे लोक नोकरीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी कॉल सेंटरचे काम पाहतात. मीनाक्षी सांगतात की, ʻयाशिवाय आम्ही लघुउद्योगांकरिता त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतो. त्याबदल्यात आम्ही त्यांच्याकडून कमी शुल्क वसूल करतो.ʼ

एक उद्योजक म्हणून त्यांना आर्थिक नियोजनापासून ते आपले काम करण्यासाठी लोकांचा शोध घेणे, यासारख्या सर्व आव्हानांचा सामना करावा लागतो. कौशल्यहिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगली आणि सन्मानजनक नोकरी मिळवून देणे, हे मीनाक्षी यांचे ध्येय आहे. ʻनोकरी मिळाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला होणारा आनंद विशेष करुन अशा व्यक्तीला ज्याला आपल्याला नोकरी मिळेल, अशी अपेक्षादेखील नव्हती आणि त्याने मानलेले आभार, हे खूप सकारात्मक असते. आमच्याकडे अशा अनेक यशस्वी गोष्टी आहेत, ज्यामुळे आम्ही योग्य दिशेने काम करत असल्याचा आम्हाला विश्वास वाटतोʼ, असे मीनाक्षी सांगतात. आपल्या या पोर्टलचे रुपांतर ʻनौकरीडॉटकॉमʼमध्ये करण्याची मीनाक्षी यांची इच्छा आहे. ज्यामुळे नोकरीच्या शोधार्थ असलेल्या कुशल, अकुशल लोकांना एक चांगले व्यासपीठ मिळू शकेल. जसजशी मीनाक्षी यांच्या संकेतस्थळाची किर्ती सर्वदूर पसरत आहे, तसतसे मुंबई आणि पुण्यातील लोक त्यांना संपर्क करत आहेत. त्याशिवाय त्यांना दिल्ली आणि बंगळूरू येथुनदेखील फोन येत असून, तेथील नागरिक सहाय्यकांची मागणी करत आहेत. ʻसध्या आम्ही मुंबई आणि पुण्यात आमची सेवा पुरवत आहोत. भविष्यात आम्ही हैदराबाद येथेदेखील सेवा पुरवणार आहोतʼ, असे मीनाक्षी सांगतात.