केवळ पाच रुपये नसलेल्या महिला झाल्या आत्मनिर्भर, सूरु केली स्वतःची बँक!

0

असे म्हटले जाते की, जीवन आपला मार्ग स्वतः निवडते. कदाचित यासाठीच म्हटले जाते की, आशेवरच जीवन कायम आहे. एक रस्ता बंद झाल्यावर दुसरा रस्ता दिसायला लागतो. जगण्या मरण्याचा प्रश्न असेल तर, त्याचे महत्व अधिकपटीने वाढते. वाराणसीच्या प्रल्हादपूर गावात महिलांनी असेच काही करून दाखविले आहे. या महिलांनी ते करून दाखविले आहे, ज्यामुळे आपण हेच म्हणू शकतो की, जीवन हे चालण्याचेच नाव आहे, रस्ते स्वतः बनवावे लागतात आणि त्यावर चालून उदाहरण मांडायचे असते.

वाराणसीच्या प्रल्हादपूर गावात महिला शेती करून केवळ आपले घरच चालवत नाहीत तर, महिला सबलीकरणाचे उदाहरण देखील देत आहेत. या महिलांनी शेती करण्यासोबतच आपल्या वाईट काळात मदतीसाठी गट देखील बनवून ठेवला आहे. या गटाच्या मदतीने ह्या वाईट काळात स्वतःच्या जमा झालेल्या पैशांनी कर्ज घेतात आणि नंतर कर्ज जमा करून या गटातील लोकांच्या मदतीत महत्वाचे योगदान देखील देतात. १० महिलांनी सुरु झालेला हा गट आज २२५० महिलांपर्यंत पोहोचला आहे आणि केवळ २०० रुपयांनी सुरु झालेली बचत आज साडे तीन कोटींच्या रोटेशन पर्यंत पोहोचली आहे.

रोज महिला खांद्यावर फावडे घेऊन शेताकडे जातात आणि फुलाची शेती करतात. तसेच त्या फुलांचे हार करून बाजारात विकतात, ज्यामुळे त्यांचे केवळ घरच चालत नाही तर, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि पालन पोषण देखील होते. इतकेच नव्हे, या गावातील महिलांमार्फत स्वतः बनविलेल्या गटातील सर्वात मोठा फायदा हा आहे की, यामुळे महिला कुणा दुकानदाराकडून कर्ज घेण्यापासून दूर राहतात आणि त्यामुळे त्या एकमेकांची मदत देखील करतात.

प्रल्हादपूर गावातील या महिलांचे यश पाहून शेजारी गावातील महिला देखील त्यांचे अनुसरण करायला लागल्या आहेत आणि आज ही मोहीम २२ गावात सुरु आहे. प्रल्हादपूर गावच्या मीरा यांचे म्हणणे आहे की, “माझे पती विणकाम काम करायचे. त्यानंतर ते काम बंद झाले. मात्र, गट झाल्यानंतर पासून, आमची स्थिती पहिल्यापेक्षा सुधारली आहे. त्यामार्फत बचत देखील व्हायला लागली आणि शेतात काम देखील वाढले. जुने सर्व कर्ज संपले. आता दुकानदार घरी येत नाहीत. याहून शांततेची बाब दुसरी काय असेल.”

गटाच्या संचालिका माधुरी यांचे म्हणणे आहे की, “ वीस रुपये महिना जमा करून दहा लोकांचा गट बनविला. या गावाव्यतिरिक्त जवळपास दोन डझन गावात काम सुरु केले. सामुहिक बचतीनंतर या महिला भाडेपट्ट्यावर शेत घेतात आणि एका वर्षासाठी शेती करतात आणि जे शिल्लक राहते त्यातून सर्व काम करतात. एक काळ होता की, या महिला पाच रुपयासाठी तरसायच्या, आज त्या दुस-यांची मदत करत आहेत.”

प्रल्हादपूर गावातील महिलांनी ते करून दाखविले, ज्यासाठी सरकार अनेक योजना बनवितात. त्या योजनांना बनविण्यात अनेक वर्ष लोटतात. यामुळे सिद्ध होते की, जर आपण एकत्र मिळून एखादी गोष्ट ठरवली तर, त्याचा परिणाम देखील चांगला असतो. या महिलांनी एक उदाहरण मांडले आहे, ज्याचा परिणाम दुस-या जागांवर देखील दिसत आहे. मोठी बाब ही देखील आहे की, या महिलांनी नकळतपणाने अर्थशास्त्राच्या मोठ्या पंडितांना एक उदाहरण घालून दिले आहे, ज्याचा खूप चांगला वापर केला जाऊ शकतो आणि गरिबी दूर केली जाऊ शकते.

लेखक: नविन पांडे

अनुवाद : किशोर आपटे.