४२ मुला-मुलींचे ते आहेत आदर्श माता-पिता

1

बीडमधील एक दांम्पत्य हे तब्ब्ल ४२ मुला-मुलींचे आई-वडिल बनले आहेत...काय? विश्‍वास नाही बसत का? पण हे खरं आहे. यवतमाळमधील सधन घरातली आणि व्यवसायाने वकील असलेली  प्रीती गर्जे आणि अनाथ मुलांसाठी बीडमधील गेवराई येथे अनाथालयाच्या माध्यमातून अनाथ मुलांना सावली देणारे संतोष गर्जे...बीडमधील अनाथ मुला-मुलींना आपल्या पोटच्या मुला-मुलीप्रमाणे सांभाळणारे हे दांम्पत्य सर्व माता-पित्यांसाठी एक आदर्श माता-पिता ठरले आहेत. या दोघांचीही आई-बाबा बनण्याची कहाणीही काही निराळीच...

उमलत्या कोमल वयात आपल्या आई-वडिलांचे अचानकपणे जाणे हे चिमुरड्यांसाठी काय असतं हे संतोष जाणत होता. पाटसरा (ता. आष्टी) येथील ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील संतोष गर्जे यांची कौटूंबिक परिस्थिती अतिशय बेताची होती. बहिणीने गर्भातील सात महिन्याच्या बाळासह इहलोकीचा निरोप घेतला. एवढेच नव्हे तर सासरच्या मंडळीकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यापूर्वीच निरागस भाची अनाथ झाली. ‘‘ मामा मला माझ्या आईला भेटायचं आहे’’, अशी तिची व्याकुळता पाहून डोळे पाण्याने डबडबायचे. आपली अशी स्थिती आहे तर समाजात असे किती उपेक्षित, अनाथ मुलं असतील की ज्यांचं मातृपितृ छत्र हरपलं असेल, अशा प्रश्‍नाने डोक्यात विचारांचे आगेमोहोळ उठत असे. जीवनातील अस्वस्थता लक्षात घेऊन अनाथांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी कृतीशील पाऊल टाकलं, हे बोलं आहेत ४२ अनाथांचा बाप संतोष नारायण गर्जे यांचे...

आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण; परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. रस्त्याच्या कोपर्‍यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवाला मग कुठल्या तरी अनाथाश्रमात स्थान मिळते. तेच त्याचे कुटुंब बनते. अशा अनाथ मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही, यासाठी गेवराई या तालुक्याच्या ठिकाणी तो आई जनहित बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ‘सहारा अनाथालय परिवार’ हा प्रकल्प गेल्या आठ वर्षापासून चालवित आहे. ‘आई- द ओरिजन ऑफ लव्ह’ या ब्रीद वाक्याखाली सुरू केलेल्या या अनाथालयात रेडलाईट एरियातील माता, तुरूंगात शिक्षा भोगणारे कैदी, परितक्त्या, घटस्फोटीत मातांच्या मुलांचा सांभाळ केला जात आहे. आजमितीस संतोष गर्जे हा दात्यांच्या सहकार्याने सहारा अनाथालयात सहा ते १८ वर्षे वयोगटातील ४२ मुला-मुलींचा सांभाळ करून त्यांना मायेची ऊब देत आहे. या अनाथालयातील गेल्या दोन वर्षात चार मुलांनी दहावीची परिक्षा दिली. शिक्षण, पुस्तके, कपडे आणि जेवणाचा खर्च भागविण्यासाठी महिन्याला जवळपास ५० हजारापर्यंत खर्च येतो. मित्र परिवाराच्या ओळखीतील दानशुरांकडून मदत मिळावी, यासाठी तो सतत पायाला भिंगरी लावत भटकंती करीत असतो.

शेतात शेडमध्ये सुरू केले काम

अनाथांच्या जीवनातील अंधार भेदण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचा मानस बोलून दाखविला. तेव्हा मित्रही बुचकळ्यात पडले. स्वतःला भाकरीच्या चंद्राची भ्रांत असताना हे कसं शक्य आहे? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. एका मित्राने धाडसाने गेवराईजवळ शेतात जागा दिली. पत्र्याचे शेड टाकून तेथे २००४ साली ‘सहारा अनाथालय परिवार’ सुरू केले. वयाच्या २० व्या वर्षी तेथे सात अनाथ मुलांसह राहू लागला. कालांतराने शिवाजीनगरात भाड्याने जागा घेऊन तेथे या कामाला गती दिली. मुलांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दारोदार फिरला. मात्र, एखाद्या वेळी अपेक्षित सहकार्य मिळाले नाही तर मन उदास होतं. तेव्हा हीच मुलं लाडीवाळपणे जवळ घेऊन समजूत घालतात, तेव्हा कंठ दाटून येतो, हे सांगताना संतोष गर्जेे याला तर अक्षरक्षः गहिवरून आले.

....आणि या अनाथांना मिळाली ‘आदर्श माता’

संतोष गर्जे हा एका सामाजिक कार्यक्रमासाठी यवतमाळमध्ये गेला असताना कार्यक्रमानंतर तेथीलच व्यवसायाने वकील असलेल्या प्रीती ठुलकर हीला संतोषच्या या उपक्रमाची माहिती मिळाली. ४२ मुला-मुलींचा बाप बनलेल्या संतोषच्या धाडसाने प्रेरित होऊन प्रीतीने त्याचा मोबाईल क्रमांक मिळविला. अनाथ मुलांना कायद्याचे संरक्षण देण्याच्या निमित्ताने दोघे पुन्हा एकत्र आले. दोघांचे विचार एकमेकांना पटणारे होते. संतोषला अनाथालयामध्ये ‘आई’ ची भूमिका निभावणारी पत्नी हवी होती. संतोषने लग्नासाठी तिला विचारणा केली. दोन दिवसांनी विचार करून तिने होकार दिला. संतोष ज्या प्रकारचे सामाजिक काम करीत होता, तिथे ‘ जात’ या संकल्पनेला कोणताही थारा नव्हता. त्यामूळे या ४२ अनाथांच्या संगोपनासाठी जातीची भिंत आपोआप विरली आणि त्यांना एक आई ही मिळाली. अनेक वर्षांपासून ती संतोषच्या खांद्याला खांदा देऊन आश्रमातील ४२ मुलांचा सांभाळ करीत आहे. दात्यांशी पत्रव्यवहार, मुलांचा अभ्यास घेणे, किराणा आणणे, स्वयंपाकीण नसेल तेव्हा स्वयंपाक करणे अशी कामे प्रीती दिवसभर करीत आहे. सर्वस्व सोडून अनाथ मुलांसाठी काम करणारी प्रीती खरोखरच ‘आदर्श माता’ ठरली आहे.

एक गोष्ट मुलांना आवर्जून शिकवली जाते ती म्हणजे कधीही लाचार व्हायचं नाही. स्वाभिमानानं जगायचं. आपल्याला आई-वडील नाहीत, हा भूतकाळ झाला. आज आपण सशक्त आहोत. केवळ आई-वडील नाहीत ही गोष्ट सोडली तर आपण कुठल्याही अर्थानं आज अनाथ राहिलेलो नाही. समाजानं अनाथपणाचा शिक्का मारल्यानं अशा मुलांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. अनाथाश्रमांमध्ये त्यांना आश्रितासारखं, उपर्‍यासारखं वाटतं. त्यामुळं ‘सहारा’ मध्ये स्वतःच्या घरासारखंच वातावरण ठेवण्याची धडपड केली जाते.

नातं जोडणारं घऱ

जात-पात विसरून अनाथालयातील निराधार मुलं भावनिक जिव्हाळा जोपासून मायेचा ओलावा अनुभवतात. दुःखावर पांघरूण घालून माणुसकीचं नातं जोडण्यासाठी भविष्याच्या नव्या क्षितिजात माणूसपणा आणणारं छोटसं हक्काचं घर म्हणजे ‘सहारा अनाथालय परिवार’. ‘‘ रुसू नको माझ्या मना सारे आयुष्य जायचे, दुःख देहात गाडून पुन्हा गोड हास्य फुलवायचे’’, या कवितेप्रमाणे शेवटच्या श्‍वासापर्यंत उपेक्षितांसाठी काम करण्याचा वसा जोपासला असल्याचे संतोष सांगतो.

अक्षरधारा पुस्तकपेढी

उपेक्षितांना गरजेच्या वेळी समाजाने उत्तरदायित्वाच्या भावनेने सहकार्य केले, तर अनाथालयांची गरज भासणार नाही. सुदैवाने तो दिन उजाडावा याची वाट पाहतोय. प्रयास संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी, डॉ. अभय बंग, महेश पवार, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, अर्थक्रांतीचे अनिल बोके यांच्यासह अनेक मान्यवरांकडून अपेक्षित सहकार्य मिळते. ‘सहारा अनाथालय परिवारा’ तर्फे जुनी अथवा नवी कुठल्याही प्रकारची पुस्तके संकलित करण्यासाठी दरवर्षी पुस्तक दिंडी काढली जाते.

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories