आत्मसंतुष्ट न होता, सतत नव्याचा ध्यास असलेल्या यशस्वी उद्योगिनीची कथा

0

आयुष्यात अनेकदा ठरवून काही होत नाही, तर घटना घडत जातात... काहीही ध्यानीमनी नसताना परिस्थितीच अशी येते, की नियतीने तुमच्यावर सोपविलेली जबाबदारी तुम्हाला शिरावर घ्यावी लागते... तर काही वेळा एखादा चांगला नेता किंवा उत्तम मार्गदर्शक, तुम्हाला महत्वाचे स्थान पटकविण्याचे स्वप्न दाखवितो... अशीही वेळ येते जेंव्हा कार्यालयीन काम करताना, त्या चार भिंतीत तुम्ही अगदी घुसमटून जाता आणि मग तुम्हाला ही चाकोरी तोडण्याची तीव्र इच्छा होते... तर काही जणांना आपल्या कामाने लोकांच्या मनात कायमचे स्थान मिळविण्याची इच्छा असते.... आयुष्यात येणारे हेच क्षण खऱ्या अर्थाने निर्णायक असतात आणि तुमच्या आयुष्याला आकारही हेच क्षण देतात... आज एक यशस्वी उद्योजक असलेल्या पौर्णिमा शेनॉय यांनी त्यांच्या आयुष्यात हे सगळेच टप्पे अनुभवले आणि विशेष म्हणजे या प्रसंगांचे संधीत रुपांतर करण्यातही त्या यशस्वी ठरल्या...शंकाकुशंकांवर मात करत, मनाचा आवाज कसा ऐकायचा हे पौर्णिमा यांना चांगलेच माहित आहे. जाणून घेऊ या त्यांची कथा...

मुंबईत जन्मलेल्या आणि गोव्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या पौर्णिमा यांनी बंगळुरुच्या माऊंट कारमेल महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली आणि टीएपीएमआय, मणिपालमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. “ अभियंते आणि गणितज्ञांच्या आमच्या कुटुंबातून, मी एकटीच अशी होते, जिने समाजिकशास्त्रांच्या वाटेवरुन चालण्याचा निर्णय घेतला होता,” त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण निर्णयाबद्दल बोलताना त्या सांगतात.

त्यांनी साची ऍन्ड साची (Saatchi and Saatchi) मध्ये मार्केट रिसर्च आणि क्लायंट सर्विसिंगमध्ये कामाला सुरुवात केली, जेथे त्यांच्या बॉसने त्यांना सर्व काही शिकविले. पण त्यांच्या दुसऱ्या नोकरीतील बॉसबद्दल मात्र असे मुळीच म्हणता येत नाही. “ ती बाई म्हणजे एक दुःस्वप्नच होती. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा त्याच वेळी माझ्या मनात निर्माण झाली,” त्या सांगतात.

ते नव्वदचे दशक होते. त्या बंगळुरुमध्ये होत्या. त्या एका चुकीच्या नोकरीत अडकल्या होत्या आणि ती सोडण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांची परिस्थिती अगदीच अगतिक झाली होती. “ नोकरी बदलण्याची इच्छा असताना, तुम्ही कुठे जाल – खास करुन इंटरनेट नसतानाच्या काळात... अशा वेळी संधींचा शोध घेणे खूपच अवघड होते,” त्या विस्ताराने सांगतात. ही समस्या स्वतः अनुभवल्यानंतर, यावर काहीतरी उपाय शोधण्याचा निर्णय पौर्णिमा यांनी घेतला आणि सुदैवाने कारकिर्दीतील पुढील खेळी सुरु करण्याच्या त्यांच्या समस्येवरचाही हाच उपाय ठरला. कारकिर्दीतील त्यांची पुढील खेळी होती, नेक्सस कन्सल्टींग (Nexus Consulting)... कारकिर्दीच्या पुढील टप्प्याच्या शोधात असलेल्यांना मदत करण्याचे लक्ष्य ठेवून, या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. पण हा निर्णय आणि प्रत्यक्ष सुरुवात यामध्ये अनेक साशंक लोक होते, ज्यांनी एक स्थिर नोकरी सोडून हा नवीन उद्योग सुरु करण्याबाबत संशय व्यक्त केला होता.

“ अशा प्रकारची धाडसी खेळी खेळण्यासाठी खरं तर सर्व बाजूंनी आणि विशेष करुन घरुन, पाठींबा मिळणे गरजेचे असते आणि माझे पती हे एखाद्या पहाडासारखे माझ्या मागे उभे राहीले. चांगल्या दिवसांचा आनंद लुटावा, पण वाईट दिवसांनंतरही पुन्हा उठून उभे राहिले पाहिजे. तसेच मार्गात येणाऱ्या गृहीत समस्यांवर सातत्याने उपाय शोधण्याचा प्रयत्नही केला पाहिजे, कारण तुम्ही हे सगळे सोडून देऊ शकत नाही किंवा दुकान बंद करु शकत नाही,” पौर्णिमा सांगतात.

नेक्सस कन्सल्टींग हे पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल क्रमांकावर जाऊन पोहचले. त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस, नोकीया आणि यासारख्या इतर अनेक नामवंत कंपन्यांना कर्मचारी मिळवून देण्यात सहाय्य केले. आपण एका ब्रॅंडची उभारणी केली असली, तरी येथील कामामध्ये आता वैयक्तिकरित्या साचलेपणा आल्याचे पौर्णिमा यांना १९९९ च्या सुमारास जाणवू लागले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सह-संस्थापकांसह संपादनाच्या प्रक्रियेला गती दिली आणि २००० मध्ये इ4इ लॅब्ज (e4e Labs) ला विक्री केली.

त्यानंतर त्या पुन्हा एखादा नवीन  अनुभव घेण्यासाठी तयार झाल्या आणि दक्षिण भारतातील पहिल्याच नॅसकॉम कार्यालयाच्या उभारणीची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. यानंतर त्यांनी तीन महिन्यांचा ब्रेक घेतला, कारण त्यांना ब्रिटीश फॉरीन ऍन्ड कॉमनवेल्थ ऑफीसकडून अमेरिकेतील ऍन आरबोर येथील मिशिनग विद्यापीठात आणि युकेतील ब्रॅडफोर्ड विद्यापीठात मॅनेजमेंट डेवलपमेंट प्रोग्रॅमसाठी शिष्यावृत्ती मिळाली होती. “ तेथे मी काही असामान्य महिलांना भेटले, ज्यांनी मला वेगळी दृष्टी दिली आणि नक्की काय करायचे आहे, याचे पुन्हा एकदा मूल्यमापन करण्यास भाग पाडले,” त्यावेळच्या अनुभवाबाबत बोलताना त्या सांगतात. त्यानंतर त्या परत आल्या आणि मणीपाल ग्रुपबरोबर काही काळ घालविल्यानंतर, त्यांनी सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात उडी घेतली. २००५ मध्ये इंडीयन सेमीकंडक्टर असोसिएशनच्या उभारणीत त्यांनी मोलाचा हातभार लावला. या संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. देशातील एखाद्या औद्योगिक संघटनेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या.

या क्षेत्रापुढील महत्वाची समस्या होती, ती म्हणजे सेमीकंडक्टर्सनी केवळ सॉफ्टवेअर अंतर्गत वर्गीकृत करण्यात येत होते, पण त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होणे गरजेचे होते. पौर्णिमा यांच्या नेतृत्वाखाली, या संघटनेत १५७ सदस्यांची ताकद निर्माण झाली आणि सेमीकंडक्टर क्षेत्राला स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मदत मिळाली. त्यामुळे केवळ त्यांच्या शहरात आणि राज्यातच नव्हे तर देशातही व्यावसायिक आणि नेता म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाची गणना झाली.

“ मी शून्यातून त्या गोष्टीची उभारणी केली. बॅंकेत काहीही पैसा नसताना, फक्त या उद्योगातील खेळाडूंकडून मिळालेल्या गुडविलच्या भरवशावर... आम्ही एक राष्ट्रीय स्तरावरील तर सहा राज्यस्तरावरील धोरणे मंजूर करुन घेण्यात यशस्वी ठरलो. सेमीकंडक्टर विषयीच्या बातम्या, वर्तमानपत्राच्या तंत्रज्ञान पानाकडून मुख्य व्यवसाय पानाकडे वळविण्यात मिळालेले यश आमच्यासाठी खूपच महत्वाचे होते,” त्या सांगतात.

त्यानंतर पौर्णिमा यांना पुन्हा एकदा कोंडीत अडकल्यासारखे वाटू लागले. “ तुमच्या कारकिर्दीत एक वेळ अशी येते, जेंव्हा तुम्ही काहीसे आरामशीर असता. तुम्ही बरेच काही साध्य केलेले असते, लोक तुम्हाला ओळखू लागलेले असतात आणि तुमच्याबद्दल आदरही निर्माण झालेला असतो. बरेच जण या परिस्थितीत खूष असतात, पण मला मात्र एवढे आत्मसंतुष्ट व्हायचे नव्हते,” त्या सांगतात.

२०११ मध्ये पौर्णिमा यांनी आयएसएचे अध्यक्षपद सोडले आणि लॅटीट्यूड एज्युटेक या त्यांच्या फर्मने कॉर्पोरेट प्रशिक्षणार्थींसाठीच्या ई-लर्निंगमध्ये उडी घेतली.

“ ऑनलाईन लर्निंगसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि अजूनही तिचा पुरेपुर वापर झालेला नाही. असं म्हटलं जातं की, जर तुम्ही भारतात यशस्वी ठरलात, तर तुम्ही जगात कुठेही यशस्वी ठरु शकता. किंमतीचा दबाव आणि अतिशय मोठी अशी निर्णय प्रक्रिया यामुळे ही गोष्ट कठीण होते,” पौर्णिमा आपले निरिक्षण नोंदवितात.

बी2बी क्षेत्रासाठी मजकूर आणि मॉड्युल्स तयार करताना, त्यांनी कॉर्पोरेटवर लक्ष केंद्रीत केले होते. “ पहिली दोन वर्षे आम्ही प्रशिक्षणामध्ये होतो आणि त्यानंतर ई-लर्निंगच्या क्षेत्रात विस्तार केला,” त्या सांगतात.

१०० टक्के ई-लर्निंग केपीओ म्हणून कंपनीचे हे पहिलेच वर्ष आहे आणि कंपनीने आरीन कॅपिटलचे मोहनदास पै आणि नेचर ईकोवेंचर्सचे आलोक शर्मा यांच्याकडून सीड कॅपिटल फंडीग मिळविण्यातच यश मिळविलेले नाही, तर त्याचबरोबर सिलिकॉन इंडीयाज स्टार्टअप ऑफ द इयर, २०१५ हा सन्मानही मिळविला आहे.

जरी या संपूर्ण प्रवासात त्यांना कायदेशीर आणि वैचारीक अडथळ्यांमुळे अनेकदा अपयशाचाही सामना करावा लागला असला, तरी यशाचा आनंद लुटणे हाच त्यांचा मंत्र राहिला आहे. “ अगदी गेल्याच वर्षी बॅंकेने माझ्याकडे विचारणा केली की कोअर सिग्नेटरी म्हणून माझे पती येऊ शकतात का, कारण मी एक महिला आहे. १९९० साल असो किंवा आजचा दिवस, हेच वास्तव आहे. त्यांना हे समजले नाही की महिलेलाही स्वतःचे अस्तित्व आहे, कोणत्याही पुरुषाच्या समर्थनाशिवायही...” त्या सांगतात.

त्यांच्या यशात तीन ‘पी’ हे अत्यंत महत्वाचे आहेत – ‘पीपल, पर्सव्हिअरन्स आणि प्राॅफीट’ अर्थात लोक, चिकाटी आणि फायदा आणि खास करुन फायदा. “ महिलांनी मनी मांईंडेड असू नये, असे नेहमीच म्हटले जाते. पण का नाही? जर तुम्ही तेवढीच कठोर मेहनत घेत असाल आणि तुमचे सर्वस्व देत असाल, तर तुम्ही फायदा मिळविण्याचे लक्ष्य का बरे ठेवू नये? ‘प्राॅफीट’ हा महिलांसाठी वाईट शब्द ठरणे, बंद व्हायला पाहिजे,” त्या सांगतात.

या सारख्या आणखी काही यशस्वी महिला उद्यमिंच्या कहाण्या वाचण्यासाठी YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

सर्वसामान्यांपर्यंत कला पोहचवण्याकरता कलाकार, क्युरेटर आणि उद्योजिका सुरभी मोदींचे अथक प्रयत्न

उत्तरप्रदेश ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास करत देशाची आघाडीची गुंतवणूक सल्लागार बनली 'हंसी महरोत्रा'

संमोहन चिकित्सक ते बेकरी व्यावसायिक, उज्ज्वला पटेल यांचा अनोखा प्रवास

लेखक – बिंजल शाह
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन