महिला सक्षमीकरणाचे दोन मूलमंत्र – शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य- एल. कुमारमंगलम

महिला सक्षमीकरणाचे दोन मूलमंत्र – शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य- एल. कुमारमंगलम

Friday October 30, 2015,

10 min Read

न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना पोलीस यंत्रणेत फैलावलेल्या भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, महिलांच्या समस्यांवर दीर्घकाळ काम करणाऱ्या ललित कुमारमंगलम यांचा हा आरोप आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांच्या मते उच्च पदांवरील आणि प्रभावशाली पुरूषांची महिलांविषयी असलेली वागणूक हे सगळ्यात मोठं आव्हान आहे.

image


“ कौटुंबिक हिंसा, हुंडा, बलात्कार यासारख्या कोणत्याही अत्याचारग्रस्त महिलेला सगळ्यात आधी पोलिसांची उदासीनता, निष्काळजीपणा आणि उद्धटपणाचा सामना करावा लागतो. ही खूप भयंकर बाब आहे आणि माझ्या पातळीवरही ती जाणवते म्हणूनच मी याविरुद्ध लढण्यासाठी सज्ज होते. त्यामुळे सामान्य महिलेला किती त्रास होत असेल याची मला जाणीव आहे. म्हणूनच अशा प्रतिकूल परिस्थितीतही झगडून विजयी झालेल्या महिलांविषयी मला नितांत दर आहे, हे नरकात जाऊनही सुखरुप परत येण्यासारखं आहे, 'युअर स्टोरी' शी बोलताना त्यांनी भावना व्यक्त केल्या.

देहविक्रीशी संबंधित महिलांची परिस्थिती सुधारावी यासाठी हा व्यवसाय कायदेशीर करण्याची मागणी ललिता यांनी गेल्यावर्षी केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या मते हा व्यवसाय कायदेशीर केला तर मानवी तस्करी थांबवता येईल आणि एचआयव्ही तसंच गुप्तरोगांच्या फैलावावरही नियंत्रण मिळवता येईल. पण त्यांच्या या मागणीला पक्षांशी संबंधित संघटनांनी कडाडून विरोध केला.

ललिता कुमारमंगलम ह्या धाडसी आणि स्पष्टवक्त्या आहे आणि ज्या पद्धतीने महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे ते पाहता सरकारी यंत्रणांना त्याबाबत जागृत करण्यात त्या यशस्वी होतील यात शंका नाही. त्याचबरोबर भारतात महिलांची सुरक्षा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यात आवश्यक ती सुधारणा करण्यासही त्या सरकारला भाग पाडतील.

न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आपल्या कार्यालयाचे दरवाजे सतत उघडे आहेत असं आश्वासनही त्या देतात.

“ जर एखादी पीडित महिला माझ्याकडे आली तर तिच्यासाठी मी शक्य ते सर्व करीन, माझ्या वाईट काळात मला खूप लोकांनी सहकार्य केलं. मग मी अशा महिलांना मदत का करु नये. आपण काही निर्जन ठिकाणी राहत नाही तर समाजात राहतो. अगदी अनोळखी ठिकाणीही तुम्हाला मित्र मिळतात, ” असं त्या सांगतात. ललिता यांचा जन्म तामिळनाडूत झाला होता. प्रसिद्ध राजकीय नेते मोहन कुमारमंगलम हे त्याचे वडील तर त्यांचे आजोबा पी. सुब्रमण्यम हे मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते. ललिता यांच्या आई कल्याणी या बंगालचे मुख्यमंत्री अजय चक्रवर्ती यांच्या कन्या तर प्रसिद्ध राजकारणी रंगराजन कुमारमंगलम हे ललिता यांचे बंधू आहेत.

ललिता या स्वत: एक उद्योगी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे तर मद्रास विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले आहे. २००४ आणि २००९ मध्ये त्य़ांनी लोकसभा निवडणूक लढवली पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्या ‘प्रकृती’ नावाने एक एनजीओ चालवतात.

'युअर स्टोरी' शी मारलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये ललिता म्हणतात की भारतीय समाजात महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीमध्ये येत्या काळात सकारात्मक बदल होण्याची आशा आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून तुम्हाला समोर कोणती आव्हानं आहेत असं वाटतं?

ललिता कुमारमंगलम : महिलांबद्दल भारतीय समाजाची संकुचित विचारसरणी हे चिंतेचं सगळ्यात मोठं कारण आहे. गेल्या अनेक शतकांपासून ही संकुचित मानसिकता पिढ्यानपिढ्या कायम आहे. महिलांनी पुरूषांच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, पुरूषांच्या मागेमागे फिरलं पाहिजे, कौटुंबिक गोष्टींमध्ये त्यांनी बोलू नये आणि स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगू नये अशी ही मानसिकता आहे. पण आता त्यात हळूहळू परिवर्तन होत आहे. हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे त्यामुळे हे परिवर्तन होण्यास खूप वेळ लागणे साहजिक आहे. याबाबतीत शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य या दोन महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टी आहेत.

माझ्या मते शिक्षणाची कमतरता हे दुसरे आव्हान आहे. शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे अनेक मुलींना माहितीच नसतं. भविष्यात तुम्ही शिक्षणाचं कोणतंही क्षेत्र निव़डलं आणि त्यात यशस्वी झालात तरी मर्यादित शिक्षण हे तुमच्याच मार्गातला अडथळा बनू शकतं. शिक्षणातून तुम्हाला जे प्रशिक्षण आणि शिस्त शिकायला मिळते ते दुसरं कशातूनच मिळत नाही.

सरकारमध्ये सहभागी होण्यापूर्वी तुमचं आयुष्य नेमकं कसं होतं?

या सरकारी पदासाठी पंतप्रधानांनी माझी निवड केली. त्याआधी मी भाजपची प्रवक्ता म्हणून काम करत होती. पण मी ठोस काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होते.

मी सेंट स्टिफन्स महाविद्यालयातून अर्थशास्त्रातील ऑनर्स पदवी मिळवली आहे. तर मद्रास विद्यापीठातून एमबीए केले आहे. माझं कुटुंब दक्षिण भारतीय आहे. माझे वडील दिल्लीत होते म्हणून मी १३ वर्ष दिल्लीत राहिले. ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, पण मी खूप छोटी असताना एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता.

शाळेनंतर मी स्टिफन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला ( मी अभ्यासात चांगली असले तरी स्टिफन्समध्ये मला नशीबानेच प्रवेश मिळाला होता.) आणि पदवी घेतल्यानंतर एमबीए करण्यासाठी मी मद्रासला निघून गेले. मी अशोक लेलँड आणि इतर कंपन्यांमध्ये नोकरीही केलीये तसंच पर्यटन क्षेत्रातही मी काम केलंय. पण १९९१ मध्ये मला या सगळ्याचा वीट आला आणि मी एका एनजीओची सुरूवात केली. एड्सला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मी काम करत होते.

या क्षेत्रात काम करण्याचा विचार तुमच्या मनात कसा आला ?

या क्षेत्रात समस्या आणि त्यावरील उपाय यात मोठं अंतर आहे. पण मैदानात उतरुन काम करण्यावर माझा जास्त भर असतो आणि आजही मी तेच करते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या कामाचं स्वरुप पाहता मला खुर्चीवर बसून काम करण्याचा अनुभव आहे, पण मी लगेच कामाला लागले आणि माझ्या आवडीचं काम असल्यानं मी खूप वेळ काम करत राहिले. जेव्हा तुम्ही अडचणीत असलेल्या लोकांसोबत मन लावून काम करतात तेव्हा तुम्हाला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे नोकरशाहीचा हिस्सा बनून खुर्चीवर बसण्यापेक्षा अशा प्रकारे काम केलेलं बरं.


image


प्रत्यक्षात मी कधीही राजकारणी बनले नाही आणि मला राजकारणात यायचंही नव्हतं. पण माझ्या भावाच्या निधनानंतरच मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. माझा भाऊ एक तरुण आणि तडफदार राजकारणी आणि वाजपेयी सरकारचा लोकप्रिय चेहरा होता. त्याच्या निधनानंतर माझ्यावर राजकारणात येण्यासाठी खूप दबाव टाकण्यात आला.

पद आणि सत्तेचा माझ्यावर कोणताही परिणाम होत नाही. मी खूप मोठ्या लोकांना अगदी जवळून पाहिलंय पण कडाडणाऱ्या विजेप्रमाणे ते सारं काही एका क्षणात नाहीसं होऊ शकतं. मी खूप स्पष्टवक्ती आहे. मीही गोड गोड बोलू शकते पण मला खोटं बोलणं आवडत नाही. बहुतेक मी लोकांकडून त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा करते.

तुमच्यावर सुरूवातीला कोणाचा प्रभाव होता?

मी मुलगी आहे म्हणून मला कायम स्वाभिमान बाळगण्याचं शिक्षण दिलं गेलं. पण याचा अर्थ असा नव्हता की मी स्वत:कडून क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत. आपल्या कामात सर्वोत्तम तेच करायचं आणि श्रेष्ठ व्हायचं हेच मला शिकवलं गेलं होतं. माझे प्रतिस्पर्धी मुलं असले तरी मला त्याची कधी चिंता वाटली नाही. आमच्या कुटुंबातच मुलांमध्ये स्पर्धा असायची. त्यांच्यातील सगळेच यशस्वी झाले आहेत. मी खूप स्वतंत्र विचारांची आहे. सुदैवानं माझ्या आधी माझ्याच घरात एक खूप सक्षम महिला होऊन गेली. भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तीनवेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या आणि कामगार संघटनेचं नेतृत्व केलेल्या पार्वती कृष्णन या माझ्या आत्या होत्या. माझ्या आईची काकू गीता मुखर्जी यासुद्धा खासदार होत्या आणि लोक आजही आदराने त्यांचं नाव घेतात. मी त्यांच्याकडून बरंच काही शिकले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाकडे पुरेसे अधिकार आहेत असं तुम्हाला वाटतं का? आयोगाला अडगळीत टाकलं गेलंय असं तुम्हाला वाटतं का?

खरं आहे, कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटू शकेल. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना मंत्रिमंडळामार्फत केली गेली होती आणि ते महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचा भाग आहे. पण तुम्हाला माहितीच आहे भारतात महिला आणि लहान मुलांना फारसं महत्त्व दिलं जात नाही. मोठे उपक्रम आहेत, परिणामकारक योजना आहेत आणि या योजनांसाठी भरपूर निधी मंजूर आहे, यावर अर्थमंत्रालयाने विचार करायला हवा पण महिला देशाच्या लोकसंख्येच्या ४८ टक्के भाग असूनही तो विचार होत नाही.

आम्हाला एक सामान्य सीएसआर ( उद्योगांना सामाजिक जबाबदारी म्हणून करावी लागणारी कार्य) या अंतर्गत काम करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त काहीही किंमत नाही. या मंत्रालयाला जितकं महत्त्व द्यायला हवं तितकं दिलं जात नाही. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या बरोबरीनं या खात्याला महत्त्व मिळालंच पाहिजे शिवाय आमचे अधिकार प्रशासकीय आहेत आणि आम्हाला आदेश देण्याचे अधिकार नाही. याचसाठी आम्ही विशेषत: या खात्याच्या मंत्री मनेका गांधींनी राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकार आणि हक्क सक्षम करण्यावर भऱ दिला आहे.

सध्याच्या सरकारला अनेक महत्त्वाची कामं पूर्ण कराय़ची आहेत. यामध्ये घाईघाईनं केली जाणारी कोणतीही कामं नाहीत तर दीर्घकालीन आणि महत्त्वाची कामं आहेत. खनिज तेलाच्या किंमती कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य असलं तरी महिला सुरक्षेसारख्या अनेक समस्या आहेत ज्या आम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करतोय. महिलांच्या समस्यासुद्धा प्राधान्याने सर्वांच्या समोर याव्यात आणि महिलांना त्यांच्या हक्काच्या संधी उपलब्ध व्हाव्यात असा माझा प्रयत्न आहे. आम्हीही आता प्रोफेशनल बनत आहोत आणि अनेक व्यावहारिक प्रस्ताव मांडत आहोत. ज्यांना केवळ पुरस्कार म्हणून पद दिलं गेलंय त्यांच्यापेक्षा अनेक राजकारणी तज्ज्ञ आहेत आणि मला असेच लोक हवे आहेत.

या देशात महिलांशी संबंधित प्रत्येक मुद्यावर वाद होतात. त्या मुद्यांकड़े दुर्लक्ष केलं जातं. पंतप्रधान यापैकी अनेक कामं मार्गी लावू इच्छिता पण ते एकटे किती आणि काय करणार? आमच्या समाजव्यवस्थेत महिलांबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. त्यामुळे कोणताही बदल घडवायचा असेल तर खूप जास्त वेळ लागतो.

एक व्यक्ती म्हणून एकाच वेळेस इतक्या साऱ्या गोष्टी करण्याची प्रेरणा कशी मिळते?

तसं पाहिलं तर मी बरीच सुदैवी आहे. खरं तर मला जाहीरपणे माझ्या कुटुंबाबद्दल बोललेलं फारसं आवडत नाही. पण इतकं नक्की सांगीन की हे सोपं नक्कीच नव्हतं. अगदी लहानपणी मी माझ्या वडिलांना गमावलं. त्यानंतर भारताच्या प्रभावी व्यक्तिंमध्ये ज्याचं नाव घेतलं जायचं तो माझ्या डोळ्यांसमोर आम्हाला सोडून गेला. १८ वर्षांपूर्वी माझ्या पतीचं निधन झालं, त्यावेळी माझ्या खांद्यावर दोन मुलींच्या पालनपोषणाची जबाबदारी होती. या देशात हे सोपं नक्कीच नव्हतं. माझ्या डोक्यावर छप्पर होतं, ही त्यातल्या त्यात सुदैवाची गोष्ट आणि दुसरं म्हणजे जीवनावश्यक गोष्टींसाठी मला झगडावं लागलं नाही. मला नेहमीच माझ्या कुटुंबीयांकडून पाठिंबा आणि मदत मिळत राहिली. पण वाट नक्कीच कठीण होती. म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही आयुष्यातल्या सर्वांत कठीण काळातून जाता, त्याचवेळेस तुम्हाला सत्याची जाणीव होते. नाहीतर तुम्ही तग धरूच शकत नाही. तुम्ही सकाळ- संध्याकाळ रडत बसू शकत नाही, हे तुम्हाला समजतं. त्यानंतर मग तुम्ही आयुष्यात अनेक तडजोडी करायला तयार होता...मलाही हे करण्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण मिळालं नव्हतं.

तुमच्या करियरची सुरुवात तुम्ही अगदी नियोजनबद्ध रितीनं केली होती, असं तुम्हाला वाटतं का?

मुळीच नाही.मला राजकारणात अजिबात यायचं नव्हतं. मी माझ्या एनजीओच्या कामामध्ये खुश होते आणि तिथं माझं चांगलं चाललं होतं. मी तिथे जगातल्या जवळपास सर्व दानशूर लोकांसोबत काम करत होते. मी त्याच वेळेस साधारणपणे २७-२८ देशांचे दौरे केले. २००२ च्या सुमारास माझी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. मी दोन्हीकडे एकाच वेळेस काम करू शकत नव्हते. त्याहीवेळेस एनजीओचं काम बऱ्यापैकी सुरु होतं. पण मला वेळ खूप अपुरा पडू लागला आणि आतातर अजिबात वेळ नसतो. राजकारण हे खूप वेळखाऊ काम आहे. तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी संपूर्ण वेळ द्यावाच लागतो.

कालांतरानं तुम्ही अधिक सक्रीय झालात का?

महत्त्वाकांक्षा ही चांगली गोष्ट आहे. पण अति महत्वाकांक्षा चांगली गोष्ट नक्कीच नाही. माझी माणसं, माझे कुटुंबीय, माझा पक्ष या माझ्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. गांधीजींनी म्हटलं होतं, देश जास्त महत्त्वाचा आहे, मी नाही, म्हणूनच ते इतके यशस्वी होऊ शकले.

तुमच्या मुली सध्या त्या काय करत आहेत ?

माझी मोठी मुलगी वकील आहे आणि ती सध्या सर्बियात राहत आहे. धाकटी मुलगी पत्रकार आहे. पण ती सध्या एका एनजीओसाठी काम करते आणि ती दिल्लीत राहते. ती तिच्या संसारामध्ये सुखी आहे.

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी तातडीनं झाल्या पाहिजेत?

आर्थिक सबलीकरण, समान संधी, समान सुविधा आणि शिक्षण. याशिवाय दक्षतेचं प्रशिक्षण आणि किमान एका तरी कौशल्याचं शिक्षण हे सुद्धा शिक्षणात असलेच पाहिजे. जर आपण हुंडा देणं बंद केलं तर मुलींच्या किंवा स्त्री-भ्रूण हत्यासुद्धा आपण रोखू शकतो.

तुमच्या शिक्षणाबद्दल काय सांगाल?

आम्ही सेंट स्टीफन महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीच्या विद्यार्थिनी होतो. स्टीफन महाविद्यालय नक्कीच एक कडक शिक्षण संस्था होती. पण आम्ही मुलांनाही मुलींकडे मैत्रीच्या नजरेनं बघायला शिकवलं. आमच्या महाविद्यालयात काही खूप चांगले प्राध्यापक होते. दिल्लीमधील महाविद्यालयाचं वातावरण देशातील इतर महाविद्यालयांपेक्षा वेगळं आहे. इथलं वातावरण खूप मोकळं आणि स्वतंत्र आहे. स्टीफन महाविद्यालयाचं एक वेगळंच सौंदर्य आणि जादू आहे. त्यांच्या काही समस्याही आहेत. पण तरीही आम्हाला खूप सन्मानानं वागवण्यात आलं. तिथे शिस्त होतीच..आणि मुली त्या शिस्तीचं काटेकोर पालनही करायच्या. कोणीही आम्हाला कमी लेखू शकत नव्हतं.

तुम्हाला प्रेरणा देणारी एखादी व्यक्ती सांगा.

खूप आहेत. माझे वडील खूप यशस्वी, प्रभावशाली होते. त्यांचं व्यक्तिमत्वच जादुई होतं. पण आई म्हणजे माझं सर्वस्व होती. मी साडेपंधरा वर्षांची असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. आईचा पाठिंबा आणि मदतीशिवाय मी काहीही करू शकले नसते. तिच्या पिढीच्या तुलनेत ती खूप आधुनिक होती. तुम्ही मुली खूप वेगानं प्रगती करत आहात, असं ती मला नेहमी म्हणायची. एकमेकांबद्दल असलेल्या अपेक्षांमुळे आमच्यामध्ये कधीकधी वादही व्हायचे. मला वाटतं, त्या पिढीमध्ये जास्त धाडस होतं आणि माझ्या मुलींनीही मला खूप दुर्घटनांचा सामना करताना पाहिल्यानं त्याही सक्षम आणि धाडसी बनल्या. मी त्यांच्या वयाची असताना जेवढी धाडसी नव्हते, तेवढ्या त्या आहेत. पण मला आनंद आहे कारण तुम्हाला जगायचं असेल तुम्हाला सक्षम व्हायलाच हवं.

इतक्या समस्या असूनही तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक कसा काय आहे?

हो नक्कीच..नाहीतर तुम्ही जगूच शकणार नाही. तुम्हाला स्वत:वर हसता आलं पाहिजे. तुमचा रडका चेहरा पाहणं कोणालाही आवडणार नाही. प्रत्येकाच्या आपापल्या वैयक्तिक समस्या असतात. तुम्हाला त्या पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे. अर्थात, हे तुमच्यावरच अवलंबून आहे. तुम्हाला हवी तितकी लोक तुमची मदत करू शकतात, पण जर तुम्हीच स्वत:ची मदत केली नाही तर तुम्ही होता तिथंच रहाल. देवही त्याच्याच मदतीला येतो, जो स्वत:ची मदत करतो. मलाही या संकटांमधून बाहेर पडायचं होतं आणि मी प्रयत्न केले तेव्हा हे खूप अवघड नसल्याचं जाणवलं. आयुष्य तर जगावं लागणारच...हसत जगायचं की रडत ते तुमच्यावर आहे..