६६ वर्षाचे श्याम बिहारी प्रसाद, गरीब मुलांना फूटपाथवर शिकवून करीत आहे देशाचे भविष्य उज्ज्वल

६६ वर्षाचे श्याम बिहारी प्रसाद, गरीब मुलांना

फूटपाथवर शिकवून करीत आहे देशाचे भविष्य उज्ज्वल

Tuesday March 15, 2016,

3 min Read

समाजाच्या प्रगतीसाठी कोणतीही स्वयंसेवी संस्था सुरु करण्याची गरज नसते. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणत्याही उपयुक्त साधनांशिवाय आपण कार्यपूर्ती करू शकतो. काही असेच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य, दिल्ली स्थित वसंत कुंज मध्ये रहाणारे ६६ वर्षीय श्याम बिहारी प्रसाद करीत आहेत. वसंतकुंज सेक्टर बी-९ च्या हनुमान मंदिरासमोरील फुटपाथवर मागच्या तीन वर्षापासून श्याम बिहारी प्रसाद दररोज गरीब मुलांसाठी वर्ग चालवत असून त्यांच्या वर्गाला ३५ ते ४० मुलांची मोलाची साथ मिळत आहे.

image


भारत संचार निगम लिमिटेडच्या सहाय्यक प्रबंधकाच्या पदावरून सेवानिवृत्त श्याम हे मुळतः पटना येथील रहिवासी असून निवृत्तीनंतर ते दिल्लीत डीआरडीओ मध्ये वैज्ञानिक असलेल्या आपल्या मुलीकडे रहात आहेत. श्याम यांनी युवर स्टोरीला सांगितले, "तीन वर्षापूर्वी एक दिवस मी हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी आलो तेव्हा काही मुले प्रसाद घेण्यासाठी मंदिराच्या जवळपास घोटाळत होती. जेव्हा मी या मुलांबद्दल माहिती काढली तेव्हा कळले की ही मुलं दिवसभर भटकत असतात व यातील काहीच मुल शाळेत जातात. या विषयाची चर्चा मुलीशी केल्यानंतर या मुलांसाठी काहीतरी करण्याचा सल्ला तिने दिला व त्यानंतरच मी या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला".

image


सुरवातीला ते मुलांना प्रसादाचे आमिष दाखवून स्वतःकडे बोलवत असत. यानंतर ते मुलांना चॉकलेट, बिस्कीट, भेळ देऊन मंदिराच्या समोरील फुटपाथवर बसवून त्यांच्याशी गप्पा मारत असत. याच क्रमाने श्याम प्रसाद यांनी हळूहळू या मुलांना वही व पेन्सिल आणून दिली अशा प्रकारे फुटपाथवर अभ्यासाचा श्रीगणेशा झाला. त्यांच्याकडे शिकणाऱ्या मुलांनी आपल्या इतर मित्रांना सांगितल्यावर कालांतराने मुलांच्या संख्येत वाढ झाली. वर्तमानात यांच्या वर्गात दुसरी ते दहावी पर्यंत ३५ ते ४० मुले शिकण्यासाठी येतात.

श्याम सांगतात की, "सुरवातीला मी जेव्हा शिकवायला सुरवात केली तेव्हा येणाऱ्या मुलांमध्ये बरीचशी मुले शाळेत जात नव्हते. मी त्यांच्या पालकांना समजावून मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश करवला. आता इथे येणाऱ्या मुलांमध्ये बरेचशी मुले हे सरकारी शाळेत शिकायला जातात’’.

image


जास्त थंडी व पावसाळ्यात ते मुलांना मंदिराच्या आत शिकवतात. श्याम यांनी सांगितले की, "एक दिवस पावसामुळे मुलांना शिकवू शकलो नाही या समस्येला बघून मंदिरातील पुजाऱ्याने मला मंदिराच्या आत बसून शिकवण्याची परवानगी दिली. "इथे शिकणाऱ्या राजकुमार सेन यांनी सांगितले, "श्याम सर आम्हाला खाण्यासाठी रोज फळे किंवा बिस्कीट आणतात". राजकुमार वसंत कुंजच्या अर्जुन वस्ती मधून शिकायला येतो व जवळच्याच सरकारी शाळेत दहावीच्या वर्गात शिकत आहे.

श्याम सांगतात की जवळपास रहाणारे लोक त्यांची वह्या, पुस्तक देऊन मदत करतात. एक दिवस एका डॉक्टरांनी मोठा फळा दिला. दहावीच्या वर्गात शिकणारे इंद्रेश कुमार सांगतात की बऱ्याचवेळा लोक आमच्या गरजेनुसार आम्हाला पुस्तके आणून देतात. या शाळेत आठवड्याच्या सातही दिवस रोज हजेरी घेतली जाते.

image


कोणतीही गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते गरज आहे ती फक्त आवेश व उत्साहाची. श्याम प्रसाद यांच्या प्रयत्नांचाच हा परिणाम आहे की आज मुले उनाडक्या करण्यापेक्षा शाळेत येणे पसंत करत आहे. जर प्रश्न देशातील तरुणांशी निगडीत असेल तर प्रारंभ करून बदल हा अनिवार्य आहे.   

लेखक : अनमोल

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close