ʻगंगा की वापसीʼ जलप्रदूषण रोखण्यासाठी दोन अवलियांचा प्रवास

0

गंगा! भारतातील एक सर्वात लांब आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार पवित्र समजली जाणारी नदी. शरीर आणि आत्म्याच्या सर्व पापांचा नाश करणारी नदी, असे गंगा नदीला समजले जाते. याच गंगा नदीवर स्थापन करण्यात आलेल्या असंख्य जलविद्युत प्रकल्पांमुळे आत्मा आणि शरीराला पापमुक्त करणाऱ्या गंगेचे पवित्र जल आता सुकू लागले आहे. याशिवाय गंगेला जगातील पाच सर्वाधिक प्रदूषित नद्यांच्या श्रेणीत ठेवण्यात आल्यानंतरही आपल्याला जाग आली नाही. गंगेच्या या दुर्दशेवर करण्यात येणारे अहवाल, बातम्या, शोधपत्र यांच्यामुळे प्रेरीत होऊन गंगा सफाईसाठी करण्यात येणारे प्रयत्न आज वर्तमानपत्रांमध्ये छापूनदेखील येत आहेत. अनेक वृत्तपत्रे या विषयावर विशेषांक छापत आहेत. शिवाय टीवीवर महत्वाच्या वेळेस म्हणजेच प्राईम टाईमला यासंबंधित कार्यक्रम प्रक्षेपित केले जात आहेत.

नदी किनारी राहणारे लोक, विकासाकरिता उत्साही असलेले राजकारणी, उर्जा कंपनी आणि त्यांच्या लॉबी, धार्मिक संघटना, पर्यावरणवादी, भूवैज्ञानिक, भूकंप विशेषज्ञ सर्व गंगानदीच्याबाबतीत आपल्या विविध कल्पना आणि विचार मांडतात, ज्यामुळे गंगा नदीची समस्या अधिक जटील बनत आहे. गंगानदीवर अनेक धरणे बांधण्यात आली आहेत. याशिवाय जल प्रदूषण करणारी असंख्य रसायने नदीपात्रात सोडण्यात येतात. गंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येणारे सुधारणात्मक उपायदेखील संशयास्पद आहेत. तसेच ते उपाय आजमविण्यापूर्वीच येतात त्या त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या.

गंगानदीच्या प्रेमात असलेले भाऊ-बहिण मार्तंड बिंदाना आणि वल्ली बिंदाना यांनी आपल्या गंगा प्रकल्पाद्वारे नदी वाचवण्यासाठीच्या उपायांबाबतीत लोकांना जागरुक करण्याचा विडा उचलला आहे. किमान पैसे आणि अनुभवाच्या जोरावर सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पात ज्यात धनलाभच सोडा, तर गुंतवलेले पैसेदेखील परत मिळण्याची शक्यता कमी आहे. याबाबतीत बोलताना वल्ली यांनी सांगितले की, ʻʻगंगा की वापसीʼ एक लघुपट असून, ज्याचे तीन भाग आहेत. त्यात भूमी, पाणी, मानवी संसाधनांचा वापर आणि त्यांच्या संरक्षणादरम्यान चालणारे अराजक तसेच तणावपूर्ण वाद दाखवते. गंगा नदीवर बांधण्यात आलेल्या धरणांमुळे तिचे पात्र सुकत जात आहे, हे या लघुपटाचे सार आहे. नदीवर कार्यान्वित होणाऱ्या ६०० पेक्षा अधिक विद्युत प्रकल्पांपासून गंगा नदीला वाचविण्याचे पर्याय या लघुपटात विस्तृतरित्या दाखविण्यात आले आहेत. व्यापक स्वरुपात होणाऱ्या जागतिक बदलांमुळे प्रतिकूल परिणाम करणाऱ्या पर्यायांचादेखील अंदाज या लघुपटात घेण्यात आला आहे. कशाप्रकारे नियोजन करुन एकत्रितरित्या आपण या संकटातून बाहेर पडू शकतो आणि मानव अस्तित्वाचे संरक्षण निश्चित करू शकतो, याचा अंदाजदेखील या लघुपटात घेण्यात आला आहे.

सप्टेंबर २०१२ पासून सुरू झालेला मार्तंड आणि वल्ली यांचा हा प्रवास अत्यंत रोमांचक, नाटकीय आणि मनोरंजक आहे. मार्तंड आणि वल्ली दोघांनीच या लघुपटासाठी लागणारा शोध घेतला, पटकथा लिहिली. तसेच आजही ते या लघुपटाच्या चित्रिकरणासाठी अनेक ठिकाणी प्रवास करतात. त्यावेळेस ते या लघुपटाचे संपादन आणि प्रचार कार्यदेखील करतात. लघुपट निर्मितीमध्ये पैशाच्या कमतरतेमुळे अनेकदा अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी शेकडो योजना राबवण्यात आल्या. मात्र त्यांचा कोणताही ठोस परिणाम दिसून आला नाही. तेव्हा आम्ही निराश होऊन विचार करतो की, लोक याबाबतीत गंभीर नाहीत आणि समस्येच्या निराकऱणाच्या दिशेने कोणतेही काम करू इच्छित नाहीत. मात्र वल्ली यांचा अनुभव काही वेगळेच सांगतो. ʻगंगा की वापसीʼला या दरम्यान भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणवाद्यांकडून जोरदार समर्थन मिळाले. भले विद्युत, पर्यावरण तसेच ग्रामविकास मंत्रालय याबाबत आढेवेढे घेत असेल. आम्हाला खरोखरच ते समोर येऊन याबाबतीत आपला विचार आणि दृष्टीकोन मांडतील, अशी अपेक्षा आहे. मात्र आमच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही असे होऊ शकले नाही, असे वल्ली सांगतात. पैसा गोळा करणे, हेदेखील त्यांच्यासाठी एक आव्हान होते. यासाठी काही वेळेची आवश्यकता होती. कोणत्याही परिस्थितीत त्यांचा लघुपट पावसाळ्यादरम्यान किंवा त्यानंतर लगेचच लोकार्पित व्हावा, ही त्यांची अपेक्षा होती. कारण श्रीनगरची घाटी बुडण्याच्या अवस्थेत होती. वेळेचा अभाव आणि आवश्यक तेवढे पैसे जमा न झाल्याने निराश होऊन आणि सामान्य नागरिकांकडून गोळा झालेल्या देणगीच्या मदतीने ते शोधकार्यात गुंतले. समस्येच्या मुळाशी जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या विषयावर गेल्या काही दशकांपासून काम करणाऱ्या लोकांचे विचार त्यांनी जाणून घेतले. संसाधने गोळा केली आणि त्यांना वापरण्याचे प्रशिक्षण घेतले. ʻअजूनही चित्रिकरणाचे काही काम शिल्लक आहे आणि आमच्याकडे पैसेदेखील एक लाखपेक्षा कमी आहेत.ʼ, असे वल्ली सांगतात.

चित्रिकरणाशिवाय मार्तंड आणि वल्ली यांचा हा प्रवास भावनांनी आणि रोमांचकारी अनुभवांनी भरलेला आहे. एका बाजूला असे लोक होते, जे हे काम निरर्थक असल्याचे म्हणत होते. ते वेळेचा दुरुपयोग करत असल्याचे म्हणत त्यांना चिडवत होते. तर दुसरीकडे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्यासारखे लोक होते, जे या योजनेला बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी तयार होते. नसिरुद्दीन शाह सांगतात की, ʻगंगा परियोजनेला मी दिलेल्या समर्थनासारख्या छोटेखानी योगदानाला एवढे महत्व देऊ नये. आपल्याला उत्तराखंडात आलेला भीषण महापूर आणि जवळपास दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींना लक्षात घ्यायला हवे. तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीवर अतिक्रमण करणाऱ्या दुष्ट लोकांपासून आपण तिचे रक्षण करण्याचा प्रयत्न करायला हवा किंवा किमान त्यांचा निषेध तरी करायला हवा; जे लोक जंगलातील झाडे तोडतात, खनिजसंपत्तीच्या हव्यासापोटी डोंगरदऱ्यांचा सर्वनाश करतात, पर्यायी योजनांकडे कानाडोळा करुन मोठ मोठ्या अनावश्यक गोष्टी उभारतात. यात सर्वाधिक नाश हा भरुन न येणारा आहे. आपण फक्त ही दुर्दशा लोकांसमोर आणून त्यांच्यात जागरुकता निर्माण करु शकतो, जेणेकरुन भविष्यातील नुकसान टाळता येऊ शकते. कदाचित बराच उशीर झाला आहे. तरीही ʻउशीरा सुचलेलं शहाणपणंʼ, किमान आपल्याला प्रयत्न केल्याचे समाधान तरी मिळेल.ʼ

व्यापक दृष्टीकोनातून पाहिले तर फक्त गंगाच नाही तर कोणत्याही मोठ्या नदीच्या होणाऱ्या प्रदूषणाची गोष्ट जवळपास सारखीच असते. आम्ही गंगा नदी यासाठी निवडली कारण आपण सर्व मिळून जर गंगा नदीला वाचवू शकलो तर भारतातील अन्य नद्यांना सुरक्षित ठेवण्याची आशा राहिल, असे वल्ली सांगतात. त्या सर्व लोकांना या जोडगोळीचे अप्रूप वाटते, ज्यांनी या योजनेला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे समर्थन आणि सहयोग दिला आहे. आता ते रणनिती आखणाऱ्यांसमोर आपला लघुपट प्रदर्शित करण्याची इच्छा बाळगतात. तसेच सरकारमध्ये असे धाडसी लोक येतील, जे पर्यावरणातील समस्यांच्या निराकरणारासाठी सकारात्मक पावले उचलतील. याशिवाय त्यांचा हादेखील प्रयत्न आहे की, पर्यावरण हा लोकांच्या दैनंदिन चर्चेचा विषय बनावा. यासाठी ते शहरी नागरिकांना ग्रामीण जनता आणि तेथील समस्यांच्या प्रति संवेदनशील बनवण्यासाठी तसेच त्या गोष्टीची जाणीव करुन देण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला बदल घडवण्याची मागणी करायला हवी, असे ते सांगतात. जर तुम्हाला ʻगंगा की वापसीʼ या योजनेकरिता आपले सहकार्य द्यायचे असेल, तर तुम्ही http:/returnoftheganga.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.