एका गरीब कामगाराच्या मुलीचा वयाच्या १५ व्या वर्षी पीएचडीसाठी प्रवेश !

0

वयाच्या ७ व्या वर्षी माध्यमिक, १० व्या वर्षी उच्च माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण करून १३ व्या वर्षी जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली. १५ व्या वर्षी पर्यावरण सूक्ष्मजीव शास्त्रा (environmental microbiology) सारख्या विषयात पदवीत्युर झाली. हे सगळे या वयात सफलतापूर्वक करणे म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे, पण हे लखनऊच्या १५ वर्षीय सुषमा वर्माने करून दाखवले आहे. ७ फेब्रुवारी २००० मध्ये जन्मलेल्या १५ वर्षाच्या सुषमाने याच वर्षी लखनऊच्या बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठातून (बीबीएयू) पीएचडीची प्रवेश परीक्षा पास करून नावलौकिक मिळवला.

एका गरीब कुटुंबात जन्मलेली सुषमा ही आपल्या आई वडिलांच्या तीन अपत्यांपैकी एक आहे. तिचे वडील एक श्रमिक मजूर म्हणून काम करतात. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सुषमा वयाच्या ५ व्या वर्षा पर्यंत शाळेत गेली नाही. लखनऊला फोनवरून झालेल्या संभाषणात सुषमाने सांगितले की, "माझे वडील दिवसभर मजुरी करायचे तरी पण उदरनिर्वाह करणे कठीण होत होते. म्हणून शाळेत न जाता वयाच्या ५ व्या वर्षी साल २००५ मध्ये यूपी बोर्डाच्या मान्यता प्राप्त ‘मीरा इंटर कॉलज’ मध्ये नववीच्या वर्गासाठी अधिकृत नाव नोंदविले.’’ सुषमाच्या कुटुंबात तिचे भावंडपण अतिशय हुशार होते. मोठ्या भावाचे शैक्षणिक रेकॉर्ड पण कौतुकास्पद होते. त्याने वयाच्या नवव्या वर्षी १० वीची परीक्षा पास करून फक्त १४ व्या वर्षी बॅचलर इन कॉम्पुटर एप्लिकेशन (बीसीए) मध्ये पदवी मिळवली. सुषमाचे मोठे भाऊ शैलेंद्र तिचे प्रेरणास्तोत्र, मार्गदर्शक व शिक्षक आहे. मोठ्या भावाच्या सहयोगाने ती पुस्तकांचा अभ्यास करू लागली. तो पर्यंत कल्पना नव्हती पण अभ्यासाची गंमत वाटायची आणि मी तो आनंदाने करायची असे ती सांगते. शैलेंद्र सध्या बेंगलोर मध्ये तांत्रिक सल्लागाराच्या रुपात काम करण्याव्यतिरिक्त स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या प्रयत्नाची पूर्ती करत आहे.

साल २००७ मध्ये १० वीचा निकाल हा सुषमा व तिच्या कुटुंबियांना अपेक्षित असाच होता. सुषमाने फक्त ७ वर्ष ३ महिने आणि २८ दिवसात दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केले. नंतर ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ ने कमी वयातील १० वी उत्तीर्ण झालेली विद्यार्थीच्या रुपात तिला मान्यता दिली. सुषमा सांगते की,’’ ७ व्या वर्षी शालेय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी तिला जपानला जावे लागले. या कारणासाठी अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष झाले. यामुळे तीन वर्षानंतर ती वयाच्या १० व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. डॉक्टर बनण्याची इच्छा असलेल्या सुषमाने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेडीकलच्या अभ्यासासाठी आवश्यक यूपी – सिपिएमटी परिक्षा दिली पण लहान वय असल्यामुळे तिचा निकाल थांबवण्यात आला. परिस्थितीला न घाबरता सुषमाने जीवशास्त्र आणि वनस्पतीशास्त्रातून पदवी (बीएससी) घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढच्या तीन वर्षात वयाच्या १३ व्या वर्षी स्नातकची पदवी प्राप्त केली. बीएससी नंतर एनवायरमेंटल बायोलॉजी मध्ये पदवीत्युर केल्यानंतर फक्त वयाच्या १५ व्या वर्षी विज्ञानशाखेची पदवीत्तर पदवी संपादन करण्यात यश मिळवले.

परंतु पदवीनंतर सुषमा आपल्या परिवाराच्या आर्थिक परिस्थितीमुळे चिंतीत होती कारण तिचे वडील तेज बहादूर तिच्या अभ्यासाचा खर्च पेलण्यास असक्षम होते. अशातच सुलभ इंटरनॅशनल चे संस्थापक बिंदेश्वर पाठक एखाद्या देवदूतसारखे त्यांच्या मदतीला आले. ती आज ज्या स्थानावर आहे आणि जे शिकते, त्या मागे बिंदेश्वर यांचे मोलाचे योगदान आहे. वडिलांना बीबीयू मध्ये एका सफाई कर्मचाऱ्याची नोकरी देऊन त्यांच्या आर्थिक परिस्थितीला एका प्रकारे हातभार मिळाला. तसेच मदत म्हणून कॉम्पुटर,कॅमेरा आणि मोबाईल फोन दिले. यानंतर याच वर्षी सुषमाने एमएससीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून पीएचडीच्या परीक्षेसाठी नोंदणी परीक्षा दिली.


याच वर्षी वयाच्या १५ व्या वर्षी सुषमाला लखनऊ च्या बीबीएयू मध्ये पीएचडीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणारी कमी वयातील भारतीय असल्याचा बहुमान प्राप्त झाला. सध्या सुषमा आपल्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांबरोबर शिकत आहे, त्याच बरोबर त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा पण तिला होतोय. योग्य सहयोगाने तिच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळत आहे. पीएचडीच्या अभ्यासक्रमानंतर वयाची १७ वर्ष पूर्ण होणाऱ्या सुषमाला मेडिकलची प्रवेश परीक्षा देण्याचा विचार आहे.

सुषमा आणि तिच्या कुटुंबियांना तिच्या या यशाचा अभिमान आहे. वडिलांना पूर्ण खात्री आहे की, "एक दिवस त्यांची मुलगी सीपीएमटी ची परीक्षा पास करून नक्कीच डॉक्टर होण्यात यशस्वी होईल. याव्यतिरिक्त पूर्व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना पाच लाखांची आर्थिक सहाय्यतेची अधिकृत घोषणा केली आहे ’’.

ईमेलद्वारे तुम्ही सुषमाशी संपर्क साधू शकता : sushma936@gmail.com


लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किरण ठाकरे