सुविग्य शर्मा - व्यावसायिक भान असलेला जातीवंत कलाकार

0

‘कला’ ही एक अशी गोष्ट आहे, जी मला नेहमीच भुरळ घालत आली आहे. मी मनापासून कला रसिक आहे. खास करुन चित्र आणि रंगांच्या मदतीने निर्जीव वस्तूंना कॅनव्हासवर जिवंत करण्याची दैवी देणगी तर खरोखरच हेवा वाटवा अशीच असते. अशीच दैवी देणगी लाभलेला कलाकार म्हणजे सुविग्य शर्मा... मिनिएचर पेंटींग्जमध्ये आज ते एक आघाडीचे कलाकार आहेत. मुख्य म्हणजे कला आणि व्यवसायाची सांगड घालण्यातही ते यशस्वी ठरले आहेत. त्याचबरोबर ही कला सर्वदूर पोहचविणे हेदेखील त्यांचे लक्ष्य आहे. या तरुण कलाकाराचा कलाप्रवास आणि त्याचबरोबर व्यावसायिक प्रवास उलगडण्याचा हा प्रयत्न...

सुविग्य शर्मा यांना आठवतं तेंव्हापासून ते नेहमीच चित्र काढत आले आहेत, रंगात रंगून गेले आहेत आणि सातत्याने नवनर्मिती करत आहेत. मिनिएचर पेंटींग हा जगातील सर्वात जुन्या कला प्रकारांपैकी एक... भारतीय राजेरजवाड्यांच्या काळात या कलाप्रकाराला राजाश्रय मिळाला, पण काळानुरुप या कलाप्रकाराला काही अडचणींचा सामना करावा लागल्याने, त्याला काहीशी उतरती कळा आली. पण तरीही सुविग्यचे कुटुंबिय मात्र गेल्या तीन पिढ्यांपासून या कलेची उपासना करत आले आहे. सुविग्य हे त्यातील तिसऱ्या पिढीचा प्रतिनिधी.

या तेहतीस वर्षीय कलाकाराने आजपर्यंत देशातील अतिशय मोठमोठ्या घराण्यांसाठी पेंटींग्ज केली आहेत. राजस्थानचे राजघराणे, बजाज, बिर्ला, अंबानी, पिरामल आणि मोदी ही घराणी त्यापैकीच काही...

होतकरु कलाकार

वयाच्या चौथ्या वर्षापासून ते त्यांच्या वडीलांचे बारकाईने निरक्षण करत असत आणि यामधून आपण खूप काही शिकल्याचे ते आवर्जून मान्य करतात. “ मी चित्रकलेचे औपचारीक शिक्षण कधीच घेतले नाही. मी जे काही शिकलो ते निरीक्षणातूनच... मी व्यावसायिकरीत्या काहीच शिकलो नाही. हे सर्व अगदी सहजपणे आले किंवा जन्मजातच म्हणा ना! हा माझा व्यवसाय कधी बनला, तेदेखील मला कळले नाही. माझ्या मते हे खूपच नैसर्गिक होते,” ते सांगतात. वयाच्या सातव्या वर्षी सुविग्यने आपले पहिले पेन्सिलने काढलेले व्यक्तिचित्र बनविले. तर वयाच्या बराव्या वर्षी, सुविग्यने आपल्या आईला, तिच्या वाढदिवसानिमित्त, तिचेच व्यक्तिचित्र भेट दिले. त्याचबरोबर ते त्यांच्या मित्रांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी व्यक्तिचित्रं भेट देत असत आणि पंधराव्या वर्षाच्या आतच त्यांनी जयपूरमधील मुलांसाठी चित्रकलेचे वर्ग घेण्यास सुरुवात केली होती – हा किशोरवयीन मुलगा एका बॅचमध्ये तीस विद्यार्थ्यांना शिकवित असे. “ या कामासाठी झालेले कौतुक आणि वाढती मागणी,यामुळे मी हे वर्ग पुढे सात वर्षं चालवले,” सुविग्य सांगतात.

मात्र त्यांच्याच वयाच्या इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचे शिक्षणही सुरु होतेच. त्यानुसार ते महाविद्यालयात गेले आणि त्यांनी विदेश व्यापार व्यवस्थापनाचा अभ्यास केला. शिक्षणानंतर या क्षेत्राशी संबंधित नोकरी मिळविणे, हाच यामागचा हेतू होता. पण ती वेळ कधी आलीच नाही. “ त्यावेळी अशा अनेक लहान-लहान गोष्टी होत्या, ज्यांनी मला कलेच्याच मार्गावरुन चालण्यासाठी प्रोत्साहीत केले. मी महाविद्यालयात असताना, मलेशिया विद्यापीठाने कुलपतींची खुर्ची करण्यासाठीची निविदा काढली होती. वीस वर्षांतून एकदाच ही खुर्ची बदलली जात असल्याने, सहाजिकच हा एक मोठा समारंभ होता. मला ही निविदा मिळाली आणि मी सोने, चांदी, क्रिस्टल अर्थात बिलोरी काच, संगमरवरी दगड यांचा वापर करत ही खुर्ची बनवली. सगळ्यांनाच ती प्रचंड आवडली. तुम्ही विद्यापीठात गेलात, तर आजही तुम्हाला ती तेथे पहायला मिळेल,” सुविग्य अभिमानाने सांगतात.

आज या सगळ्या गोष्टीकडे मागे वळून पाहिल्यावर आपण आश्चर्यचकीत होत असल्याचे ते मान्य करतात. “ आपल्या मार्गात जे काही येते, ते आपण घेतो आणि प्रवाहाबरोबर वहात जातो. कधीकधी आपण हसतो आणि म्हणतो, अरे हे सगळे आपण केले आहे?” ते मोकळेपणाने सांगतात.

प्रगल्भ कलाकार

सुविग्य यांनी देशातील बहुतेक सर्व अव्वल उद्योजक कुटुंबियांसाठी चित्रं काढली आहेत, बजाज, अंबानी, मित्तल आणि पिरामल हे त्यापैकीच काही... काही गोपनीय कारणांसाठी ते काही ग्राहकांची नावे उघड करु शकत नाहीत, पण त्यांच्या ग्राहकांमध्ये या देशातील अनेक सुप्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. “ माझ्या ग्राहकांकडून केल्या गेलेल्या शिफारसीमधूनच मला माझे बहुतेक काम मिळते. लोक जे बघतात, ते त्यांना आवडते आणि त्यातूनच आम्ही जोडले जातो,” ते सांगतात. तर काही वेळा काम मिळविण्यासाठी ते देखील लोकांचे मन वळवितात. एकदा एका अतिशय सुप्रसिद्ध उद्योजक कुटुंबाची वेळ मिळविण्यासाठी सुविग्य प्रयत्न करत होते, मात्र ते अतिशय व्यग्र असल्याने, ही वेळ मिळण्यास दोन वर्षे लागली. पण कठीण भाग हा फक्त एवढाच असतो. एकदा या कुटुंबाशी पहिली भेटी झाल्यानंतर मात्र गेल्या दहा वर्षांत सुविग्य सातत्याने त्यांच्यासाठी काही ना काही काम करत आहेत. “ त्यांच्या गुरुंच्या चित्रापासून याची सुरुवात झाली, तेंव्हापासून मी त्यांच्यासाठी कौटुंबिक व्यक्तिचित्रे, देवळे, फ्रेस्को पेंटींग्ज – काही ना काही तरी – बनवत आहेच,” ते सांगतात.

जयपूरमध्ये आज सुरु असलेले बहुतेक काम हे सुविग्यशी संबंधित स्थानिक कलाकारांकडून किंवा जे त्यांच्यासाठी काम करतात अशा कलाकारांकडून केले जाते. जेंव्हा जीर्णोध्दार किंवा वास्तुशास्त्राशी संबंधित काम सुविग्य हाती घेतात, तेंव्हा सुमारे शंभर कारागिरांची एक टीम त्यांच्याबरोबर काम करते – ज्यापैकी सर्व हे जयपूरमधील किंवा आसपासच्या परिसरातील आहेत. “ आम्ही स्वीकारलेले प्रत्येक काम वेगवेगळ्या टप्प्यात होते – वेगवेगळे कारागिरी हे वेगवेगळ्या कौशल्यांमध्ये पारंगत असतात. काही जण सोने एम्बॉसिंग करण्यात तरबेज असतात, तर काही फ्रेस्को काम करु शकतात, इत्यादी. एकदा मी मुख्य भाग पूर्ण केला, की इतर कारागिर उर्वरित काम भरण्यास मदत करतात,” ते सांगतात.

तीन पिढ्यांपासून सुविग्य आणि त्यांचे कुटुंबिय चित्रकला साकारत आहेत, या काळात त्यांनी हजारहून अधिक कारागिरांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे आणि त्यांना रोजगार आणि काम दिले आहे. सध्या सुविग्य यांच्या पत्नी चारु या एक स्वयंसेवी संस्था चालवितात, जी नियमितपणे जयपूरच्या आसपासच्या गावांमध्ये कला शिबिरे आयोजित करते आणि या परिसरातील कलेची आवड असणाऱ्या तरुण मुली आणि स्त्रियांचा शोध घेते. “ हे गावकरी त्यांच्या घरातूनच काम करण्यात खुश असतात आणि त्यांना शहरांमध्ये येण्याची इच्छा नसते. त्यांच्याबरोबर काम केल्याने योग्य त्याच कारागिरांबरोबर काम करत असल्याची आम्हाला खात्री असते तर वर्षभर आमच्याकडून काम मिळत राहील, याची त्यांनाही खात्री असते,” चारु सांगतात.

दरम्यान सुविग्य हे त्यांच्या कामामुळे उद्योजकांमध्ये प्रसिद्ध आहेतच, पण आता त्यांनी चित्रपट कलाकारांची विनंती मान्य करत, त्यांच्याबरोबरही काम करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे सिनेकलाकारांबरोबर काम करणे हे एक असे पाऊल आहे, ज्यापासून त्यांचे वडील दूर राहिले होते. पण या तरुण कलाकाराने मात्र यापूर्वीच प्रियांका चोप्रासाठी विशेष दिवाळी उत्पादने बनविले आहेत आणि भविष्यात अशा प्रकाराच्या सहयोगाच्या आणखी कल्पनांसाठीही ते तयार आहेत. “ मी सध्या प्रवाहाबरोबर जात आहे. कलेशी संबंधित सगळ्याशी जोडले जाण्यास सक्षम झाले पाहिजे, एवढेच सध्या माझ्या मनात आहे. काही काळापूर्वी एका फॅशन डिजायनरने माझे सोने फ्रेस्कोचे काम त्यांच्या कपड्यांमध्ये अंतर्भूत करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार हे कसे करता येईल हे आम्ही तपासून पहात आहोत. मी सगळ्या प्रकारच्या कलाप्रकारांसाठी तयार आहे,” ते सांगतात.

ते करत असलेल्या सर्व गोष्टींना जोडणारा दुवा आहे मिनिएचर पेंटींग्जची किशनगड शैली – जी खूपच गुंतागुंतीची शैली आहे आणि त्यासाठी खूपच चिकाटी आणि तपशिलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. “ मिनिएचर कलेच्या बाबत माझ्या खूपच उत्कट भावना आहेत आणि ही कला जिवंत रहाण्यासाठी आणि तिच्या प्रगतीसाठी माझ्या क्षमतेनुसार शक्य ते सर्व करण्याची माझी इच्छा आहे. कदाचित काही वर्षांनंतर मला एक कला विद्यालय सुरु करायला आणि हा कलाप्रकार आणखी लोकांना शिकवायला आवडेल,” ते सांगतात.

शक्य तेथपर्यंत या कलेचा प्रचार करुन ही कला सर्वदूर पोहचविण्याच्या उत्कठ इच्छेतूनच सुविग्य या कलाप्रकारासाठी बाजारपेठ उभारत आहेत, ज्याची कदाचित फारशी माहिती आपल्यापैकी अनेकांना नाही. मिनिएचर कला सामान्यांपर्यंत घेऊन जाण्याच्या त्यांच्या या मिशनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा...

लेखक – प्रीती चामीकुट्टी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन