युरोपिअन बाजारात भारतीय त्रिमूर्ती उतरवणार ‘मेकींग इन इंडिया’

युरोपिअन बाजारात भारतीय त्रिमूर्ती उतरवणार ‘मेकींग इन इंडिया’

Wednesday April 06, 2016,

5 min Read

कामाच्या ठिकाणी सायकलवर जाण्याचा पर्याय आकर्षक वाटत असला, तरी अंमलात आणण्यास जरा कठीणच आहे. कारण सायकल चालवून ऑफिसला पोहचेपर्यंत चांगली दमछाक तर होतेच शिवाय चिंब घामाजलेल्या अवस्थेत ऑफिसमध्ये प्रवेश करणं तितकसं व्यवहार्यही नाही. पण जर का तुम्हाला मोटारसायकल किंवा स्कूटरचा वेग आणि व्यायामाची सुविधा असणारं वाहन मिळालं तर? असा पर्याय खरोखरचं मिळाला तर तुम्ही व्यायाम करत आरामात, ताजेतवानेच ऑफिसला किंवा इच्छित स्थळी पोहचू शकता. नारायण सुब्रमण्यम, नीरज राजमोहन आणि प्रीतम मूर्ती ही त्रिमूर्ती सध्या याच कामात गुंतली आहे.

गेले वर्षभर ‘अल्ट्राव्हायलेट’ वैयक्तिक प्रवासाकरता नवीन पर्याय चाचपडत आहे. शहरी जीवनशैली आणि प्रवास यांच्याशी निगडीत समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.

वेगळी वाट

नारायण स्वीडनमधील उमेअ इथं मास्टर्स करत होता. तर प्रीतम स्वतःचा कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचं काम पाहायचं. नारायण युरोप आणि आशियातल्या लोकांची स्थानिक प्रवासाची पद्धत न्याहाळत असायचा. आणि मग या दोघांनी मिळून अल्ट्रव्हायलेट सुरू करण्याचं ठरवलं.

प्रीतम सांगतो की, सॅनफ्रन्सिस्कोमध्ये त्याच्या विद्यार्थीदशेत प्रत्येक ठिकाणी त्याला सायकलवर जाणं शक्य नसायचं. आणि त्याचवेळी ‘अल्ट्राव्हायलेट’ची कल्पना सुचली. 30 वर्षीय नारायण सांगतो की, “बेंगळुरूतल्या कोरामंगला भागातल्या एका लहानशा खोलीत आम्ही कामाला सुरूवात केली. मुख्य डिझाइन आणि मूळ प्रतिकृतीवर आम्ही इथेच काम केलं. आमचा सर्वात मुख्य IP तर तयार झाला. पण आम्हाला खर्च आटोक्यात ठेवण्याकरता आमच्या बऱ्याच गोष्टी आम्हालाच कराव्या लागणार होत्या. मग आम्ही मोठा 3डी प्रिंटर घेतला”. काही महिन्यानंतर नीरजही त्यांना येऊन सामील झाला.

रजनीश, कार्तिक, नारायण, प्रीतम, नीरज आणि अजय

रजनीश, कार्तिक, नारायण, प्रीतम, नीरज आणि अजय


ट्रॅक चेंज

या त्रिमूर्तीने त्यांचं लक्ष्य दोन महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रीत करण्याचं ठरवलं. प्रवासातल्या पहिल्या ते शेवटच्या किलोमीटरपर्यंत वैयक्तिक गतीशीलता, ज्याकरता सार्वजनिक परिवहन व्यवस्था वापरली जाते. तसेच एखाद्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी पुरेशा वेगात पोहचवेल आणि त्याच्या व्यायामाचीही गरज भागवली जाईल, असं वाहन बनवणं.

30 वर्षीय प्रीतम सांगतो की, “आपल्या जीवनशैलीनुसार वाहन बनवली जात नाहीत. म्हणजे तुम्ही मोटरसायकलच बघा ना, तिच्यावर बसून आपण व्यायाम नाही करू शकत ना. सायकलनी प्रवास केल्यास व्यायाम होईल पण आपण चटकन एखाद्या ठिकाणी पोहचू नाही शकत. या दोन्ही वाहनांना काही मर्यादा आहेत. याच मर्यादावर तोडगा काढण्याकरता ट्विस्टर बनवण्याची कल्पना आम्हाला सुचली”. नारायण ट्विस्टरविषयी अधिक माहिती देतो, “ट्विस्टरची बांधणी जरा वेगळी आहे. ती सायकल आणि बाईक या दोन्हींच्या कार्यप्रणालीवर चालते. तिचा साचा (फ्रेम) एका कोनात १८० अंशात फिरवता येतो. एका प्रणालीनुसार सायकल चालवता येते तर दुसऱ्या प्रणालीने बाईक चालवता येते. मोटर असणाऱ्या सायकल किंवा सायकल आणि बाईक यादोन्ही प्रणालीत ट्विस्टरची सीट/बसण्याची पद्धत वेगळी आहे”.या टीमच्या म्हणण्यानुसार, आपल्या सर्व सामाजिक आणि शहरी जीवनपद्धतीची, प्रवासाची सांगड घालून ट्विस्टर बनवण्यात येत आहे. ट्विस्टरचे सुरूवातीचे डिझाइन्स, नमुने नारायण आणि कार्तिक कानन यांनी बनवलेत.

बाजारात मोटर असणाऱ्या सायकल्स उपलब्ध आहेत. त्या मूळतः सायकलचचं तत्त्व पाळतात. त्यामुळे कोणाला जर खूप लांबच अंतर कापायचं असेल तर ते मोटर असणाऱ्या सायकलवर कापणं जरा कठीण आहे.

नारायण सुब्रमण्यम आणि नीरज राजमोहन स्टुडीओत

नारायण सुब्रमण्यम आणि नीरज राजमोहन स्टुडीओत


ट्विस्टरची स्वारी

ट्विस्टरची मूलकृती (prototype) बनवण्याकरता चांगलाच खर्च येत असल्यानं, त्यांना आणखी साधनं लागणार असल्याचं टीमला जाणवलं. नीरज सांगतो की, “आम्ही गुंतवणुकदारांकडे फक्त कागदांवरचे काही आराखडे घेऊन तर जाऊ शकत नव्हतो ना. फक्त कागदावरचे आराखडे दाखवून ही आमची योजना आहे तुम्ही पैसे गुंतवा असं सांगितलं असतं तर कोणीही आम्हाला त्यांच्या दारात उभं केलं नसतं. काम करणारं मॉडेल आम्हाला बनवणं आवश्यक होतं”. ट्विस्टर बनवण्याकरता निधी जमवण्यासाठी कागदावरची पहिली डिझाइन होती ग्लाईड. सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून दक्षिण-पूर्व आशियातून त्यांना प्रमाणित मोटर आणि बॅटरी मिळाल्या. साचा आणि बरेचसे इतर भाग 3डी प्रिंट होत्या.

मूळ प्रतिकृती तयार झाल्यावर त्यांनी गुंतवणुकदारांना दाखवण्याकरता एक व्हिडिओ बनवला. बऱ्याच जणांना ही कल्पना आवडली पण जोखीम पत्करायला कोणी तयार नव्हतं. नारायण सांगतो की, त्यांच्या आणि गुंतवणुकदारांच्या पसंतीचा सुवर्णमध्य साधायला खूप वेळ लागला. आतापर्यंत आपल्या भोवताली जी गोष्ट नव्हती, ती आणायला स्वतःहून कोणीतरी पुढे यायला हवं होतं. चेन्नईतल्या एका एंजल गुंतवणुकदाराकडून त्यांना काही रक्कम मिळाली. ट्विस्टरला सर्वोत्कृष्ट डिझाईनचा पुरस्कार मिळाला. मार्च २०१६ मध्ये तैवान इथं झालेल्या आंतरराष्ट्रीय बाईक शो मध्ये ट्विस्टर सहभागी झाली.

ट्विस्टर

ट्विस्टर


मूळ प्रतिकृती बनवायला टीमला खूप कयास पडले. कागदावर आराखडे तयार असले तरी, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवायला महत्प्रयास पडले. अनेक फेरबदल करून तंतोतंत प्रतिकृती तयार करण्यात आली. नीरज सांगतो की, “आमचं उत्पादन वर्कशाळेत एकदम झक्कास वाटत होतं. पण जेव्हा त्याला स्टुडिओत घेऊन आलो तेव्हा त्यात खूप बदल करायला हवं असल्याचं आमच्या लक्षात आलं”. उत्पादन दर्जेदार होण्याकरता सतत कराव्या लागणाऱ्या बदलांमुळे बॅटरी तंत्रज्ञानातही बदल करावे लागणार असल्याचं टीमच्या ध्यानात आलं. बॅटरी तंत्रज्ञानावर नीरज काम करत होता. त्याने मग आग प्रतिबंध करण्याकरता बॅटरी चटकन थंड करणे आणि औष्णिक कार्यक्षमतेवर भर दिला.

नीरज सांगतो की, “बॅटरी चार्ज करणे आणि औष्णिक कार्यक्षमता वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. सर्वाधिक वापर होत असतानाही बॅटरी सुरक्षित असली पाहिजे. हेच तंत्रज्ञान टेस्लामध्येही तुम्हाला पाहता येईल”. यावर्षी बाजाराचा अंदाज घ्यायला काहीच वाहन बाजारात आणणार आहेत. जर्मनी, स्विडन आणि एमस्टरडममधली विद्यापीठ आणि शहरांमध्ये चाचपणी केल्यावर, २०१७ मध्ये युरोपच्या बाजारात ट्विस्टर दिसेल. साधारण २ लाख ३२ हजार ८५४ रुपये ते ३ लाख ३२ हजार ५५७ रुपयांदरम्यान ट्विस्टरची किंमत असणार आहे.

डिझाईन, उत्पादन आणि जोडणी यासर्व गोष्टी भारतातच करण्यात येणार आहेत. तैवान आणि चीनमधल्या काही उत्पादकांशी अल्ट्राव्हायलेट सध्या बोलणी करत आहे. भारतीय लोक आणि वाहतूक यांचा विचार करून कामगिरी आधारित दुचाकी भारतीय बाजाराकरता बनवण्याच्याही विचारात ते आहेत. ही दुचाकी सध्या अगदी प्राथमिक अवस्थेत आहे.

इलेक्ट्रॉनिक वाहनांचा बाजार

२०२२ पर्यंत भारत सरकारचं १०० गिगाव्हॅटस् सौरऊर्जेचं लक्ष्य आहे. २०२० पर्यंत ७० लाख इलेक्ट्रीक आणि हायब्रिड वाहन रस्त्यावर आणण्याच्या विचारात सरकार आहे. म्हणजेच या नवीन क्षेत्राला चांगलाच वाव असणार आहे. ब्रामो, झीरो मोटरसायकल्स, बीएमडब्ल्यू, इलेक्ट्रीक मोटरस्पोर्ट, हॉलीवूड इलेक्ट्रिक्स, यामहा, हार्ले डेव्हिडसन आणि लिटो या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहन जागतिक बाजारात आणली आहेत.

जपानच्या टेर्रा मोटर्स कंपनीने २०१५ मध्येच भारतात इलेक्ट्रीक स्कूटर्स विकायला सुरूवात केली आहे. गुडगावमध्ये ३३ कोटी २४ लाख १७ हजार २५० रुपयांचा प्लांट उभारण्याची घोषणाही नुकतीच या कंपनीने केली आहे. कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो २०१५ मध्ये गोगोरोने गोगोरो स्मार्टस्कूटर आणि गोगोरो एनर्जी नेटवर्क, बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क या प्रकल्पांची घोषणा केली आहे.

लेखिका – सिंधू कश्यप

अनुवाद – साधना तिप्पनाकजे