युपीच्या खाप पंचायतींना सार्वजनिकपणे मोबाईलचा वापर करणा-या महिलांना शिक्षा करायची आहे

0

उत्तर प्रदेशातील लखनौ जवळच्या मादोरा सारख्या गावात खाप पंचायतीने महिलांनी सार्वजनिक जागेत मोबाईलचा वापर करण्यावर दंड देण्याचा निर्णय घेतला आहे. ते अशा गुन्हेगारांना २१हजार रूपयांचा दंड करणार आहेत. हे मुस्लिमबहूल गाव आहे. येथील जेष्ठांचा समावेश असलेल्या खाप पंचायतीने महिलांनी मोबाईल फोन वापरल्याने पुरूषांचे फावते असा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळेच महिलांच्या मोबाईल फोन वापरावर निर्बंध घालण्याचा हा विचार आहे. आणि त्यामुळे स्त्री आणि पुरूषांमध्ये सुरू असलेल्या अनैतिकतेला यातून आळा बसेल असे या जेष्ठांना वाटते.

त्यांनी सूचविले आहे की मुलींनी रस्त्यातून चालताना फोन वापरणे हे बेजबाबदारपणाचे वर्तन आहे, त्यामुळे अशा प्रकारचे वर्तन करणे गुन्हाच समजला पाहिजे, आणि महिलांच्या भल्यासाठी त्याच्यावर काही निर्बंध हे असलेच पाहिजेत.


परंपरेने या खाप पंचायती उत्तर भारतात सर्वत्र आढळतात, या शिवाय देशाच्या इतरही काही भागात त्या आहेत. त्यांना सामाजिक न्यायालयाचा दर्जा दिला जातो, त्यांच्या मते समाजात अनेक आधुनिक गोष्टी या गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत ज्यांचा समाजाला फायदा नसून त्रास होत आहे. जुन्या रिती-प्रथा आणि परंपरांचा पगडा असलेल्या या पंचायती ‘चांगल्या – वाईट’ गोष्टी कोणत्या यांची कोतवाली करत असतात.

या खाप पंचायती स्वयंघोषित न्यायव्यवस्था असतात, त्यामुळे त्या कायदा त्यांच्या हाती घेतात, मात्र त्यांना शिक्षा करण्याचे अधिकार नसतात त्यामुळे स्थानिक कायद्याच्या रखवाल्यांना त्यांच्या या कृतीला पायबंद घालण्यासाठी वेळोवेळी हस्तक्षेप  करावा लागतो. या प्रकारच्या प्रकारणात देखील पोलिसांनी दखल घेतली आहे. “ आम्हाला खाप पंचायतीने महिलांना बंदी घातल्याची माहिती समजली आहे, अशा बंदीला घटना विरोधी समजले जाते त्यामुळे त्यावर आम्ही कारवाई करू” असे स्थानिक पोलिस प्रमुख अरूण कुमार सिंह यांनी सांगितले.

खाप पंचायती गायींना कत्तलखान्यात धाडणा-यांना दोन लाखांचा दंड देखील करतात, किंवा दारूची वाहतूक करणारांना १.१ लाख रूपये दंड देखील करतात. स्थानिक पोलिस अधिकारी अरूण कुमार यांच्या मते अशा प्रकारच्या कामात आम्हाला खाप पंचयातीला समर्थन देणे योग्य वाटते. मात्र महिलांच्या स्वातंत्र्यावर बंदी घालण्याच्या प्रकाराला थारा देता येणार नाही. या प्रकारच्या धोरणाची सुरूवात माजी गाव प्रधान मोहमद गफ्फार यानी केली, यामागचे कारण उत्तर प्रदेशातील मुस्लिम समाज देखील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोहत्या बंदीच्या निर्णयाचा पाठिंबा देते हे त्यांना दाखवून द्यायचे होते.

जातीबाह्य विवाहाच्या प्रकरणात, मालमत्ता मालकी विवाद,आणि सामाजिक आभिसरणाच्या कोणत्याही आधुनिक विचारांच्या कृतीला खाप पंचायती त्यांच्या बुरसटलेल्या मानसिकता वेळोवेळी दाखवून देतात. यापूर्वीच्या काळात खाप पंचायतींनी महिलांचा अतोनात छळ केल्याच्या घटना आहेत, मग त्या जीन्स घातली म्हणून, किंवा आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाह केला म्हणून ‘ऑनर किलींग सारख्या घटनाचे आदेश दिले म्हणून गाजल्या आहेत.