लोकांच्या पारंपरिक गरजा आधुनिक पद्धतीने पूर्ण करणारी ‘द एथनिक स्टोरी’

0

एमॅझोनसोबत काम करताना वरूण बांटिया यांना समजलं की अजूनपर्यंत लोकांपर्यंत न पोहोचलेल्या हस्तकलेच्या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. मूळचे राजस्थानचे असलेल्या वरूण यांनी त्यांचं पारंपरिक हस्तकलेविषयीचं प्रेम आणि ई-कॉमर्सबद्दलचं ज्ञान यांची सांगड घालायचं ठरवलं आणि लोकांच्या सगळ्या पारंपरिक गरजा पूर्ण करण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एमॅझोनमधली त्यांची नोकरी सोडली आणि निश्चित केलेल्या ध्येयाच्या दृष्टीनं नियोजन करायला सुरुवात केली.


ऑगस्ट २०१५ मध्ये वरूण यांनी द एथनिक स्टोरी सुरु केलं. पारंपरिक पद्धतीनं बनविलेल्या गृहसजावटीच्या वस्तू, दागिने, कपडे, वस्तू आणि कॉर्पोरेटसाठी भेटवस्तू इत्यादी सर्व एकाच ठिकाणी मिळणारं हे ई-कॉमर्स व्यासपीठ आहे. सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सगळं काम स्वत: एकट्यालाच करावं लागलं. त्यानंतर दीपेश दारला हे त्यांच्यासोबत काम करू लागले आणि आता ते त्यांच्या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत.

द एथनिक स्टोरी कारागीर आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणते. हे काही शोधावर आधारित मॉडेल नाही, तर देशभरातील विविध विक्रेते आणि कारागिरांना आम्ही एकत्र आणलं आहे.

आम्ही त्यांना त्यांच्या उत्पादनांचे फोटो काढायला मदत करतो आणि नंतर ते फोटो आमच्या साईटवर टाकतो. कारागिरांसोबतच आणि गृहसजावटीच्या वस्तू किंवा भेटवस्तू तयार करणारे आणि रंगवणाऱ्यांसोबतही आम्ही करतो, असं द एथनिक स्टोरी चे संस्थापक वरूण सांगतात.

त्यांच्या या उद्योजकतेच्या नवीन प्रवासात दररोज नवीन संघर्षाला सामोरं जावं लागतं. अगदी कारागिरांशी संपर्क साधण्यापासून ते दररोजचा खर्च चालवण्यासाठी भांडवल उभं करण्यापर्यंत रोज नवीन अडथळे असतात. प्रत्येक टप्प्यावर आव्हानं असतात. ही त्यांची प्रामाणिक सुरुवात आहे आणि त्यांना अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

स्वत:ची जमविलेली पुंजी, भविष्य निर्वाह निधी सर्वकाही एकत्र करून सुरुवातीला ४ लाख रुपयांच्या भांडवलावर त्यांनी या इ-कॉमर्सच्या एॅपची सुरुवात केली. ब्रांडींग, वेबसाईट तयार करण्यासाठी, सोशल मिडियाच्या विपणनासाठी आणि ऑफिससाठी छोटी जागा घेण्यात त्यातला बराच खर्च झाला. हा उपक्रम सुरु होऊन तीन महिने झालेत आणि आम्ही आता आमचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीनं आणि त्यासाठी आणखी भांडवल उभं करण्याच्या दृष्टीनं विचार करत आहोत, असं वरूण सांगतात.

पारंपरिक भेटवस्तू आणि हस्तकलेच्या वस्तू यांची बाजारपेठ खूप मोठी आणि त्यात संधी खूप जास्त असल्या तरी त्यात आव्हानंही खूप आहेत. भारतीय हस्तकला नितांत सुंदर असून तिची जगभरात मागणी आहे. भारतातील प्रत्येक राज्याची हस्तकला समृद्ध इतिहास आणि धार्मिक मुल्यांवर आधारित असल्यानं ती गर्व करण्यासारखी असते.

या ऍपवर दिवाळी आणि इतर उत्सवांदरम्यान मोठी मागणी नोंदवली जाते. आतापर्यंत पंचवीस हजारांपेक्षा जास्त लोकांनी वेबसाईटला भेट दिल्यानं या वस्तू आणि व्यवसायाला खूप वाव असल्याचा दावा कंपनी करते. त्याचबरोबर वेबसाईटवर ग्राहकांना पसंतीचा क्रम देण्याचा वेबसाईटचा दावा आहे. सध्या वेबसाईटवर फक्त राजस्थान आणि गुजरातमधल्या वस्तू उपलब्ध आहेत. पण लवकरच इतर वस्तू त्या त्या विभागानुसार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे, असं वरुण सांगतात. वेगळी आणि एकमेवाद्वितीय अशी उत्पादनं तयार करणे आणि त्यासाठी योग्य कारागीर उपलब्ध होणे ही दोन मोठी आव्हानं असल्याचंही वरुण सांगतात.

भारतीय बाजारपेठेतून दरवर्षी ५ हजार अब्ज डॉलर किंमतीच्या हस्तकलेच्या वस्तूंची निर्यात केली जाते. या बाजारपेठेत आता अनेक नवीन लोक उतरु लागले आहेत.

एथनिक स्टोरीला याच क्षेत्रातील इंडियनरुट्स, क्राफ्ट्सव्हिला आणि इंडिकला यासारख्या कंपन्यांची स्पर्धा आहे. याचबरोबर फ्लीपकार्ट आणि स्नॅपडिलसारखे स्पर्धकही आहेत. पण उत्पादनांच्या श्रेणीपद्धतीमुळे एथनिक स्टोरी या सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते. इंडियनरुट्स आणि क्राफ्टसव्हिलाने सध्या पारंपरिक कपड्यांवर लक्ष केंद्रीत केलंय, पण इथनिक स्टोरी घरांची सजावट आणि फर्निचरसाठीही हा पर्याय उपलब्ध करुन देणार आहे.

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सचिन जोशी