'कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवलात तर कंपनीला चांगले दिवस येतील नवीन तिवारी यांच्या यशाचा मूलमंत्र

0

ʻआमच्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांवर आम्हाला विश्वास आहे, असे आम्ही निश्चितच सांगत असतो. मात्र खरंच असे आहे का?, कदाचित नाही. ज्या दिवशी आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला शिकू, त्या दिवसापासून आपली कंपनी अधिक सुस्थितीत यायला लागेल. असे केल्याने कर्मचारीदेखील कंपनीला आपलीशी समजू लागतील.ʼ, खरोखरच कोणत्याही कंपनीच्या प्रगतीचा हा सर्वात मोठा मंत्र आहे. यशाचा हा मूलमंत्र सांगितला आहे इनमोबी कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन तिवारी यांनी. टेकस्पार्क ६ मध्ये कंपन्यांमध्ये चांगले वातावरण राखण्यासाठी तसेच कंपनी जगभरात यशस्वी ठरविण्यासाठी उपायांबाबत चर्चा करताना नवीन तिवारी यांनी हा मंत्र सांगितला. नवीन यांनी सांगितले की, जेव्हा इनमोबी लहान कंपनी होती, तेव्हा त्यांनी बऱ्याच चुका केल्या. ʻआमची कंपनी लहान असताना, कंपनीत काम करणारी प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र राहून जगण्याचा प्रयत्न करत होती. आणि ते योग्यदेखील आहे. कारण आपण काही आता शाळेत शिकत नाही. आपण वयस्कर लोकांसोबत काम करत आहोत. आपल्याला जर एखादे सार्थकी लागण्यासारखे काम करायचे असेल, तर आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांकडून तसेच काम करुन घेता आले पाहिजे. आपल्याकडील लोकांचा आपण संसाधनाप्रमाणे वापर करू शकत नाही, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे.ʼ

नवीन तिवारी यांच्या मते, त्यांना ही गोष्ट लक्षात आली होती. ते सांगतात की, लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष देत राहणे, हे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया घालवण्याप्रमाणे आहे. नवीन यांनी जेव्हा आपल्या कंपनीच्या कार्य़संस्कृतीत बदल केला, तेव्हा त्यांना त्याचा फायदा एकदम जलदगतीने दिसून आला. कंपनीला नफा होण्यास सुरुवात झाली होती. त्याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्मचारी स्वतंत्र कार्यपद्धतीचा वायफळ उपयोग करत नव्हते. यापूर्वी कर्मचाऱ्यांवर अनेक प्रकारची बंधने होती. मात्र कर्मचाऱ्यांचे वागणे त्या बंधनांना झुगारुन देत होते. सध्या फक्त कंपनीत एक टक्केच कर्मचारी असे आहेत, जे या स्वतंत्र कार्य़पद्धतीचा गैरफायदा घेत आहेत, हे नवीन यांनी कबूल केले. अशा कार्यसंस्कृतीत लोकांना आपल्या कर्तव्याची जाणीव होते. कंपनी फायद्यात असणे आणि कंपनीतील वातावरणदेखील चांगले राहणे, एखाद्या कंपनीसाठी यापेक्षा चांगली गोष्ट अजून काय असू शकते, असे नवीन सांगतात. ते पुढे सांगतात, ʻकंपनीत जर चांगली कार्यसंस्कृती असेल, तर काम करणारे नोकरी सोडणार नाहीत. सर्वकाही विश्वासाशी जोडले गेले आहे. जर कंपनीत काम करणाऱ्या लोकांना कंपनीवर विश्वास नसेल, तर कंपनीची वाढदेखील होणार नाही. अशा परिस्थितीत हे गरजेचे आहे की, पहिल्यांदा आपल्या कंपनीतील लोकांमध्ये कंपनीप्रती विश्वास निर्माण करा आणि दुसरे म्हणजे, ज्या नव्या लोकांची तुम्ही भरती कराल, तेव्हा इंटरनल हायरिंगला (अंतर्गत भरती) प्रोत्साहन द्या.ʼ

नवीन सांगतात की, ʻया गोष्टीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, कंपनीतील एका कर्मचाऱ्याची जेव्हा एका पदावरुन दुसऱ्या पदावर नियुक्ती होते, तेव्हा ते दुसरी गोष्टदेखील शिकतात. याशिवाय त्यांच्यामध्ये कंपनीप्रती विश्वास अधिक दृढ होतो.ʼ असे म्हणतात की, प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात एका लहान पावलानेच होते. त्यासाठी गरज आहे ते फक्त पाऊल उचलण्याची. जर निर्णयच घेतला नाही, तर समजणार कसे की, निर्णय बरोबर आहे की चुक. नवीन यांच्या मते, ʻजेव्हा आपण एखादी कंपनी सुरू करतो, तेव्हाच तुम्ही विचार करायला हवा की, कंपनीचा विस्तार कसा असेल. तुम्ही कमी कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन आपल्या कंपनीचे काम सुरू केले आहे का? की तुम्हाला कंपनीचा संपूर्ण देशभर विस्तार करायचा आहे, कदाचित विदेशातदेखील. तुम्हाला मोठे काम करायचे असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, कार्यसंस्कृती चांगलीच ठेवावी लागेल. तेव्हाच तुमचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे जेव्हा तुमची कंपनी लहान असेल, तेव्हाच तिच्या कार्यसंस्कृतीकडे लक्ष द्या.ʼ

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीला जर अधिक चांगले बनवायचे असेल, तर कंपनीच्या संस्थापकाला कार्यालयात चांगली कार्यसंस्कृती राबवण्यासाठी वेळ द्यावा लागेल. फक्त गुंतवणूकदारच मिळवणे एवढेच गरजेचे नाही, तर त्यासोबतच कंपनीत अधिकाधिक वेळ व्यतित करणे, हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. ʻजर कंपनीला ए,बी,सी दर्जापेक्षा श्रेष्ठ बनवायचे असेल, तर तेथे चांगल्या कार्यसंस्कृतीची निर्मिती करणे आवश्यक आहे. यासाठी ह्युमन रिसोर्स आऊटसोर्सचा वापर अजिबात करू नका, त्याऐवजी कर्मचाऱ्यांना आपल्या समजुतीचा एक भाग बनवा.ʼ, असे नवीन सांगतात.लेखक : अपर्णा घोष

अनुवाद : रंजिता परब