‘व्हॉइस 4 गर्ल्स’, आवाज मुलींचा!

‘व्हॉइस 4 गर्ल्स’, आवाज मुलींचा!

Friday November 06, 2015,

4 min Read

जगभरातील ३७० लिंग विशेषज्ञांनी मिळून एक सर्व्हेक्षण केले. त्यात महिलांसाठी राहण्यालायक नसलेल्या अग्रक्रमाच्या २० देशांत भारताचा क्रमांक सर्वांत वरचा लागला. महिलांना आहार, विहार, संधी, अधिकार अशा सर्वच बाबतीत जिथे दुय्यम स्थान मिळते, अशा देशांमध्ये भारताची आघाडी असावी ही जितकी दुर्दैवी तितकीच लाजिरवाणी गोष्ट आहे. महिला सशक्तीकरणाची आपल्या देशात किती आवश्यकता आहे, हे यातून लक्षात येते. २०११ नंतर याच दिशेने सतत प्रयत्नशिल असलेल्या VOICE 4 Girls (‘व्हॉइस 4 गर्ल्स’ने) देशभरातील १५०० तरुण मुलींना स्वावलंबनाचे धडे दिले. स्वत:ची ओळख पटवून दिली. आत्मविश्वास बिंबवला. देशातील महिलांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाउल ठरले आहे.

सामाजिक उद्यमाच्या क्षेत्रात IDEX फेलोशिप करायला अमेरिकेहून भारतात आलेल्या ४ जणींनी ‘व्हॉइस 4 गर्ल्स’ची स्थापना २०१० मध्ये केली होती. या तिन्ही अमेरिकन महिला त्यावेळी हैदराबादेतील एका गरिब वस्तीतील लहानशा खासगी शाळेत मार्गदर्शक म्हणून काम करत होत्या. २०११ च्या जानेवारी महिन्यात जगप्रसिद्ध नाइके फाउंडेशन ने IDEX फेलोशिपची प्रायोजक असलेल्या ‘ग्रे मॅटर्स कॅपिटल’शी संपर्क केला आणि भारतातील अल्प उत्पन्न गटातील मुलींसाठी इंग्रजी भाषेचे उन्हाळी शिबिर आयोजित करण्याचा आपला हेतू कळवला. IDEX फेलो ॲवेरिल स्पेन्सर, ॲलिसन ग्रोस आणि इलियाना सुशॅन्स्की यांनी ही संधी साधली आणि शिबिरांसाठी पुढे स्वत:ला झोकून दिले.

image


‘व्हॉइस 4 गर्ल्स’च्या संचालिका स्पेन्सर सांगतात, ‘‘आमचे संशोधन कार्य सुरू होतेच. अल्प उत्पन्न गटातील भारतीय मुली या शिबिराच्या निमित्ताने संपर्कात आल्या. मुलींशी बोलताना लक्षात आले, की त्यांच्यात अगदी आवश्यक असलेल्या माहितीचाही अभाव आहे. आरोग्य, सुरक्षितता याबद्दलची जागरूकता त्यांच्या ठायी जवळपास नाहीच.’’ उदाहरण म्हणून त्यांनी एक़ा नुकत्याच पदर आलेल्या मुलीचा दाखला दिला. पहिल्यांदा जेव्हा या मुलीला ऋतुस्त्राव झाला, तिला वाटले आपल्याला कँसर झालेला आहे. एकतर आपण मरणार आहोत किंवा मग इलाजाला फार पैसे लागतील म्हणून तिने गरिब आई-बाबांनाही ही गोष्ट सांगितली नाही. स्पेन्सर म्हणतात, ‘‘मग आम्ही ठरवून टाकले, की आपण आपल्या पातळीवर मुलींमध्ये जागरूकता आणण्याचे प्रयत्न सुरू करायचे. जेणेकरून या मुलीसारखा अनुभव अन्य कुणाच्या वाट्याला येऊ नये. ऋजुस्वला होण्याची सुरवात हा एक अत्यंत अवघड अनुभव असतो. यादरम्यान तुमचे शरीर ज्या अवस्थेतून जात आहे, त्या अवस्थेबद्दल तुम्हालाच माहिती नसणे जोखमीचे ठरू शकते.’’

image


भारतामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात महिलांसोबत ठळकपणे लक्षात येईल इतपत भेदभाव केला जातो. इतकी विपरित परिस्थिती असतानाही इथल्या दारिद्रयनिर्मूलनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडू शकतील, इतकी क्षमता भारतीय मुली आणि महिलांमध्ये आहे. नाइकेचे गर्ल इफेक्ट कँपेन हेच ‘व्हॉइस 4 गर्ल्स’चेही प्रायोजक आहे. गरिबीचे दुष्टचक्र भेदून या वर्गातील मुलींसह विविध उपक्रम गर्ल इफेक्ट कँपेन राबवते आहे. अल्प उत्पन्न गटातील मुलींना जर इंग्रजी, आर्थिक साक्षरता, आरोग्य आणि महिलांविषयी शिक्षण दिले गेले तर या मुली पुढे जाऊन समाजातील महिलांच्या स्थितीत एक चांगला बदल घडवून आणू शकतील. आपल्या कुटुंबीयांचा महिलाविषयक दृष्टिकोन बदलण्यात तसेच लग्न होऊन सासरी गेल्यानंतर तिथल्या मंडळीचा दृष्टिकोन बदलण्यात व पुढे आणखी पुढल्या पिढ्यांमध्येही महिला सशक्तीकरणाचे वारे वाहते नेण्यात या मुली मोठी भूमिका बजावतील.

image


मे २०११ मध्ये ४ आठवड्यांच्या उन्हाळी शिबिराला सुरवात झाली. आरोग्य, पोषण, स्वच्छता, प्रसूती, महिला हक्क आणि अभिव्यक्तीसारख्या विषयांबद्दल मार्गदर्शन तसेच इंग्रजी भाषा व संभाषण कौशल्याचे धडे यातून देण्यात आले. अशा शिबिरांचे आयोजन लहानसहान खासगी शाळांकडून आपल्या विद्यार्थिनींसाठी केले जाते. तरुण महिला तज्ज्ञ तसेच शिक्षिका या शिबिरांचे संचलन करतात. मुलींमधल्या नेतृत्व आणि शिक्षण क्षमतांनाही या शिबिरांतून वाव दिला जातो. ‘व्हॉइस 4 गर्ल्स’ ज्या शाळेसमवेत शिबिर राबवते, त्या शाळेच्या गरजाही लक्षात घेते.

‘व्हॉइस 4 गर्ल्स’ने हैदराबाद आणि उत्तराखंडमधील शाळांतून शिबिरे आयोजित केलेली आहेत. आता मुंबईतही अश्याच प्रकारचे आयोजन सुरू आहेत. सुरवात झाली तेव्हा ‘व्हॉइस 4 गर्ल्स’च्या तीन सदस्या होत्या. आणि या तिन्ही जणी सहसंस्थापिकाच्या होत्या. आता या चमूत एकूण दहा सदस्य आहेत. स्पेन्सर सांगतात की एक लहान स्टार्टअप म्हणून ध्येयवादी, सर्जनशिल आणि आतला आवाज ऐकणाऱ्या मंडळींनाच आम्ही आमच्या सोबत घेतो.

image


‘व्हॉइस 4 गर्ल्स’ आता वर्षभर चालणारा शिक्षणपूरक शालेय कार्यक्रमही सुरू करत आहे. स्पेन्सर सांगतात, ‘‘अर्थात मुलींना खऱ्या अर्थाने आत्मशोध घ्यायचा तर महिलामय वातावरणातच ते सोपे ठरते. आत्मविश्वास लवकर बळावतो, पण मुलांसमवेत असतानाही मुलींनी आत्मविश्वासाची भावना बाळगायलाच हवी, हेही तितकेच खरे आहे. कारण लैंगिक विषमता दोन्ही बाजूंनी आहे. आम्ही मुलींसोबत आणि मुलींसाठी कितीही काम करायला तयार आहोत, पण जोवर या मुलींचे वडिल, भाऊ आणि इथला पुरुष समाज लैंगिक समानतेला पाठिंबा देत नाही, महिलेला आपल्याप्रमाणेच एक व्यक्ती म्हणून दर्जा देत नाही, तोवर हे सगळे फोल आहे. मुलींच्या वडिलांनी, भावांनी तर मुलींना सर्वप्रकारचे पाठबळ द्यायलाच हवे, बदलत्या काळाची ही गरजही आहे.’’ वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमाच्या आणि उन्हाळी शिबिरांच्या माध्यमातून ‘व्हॉइस 4 गर्ल्स’ दरवर्षी अल्प उत्पन्न गटातील ३००० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना लैंगिक समानता तसेच शिक्षणपूरक ज्ञान देऊन सशक्त करीत आहे. आगामी काळात ‘व्हॉइस 4 गर्ल्स’ला देशभरातील लाखो बालकांपर्यंत ज्ञानाचा हा दिवा घेऊन पोहोचायचे आहे.