अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

अभियांत्रिकीचे शिक्षण नसूनही वीजवितरणाच्या डिपी तयार करणा-या कोट्यावधीच्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या ‘नेहा म्हैसपूरकर’!

Monday April 25, 2016,

5 min Read

‘बेटी धनाची पेटी’ अशी मराठीत म्हण आहे नेहा म्हैसपुरकर यांना भेटल्यावर याचा तर प्रत्यय तुम्हाला येईलच शिवाय ‘उद्योगात वसते लक्ष्मी’ असे का म्हणतात याची देखील जाणीव होईल. अगदी बालवयापासून झपाटल्यागत नवे ‘काहीतरी’ करायचे या वेडाने झपाटलेली एक मध्यमवर्गातल्या घरातली मुलगी कोणत्याही तांत्रिक माहिती शिक्षणाशिवाय आज महावितरणाच्या घरोघरी वीज वितरण करणा-या डिपी बनवून देणाऱ्या कारखान्याची ‘विजया कन्व्हर्टर’ची वयाच्या केवळ २९व्या वर्षी मालकीण आहे, हे आहे की नाही तोंडात बोट घालायला लावणारे?

image


त्यांच्या या यशामागे आहे अखंड धडपड, जिद्द, नाविन्याची भूक आणि प्रामाणिक मेहनत, त्यामुळेच आज नेहा म्हैसपूरकर या कोट्यावधी रुपयांच्या ऊलाढाल असलेल्या उद्योगाच्या कर्त्याधर्त्या आहेत. त्यांच्या या यशाच्या कहाणीचा प्रत्यक्ष मागोवा घेण्यासाठी युअर स्टोरीने त्यांच्या नाशिक येथील कारखान्याला भेट दिली. आणि त्यांच्याकडून जाणून घेतले.

राज्यात घराघरात विजेचे वितरण होते ते डीपीच्या माध्यमातून राज्यातील अशाप्रकारच्या डीपी बनविणा-या उद्योजिका आहेत नेहा म्हैसपुरकर! तरुण वयात कुठलीही अभियांत्रिकी पदवी नसताना त्यांनी हे शक्य करून दाखविले आहे. अभावानेच अभियांत्रिकी क्षेत्रातही महिला उद्योजक आढळतात असे असताना लौकीकार्थाने अभियांत्रिकीचे शिक्षण न घेताही त्यांनी मिळवलेले यश डोळ्यात भरणारेच आहे. लहानपणापासून वेगवेगळे उद्योग करण्याची जात्याच आवड असल्याने त्यांनी कधी स्टीकर, चिकटपट्ट्या तर कधी मिळेल त्या वस्तू विकून आपल्यातील उद्यमी व्यक्तिमत्व घडविले त्यासाठी सातत्याने नाविन्याचा ध्यास त्यांना राहिला. हळूहळू नवीन संकल्पनांचा विचार करत त्यांनी अगदी भाज्या डीहायड्रेशन करून निर्यात करणाऱ्या कंपनीला भेंडी कापून देण्याच्या कामांपासून आंब्याच्या कोयीचा गर फोडून व्हीटमिन ‘ई’ बनविणाऱ्या कंपनीला पुरविण्याचा उद्योग यशस्वीपणे केला. अगदी बालवयातच अशी विविध कामे करत असताना त्यांचे मन कधी त्यांना शांत बसू देत नसे.

image


त्या सांगतात “ नवीन काही मिळाले की मी त्याचा शोध घेण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी चार-पाच दिवस झपाटून जाते आणि मला काय हवंय, त्याच्यासाठी काय करता येईल याची तयारी करते” आपल्या अखंड धडपडीच्या प्रवासाचे आता नेहा यांनाच अप्रूप वाटते त्यावेळी मी कशी झपाटलेली होते आणि कश्या शक्कल लढवून कामे मिळवत गेले याचे त्या अत्यंत मिश्कीलपणे आणि तेवढ्याच उत्कटपणाने वर्णन करतात.

त्या म्हणतात, “ लहानपणापासून मला चाकोरीबाहेर काहीतरी करावे याची ओढ होती. मग मी चवथीच्या वर्गात शिकत असताना स्क्रिन प्रिंटीगचा व्यवसाय केला आणि पहिल्यांदा अर्थार्जन केले. आठव्या वर्गात असताना ऍल्युमिनीअम फॉइलच्या व्यवसायात मार्केटिंग केले. बारावीच्या वर्गात असताना पतसंस्थेच्या रोजच्या ठेवी गोळा करण्याचे काम केले. पण मन शांत होत नव्हते, असे काहीतरी करावे ज्यात शेवट नसेल. जे काम कायमस्वरुपी, शाश्वत असेल असे वाटत असे”

image


वयाच्या १९व्या वर्षी त्यांनी पँकेजींगसाठी लागणा-या चिकटपट्ट्यांसाठी मार्केटिंग सुरू केले. त्यासाठी कामे कशी मिळवायची हा प्रश्न होता मात्र त्यांनी प्रसंगी बॉक्स वाहून नेणा-या ट्रकचा पाठलाग करून ते सामान कोणत्या कंपनीचे आहे याची माहिती घेतली आणि त्या कंपनीला कमी किंमतीत तेच पँकिंग करुन देण्याची हमी देत कामे मिळवल्याचे त्या सांगतात. त्यानंतर असेच नेहमी नाविन्याचा शोध घेत त्यांनी क्रॉम्पटनच्या पेपर कटींगचे काम करता करता कपॅसिटर बनविण्याचे काम सुरू केले. त्यातही कमी खर्चात चांगल्या प्रतीचे कपॅसिटर बनवून देत त्यांनी नफा कमावला आणि त्या म्हणतात की, “वयाच्या तेविसाव्या वर्षी मी माझी स्वत:ची आय टेन कार घेतली.” ज्या वयात कोणत्याही सर्वसाधारण घरातील मुली पदवीधारक होतात किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतात किंवा लग्नाची तयारी करतात त्या वयात नेहा यांचे हे यश लक्षात घेण्यासारखेच म्हणावे लागेल. नेहा यांचा स्वभाव मात्र त्यांना स्वस्थ बसावे असे कधीच सांगत नाही, एक काम झाले की त्यांना नवा उद्योग खुणावतो.

image


त्या सांगतात की, “ देवदर्शनाला गेले असताना एका ठिकाणी वीज वितरणाच्या डिपी तयार करत असल्याचे दिसले.” हा काय प्रकार असतो त्याची गंधवार्ता नसताना त्यांनी ‘हे करायचे’ मनात ठरवले. आणि महावितरणच्या कार्यालयात मुंबईपासून नाशिकपर्यंत सारीकडे शोध घेतला. त्यात त्यांना कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना, उदयोगाच्या काहीच खाचाखोचा माहिती नसताना केवळ अंगभूत हुशारी, प्रयत्न करत राहण्याची वृत्ती आणि प्रामाणिक मेहनत यांच्या बळावर त्यांनी त्याचा अभ्यास करून एक डीपी बनविली आणि वीज मंडळाला दाखवली. नेहा यांनी आज डीपी बनविण्याच्या उद्योगात वार्षिक २०कोटी रुपयांची उलाढाल करणा-या उद्योगाचे यशस्वी संचालन करुन दाखवले आहे. राज्यातील बहुतांशी भागात लावण्यात आलेल्या डीपी त्यांनी निर्माण केलेल्या असतात हे त्या अभिमानाने सांगतात.

image


स्वभावात शांत बसण्याची वृत्तीच नसल्याने नेहा आता स्टील होर्डिंग तयार करण्याची तयारी करताहेत. अशी पाच नाविन्यपूर्ण उत्पादने बनवायची आहेत ज्यातून आपली ओळख होईल असे त्यांना वाटते.

आजची मुलेमुली महाविद्यालयात शिक्षण घेताना आपला अधिकाधिक वेळ फिरण्यात मजा करण्यात वाया घालवितात. त्यांनी तो न घालविता आयुष्याला आवश्यक असलेली कौशल्य शिकावी असे त्यांना वाटते. त्यांचा हा प्रवास ऐकताना ‘ती आली तिने पाहिले तिने जिंकले’ असे वाटत असले तरी सातत्याने दहा वर्षे अगदी वेड्यासारखे सैरभैर होउन त्यांनी कामे केली हे विसरता येणार नाही. आता त्यांनी अक्कल हुशारीने नफा कसा कमाविता येतो याची चाचपणी करत चीनपासूनच्या बाजार तंत्राचा अभ्यास केला आहे. त्या म्हणतात जीवन किती लहान आहे अजून खूप काही करता येण्यासारखे आहे पण काय? जे करताना मजा आली पाहिजे. त्यांची ही उद्यमशिलतेची भूक त्यांना शांत बसू देत नाही हीच तर त्यांच्या आजच्या यशाच्या मागची खरी शक्ति आहे! नाही का?

विशेष म्हणजे म्हैसपुरकर कुटुंबात नेहा आणि त्यांची बहीण या दोन्ही मुलीच आहेत. पण कर्तृत्वाच्या ज्या उंचीला त्यानी गवसणी घातली आहे ती कदाचित त्यांच्या वडिलांच्या त्या मुलगा असत्या तरी शक्य झाली नसती. ‘माझे प्रेरणास्थान माझे वडीलच आहेत’ असे त्या म्हणतात. मराठी चित्रपट आणि बांधकाम व्यवसाय आता त्यांचे लक्ष्य आहे. त्यांच्या आईवडिलांनाही आपल्या मुलीच्या कामगिरीचा अभिमान आहे. 

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

"मी तुमच्यातलीच एक आहे" इति भारतातली आठवी श्रीमंत महिला अनू आगा

आपल्या यशाची वाट धुंडाळणाऱ्या सहा उद्योगसम्राटांच्या राजकन्या

तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….