भारतीय मातीतली बहुराष्ट्रीय संस्था उभारण्याची डॉ. स्मिता नरम यांची महत्वाकांक्षा

भारतीय मातीतली बहुराष्ट्रीय संस्था उभारण्याची डॉ. स्मिता नरम यांची महत्वाकांक्षा

Wednesday November 11, 2015,

6 min Read

जेंव्हा डॉ. स्मिता नरम १० वर्षाच्या होत्या तेंव्हा त्यांना तीव्र पोटदुखीने ग्रासले होते. त्या वेदना इतक्या जबर होत्या की त्यांच्या पालकांना अशी शंका आली की त्यांना अॅपेन्डीक्स झाला असावा. त्यांनी छोट्या स्मिताला शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात घेऊन जाण्याचा विचार केला होता. पण तत्पूर्वी स्मिताच्या वडिलांनी त्यांच्या मूळ गावी राहणाऱ्या त्यांच्या बंधूंचा सल्ला घेतला जे एक निष्णात वैद्य होते. त्या बंधूंनी स्मिताच्या वडिलांना एक आयुर्वेदिक औषध बनवण्याची कृती समजावली. त्याप्रमाणे स्मिताला ते औषधी मिश्रण देण्यात आले, आणि काय आश्चर्य, त्रासदायक पोटदुखी लगेच पूर्णपणे बरी झाली. जो इतके दिवस काळजीत पाडणारा मोठा आजार वाटत होता, तो फक्त घरगुती औषधांनी आटोक्यात आला होता.


डॉ. स्मिता नरम

डॉ. स्मिता नरम


त्या घटनेमुळे डॉ. स्मिता नरम यांचा आयुर्वेदावरचा विश्वास अधिक दृढ झाला. डॉ. नरम यांनी सांगितलं, “माझे वडिल, आजोबा आणि काका सगळेजण आयुर्वेदिक डॉक्टर होते. लहानपणापासून मी कधीच आधुनिक औषधं खाल्ली नव्हती. जर मी आजारी पडले तर, मला ‘सुदर्शन घनवटी’ देण्यात येत असे, आणि दर रविवारी मी चमचाभर एरंडेल तेल पीत असे.”

असे कितीतरी वेळा घेतलेले स्वानुभव आणि प्राचीन आयुर्वेद शास्त्राशी घरच्या वातावरणामुळे झालेल्या जवळीकीमुळे डॉ. नरम यांनी आयुर्वेद विज्ञानाचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पण त्या फक्त आयुर्वेदिक डॉक्टर बनून थांबल्या नाहीत. त्यांनी त्याहून पुढे जाऊन ‘आयुशक्ती आयुर्वेदिक प्रायव्हेट लिमिटेड’ ची स्थापना केली, जी त्यांच्या प्राचीन शास्त्राप्रती असणाऱ्या प्रेम व रूढी-परंपरेच्या पलीकडे जाण्याच्या उर्मीतून जन्माला आली.

आयुर्वेदाच्या शक्तीची उपासना

डॉ. नरम आयुर्वेदाचे शिक्षण घेत असताना त्यांच्या भावी पतिला भेटल्या आणि त्या दोघांनी शिक्षण संपल्यावर स्वतःची प्रॅक्टिस सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आयुर्वेद शास्त्राचे सखोल ज्ञान आणि सरावातील व्यावहारिक पकड, यामुळे लवकरच त्यांच्याकडे ग्राहकांचा ओघ मोठ्या संख्येने वाढला. पण डॉ. नरम यांना फक्त स्थानिक रुग्णांपर्यंत पोहचण्यात समाधान मानायचे नव्हते. त्यांनी सांगितलं, “आयुर्वेदामध्ये रोगाला समूळ नष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे आणि म्हणूनच मला असे काहीतरी करायचे होते ज्याद्वारे अनेक डॉक्टर आयुर्वेदाची महती जगभर पसरवू शकतील.”

तुम्हांला माहिती आहे का संधिवात, वंध्यत्व, फाइब्रॉइडस् आणि सोरायसिसचा आयुर्वेदामध्ये इलाज उपलब्ध आहे? त्यांच्या ह्या दाव्यांना पडताळून पाहण्यासाठी डॉ. विक्टर मॅन्हॅव नेदरलंडहून भारतात आयुशक्तीमध्ये आले. तीन वर्ष येथेच राहून त्यांनी आयुशक्ती मध्ये येणाऱ्या वंध्यत्वाने ग्रासलेल्या अशा विविध रुग्णांचा अभ्यास आणि निरीक्षण केले, ज्यांना पिसिओडी, अल्प शुक्राणू संख्या, शुक्राणूंची मंद गती, वारंवार होणारा गर्भपात या सारख्या समस्या भेडसावत होत्या. त्यांना ह्या सगळ्या आजारामध्ये आयुशक्तीच्या उपचारांमुळे बरीच सुधारणा झालेली दिसली. डॉ. विक्टर मॅन्हॅव यांनी नेदरलंड येथील इरास्मस विश्वविद्यालयात त्यांनी काढलेल्या निष्कर्षांच्या आधारावर एक प्रबंध सादर केला, ज्यात असे नमूद करण्यात आले होते की आधुनिक वैद्यक शास्त्रातील उपचारांमध्ये वंध्यत्व निवारणाची १५% ते २०% इतकी यशाची संभावना असते, पण आयुशक्तीच्या उपचार पद्धतींमुळे यशाचा दर जवळ जवळ दुप्पट होतो म्हणजेच ४२% पर्यंत वाढतो.

ही घटना आयुशक्तीच्या प्रवासाला निर्णायक वळण देणारी ठरली. डॉ. विक्टर मॅन्हॅव यांच्या प्रबंधाची बातमी कानोकानी पसरल्यामुळे पश्चिमी देशांतील अनेक डॉक्टरांनी आयुशक्तीशी भागीदारी करून येथील उपचार पद्धती त्यांच्या देशांमध्ये नेण्यासाठी विचारणा केली. डॉ. नरम आणि त्यांच्या पतींनी अशा आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करण्यास सुरुवात केली जी आंतरदेशीय स्तरावर विकता येतील. त्यांनी १९८७ मध्ये ‘आयुशक्ती आयुर्वेद’ ची एकत्रितपणे स्थापना केली.

त्यांचे पहिले औषध उत्पादन केंद्र महाराष्ट्रातील पालघर येथे उभारण्यात आले आणि तेंव्हा त्यांच्याकडे औषधनिर्मिती करण्यासाठी एकच यंत्र होते. जरी औषध उत्पादन सोपं काम होतं तरी त्यांची युरोपीय मानकांप्रमाणे चाचणी करणे व योग्य प्रमाणपत्र मिळवणे, हे कंपनीसाठी खूप जिकीरिचं आव्हान ठरत होते.

डॉ. नरम म्हणाल्या, “आम्हांला साजेशी अशी एक प्रयोगशाळा मिळाली, आम्ही आमची उत्पादनं तेथून तपासून घेऊन, आमच्या युरोपमधील वितरकांकडे पाठवून दिली. त्यांनी ती स्वीकारली, पण वर्षभरानंतर जेंव्हा तेथील एका प्रयोगशाळेत पुन्हा त्या उत्पादनांची तपासणी करण्यात आली तेंव्हा असे आढळून आले की आमची सगळी औषधं तेथील कसोटीनुसार कुचकामी होती. भारतातील आमची प्रयोगशाळा अविश्वसनीय ठरली. आमच्या उत्पादनांच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.”

त्यांच्या संपूर्ण चमूने उत्पादनांचा दर्जा उंचावण्यासाठी खूप मेहनत केली. सरतेशेवटी त्यांना आय. आय. टी. मधील तंत्रज्ञांची मदत मिळाली, ज्यांनी त्यांना उत्पादन निर्मिती मधील चुका दुरुस्त करण्यासाठी मदत केली. त्यांनी असा निर्णय घेतला की येथून पुढे ते त्यांच्या प्रत्येक उत्पादनांची चाचणी जर्मनी येथील प्रयोगशाळेतूनच करतील. “आम्हांला धातुविहीन, जीवाणूरहित आणि कीटकनाशकरहित उत्पादनं बनवायची होती आणि संपूर्ण भारतात अशा तऱ्हेच्या चाचण्या करणारे AASF मशीन उपलब्ध नव्हते. सगळ्यात मोठ्या, नावाजलेल्या प्रयोगशाळा, ज्या भारतातील मोठ्या औषधनिर्मिती करणाऱ्या संस्थासाठी चाचण्या करायच्या, त्यांच्याकडे सुद्धा AASF मशीन नव्हत्या. हा १९९३ चा काळ होता, आता आम्ही ते मशीन विकत घेतले आहे, पण त्या वेळेस आमच्यासाठी ते सगळं काम खूप आव्हानात्मक होतं.” डॉ. नरम यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय भागीदारी

२००५ सालापर्यंत ‘आयुशक्ती’ जवळ जवळ फक्त वैयक्तिक स्तरावरच कार्यरत होती; जाहिराती किंवा जनसंपर्क सेवेची मदत घेतली गेली नव्हती. असे असूनसुद्धा ते खूप प्रसिद्ध झाले होते आणि ३०० पेक्षा जास्त रुग्ण आयुशक्तीच्या रुग्णालयात येत असत.

तीच वेळ होती जेंव्हा त्यांना आयुशक्तीच्या इतरत्र शाखा वाढवण्याची कल्पना सुचली. तेंव्हापासून ‘आयुशक्ती आयुर्वेद’ ने भारतात ७ आणि जर्मनीमध्ये ३ चिकित्सालयं उभारली आहेत.


आयुर्वेदाच्या शक्तीची उपासना

आयुर्वेदाच्या शक्तीची उपासना


त्यांच्या अशा तऱ्हेच्या आंतरराष्ट्रीय भागीदारी संबंधात एक मजेदार गोष्ट सांगण्यासारखी आहे. इटली देशातील व्हिक्टोरिया रासिदोरिया नावाची एक स्त्री भारतात आध्यात्मिक उपचारासाठी आली होती. ज्या दिवशी ती भारतातून तिच्या देशी परत जाणार होती, त्याच दिवशी ती ‘हिपॅटायटीस अ’ ने आजारी पडली. “‘हिपॅटायटीस अ’ फार वेगाने वाढतो. पहिले दोन-तीन दिवस त्याची लक्षणंसुद्धा दिसून येत नाहीत, पण शरीरात पित्ताचं प्रमाण अधिकाधिक वाढतच जातं. तिचे डोळे एका दिवसात हळदीसारखे पिवळे दिसू लागले होते. तेंव्हा आमचं इस्पितळ नव्हतं, पण मी तिला माझ्या घरी ठेवून घेतले आणि तिला विशेष आहार, औषधी वनस्पती आणि आयुर्वेदिक औषधं देऊन उपचार चालू ठेवले. ती रोज तिच्या इटली येथील डॉक्टरांच्या संपर्कात होती. ती परत गेल्यावर तिच्या डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि तिचे सुधारलेले स्वास्थ्य पाहून ते सगळे फार आश्चर्यचकित झाले. आम्ही फक्त १५ दिवसांच्या उपचारामध्ये असे परिणाम दाखवले होते जे सहा महिन्यात करणं देखील अशक्य होतं.” डॉ. नरम यांनी सांगितलं.

इटलीहून ५ डॉक्टर भारतात आयुर्वेदाचा अभ्यास करायला आले आणि अशा पद्धतीने ‘आयुशक्ती’ ने युरोपमध्ये आपले काम सुरु केले. आजपर्यंत ‘आयुशक्ती आयुर्वेद’ ने आंतरराष्ट्रीय स्तरावर जी भरारी मारली आहे, ती भागीदारी तत्वावर शक्य झाली आहे. आज त्यांनी जगभरात १०० ठिकाणी चिकित्सालयं उभारली आहेत, ज्यात युरोप, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. डॉ. नरम बोलल्या की त्यांची भविष्यकाळात इंग्लंड आणि युरोपमध्ये ‘आयुशक्ती आयुर्वेद’ ची स्वतःची चिकित्सालयं उभारण्याची योजना आहे.

समर्थ पाठबळ

डॉ. नरम यांच्या पतिने सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना जे समर्थन दिले, त्याबद्दल बोलताना त्यांना शब्द अपुरे पडत होते, “त्यांनी मला फक्त माझा व्यवसाय सांभाळायलाच मदत केली असे नाही तर त्यासाठी माझी उशिरा मुल होऊ देण्याची इच्छा सुद्धा मान्य केली.” डॉ. नरम म्हणाल्या. त्यांनी ही बाब मान्य केली की त्यांचे सासू-सासरे, इतर कुटुंबीय आणि विश्वासू कर्मचारी वर्ग त्यांच्या व्यावसायिक जडणघडणीत शक्तिशाली स्तंभांसारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्या म्हणाल्या, “माझे काही कर्मचारी तर माझ्यासोबत २५ वर्षांपेक्षा जास्त काळ काम करत आहेत आणि त्यांच्यावर मी डोळे झाकून करत असलेल्या विश्वासामुळेच आम्हांला विकास करायला मदत केली आहे.”

वाणिज्य आणि भारतीय उद्योग असोसिएटेड चेंबर्स [Associated Chambers of Commerce and Industry of India (ASSOCHAM)] च्या अनुसार भारतातील औषधी वनस्पतींचा उद्योग २०१५ सालापर्यंत ७,५०० कोटी पासून दुपटीने वाढून १५,००० कोटींपर्यंत पोहचणार आहे. ‘आयुशक्ती’ त्यांची उत्पादनं, भागीदारी आणि शाखांच्या बळावर अशा अनेक संस्था पैकी एक आहे, जी ह्या विकासाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज झाली आहे. डॉ. नरम यांनी दावा केला की ‘आयुशक्ती’ ने गेल्या दहा वर्षापासून दरवर्षी ३०% दराने विकास केला आहे. “लोकांना आता हे कळून चुकले आहे की आधुनिक औषधाची गोळी खाणे, हा प्रत्येक आजाराचा इलाज नाही होऊ शकत, त्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने उपचार आणि वेळीच आजारांना प्रतिबंध करणे जास्त सुरक्षित आहे.”

“आम्ही क्रमाक्रमाने विकास करत आलो आहोत आणि आता आमच्याकडे सगळ्या प्रकारची साधनसंपत्ती जमा झाली आहे. आता मला भारतीय मातीतली बहुराष्ट्रीय संस्था उभारायची आहे.” डॉ. नरम यांनी आत्मविश्वासाने त्यांची रास्त महत्वाकांक्षा बोलून दाखवली.

    Share on
    close