रात्री उशीरा भूक लागलीये ?...सांता डिलिवर्स आहे ना!फक्त ऑर्डर द्या !

0


रात्री घरी यायला उशीर झालाय ? भूक लागलीये पण सर्व हॉटेल्स बंद झाली आहेत आणि स्वयंपाक करण्याची तर ताकदच नाही ही परिस्थिती अनेकांनी अनुभवली असेल. पण अशाच भुकेल्या लोकांना रात्री उशीरा अन्न उपलब्ध करुन देण्यासाठी कोलकातामधील काही तरुण बनले आहेत सांता क्लॉज...

सांता डिलिवर्सनं खऱ्या अर्थानं मुसंडी मारली ती २०१४ च्या डिसेंबरमध्ये कारण याच दिवशी आदर्श चौधरी आणि हर्ष कांडोई यांचा कॅट परीक्षेचा निकाल लागला. पण कॅटच्या परीक्षेत आदर्शच्या पदरी निराशा पडली कारण त्याला अपेक्षेएवढं यश मिळालं नाही. “ मी हिंमत न हरता ही तर एका सुंदर प्रवासाची सुरूवात असल्याचं स्वत:ला बजावलं. आता मी माझं संपूर्ण लक्ष सांता डिलिवर्सवर केंद्रीत करण्याचं ठरवलं.” असं सांगत आदर्श जुन्या आठवणीत रमतो.


सांता डिलिवर्सचे सह संस्थापक आदर्श चौधरी आणि हर्ष कांडोई
सांता डिलिवर्सचे सह संस्थापक आदर्श चौधरी आणि हर्ष कांडोई


त्याच दिवशी पहाटे चार वाजता आदर्श आणि हर्ष एका वृत्तपत्र विक्रेत्याकडे गेले आणि त्याच्याकडे त्यांनी वितरणासाठी १० हजार पत्रकं दिली. ही पत्रकं सगळ्या वृत्तपत्रांमध्ये व्यवस्थित टाकण्यात आली की नाही याची खातरजमा करण्यासाठी हे दोघंही जण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत तिथेच थांबलेले होते.

तीन दिवसांतच सांता डिलिवर्सला २० ऑर्डर्स मिळाल्या..आणि त्यातून त्यांना उत्पन्न मिळालं जवळपास १० हजार रुपये...

सांता डिलिवर्स नावामागची कथा

रात्री उशीरा लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या सांताक्लॉजप्रमाणेच आपण लोकांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं काम करतो, असा सांता डिलिवर्सच्या संस्थापकांचा विश्वास आहे. संध्याकाळी पाच ते रात्री तीन या वेळेत लोकांपर्यंत अन्न पुरवणं हे सांता डिलिवरचं वैशिष्ट्य आहे. असं काम करणारं सांता डिलिवर हे कोलकात्याच्या बाहेर वसलेलं तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप आहे. santadelivers.co.inया पोर्टलवर जाऊन किंवा त्यांच्या एँड्रोइड एपवर जाऊन तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ मागवू शकता.आदर्श आणि हर्षच्या पालकांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या भांडवलावर सांता डिलिवर्सची सुरुवात झाली.सध्या त्यांच्यांकडे तीन भागीदार, एक व्यवस्थापक, पाच डिलिवरी करणारी मुलं, तीन शेफ आणि दोन मदतनीस अशी १४ जणांची टीम आहे.

“आम्ही बाहेरून पदार्थ मागवत नाही किंवा कोणत्याही रेस्टॉरंटशी आम्ही जोडलेले नाही... आम्ही सर्वकाही स्वत: आमच्या इथेच बनवतो,”असं आदर्श सांगतो..

सांता डिलिवर्सचं उत्पन्न हे त्यांना मिळालेल्या ऑर्डर्सवर अवलंबून आहे. दिवसाला त्यांना प्रत्येकी ४५० रुपयांप्रमाणे सरासरी ४० ते ४५ ऑर्डर्स मिळतात..म्हणजेच त्यांना महिन्याला जवळपास १३०० ऑर्डर्स मिळतात.दर महिन्याला त्यांच्या व्यवसायात २० टक्क्यांनी वाढ होतेय. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी त्यांच्याकडे दोन स्वतंत्र स्वयपांकगृहं आहेत.

वेगळ्या वाटेवर

सुरुवातीच्या काळात सांता डिलिवर्सला दिवसाला फक्त पाच ऑर्डर्स मिळायच्या. डिलिवरी बॉईजच्या कमतरतेमुळे जवळपास महिनाभर या दोघांनाही डिलिवरी देण्याचं काम करावं लागलं.

“ आम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्सची सरासरी संख्या वाढवण्सासाठी आम्हाला सतत मार्केटिंग करावं लागलं. आम्ही कॉलेजेस आणि ऑफिसेसमधील ग्राहक समूहांवर आमचं लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर आम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्समध्ये भरपूर वाढ झाली”असं हर्ष सांगतो.

एकीकडे त्यांचं स्वप्न असलेला हा व्यवसाय वाढत असताना हर्ष आणि आदर्श यांच्या जीवनाला वेगळं वळण देणारी घटना घडली. या दोघांनाही नरसी मोनजी व्यवस्थापन शास्त्र संस्थेत प्रवेश मिळाला. त्यामुळे एमबीए करायचं की सांता डिलिवरीच्या वाढीवर लक्ष केंद्रीत करायचं हा निर्णय घेणं कठीण होतं. अखेर कुटुंबियांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्या दोघांनीही एमबीए करुन आपला व्यवसाय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला.

सांता डिलीवर्सला वेगळं परिमाण देण्यासाठी या दोघांनी त्यांच्यासोबत पुलकीत केजरीवाल या मित्राला घेतलं, त्यालाही या व्यवसायात येण्याची तीव्र इच्छा होती. पुलकीत आता सांता डिलिवर्सचं रोजचं काम आणि मार्केटिंग पाहतो.

एमबीए करत असतानाही त्यांनी डिजीटल मार्केटिंग आणि जनसंपर्कातून सांता डिलिवर्सच्या वाढीत महत्त्वाचं योगदान दिलं.

“या सहा महिन्यांच्या प्रवासात आम्हाला खूप काही शिकायला मिळालं.सुरुवातीचे तीन महिने आम्हांला खूप संयम ठेवावा लागला...कोणत्याही क्षणी ऑर्डर येईल म्हणून सतत जागरुक रहावं लागलं. थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्यात अडथळे असतात, असं म्हटलं जातं. पण सांता डिलिवर्सनं हे खोटं ठरवलं आणि कोणतंही काम छोटं नसतं, याचा आम्हाला अनुभव आला,” उद्योजकतेच्या या प्रवासात त्यांना सगळ्यांत महत्त्वाचं काय मिळालं, याचं उत्तर आदर्श देतो.

तांत्रिक गोष्टींमध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल आणि ठामपणे पाठीशी उभं राहिल्याबद्दल आदित्य अग्रवाल, प्रतिक चौधरी, गौरव झुझुनवाला आणि हितेश अग्रवाल यांचेही आदर्शनं आभार मानलेत.

एक पाऊल पुढे

सॉल्ट लेक, न्यूटाऊन, सिल्वर स्प्रिंग, फूलबाग आणि लेकटाऊन कोलकात्याच्या या भागांमध्ये सांता डिलिवर्स सध्या केटरिंगची सेवा पुरवत आहे. यापुढे कोलकत्यामध्ये आणि पुढच्या तीन वर्षांत भारतभर आपल्या सेवेचा विस्तार करण्याचा सांता डिलिवर्सचा मानस आहे.

पुढच्या आर्थिक वर्षांत दर महिन्याला साधारणपणे तीन हजार ऑर्डर्स मिळण्याची आमची अपेक्षा आहे. यातून आम्हाला दर महिना १३ लाखांचं उत्पन्न मिळू शकतं.