नवीन उपक्रमांना ऑनलाईन प्रेझेन्स मिळवून देणारे विश्वसनीय नाव ‘विडरशीन्स’

0

सोशल मीडिया हा आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनलेला आहे. सुरुवातीला केवळ चॅटींगसाठी वापरल्या जाणाऱ्या या माध्यमाचे फायदे लक्षात आल्यावर याचा वापर आता अधिक प्रभावीपणे होऊ लागला आहे. नवीन उपक्रम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी, कंपन्यांच्या जाहिरातींसाठीही आता सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम म्हणून पुढे येऊ लागले आहे. मात्र सोशल मीडियावर स्वतःच्या उपक्रमाचे, उद्योगाचे पद्धतशीर व प्रभावी ब्रॅण्डिंग स्वतः करणे प्रत्येक उद्योजकाला जमतेच असे नाही. एखादा उद्योग सुरु करताना फायनान्स उभा करणे, इतर सर्व कामांचे नियोजन करणे यासारख्या अनेक गोष्टी करायच्या असतात. अशा वेळी ब्रॅण्डिंगसाठी एखाद्या क्रिएटिव्ह कल्पनेचा विचार करणे, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वतः वेळ देणे कठिण असते. तसेच सोशल मीडियाचा ब्रॅण्डिंगसाठी वापर कसा करावा याबाबत तितकेसे ज्ञान नसणाऱ्या उद्योजकांना स्वतःहून या माध्यमाचा वापर करणे शक्य होत नाही. केवळ वेळेचा अभाव किंवा अज्ञान यामुळे सोशल मीडियासारख्या प्रभावी माध्यमापासून दूर राहणाऱ्या अशा उद्योजकांना कौशिक भागवतने ‘विडरशीन्सच्या’ माध्यमातून एक विश्वसनीय पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

कौशिक भागवत
कौशिक भागवत

कॉम्प्युटरमध्ये रमणाऱ्या कौशिकने खरं तर वयाच्या १७व्या वर्षापासूनच आपल्या करिअरची सुरुवात केली. १२वीमध्ये असताना शिक्षण घेता घेता त्याने आपल्या भावाच्या कंपनीमध्येच एक वर्ष इन्टर्नशीप केली. त्यानंतर बीबीए केलेल्या कौशिकचे कॉम्प्युटरवरचे प्रभुत्व दिवसेंदिवस वाढत होते. अशातच सोशल मीडियाचे युग आले आणि अर्थातच कौशलचा या माध्यमातही हातखंडा बसला. कौशलचे सोशल मीडिया क्षेत्रातील प्रावीण्य पाहून त्याच्या भावाने त्याला स्वतःची एजन्सी सुरु करण्याचे सुचविले. “दोन-अडीच वर्षांपूर्वीच स्वतःची सोशल मीडिया सर्विस एजन्सी सुरु करण्याचा विचार होता. मात्र त्यावेळी काही कारणाने ते राहून गेलं. पुढे ‘दि मेश’ या को-वर्किंग प्लेसचा सीओओ म्हणून काम करताना पुन्हा एकदा त्याची आठवण झाली. इथे येणाऱ्या स्टार्टअप्सना सोशल मीडिया सर्विस पुरविल्यास ‘दि मेश’ची ती वॅल्यू ऍडेड सर्विस ठरेल हा विचार मनात आला. मी ही कल्पना ‘दि मेश’ची संस्थापिका दिप्ती कसबेकरला बोलून दाखविली आणि तिलाही ती आवडली,” कौशिक सांगतो. आज कौशिकची ‘विडरशीन्स’ दि मेशमध्ये येणाऱ्या स्टार्टअप्सबरोबरच पुण्यातील इतर स्टार्टअप्सनाही सोशल मीडिया सर्विस पुरविते.

दीड महिन्यांपूर्वी ११ सप्टेंबरला सुरु करण्यात आलेली ‘विडरशीन्स’ सोशल मीडियावरील ब्रॅण्डिंगसाठी स्टार्टअप्सच्या पसंतीस उतरली आहे. केवळ महिनाभरात विडरशीन्सला पाच ग्राहक मिळाले. जपलॉप इक्वेस्ट्रिअन सेंटर, गेट अ गेन यासारख्या कंपन्यांचे सोशल मीडिया ब्रॅण्डिंग करण्याची जबाबदारी विडरशीन्सने उचलली आहे.

क्रिएटिव्ह आयडीएशन आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट अशा दोन प्रकारच्या सेवा ‘विडरशीन्स’ पुरविते. क्रिएटिव्ह आयडिएशन अंतर्गत उद्योजकांना त्यांच्या कंपनीच्या ब्रॅण्डिंगसाठी नवनवीन क्रिएटिव्ह आणि प्रभावी कल्पना सुचविण्यात येतात. तर सोशल मीडिया मॅनेजमेंट अंतर्गत या कल्पनांना प्रत्यक्षात साकारण्यापासून उद्योजकांना ऑनलाईन प्रेझेंस मिळवून देण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी ‘विडरशीन्स’ पार पाडते.

“स्टार्टअप्सकडून विडरशीन्सला खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे. मात्र सध्या टीम खूप छोटी असल्यामुळे जास्त कामं आम्ही घेत नाही . कारण जास्तीत जास्त काम मिळविण्यापेक्षा हाती घेतलेलं प्रत्येक काम उत्तमरित्या पार पाडावं असं मला वाटतं,” कौशिक सांगतो. या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत ग्राहकांची संख्या १० ते १२ पर्यंत नेण्याचे विडरशीन्सचे लक्ष्य आहे. त्यासाठी लवकरच टीम वाढविणार असल्याचं कौशिक सांगतो. भविष्यात कौशिकला बंगळुरुमध्ये विडरशीन्सचे कार्यक्षेत्र विस्तारायचे आहे. “बंगळुरुमध्ये स्टार्टअप्सची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल,” असं कौशिक सांगतो.

‘विडरशीन्स’ या शब्दाचा अर्थ आहे विरुद्ध दिशेने फिरणारे. सर्जनशील वृत्तीच्या कौशिकच्या डोक्यातून निघणाऱ्या कल्पनाही या अर्थाला साजेशा अशाच असतात. प्रचलित पद्धतीपेक्षा निराळ्या, आगळ्या-वेगळ्या मार्गाने केलेले प्रभावी ब्रॅण्डिंग ही विडरशीन्सची ओळख बनत चालली आहे. काम करण्याच्या या पद्धतीमुळेच विडरशीन्सने अल्पावधीत उद्योजकांचा विश्वास संपादन केला आहे.