वयाच्या १० व्या वर्षी लग्न, २० व्या वर्षी ४ मुलं, ३० व्या वर्षी एका संस्थेची स्थापना...... आता २ लाख स्त्रियांचा विश्वास ‘फूलबासन’

0

एक आदिवासी स्त्री जिला दोन वेळच्या जेवणाची सुद्धा भ्रांत होती ती आज अनेक लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. ज्या स्त्रीचे लग्न वयाच्या १० व्या वर्षी झाले आज ती स्वतः बालविवाहाच्या विरोधात समाजाशी लढा देत आहे. गरिबीमुळे या समाजाने तिची नेहमीच उपेक्षा केली पण आज तोच समाज तिच्या बरोबर उभाच नाही तर तिच्या एका हाकेवर धावण्यासाठी तत्पर असतो. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील सुकुलदैहान गावातील फुलबासन यादव फक्त राजनांदगाव जिल्ह्यातच नाहीतर पूर्ण छत्तीसगड मध्ये महिला सशक्तीकरणाची रोल मॉडेल ठरल्या आहेत.


आर्थिक परिस्थिती नाजूक असून सुद्धा फुलबासन यांनी बऱ्याच प्रयत्नांनी ७ वी पर्यंतचे शिक्षण घेतले. वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा विवाह शेजारील गावात राहणाऱ्या चंदुलाल यादव यांच्याशी झाला. वयाच्या १३ व्या वर्षी त्या सासरी आल्या. त्यांचा नवरा चंदुलाल हा गुराखी होता त्यांच्याकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे ते तसेच बेरोजगारच होते, म्हणून त्यांचे उत्पन्न हे मर्यादित होते. अशा कठीण परिस्थितीत दोन वेळेच्या जेवणाची सुद्धा मारामारी असायची. फूलबासन यांच्या कुटुंबाला उपासमारीची नित्य सवय झाली होती, त्याची गिनती ठेवणेसुद्धा आता कठीण झाले होते. जेव्हा पोटाला अन्न आणि शरीर झाकायला वस्त्र नसायची तेव्हा पायात चप्पल असणे तर दुरापास्तच होते. अशा निर्वाणीच्या होणाऱ्या निर्वाहात त्यांना २० व्या वर्षापर्यंत चार मुले झाली.


गरीबांचा कोणीही आश्रयदाता नसतो याचा अनुभव फूलबासन यांना चांगल्या प्रकारे आला होता. लोक मदत करण्याऐवजी त्यांच्या गरिबीची खिल्ली उडवीत असत. अशा हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत होणाऱ्या जीवनात त्यांची मुले जमिनीवर भुकेमुळे रडून विलाप करीत असत. तेव्हा फूलबासन यांनी असे काही करण्याचा निर्धार केला की आज त्या सगळ्यांसाठी एक रोलमॉडेल बनल्या आहेत. फूलबासन यांनी दिवस-रात्र उन-वाऱ्याची पर्वा न करता सन २००१ मध्ये ‘मां बम्बलेश्वरी स्व-सहाय्यता समूह’ या संस्थेची स्थापना केली. यासाठी त्यांनी २ मुठ तांदूळ व २ रुपये याने सुरुवात करून ११ स्त्रियांचा एक गट तयार केला. या मोहिमेला गावातल्या लोकांनी तसेच त्यांच्या नवऱ्याने पण विरोध केला. आपल्या नवऱ्याच्या या विरोधामुळे फूलबासन यांना बऱ्याचवेळा रात्री घराबाहेर थांबावे लागले पण ज्यांच्याजवळ हिम्मत आणि साहस असते तेच समाजात वेगळे स्थान प्राप्त करू शकतात. म्हणूनच आज राजनांदगाव जिल्ह्यातील सगळ्या गावात फूलबासन यांच्या महिला संघटना आपल्याला बघायला मिळतात. ही संघटना महिलांना स्वावलंबी बनवण्याबरोबरच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे काम करतात.


अभ्यास, चांगुलपणा आणि स्वच्छतेच्या विचारसरणी बरोबरच फूलबासन स्त्रियांसाठी लोणचे, पापड बनविण्याचे फक्त प्रशिक्षणच देत नाहीतर बम्बलेश्वरी ब्रांडच्या नावाने तयार लोणची छत्तीसगडच्या ३०० पेक्षा जास्त जागेंवर विकली जातात. फूलबासन यांनी स्त्रियांना सायकल चालविण्याचे प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केले आहे. यामागचा मूळ उद्देश म्हणजे स्त्रियांमध्ये एक आत्मविश्वास जागृत होऊन त्या सामाजिक कुप्रथेविरुद्ध लढू शकतील. त्यांच्या या विचारसरणीला तेव्हा पाठींबा मिळाला जेव्हा ग्रामीण स्त्रियांनी गावातल्या लोकांच्या दारूच्या नशेला बघून दारूबंदीच्या आंदोलनाचा निर्णय घेतला. आजपण ८ मार्चला महिला दिनानिमित्त या स्त्रिया एक दिवसाचा उपवास करून निषेध नोंदवतात तसेच गावोगावी जाऊन दारूबंदीचा कार्यक्रम आयोजित करतात ज्यात फक्त महिलांचाच सहभाग असतो. हा फूलबासन यांच्या मोहिमेचाच परिणाम आहे की त्यांच्या आंदोलनामुळे ६५० पेक्षा जास्त गावात दारूविक्री बंद झाली आहे. तसेच ६०० अशी गावे आहेत जिथे बालविवाह पूर्णपणे बंद झाले आहेत.


आज फूलबासन यांच्या समूहात २ लाखांपेक्षा जास्त स्त्रिया सहभागी आहेत आणि या संस्थेने सरकारी मदतीशिवाय २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे जिचा वापर त्या सामाजिक कामासाठी करतात. ही संस्था गरीब मुलींच्या लग्नाव्यातिरिक्त त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अल्प व्याजावर शेती, कोंबडीपालन, बकरीपालन आणि रोजगाराच्या इतर साधनांसाठी त्यांना कर्ज पण देतात. फूलबासन यांच्या निर्धाराने तसेच मेहनतीने शासनाच्या मदतीशिवाय सन २००१ पासून त्या स्वच्छता अभियान निशुल्क चालवीत आहेत. लवकरच छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील चौकी ब्लॉक असा पहिलाच भाग असेल जिथे प्रत्येक घरात स्वच्छतागृहाची व्यवस्था असेल. यासाठी मां बम्बलेश्वरी जनहितकारी समिती विशेष मोहीम राबवून लोकांना जागृत करीत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आजूबाजूच्या इतर ब्लॉक मधून आलेल्या जवळजवळ २०० स्त्रिया इथे श्रमदान करीत आहेत जेणेकरून प्रत्येक घरात स्वच्छतागृह बनविले जाईल. फूलबासनच्या या गुणवत्तेला बघून भारत सरकारने सन २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. ज्यानंतर फूलबासन यांना वाटते की त्यांची समाजाप्रती असलेली जबाबदारी आणखी वाढली आहे.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे