तबल्यावरची थाप म्हणजे जीवनाची समृध्दी....

तबल्यावरची थाप म्हणजे जीवनाची समृध्दी....

Sunday February 21, 2016,

5 min Read

मेक इन इंडियातल्या २७ क्रमांकाच्या मंडपात एक बाजू संपूर्णपणे संगीत नाटक अकादमीसाठी राखीव होती. उजव्या बाजूला भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून आणलेले तंतू वाद्य आणि इतर वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी साधारणतः ७५-८५ वर्षे वयोगटातील एक गृहस्थ अचानक उठला आणि 'चेंडा' वाद्य बडवत असलेल्या मुलाला हात न लावण्याचा इशारा करु लागला. समोर त्या मुलाचे वडील त्याचा फोटो काढत होते. त्यानं पुन्हा चेंडा बडवायला सुरुवात केली तेव्हा हे गृहस्थ फार अस्वस्थ झाले. ते त्या मुलावर ओरडलेच. मुलगा कावरा बावरा झाला. हे बघून त्या मुलाचे वडील त्यांच्यावर भडकले. त्या छोट्या मुलावर का भडकताय असं उलट तपासणी करु लागले. या आजोबांचा आवाज ही चढला. अस्सल उर्दूमध्ये त्यांनी त्या मुलांच्या वडिलांना खडसावलं. “कैसी तालीम दी है आपने अपने बच्चो को लिखा है हाथ लगाना मना है फिर भी आप उसे हाथ लगाने कह रहे है, फोटो निकाल रहे है. यह क्या आपकी तालीम है.“ आजोबा चांगलेच भडकले होते. दोघांचे आवाज चढले. सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी वाद मिटवला. वडील मुलाला घेऊन गेले आणि आजोबा बाजूलाच असलेल्या तबल्याच्या स्टॉलवर जाऊन बसले. साधा कुर्ता पायजमा असा अगदी थेट ग्रामीण भागातला पेहराव असलेले हे आजोबा अगोदर मला बघ्यांपैकी एक वाटले पण जेव्हा त्यांनी या तबल्याच्या स्टॉलवर बैठक जमवली तेव्हा समजलं की त्यांना त्या मुलाच्या चेंडा बडवण्याचा राग का आला ते. आजोबांचं नाव होतं कासीम खान नियाजी. दिल्लीतले प्रसिध्द तबला बनवणारे. मी त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा ते सांगू लागले, “साहब अभी इन लोगो क्या पता यह बनाने के लिए क्या क्या करना पडता है. कितनी मेहनत लगती है. अभी अगर वह चेंडा खराब हो जाता तो यह साहब तो अपने बच्चे को लेकर वहाँ से फरार हो जाते. हालांकी मैने यह चेंडा नही बनायी है लेकीन मै जानता हुँ यह कितना अनमोल है. इसकी थाप कितनी अनमोल है, यह इन लोगो के लिए शायद फोटोवाली चीज होगी, हमारे लिए तो जिंदगी है. हम कैसे चुप रह सकते है”

image


कासीम खानम नियाजी यांचं बोलणं ऐकत राहावं असंच वाटत होते. याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा बोलण्याचा नवाबी लहेजा. आप आप करत बोलणं. कासीम खान यांची आता दुसरी पिढी तबला बनवण्याचं काम करतेय. दिल्लीतल्या लक्ष्मीनगर भागात त्यांचं मोठं दुकान आहे. ढोलकी, तबला आणि इतर तत्सम वाद्य ते इथं विकतात. पण तबला ही त्यांची खासियत आहे. संगीत नाटक अकादमीकडून त्यांना त्याच्यासाठी गौरवलं गेलंय. कालिदास पुरस्कारही मिळाला. दिल्लीत तबला बनवून मिळण्याचं एकच ठिकाण. म्हणजे कासीम खान नियाजी यांचं दुकानं..

image


कासीमजी सांगतात, “मी आठवी शिकलो, त्यानंतर मी शिक्षण सोडलं. संगीताची आवड होती. पण शिकलो नाही. दिल्ली, लखनऊमध्ये भटकताना तबला हाती आला. तो बनवण्याची कला शिकलो. माझ्या गुरुंची ही विद्या मला वारसा म्हणून मिळाली. हळूहळू संगीत नाटक अकादमीशी जोडला गेलो. तेव्हापासून मी तिथले तबले आणि इतर वाद्य बनवतोय पण मला तबला बनवायला आवडतं. माझं वय ७८ आहे. मला माहित नाही मी किती तबल्यांना आकार दिलाय. पण त्यावर पडणारी थाप ऐकताना बरं वाटतं. तबला माझं जीवन आहे.“

image


उस्ताद अल्लाहरखाँपासून ते नवख्या तबला वादकापर्यंत सर्वांची पसंत त्यांना माहितेय. यातला कुठलाही तबलजी असा नाही की तो कासीमींच्या दुकानात आलेला नाही. सर्वांना त्यांनी तबले पुरवले आहेत. सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध आहेत. अगदी घरच्या सारखे, पण कासीमजी यांना कलेतली घराणेशाही मान्य नाही “ कला ही एका घराण्याशी जोडलेली का असावी हेच मला समजत नाही. कला कुणाची बांधिल आहे का? कला सर्वांसाठी आहे. आणि ती सर्वांना दिल्यानंच त्याचा प्रचार होईल. इथं प्रत्येकजण हा वारसा आपल्याकडेच कसा राहिल हे पाहतात. रवी शंकर, अल्लाहरखाँ, अमजदअली खाँ सर्व एकाच माळेतले. त्यामुळं हे घराणे शाही पटणारी नाही.” हे सर्व बोलत असताना कासीमजी आपल्या व्यवसायातही आपण ते पाळलं आहे असं ठणकावून सांगतात. “मी अनेकांना तबला बनवण्याचं प्रशिक्षण दिलंय असं ते सांगतात. पण दोन दिवसात त्या लोकांचा उत्साह मावळतो. अनेकांना घरातून बोलावून आणलंय” मग त्यांनी आपल्या तीनही मुलांना या व्यवसायाकडे जबरदस्तीनं आणल्याचं सांगतात. “ कुणी तयार होत नाही हे लक्षात आल्यानंतर मी माझ्या मुलांनाच तयार केलं. ही मुलं वेगळं काही तरी करु शकत होती मग मी त्यांना म्हटलं ही आपली कला आहे. त्यातच बघा काही तरी वेगळं करता येतं का?“

image


कासीमजींची ही पुढची पिढी फक्त तबल्यावर राहिलेली नाही. त्यांनी काळाऩुरुप लागणारे वाद्य बनवायला सुरुवात केली. पारंपारिक वाद्यांचा त्यांचा हातखंडा होताच. पण झपाट्यानं बदलणाऱ्या जगाचा वेग आपल्या व्यवसायामध्येही असला पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणूनच कांगो, ऑस्केस्ट्रामध्ये लागणाऱी वाद्य त्यांनी बनवायला सुरुवात केली.


image


मेक इंन इंडियाचा काय फायदा होईल? या प्रश्नाचं उत्तर देताना ते हसतात. “ एक सांगू मला माहित नाही या प्रदर्शनात आम्हाला किती फायदा होईल इथं लोक येतात, किंमती विचारतात. निघून जातात. “ तबला आणि इतर वाद्यांचा संपूर्ण अर्थशास्त्रीय दृष्टीकोन त्यांनी स्पष्ट केला. शहरात आणि ग्रामीण भागातही मॉल आणि दुकानात तबला आणि इतर वाद्य विकली जातात. ग्राहक आमच्याकडे कधीच थेट येत नाही. त्यामुळे आमच्या कमाईचा सर्वाधिक वाटा हा दुकानदार किंवा मॉलवालाच घेऊन जातो. तो अधिक नफा कमावतो. त्यामुळे इथं येऊन आम्हाला किती फाय़दा होईल हे मला सांगता येणार नाही पण एक आहे, लोकांना आम्ही हे सांगण्यात यशस्वी होतोय की आम्ही इथं आहोत जे तबला बनवतो आणि विकतोही.

एका तबल्याची किंमत ही त्याच्या बांधणी आणि आकारावर असते. त्यामुळे कधी कधी एक तर कधी दोन असे तबले विकले जातात, कधी तर काहीच विकले जात नाही. तरीही मी माझ्या पुढच्या पिढीला या बेभरवश्याच्या व्यवसायात आणलंय असं ते सांगतात. याचं कारण म्हणजे या वाद्यांवर त्याचं अतोनात प्रेम आहे. आणि त्यांना ती वाद्य आपलं जीवन वाटतात.  

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

परंपरेला आधुनिकतेची जोड हवीच...

जग मुखवट्यांचं....

'दास्तानगोई'तून 'सून भई साधो ': अंकित चढ्ढा …’