‘वेटर’च्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे तुषार मुनोत उभारणार सेवन स्टार हॉटेल

 ‘वेटर’च्या कामापासून आपल्या कारकिर्दीची सुरवात करणारे  तुषार मुनोत उभारणार सेवन स्टार हॉटेल

Thursday June 02, 2016,

5 min Read

सोलापूर जिल्ह्यातल्या बारशी या छोट्याश्या गावात राहणाऱ्या तुषार या तरुणाने सुरवातीपासूनच व्यवसाय करायचे स्वप्न उराशी बाळगले होते. आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. तुषाराने बीकॉम पूर्ण केले आणि बारशी मार्केट यार्डमध्ये भाजीपाला व्यवसाय सुरु केला. शेतकऱ्याकडून भाजीपाला खरेदी करायचा आणि घाऊक व्यापाऱ्याला विकायचा. हा व्यवसाय त्याने सहा महिने केला, मात्र भाजी विक्री व्यवसायातील बदलत्या प्रक्रियेमुळे त्याला तोटा सहन करावा लागला. हताश झालेल्या तुषाराने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. काहीतरी मोठा व्यवसाय करायचे त्याचे स्वप्न होते. त्याने आपले गाव सोडून शहराकडे जायचा निर्णय घेतला.

आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाठलाग करत त्याने थेट पुणे गाठले आणि एका मित्राच्या सहकार्याने हॉटेल व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरवातीलाच अडथळयांची मालिका सुरु झाली. ज्या मित्राच्या सहाय्याने त्याने व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता त्याने हॉटेल व्यवसाय करण्यास नकार दिला. आणि तुषारलाच गावी माघारी जाण्याबाबत सुचवले. मात्र तुषार आपल्या निर्णयावर ठाम होता. आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल मागे घ्यायचे नाही असे त्याने मनाशी ठरवले आणि आहे ती परिस्थिती स्वीकारत, कोणाचीही तमा न बाळगता, त्याने एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करायला सुरवात केली. त्याची मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहून हॉटेल मालकाने त्याला कॅशिअरच्या जागी बढती दिली. हॉटेलमध्ये कॅशिअरचे काम करत असतानाच सगळ्यांशी आपलेपणाने वागणाऱ्या तुषारला एका बंगल्याच्या पेंटिंगचे कंत्राट मिळाले. त्याने रंगकामात निपुण असलेल्या रंगकर्मीकडून काम वेळेत पूर्ण करून दिले. त्याचे काम पाहून त्याच परिसरात आणखी काही इमारतीच्या रंगकामाचे कंत्राट त्याला मिळाले. हॉटेल काम आणि पेंटिंग कंत्राटदाराचे काम या गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळण्यासाठी तुषारला तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याची अखंड मेहनत सुरु होती. पेंटिंगच्या कामाचा अवाका वाढला आणि तुषारने पूर्णवेळ पेंटिंग व्यवसाय करण्याचे ठरवले. त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

image


पेंटिंग व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुषारची धडपड सुरु होती. एकेक करून नामवंत बिल्डर्सची कामे त्याला मिळत गेली. व्यवसायात त्याने गती वाढवण्यास सुरवात केली होती, मात्र अचानक तुषारला मोठ्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. ज्या कंत्राटदाराचे काम त्याने पूर्ण केले होते त्या कंत्राटदाराने तीन ठिकाणी केलेल्या त्याच्या कामाचे पैसे देण्यास नकार दिला होता. तुषारला खुप मोठे नुकसान सहन करावे लागले. व्यवसायाचा विस्तार तर झालाच नाही उलट तुषार पुन्हा शून्याच्या दिशेने मागे खेचला गेला होता. त्याला नैराश्य आले होते. कुठेतरी स्वप्न भंगल्याचे दुखः त्याला स्वस्त बसू देत नव्हते. त्याला मनापासून गावी परतावे असे वाटू लागले आणि त्याने खरोखर गावी परतण्याचा निर्णय घेतला.

गावात तीन ते चार महिने घालवल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, व्यवसायात चढउतार येतातच. जर आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर आधी अपयश पचवायला शिकले पाहिजे. तुषारने या विषयावर सकरात्मक विचार केला आणि पुन्हा एकदा आपली इच्छाशक्ती अधिक बळकट करत त्याने पुण्याकडे कूच केले. यावेळी मात्र अत्यंत हुशारी आणि सावधगिरी बाळगत तुषारने एका बिल्डरबरोबर काम करायचे ठरवले. त्याच्या एका मित्राच्या ओळखीतून त्याला पुन्हा पेंटिंगचे कंत्राट मिळाले. त्याने मिळालेले काम उत्साहाने आणि वेळेत पूर्ण केले. तुषारच्या कामाचा दर्जा पाहून त्याच बिल्डरने त्याला लादी बसवण्याचे कंत्राट दिले. या मिळालेल्या कामाने तुषारचा उत्साह वाढला. त्याने बांधकाम संबंधी सर्वच कामे करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी उभा करणे ही सर्वात मोठी अडचण होती. त्यावेळी त्याच्या एका मित्राने भारतीय युवा शक्ती ट्रस्ट http://www.bystonline.org/ (BYST) मार्फत तरुण व्यावसायिकांना कर्ज देण्याबाबत माहिती दिली. भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या या उपक्रमाची माहिती मिळताच तुषारने या संस्थेशी संपर्क साधला. संस्थेमार्फत त्याला साडेसात लाखाचे कर्ज मिळाले. व्यवसाय उभारणीसाठी हव्या असलेल्या निधीचा प्रश्न सुटला होता. तुषारचा उत्साह वाढला होता, त्याने रुतु एन्टरप्राईजेस या त्यांच्या संस्थेची स्थापना करत अधिक जोमाने काम करण्यास सुरवात केली आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.

image


रस्ते बांधकाम, पाईपलाईन टाकणे, इमारत दुरुस्तीची कामे, सिंचन विभागातील कामे यासारख्या सर्वच कामांचे कंत्राट मिळवत तुषारने व्यवसायाचा विस्तार करण्यास सुरवात केली. आज त्याच्याकडे पूर्णवेळ काम करणारे ३० कर्मचारी तर कंत्राटी पद्धतीवर काम करणारे १५० पेक्षा अधिक कर्मचारी आहे. तुषारने २०० पेक्षा अधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहे. तुषार त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याना वैद्यकीय विमा सुविधा, मजुरांना अपघात विमा या सारख्या आवश्यक सोयी सुविधा पुरवतात. अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक मदत दिली जाते. काम करताना सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाते.

व्यावसायिक कामगिरी

२०११ साली तुषार यांनी व्यवसाय सुरु करताना १.६५ लाखाची गुंतवणूक केली होती. आज ते एक कोटीवर दहा टक्क्यापेक्षा पेक्षा अधिक नफा कमवत आहे. तुषार यांना मिळालेले कोणतेही काम ते आत्मीयतेने पूर्ण करतात. कामाच्या गुणवत्तेबाबत ते कोणतीही तडजोड करत नाही. मिळालेली कामं ते वेळेत पूर्ण करतात. ग्राहकांच्या अपेक्षेनुसार काम पूर्ण केले जाते. तुषार यांना राज्य महामार्ग विकासाचे २० कोटीचे कंत्राट मिळाले आहे.

image


सामाजिक बांधिलकी

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत असताना पर्यावरण प्रदूषित होणार नाही तसेच बांधकाम करताना नैसर्गिक संसाधनांचा वापर करण्यास रुतु एन्टरप्राईजेस वचनबद्ध आहे. तुषार यांनी स्वतः दोन उद्योजक तयार केले आहेत. त्यांनी त्यांच्या दोन मित्रांना उद्योग उभारणीस मदत केली. त्यांच्या कंपनीमार्फत अनेक छोट्यामोठ्या कामाचे कंत्राट त्यांना देऊ केले. त्यामुळे आणखी काही जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. तुषार यांनी त्यांच्या गावात डांबर आणि सिमेंट- वाळू- पाणी यांचे मिश्रण तयार करणारा उद्योग उभारला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी त्यांनी घरे बांधण्यास घेतली आहे. कामगारांच्या मुलांसाठी ते प्राथमिक शाळा सुरु करणार आहे. तुषार यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्याने त्यांना शेतकऱ्याविषयी कळवळा आहे. पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान त्यांनी अनुभवले आहे. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांना कृत्रिम तलाव तयार करायचे आहे, ज्यामुळे ते किमान १०० शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण करू शकतील. तुषार यांनी त्यांच्या व्यवसायात ५० पेक्षा अधिक महिलांना रोजगार दिला आहे. महिलांच्या सुरक्षिततेची पूर्णतः काळजी घेतली जाते.

आपल्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने तुषार यांनी एका हॉटेलमध्ये वेटरच्या कामापासून सुरवात केली होती आज ते पुण्यासारख्या शहरात स्वतःचे ‘सेवन स्टार हॉटेल’ उभारणार आहे. इथंपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला, अनेक चढउतार पहिले, नुकसान सोसले, मात्र कामात सातत्य ठेवले. कामाची गुणवत्ता राखत अनेक कामं मिळवली. ग्राहक देवो भव: ही संकल्पना राबवत त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. तुषार यांना सातत्याने नवनवीन संकल्पना राबवायला आवडतात. तुषार यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. सूम कॉर्पोरेशनचे सुनील मल्कानी यांना तुषार गुरुस्थानी मानतात. आपल्या व्यवसाय उभारणीस त्यांचा मोठा वाटा असल्याचे तुषार सांगतात. वेळोवेळी त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याचे ते सांगतात. तुषार यांच्या पुढील वाटचालीसाठी युवर स्टोरीच्या शुभेच्छा !

सौजन्य : भारतीय युवा शक्ती ट्रस्ट, पुणे.  http://www.bystonline.org/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

एकेकाळचा रेती, विटा, सिमेंट वाहक मजूर आज आहे वीस कंपन्यांचा मालक

उद्योजकतेच्या जगतात सांगलीचा ठसा उमटवणाऱ्या पयोद उद्योगसमूहाच्या देवानंद लोंढे यांची यशोगाथा

अमेरिकेतून शिक्षण घेऊनही देशातल्या शेतक-यांना शेतीमधल्या आधुनिक प्रयोगांचे धडे देणारे, “चंद्रशेखर भडसावळे” !

    Share on
    close