अकरा वर्षांचे छोटे मास्टरजी ‘बाल चौपाल’च्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात भरतात आनंद!

0

सातव्या इयत्तेत शिकणा-या अकरा वर्षांच्या आनंद कृष्ण मिश्रा याचे स्वप्न आहे की, देशातील कुणीही मुल निरक्षर किंवा अडाणी राहू नये. त्यामुळेच त्याने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्याची जाणिव जागृती करण्याचा विडा उचलला आहे. उत्तरप्रदेशची राजधानी लखनौच्या आसपास १२५ गावातून न जाणो किती मुले आज या ‘छोटे मास्टरजी’ आणि त्यांच्या ‘बालचौपाल’च्या प्रयत्नाने शिक्षित होण्यात यशस्वी झाली आहेत. आनंद याने सन २०१२ मध्ये झोपडपट्ट्यातील मुलांना साक्षर करण्याचे प्रयत्न सुरु केले. ज्याने काही काळाने चौपालचे रूप घेतले.

आनंद आता आपल्या व्यस्त दिनचर्येतून एक तास वेळ काढून या मुलांना गणित संगणक आणि इंग्रजी शिकवतो. मागील तीन वर्षापासून आनंदने आपल्या बाल चौपालच्या माध्यामातून सुमारे ७०० मुलांना शाळेत जाण्यास प्रवृत्त केले आहे. आपल्या या बालचौपालमध्ये आनंद मुलांना शिकवण्याशिवाय त्यांच्या मनस्थिती आणि वातावरणाबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग आई-वडीलांच्या मदतीने या मुलांना शिकण्यासाठी जागृत करतो.

त्याचे वडील अनूप मिश्रा आणि आई रिना मिश्रा उत्तरप्रदेश पोलिस विभागात कार्यरत आहेत, आणि दोघांचा या अभियानात सहभाग आहे. याशिवाय हे कुटूंबिय पर्यावरण संरक्षणावरही कार्यक्रम आयोजित करतात. आपल्या रिकाम्यावेळात लोकांना पर्यावरणाच्याबाबत जागृत करतानाच वृक्षारोपणाबाबतही त्यांच्यात जाणिव निर्माण करतात.

कसा सुचला विचार

आनंदचे वडील सांगतात की, लहानपणी महाराष्ट्रात सुट्टी व्यतीत करताना घडलेल्या प्रसंगातून् त्यांच्या मुलाच्या जीवनात परिवर्तन झाले. अनूप सांगतात की आनंद चौथ्या वर्गात असताना एकदा ते पुण्यात फिरायला गेले होते. तेथे आनंदने पाहिले की, एक मुलगा मंदीरात आरती सुरू झाली की येत असे आणि संपली की बाहेर जात असे. बाहेर जाऊन शोध घेतला असता दिसले की तो मुलगा झोपडपट्टीत राहणारा होता. कच-यातून उचलून आणलेल्या फाटक्या पुस्तकांतून तो अभ्यास करत होता. आनंदने त्याला काही पैसे देण्याचा प्रयत्न केला पण त्याने तो धुडकावत सांगितले की,’मला काही द्यायचेच असेल तर पुस्तके आणि पेन पेन्सिल द्या.’ ते पुढे सांगतात की,या घटनेने आनंदच्या बालमनात काहीतरी कोरले गेले आणि तेंव्हाच त्याने गरीब मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागात काम करण्याचे ठरविले.

आनंद यांचे धाडस पाहून त्याच्या आई-वडीलांनी त्याला लखनौच्या बाहेरच्या काही भागात घेऊन गेले. तेथे गेल्यावर असे दिसले की, बरीच मुले शिक्षणापासून वंचित आहेत. आणि दिवसभर इकडे-तिकडे भटकण्यात त्याचा वेळ ती वाया घालवतात. अनूप सांगतात की, सुरुवातीला या भागात आनंदने काही मुलांना आपल्यासोबत शिकण्यासाठी तयार केले. काही काळाने त्या शिकणा-या मुलांना शिकण्याची गोडी लागली आणि त्यांनी त्यांच्या मित्रांनाही शिकायला घेऊन येण्यास सुरूवात केली. अश्याप्रकारे बाल चौपालचा पाया घातला गेला.

कसे शिकवले जाते मुलांना

लखनौच्या आशियाना स्थित सीटी मॉन्टेसरी शाळेत शिकणारा आनंद रोज सकाळी लवकर उठून आपला स्वत:चा अभ्यास पूर्ण करतो आणि दुपारी शाळेतून आल्यानंतर काही वेळ आराम केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता बाल चौपाल लावण्यासाठी तो घराबाहेर पडतो. दूरध्वनीवरून याबाबत बोलताना त्याने सांगितले की, मी त्यांना हसत खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांच्यात शिकण्याची गोडी निर्माण होते आहे. मी त्यांना सुरस कहाण्या आणि शैक्षणिक खेळांच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो. मला असे वाटते की, शाळेतील वातावरण त्यांना आवडत नाही म्हणून ते शिकायला जाण्यास टाळतात.

असे नाही की आनंद आपल्या या बाल चौपाल मध्ये मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान देतो तर तो या मुलांच्या मनात देशभक्ती जागवण्याचा आणि त्यांना एक चांगला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतो. आनंद सांगतो की, ‘आमच्या बाल चौपालची सुरूवातच ‘हम होंगे कामयाब’ या गीताने होते आणि राष्ट्रगीताने सांगता होते. माझे मत आहे की, यामुळे ही मुले शिक्षणाबाबत जागरूक होत असतानाच नैतिकता, राष्ट्रीयता आणि सामाजिक बांधिलकीबाबतही ओळख करून घेतात.’

ग्रंथालय सुरू करण्याची योजना

आनंदला त्याच्या या बाल चौपाल साठी आतापर्यंत सत्यपथ बाल रत्न आणि सेवा रत्न याशिवाय काही अन्य पुरस्कारही मिळाले आहेत. आनंद ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यासाठी ग्रंथालये उघडण्याच्या प्रयत्नात असतो. आतापर्यत काही लोकांच्या मदतीने यामध्येही त्याला यश मिळाले आहे. आनंदला आता हे अभियान आणखी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी शालांत परिक्षेत अव्वल आलेल्या विद्यार्थ्याना या अभियानात जोडून गरीब मुलांना प्रेरीत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे.

आनंद दररोज आजूबाजूच्या ग्रामीण भागातील आणि गलिच्छ वस्त्यातील सुमारे शंभर मुलांना शिकवतो. तरीही परिक्षेच्या काळात त्याला आपल्या या जबाबदा-या अन्य सहकारी मित्रांवर सोडाव्या लागतात परंतू त्याचे मित्रही त्याची निराशा करत नाहीत.याचवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिवसाच्या निमित्ताने आनंदने ‘चला शिकू’ अभियानाची सुरूवात केली आहे. या अभियानातून त्याचा मानस आहे की, प्रत्येक शिक्षित नागरिकाने पुढे यावे आणि किमान एका निरक्षर मुलाला शिक्षित करण्याचा संकल्प करावा.

अखेरीस आनंद आमच्या वाचकाना सांगतो की, ‘या ज्ञानाचा दिवा उजळवूया’ माझ्या बाल चौपाल मध्ये शिकणा-या वंचित मुलांना सहकार्य करून आपण सारे जीवनात सफल होऊया. गलिच्छ वस्तीत राहणा-या मुलांना शाळेचे दप्तर, पुस्तके,वह्या पेंसिल,पाटी इत्यादी शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देऊन त्यांच्या जीवनातील अंधार आपण ज्ञान दिवा उजळून दूर करू शकतो. खरोखर तुमच्या एका छोट्याश्या कृतीनेही कुणाच्या जीवनात चांगला बदल होऊ शकतो. तुम्ही दिेलेल्या एखाद्या पेन्सिलीनेच ही मुले ‘अ’ लिहून अंध:कार नाहीसा करतील आणि ‘ज्ञ’ लिहून ज्ञानाची संधी प्राप्त करु शकतील. आनंदला संपर्क करण्यासाठी आपण त्याच्या वडीलांच्या फेसबूकवर जाऊ शकता.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte