प्रत्येक मुलाला मिळेल शिक्षण, भारताच्या प्रगतीचं हेच लक्षण

प्रत्येक मुलाला मिळेल शिक्षण, भारताच्या प्रगतीचं हेच लक्षण

Saturday October 31, 2015,

3 min Read

जय मिश्रा यांनी आपल्या जीवनातील सुरूवातीची १६ वर्ष गरीबीत काढली आहेत. एका झोपडीत राहणाऱ्या जयच्या कुटुंबाला अन्न, वस्त्र आणि निवारा यासारख्या मूलभूत गरजांसाठीही संघर्ष करावा लागत होता. तरीही आपल्या मुलांनी खूप शिकावं असं जयच्या वडिलांना वाटत होतं. आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत कर आणि कामावर विश्वास ठेव असं वारंवार त्यांनी जयला सांगितलं, त्यामुळे त्याचे वडीलच त्याचे आदर्श आहेत. जयच्या वडिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागात शिपाई म्हणून कामाची सुरूवात केली आणि आपल्या उत्तम कामाच्या बळावर ते एका ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकपदापर्यंत पोहोचले होते. शिक्षण हेच जीवन परिवर्तनाचं साधन आहे हा वडिलांनी दिलेला सल्ला जयच्या मनावर कोरला गेलाय.

'टीच फॉर इंडिया' क्लबमध्ये एक शिक्षक म्हणून जय यांनी कामाला सुरुवात केली. जयचा जन्म उत्तरप्रदेशातल्या जौनपूरमध्ये झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षणही तिथेच झालं. आर्थिक अडचणी असल्या तरी हिंमत न हरता जय यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग ८९ टक्के गुण मिळवत पूर्ण केलं आणि महाविद्यालयात तिसरा क्रमांकही पटकावला. एवढे चांगले गुण मिळवूनही केवळ दहावीत कमी गुण असल्याने जयला नोकरी मिळाली नाही. निराश न होता जय यांनी हे आव्हान स्वीकारलं. लोकांच्या समस्यांवर उपाय शोधण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची जयची इच्छा होती.


image


इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना जय यांना टीच फॉर इंडिया या मोहीमेबद्दल माहिती मिळाली. भारतातील सर्व मुलांना एक दिवस चांगलं शिक्षण मिळेल हा या मोहीमेचा उद्देश होता आणि त्यामुळेच जय मोहीमेकडे आकर्षित झाले. त्याचवेळी ते “क्वालिटी ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया” या विषयावर संशोधन करत होते. त्यामुळेच टीच फॉर इंडिया उपक्रमाविषयी ऐकताच जय यांनी त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


image


२०१३ मध्ये जय टीच फॉर इंडिया मोहिमेत सहभागी झाले. आता ते प्रकल्प व्यवस्थापक म्हणून ही मोहीम यशस्वी होण्यासाठी काम करत आहेत. शिक्षणाचं महत्त्व जाणणारे त्यांचे वडील जयच्या या कामावर खूप खुश आहेत.

कोणत्या तरी कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करण्यापेक्षा गरीब मुलांसाठी काम केल्यामुळे मिळणारं समाधान जास्त मौल्यवान असल्याचं जय अभिमानानं सांगतात. लहान मुलांसोबत संवाद साधणं, त्यांना शिकवणं त्यांच्यात डबा खाणं यामुळे मिळणारा आनंद विस्मरणीय असतो, असं जय सांगतात.

image


जय यांच्या मते प्रत्येक मूल हे वेगळं असतं पण ते एकत्र आले की एक कुटुंब बनून जातं. जय यांची फेलोशीप ३२ मुलांसोबत सुरू झाली होती आणि आता त्यांच्यासोबत ३६० पेक्षा जास्त मुलं आहेत. या मुलांना ते मित्राप्रमाणे वागवतात. इथली मुलं खूप गरीब आहेत. माध्यान्ह आहार मिळतो म्हणून ही मुलं शाळेत थांबतात. एवढंच नाहीतर आपल्या घरच्यांना खायला मिळावं म्हणून ही मुलं आपल्याला मिळालेलं अन्न घरी घेऊन जातात. जगण्याची भ्रांत असल्यानं आई-वडिल दिवसरात्र एक करत असतात. त्यामुळे ते आपल्या मुलांसोबत वेळही घालवू शकत नाहीत.

मुलं अतिशय संवेदनशील असल्यानं त्यांच्यावर चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा प्रभाव लवकर पडतो. त्यामुळे त्यांच्यासमोर आपलं वर्तन चांगलंच असायला हवं.

जय हे मुलांशी मित्राप्रमाणे वागत असल्यानं मुलं त्यांच्या अडचणी, घरातील समस्या हे सगळं जय यांच्याकडे व्यक्त करतात. मग जयसुद्धा त्यांना मदत करतात. मुलं समजूतदार व्हावीत यासाठी जय प्रयत्न करत असतात.

मुलांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी राजकारणात जाण्याची जय यांची इच्छा आहे. तर पुढे आपल्या गावातील मुलांसाठी ते शाळा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. फेलोशीप करत असताना जय यांनी पुण्यात लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘परिवर्तन’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे दर महिन्याला पालक आणि मुलांसाठी संवाद नावाची परिषद भरवली जाते. जय यांनी आपली फेलोशीप सुरू असतानाच आतापर्यंत ५ कार्यक्रम आयोजित केले आहेत.