विराटच्या नेतृत्वातील चमू हाच भारताचा आतापर्यंतचा सर्वश्रेष्ठ चमू आहे : आशूतोष

0

माजी पत्रकार/ संपादक, क्रिकेटचे चाहते / विश्लेषक आणि राजकीय नेते आशुतोष यांचे म्हणणे आहे की, त्यांना कुणी काही म्हणो, ते जोरदारपणे सांगतील की, विराट याचा संघ हाच मागील सा-या संघांपेक्षा जास्त प्रभावी आणि सक्षम आहे.

अलिकडेच मालिकेत इंग्लडवर भारताच्या क्रिकेट संघाने ४-०असा विजय मिळवला त्याला आपण काय संबोधाल? विराट कोहलीचा संघ भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक सक्षम संघ आहे? विराट आतापर्यतचा सर्वश्रेष्ठ कर्णधार आहेत का? ही भारतीय क्रिकेटच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे का? भारत आता जगातील क्रिकेटवर राज्य करेल का, ज्या प्रकारे ७०-८०च्या दशकात वेस्ट इंडिजने केले होते. हे सारे असे प्रश्न आहेत जे मी गेल्या सप्ताहभरापासून स्वत:ला विचारत आहे.

मला हे सांगायला संकोच वाटत नाही की, हा संघ बहुदा आतापर्यंतचा सर्वात श्रेष्ट संघ आहे. हा संघ कपिलदेव यांच्या त्या संघापेक्षा चांगला आहे ज्यांनी १९८३मध्ये विश्वचषक जिंकला होता. हा संघ महेंद्रसिंग धोनी यांच्या दोनदा विश्वचषक जिंकणा-या संघापेक्षा चांगला आहे. हा संघ सौरव गांगुलीच्या त्या संघापेक्षाही चांगला आहे ज्यात सचीन, द्रविड, सहवाग, लक्ष्मण, कुंबळे,आणि हरभजन यांच्यासारखे दिग्गज होते. मला माहिती आहे की टीकाकार माझ्या या मताशी सहमत होणार नाहीत आणि ते मला वेडा ठरवतील, किंवा मी विराटच्या संघाला त्यांच्या शक्तिपेक्षा जास्तच महत्व देतो आहे. परंतू वास्तव तर काही वेगळेच सांगते आहे.

मी माझ्या मतांशी ठाम आहे याची अनेक कारणे आहेत. मी लहानपणापासून क्रिकेट पाहतो आहे माझी आवड काही कमी झाली नाही. नेहमी क्रिकेटला पहात आलो आहे. मला आठवते ते लहानपणीच्या काळातील क्रिकेट जेंव्हा भारतीय क्रिकेट संघ केवळ पराभव टाळण्यासाठी खेळत असे. भारतीय संघ क्वचितच कधी जिंकत असे, तो खराखुरा मालिका क्रिकेटचा काळ होता. त्यावेळी टी-२० बद्दल कल्पनासुध्दा केली जावू शकत नव्हती. मैदानात तेवढ्या स्फूर्तीचे खेळाडूसुध्दा नव्हते जितके आजच्या काळात आहेत, परंतू काही खेळाडू त्यांच्या स्फूर्तीने सर्वांचे मन जिंकून मात्र घेत होते. आजच्या सारखे हेल्मेटची फँशन त्यावेळी नव्हती. थेट प्रक्षेपण ही सवलत देखील आमच्या काळात नव्हती. रेडिओच एकमात्र माध्यम  होते ज्याद्वारे  माहिती मिळत असे आणि आम्ही सुशिल दोशी आणि नरोत्तम पूरी यांच्या मोहक आवाजात सामना ऐकायला अधीर असायचो.

७०च्या दशकात भारत आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिध्द होता. चंद्रशेखर, बेदी, प्रसन्ना आणि वेंकटराघवन यांच्या फिरकीला प्रतिस्पर्धी फलंदाज वचकून असत. भारतीय खेळपट्टीवर तर जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज सुध्दा त्यांच्या समोर कापत असत. भारताकडे त्यावेळी दोन जागतिक दर्जाचे फलंदाज होते- सुनिल गावस्कर आणि गुंडप्पा विश्वनाथ. फिरकी गोलंदाजांची चौकडी आणि दोन धुरंधर फलंदाजांची जोडी असूनही प्रतिस्पर्धी संघाना या संघाची भिती फारशी वाटत नसे. परदेश दौ-यात पराभव जवळपास नक्की समजला जात होता. आणि घरच्या खेळपट्टीवर आपण विजयासाठी संघर्ष करताना दिसत होतो. त्या काळात आम्ही कधीच जिंकण्यासाठी खेळत नव्हतो. एक संघ म्हणून भारताची केवळ दोनच उद्दीष्ट होती.- पराभव टाळणे आणि सामना अनिर्णित करणे. सामना अनिर्णित राहिला तर भारतीय संघात मोठा दिलासा मिळत असे.

कपिलदेव यांच्या आगमनानंतर फिरकी गोलंदाजीच्या काळाची समाप्ती झाली. प्रत्येक तरूणाला कपिल यांचे अनुकरण करायचे होते, त्यांच्या सारखे बनायचे होते. फिरकीचा दबदबादेखील  कमी होत गेला. पंरंतू आमचे वेगवान गोलंदाजही तितके वेगवान नव्हते जितके वेस्ट इंडिज किंवा ऑस्ट्रेलिया यांचे प्रभावी होते. मोहमद निसार जवळ वेग होता, परंतू ते स्वातंत्र्याच्या युगापूर्वीच्या कहाणीचा भाग होते.

गावस्कर यांच्या संन्यासानंतर सचीन यांचे आगमन झाले, परंतू सौरव गांगुली यांनी ख-या अर्थाने भारतीय संघाला स्थैर्य आणि सक्षमता दिली आणि प्रतिस्पर्धी संघ बनविले. सौरव यांची फलंदाजी लयबध्द होती आणि ते एक चांगले कर्णधार देखील होते. सौरव आक्रमकसुध्दा होते. गावस्कर आणि कपिलदेव यांच्याउलट, सौरव केवळ जिकंण्यासाठी खेळत होते. ते भाग्यवान होते कारण त्यांच्याकाळात संघात दिग्गज खेळाडू होते. सौरव यांच्या संघात त्यावेळी सेहवाग यांच्यासारखे आक्रमक आणि शिघ्रगती फलंदाज होते तर तिस-या क्रमांकावर राहूल द्रविड नावाची मजबूत भिंत होती. सचीन आणि लक्ष्मण यांच्यासारखे महान फलंदाज असल्याने संघ फारच मजबूत झाला होता.अनिल कुंबळे आणि हरभजन यांच्या सारखे दोन महान जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज होते जे कोणताही सामना कोणत्याही क्षणी जिकून देवू शकत होते. कुंबळे आणि हरभजन यांची साथ देण्यासाठी जवागल श्रीनाथ आणि जहीर खान यांच्यासारखे प्रभावशाली वेगवान गोलंदाज होते. या संघाला घाबरविणे खूपच कठीण होते. सौरव यांची सेना रिकी पॉंटिंग आणि स्टिव वॉ यांच्या नेतृत्वातील सर्वात चांगल्या संघाला देखीलआव्हान देवू शकत होती. पण सौरव यांच्या संघात कुणी चांगला अष्टपैलू खेळाडू नव्हता जो या संघाचे संतुलन करु शकेल.

महेंद्रसिंग धोनी यांनी भारतीय संघाला नव्या ऊंचीवर नेण्याचे काम केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पतन सुरू झाले होते मात्र त्यांना हरविणे त्यावेळी देखील कठीणच होते. धोनी यांच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. ते सर्वात साहसी कर्णधार होते, सर्वार्थाने संघाचे नेतृत्व करत होते. मैदानात आपला आत्मविश्वास आणि शांत राहून आपल्या खास रणनितीला अंमलात आणणे या वैशिष्ट्यांमुळे धोनी कँप्टनकूल म्हणून ओळखले जावू लागले होते. धोनी यांच्या काळातच टी-२० आणि आयपीएल यांची सुरुवात झाली. आणि धोनींच्या नेतृत्वात क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात खेळाचे चांगले प्रदर्शन सुरू झाले होते. धोनी यांनी पहिला टी-२० विश्वचषक जिंकला, आणि त्यांनतर एकदिवसीय विश्वचषक देखील.परंतू धोनी यांच्या दणादण क्रिकेटच्या काळात देखील भारतीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी जागतिक दर्जाची नव्हती आणि या संघातही एकही चांगला अष्टपैलू नव्हता. गोलंदाजी मध्येही संघात चांगला पर्याय नव्हता.

धोनी यांच्या प्रमाणे विराट यांच्यातही प्रचंड आत्मविश्वास आहे आणि ते नेतृत्व करण्यातही कुशल आहेत. ते नेहमी आव्हानांचा सामना करण्यात तत्पर दिसतात. सौरव गांगुलीप्रमाणेच, विराट यांचा पवित्रा देखील नेहमी आक्रमक असतो त्यामुळे ते मैदानात विरोधकांना चिरडण्यास सज्ज दिसतात. त्यांची फलंदाजी हीच त्यांची ताकद आहे. ते सौरव आणि धोनी यांच्यापेक्षा कित्येकपटीने जास्त चांगले फलंदाज आहेत. माझ्या मते ते सचिन तेंडुलकर आणि सुनिल गावस्कर यांच्या तोडीचे फलंदाज आहेत. ते एकमात्र भारतीय फलंदाज आहेत ज्यांनी एकाच वर्षात तीनदा दुहेरी शतके झळकावली आहेत. सचीन पेक्षा वेगळेपणाने विजयाचा पिच्छा पुरविताना ते वेगळाच आत्मविश्वास असल्याचे दाखवून देतात. प्रतिकूल स्थितीत ते सचीनपेक्षा चांगले फलंदाज आहेत. दबाव असतानाही ते सचीनपेक्षा चांगला खेळ करु शकतात. विराट यांना कर्णधारपद देखील शोभून दिसते  तर सचीनला कर्णधारपद झेपले नाही, उलट ते त्यांचे कमजोरी असल्याचे सिध्द झाले.

विराट यांच्याजवळ तो संघ आहे की,ज्यात सौरवच्या संघातील प्रत्येक महान खेळाडूची जागा घेणारा खेळाडू आहे. सचीनच्या जागी विराट स्वत: आहेत ,पुजारा आपल्या धावा घेण्याच्या भुकेसाठी आणि क्षमतेमुळे राहूल द्रविडच्या बरोबरीचे आहे.रहाणे यांनी लक्ष्मणची जागा घेतली आहे. मुरली विजय, शिखर धवन आणि के एल राहूल सलामी फलंदाज म्हणून सहवाग, गौतम गंभीर यांच्या जोडीसारखा दबदबा ठेवतात. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर आश्विन आणि जडेजाने कुंबळे आणि हरभजन यांच्यापेक्षा जास्त सामने जिंकून दिले आहेत उमेश यादव, शमी, इंशात शर्मा, बुमराह, भुवनेश्वर कुमार यांच्यामुळे वेगाच्या बाबतीतही देश कोणत्याही प्रकारे मागे नाही. त्यांच्यापैकी प्रत्येकजण १४०किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून विरोधी फलंदाजाना भंडावून सोडत आहे.

सौरव आणि धोनी याच्या संघापेक्षा विराटच्या नेतृत्वातील संघात तीन महत्वाच्या तीन खुबी आहेत आणि त्यामुळे हा संघ जुन्या दोन संघापेक्षा चांगला असल्याचे दिसून येते.एक, विराट यांचा  संघ भारताचा आतापर्यंतचा सर्वात स्फूर्तीदायक आणि एथलेटिक संघ आहे. मला विराट यांच्या संघा इतकी स्फूर्ती दुस-या कोणत्याही संघात दिसत नाही. सौरव आणि धोनी यांच्या संघात अनेक खेळाडू क्षेत्ररक्षण करताना कमजोर दिसत असत. आश्विन आणि जडेजा यांच्यासारखे दोन जागतिक दर्जाचे अष्टपैलू विराट यांच्या संघाची शक्ति वाढवितात. दोघेही जागतिकदर्जाचे गोलंदाज आहेत. जयंत यादव यांच्या सारखा गोलंदाजही शतक करण्याची क्षमता ठेवतो. याच हरहुनरी खेऴाडूंमुळे भारतीय गोलंदाजीला स्थिरता आणि खोली मिळाली आहे. आता भारताजवळ ९असे खेळाडू आहेत जे शतक करण्याची क्षमता बाळगतात. आता पर्यंत कोणत्याही भारतीय संघात खोलवर फलंदाजी करण्याची प्रतिभा नव्हती. खरेतर ही क्षमता जागतिक क्रिकेटमध्ये दुर्लभ अशीच आहे. तीन, विराट यांच्या संघाचे आणखी एक वैशिष्ट्यअसे की, त्यांची बेंच स्ट्रेंथ म्हणजे राखीव खेळाडू देखील दमदार आणि प्रभावी आहेत. प्रत्येक स्थितीत विराट यांना दोन किंवा तीन पर्याय उपलब्ध आहेत. जर शिखर धवन जायबंदी झाले तर केएल राहूल आणि पार्थिव पटेल आहेत. जर रहाणे नसेल तर करूण नायर कुणालाही त्यांच्या अनुपस्थितीची जाणिव होणार नाही अश्या प्रकारे सहजपणे तिहेरी शतक करु शकतात. तर पार्थिव पटेल आपल्या बँट आणि फटकेबाजीने तयार दिसतात. रोहित शर्मा सारख्या चांगल्या फलंदाजाला या संघात जागा मिळण्यासाठी मेहनत करावी लागते. वेगवान गौलंदाजीसाठी आमच्याजवळ पाच गोलंदाज आहेत आणि या सर्वांजवळ एक सारखा वेग, शक्ति आणि प्रतिभा दिसून येते. अश्विन आणि जडेजा यांच्यासोबत जयंत यादव आणि अमित मिश्रा सारखा प्रतिभावान फिरकी गोलंदाजही आहे. सध्याच्या काळात अश्विन जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे आणि जडेजा दुस-या क्रमांकावर आहे म्हणजे जगातील सर्वात श्रेष्ठ गोलंदाज विराटच्या संघात आहेत.

मला माहिती आहे की मी मर्माला हात घातला आहे, टीकाकार यावर मला दोष देतील. परंतू कुणी मला हे सांगावे की आतापर्यंत कोणत्या भारतीय संघाने इंग्लडला ४-०असे चिरडले आहे. प्रत्येक सामना भारताने मोठ्या फरकाने जिंकला आहे. कुक यांच्या नेतृत्वातील हा इंग्लडचा संघ कमजोर म्हणता येणार नाही. या संघात अनेक चांगले खेळाडू आहेत, तरीही विराटच्या संघाने त्याना रस्त्यावर आणून उभे केले आहे. आणि हे विसरू नका की, विराटचा हा संघ आपल्या पूर्ण शक्तिनीशी मैदानात उतरला नाही, अनेक खेळाडू जखमी असल्याने मैदानात उतरलेच नाहीत तर ते बेंचवर बसले होते. विराटना नवे खेळाडू खेळवावे लागले. आणि त्या सर्व तरुण आणि नव्या खेळाडूंनी स्वत:ला आपल्या वरिष्ठांपेक्षा जास्त सिध्द केले. हीच या संघाची शक्ति आहे आणि आम्ही या सा-या खेळाडूंना सलाम करतो. अपेक्षा आहे आणि शुभेच्छासुध्दा! - हा संघ नेहमी असाच जिंकत राहो.

(माजी पत्रकार आशुतोष हे आम आदमी पक्षाचे नेते आहेत या लेखातील त्यांच्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)