अवघाचि या संसारामधली जोडी तुझी माझी - मंजिरी प्रसाद ओक

0

अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची बायको मंजिरी प्रसाद ओक यांनी नुकताच आपला लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आता किती वर्ष लग्नाला झाली यापेक्षा वर्षानुवर्ष ही साथ अशीच राहो याबद्दल ही जोडी आग्रही होती आणि आहे. यानिमित्त प्रसादची बायको, त्याआधीची त्याची प्रेयसी मंजिरीशी आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांचा हा प्रेमाचा प्रवास जाणून घेतला.

“प्रसादचा भाऊ सदानंद हा माझा मित्र, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी प्रसादला पाहीलं पण माझ्यालेखी प्रसादचं ते पहिलं इम्प्रेशन बिलकुल आनंददायी नव्हतं. आमची खरी ओळख झाली ती तोच घेत असलेल्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये. सदानंदला माझ्या अभिनयाची आवड माहीत होती त्याने मला या कार्यशाळेत सहभागी होण्यास सांगितले, साधारण तीन महिनेही कार्यशाळा होती. खरेतर ही कार्यशाळाच पुढे आमच्या प्रेमाची जन्मभूमी ठरली.”

मंजिरी सांगते, “मी जेव्हा माझ्या आई बाबांना माझ्या प्रसादच्या प्रेमाबद्दल सांगितले तेव्हा ते चांगलेच नाराज झाले होते. त्यांनी प्रसादला भेटायला बोलावले तर तो इतक्या ऐटीत आला होता की जसे काही अंबानीनंतर हाच. बाबांनी त्याला त्याच्या भविष्याबद्दल विचारले तर त्याने सरळ सांगितले की मी अभिनय क्षेत्रात काम करणार आहे, तुमच्या मुलीवर माझे प्रेम आहे आणि तिचेही माझ्यावर प्रेम आहे तेव्हा तुम्ही हो म्हणालात तर आनंद आहे आणि नाही म्हणालात तरीही आम्ही लग्न करणारच. माझ्या बाबांनी मला बाहेर बोलवले आणि विचारले हे सगळे बघतेस ना तू. मीही क्षणाचा विचार न करता हो म्हणाले होते. त्यानंतर १९९७ साली आमचा साखरपुडा झाला आणि १९९८ साली लग्न.”

“प्रसादच्या घरची परिस्थितीही काही वेगळी नव्हती. त्याच्या आई वडिलांनीही कडाडून विरोध केला. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. आज मी दोन मुलांची आई असताना त्यावेळचा त्याच्या घरच्यांचा विरोध समजू शकते. माझ्या मोठ्या मुलाने जर बावीस तेवीस वर्षी लग्न केले तेही कोणतीही नोकरी व्यवसाय नसताना तर मीही कदाचित तशीच वागेन. आमचे लग्न झाले तेव्हा प्रसाद त्याच्या अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत होता. त्याला पुण्यात २५ रुपये पर नाईट मिळत होती तर मुंबईला ३५ रुपये मिळायची. मी त्याला जबरदस्तीने मुंबईत पाठवले त्यानंतर तीन महिन्यांनी मीही मुंबईत आले.

सुरुवातीला मुंबईत भाड्याच्या घरात रहात असताना. घराचे भाडे भरण्यासाठी या दोघांना त्यावेळी प्रसादची पुण्यातली एमईटी गाडी विकावी लागली होती. तर घर चालवण्यासाठी मंजिरीने एका मासिकामध्ये नोकरी स्वीकारलेली. तुटपुंज्या पैशामध्ये घरखर्च चालवायचा. एक वेळचे जेवण, कधी खिचडी, कधी नुसती पोळी भाजी, कधी क़ॉफी बिस्कीट तर कधी फक्त ग्लुकोज बिस्कीट पाण्यात बुडवून खाल्लीत. पण त्यामुळं प्रेम कमी झालं नाही तर वाढतच गेलं.

रणांगण, भ्रमाचा भोपळा या नाटकांमधून प्रसादने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. यानंतर हळूहळू प्रसादचे काम वाढू लागले. नाटक मालिका यामधून तो लोकांच्या नजरेत येत होता. पण सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो सारेगमप या झीच्या रिअॅलिटी शोचा. मंजिरी सांगते, “या शोची जेव्हा प्रसादला ऑफर आली होती तेव्हा त्याने सरळ सरळ नकार दिला. पण नंतर माझ्या म्हणण्यावरुन तो यात सहभागी झालेला. प्रसादची आई संगीत विशारद आहे पण प्रसादने कधीच गाणे शिकले नाही, त्याला उपजतच गात्या गळ्याची देणगी मिळालीये, त्याने आपल्या करिअरची सुरुवातही गाण्याच्या कार्यक्रमातनं केली, गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तो गायचा पण रिअॅलिटी शोमध्ये गाण्याचा त्याचा पहिलाच प्रयत्न होता. ”

सारेगमपचा विजेता बनल्यानंतर प्रसाद झी मराठीचा ब्रँड अँबेसेडर बनला, एका वाहीनीचा चेहरा बनणारा प्रसाद हा पहिला मराठी कलाकार. त्यानंतर स्टार वाहिनीनेही प्रसादसोबत कॉन्ट्रॅक्ट केले होते.

“कलाकार जसा मोठा होऊ लागतो तसे त्याच्या भोवतालच्या गोष्टी पण वाढू लागतात म्हणजे मित्रपरिवार, गॉसिप्स, त्याच्यावरचा प्रकाशझोत सगळेच. पूर्वी ज्या प्रसादच्या स्वभावाला लोक नाव ठेवायचे तो प्रसाद आता मात्र त्यांच्यासाठी कौतुकाचा विषय बनला होता. त्याचा चाहता वर्ग वाढत होता ज्याची झळ माझ्यापर्यंत पोहचू लागलेली. म्हणजे निनावी पत्रं येणे, टेलिफोन येणे, मला त्याच्याशी लग्न करायचेय, माझे त्याच्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे मजकूर या पत्र आणि टेलिफोनमध्ये असायचा. याचा आमच्या दोघांच्या नात्यात काहीही फरक पडला नाही.” हे ती अभिमानाने सांगते.

एक माणूस, नवरा आणि अभिनेता म्हणून प्रसादच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल मंजिरीला अभिमान आहे. “प्रसाद अजूनही तसाच शांत, अबोल, माणसांपासून थोडे दूर रहाणाराच आहे. तो बदलला नाही, तो खवय्या बिलकूल नाहीये, त्याला फळभाज्या आवडत नाही, तो पालेभाज्या आणि भऱपूर नॉन व्हेज खातो. मला सुरुवातीला जेवण बनवता यायचे नाही पण प्रसादने मी जे जे बनवले ते आनंदाने कुठलीही तक्रार न करता खाल्ले. फक्त त्याला न आवडणाऱ्या गोष्टी तो नाहीच खात. मग तो चहा कॉफी बिस्कीट खाऊन पोट भरतो.”

प्रसादच्या भूमिका असलेल्या वादळवाट, अवघाची संसार, पिंपळपान, आभाळमाया या मालिका, ती रात्र सिनेमा, नांदी, बेचकी ही नाटकं मंजिरीला आवडतात. तिला न आवडणाऱ्याही प्रसादच्या खूप साऱ्या भूमिका आहेत पण त्याविषयी तिची तक्रार नाही. कारण या भूमिकांमध्ये प्रसादने त्याचे शंभर टक्के दिले होते आणि त्या स्वीकारण्याचे कारण ही तेव्हाची त्यांच्या संसारातली पैशाची गरज ही होती.

मंजिरीलाही अभिनयात रस आहे, प्रसादने तिला या क्षेत्रात काम करण्याविषयी अनेकदा विचारले पण तिने नेहमीच नकार दिला. ज्यावेळी गरज होती तेव्हा संसारासाठी तिने नोकरी केली, पण तिला नेहमीच संसारामध्ये, कौटुंबिक जबाबदाऱ्य़ांमध्ये रस होता. म्हणूनच आज १८ वर्षानंतरही प्रसादच्या या अवघाची संसारात मंजिरी सुखाने नांदतेय.