उत्तम आरोग्यासाठी करा प्राण्यांची नक्कल 'वू छिन क्षि' एक चीनी मार्शल आर्ट.

उत्तम आरोग्यासाठी करा प्राण्यांची नक्कल  'वू छिन क्षि' एक चीनी मार्शल आर्ट.

Thursday December 10, 2015,

5 min Read

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण वाढत आहे. शरीर आणि मनावरील ताणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या आज निर्माण झाल्या आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, थाईराॅईड हे विकार लहान वयातच जडतात. योगासनं आणि व्यायाम हा त्यावर एक उत्तम उपाय आहे. पण व्यायामासाठी वेळ नाही असं एक सांगितलं जातं. पण यावरही एक चीनी उपाय आहे. तो ही झटपट व्यायामाचा. भारतात तणाव दूर करण्यासाठी योगासनं केली जातात. त्याप्रमाणे चीनी लोक व्यायाम म्हणून प्राण्यांची नक्कल करतात. यालाच 'वू छिन क्षि' असं म्हणतात. हा व्यायाम प्रकार करायला फक्त पाच ते दहा मिनिटे लागतात. इतर चीनी उत्पादनांप्रमाणे हा व्यायामप्रकार म्हणजे चीनी लोकांनी लावलेला नवीन शोध नसून, वू छिन क्षि हा एक प्राचीन चीनी मार्शल आर्ट आहे.


image


चीन मध्ये चीनी मातीची भांडी, चीनी रेशीम किंवा चीनी चित्रकला या काही गोष्टी चीनी संस्कृतीच्या अविभाज्य घटक आहेत. तसंच चीनी मार्शल आर्ट हा पण चीनी संस्कृतीचा भाग आहे. चीनी भाषेत मार्शल आर्ट्स ला वुशु असं म्हणतात. वू म्हणजे म्हणजे सैन्य आणि शु म्हणजे कला, म्हणजे मराठीत त्याला युद्ध कला असं म्हणता येईल. चीनी मार्शल आर्टचे पण अनेक प्रकार आहेत. या कलेच्या वेगवेगळ्या शैली नुसार हे प्रकार पडले आहेत. कुंग फु हा त्यापैकीच एक प्रसिद्ध असलेला प्रकार. याशिवाय वू छिन क्षि हा पण एक चीनी मार्शल आर्ट्स चा प्रकार आहे. हा प्रकार आपल्या भारतीय योगाशी मिळता जुळता आहे.


image


साधारण पणे मार्शल आर्ट्स मध्ये लाथा आणि बुक्के मारणे याचा प्रामुख्याने समावेश असतो पण या व्यायाम प्रकारात शरीर आणि मन या दोन्हीचा समावेश आहे. वू छिन क्षि म्हणजे पाच प्रकारच्या प्राण्यांच्या हालचाली. या हालचालीतून शरीरातील एक एक अवयवाला ताण पडतो. योगासनामुळे जसा शरीराला ताण पडतो तसाच ताण या व्यायाम प्रकारात शरीराला दिला जातो. प्राणी जसे हालचाली करतात त्याप्रमाणे शरीराच्या हालचाली या व्यायाम प्रकारात करायच्या असतात. एका वेळी पाच प्राण्यांच्या हालचाली करायच्या असतात त्यामुळे हा व्यायाम करायला फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात.


image


चीन मध्ये १३ व्या शतकात वू छिन क्षि या व्यायाम प्रकारचा शोध लागला. सुरवातीला यामध्ये १८ प्रकारच्या प्राण्यांच्या हालचाली होत्या. त्यात बदल होत ७२ प्रकार झाले आणि कालांतराने त्यामध्ये अधिक प्राण्यांची भर पडत गेली आणि एकूण १७० प्राण्यांच्या हालचालींचा समावेश यामध्ये झाला. यामध्ये प्रामुख्याने वाघ, हरीण, अस्वल, माकड आणि सारस पक्षी या प्राण्यांच्या हालचालींचा समावेश असतो. प्रत्येक प्राण्यांच्या दोन हालचाली यामध्ये असतात. भारतीय योग हा आयुर्वेदाशी जोडला गेला आहे त्याप्रमाणे वू छिन क्षि सुद्धा पारंपारिक चीनी औषध पद्धतीशी संबंधित आहे. यानुसार प्रत्येक प्राणी हा त्याच्या गुणधर्मानुसार प्रत्येक एका अवयवाशी जोडला गेला आहे आणि त्या प्राण्यांच्या हालचालीमुळे त्याच्याशी संबंधित अवयवाची कार्यक्षमता वाढते. प्रत्येक प्राण्याच्या हालचालीतून कोणत्या अवयवाला फायदा होतो ते आपण बघूया.


image


वाघ: हा पहिला प्राणी आहे. वाघ जंगलाशी संबंधित आहे. जंगलातील ऋतू वसंत असतो. याचा संबंध पित्ताशय आणि यकृताशी आहे. वाघाप्रमाणे यकृत आणि पित्ताशय हे रागीट असतात हे दोन अवयव बिघडले तर शरीराला त्रास होतो. त्यामुळे वाघ ज्याप्रमाणे पुढे उडी मारून शिकार पकडतो त्याप्रमाणे ही हालचाल करावी लागते आणि यामुळे यकृत आणि पित्ताशयाचे कार्य सुधारते. जंगलात वाघ या प्राण्यामुळे संतुलन राखले जाते त्याप्रमाणे या हालचालीमुळे शरीराचेही संतुलन राखले जाते.

image


दुसरा प्राणी आहे हरीण. हा प्राणी पाण्याशी संबंधित आहे त्याचा ऋतू हिवाळा हा आहे. किडणी आणि मूत्राशय हे दोन अवयव याचाशी जोडले गेले आहेत. हरीण ज्या प्रमाणे मान वळवून मागे बघतं त्याप्रमाणे आपल्यालाही मान कंबरेला ताण देऊन मान मागे करावी लागते. हरणाचा खेळकरपणा हा स्वभाव आहे. त्यामुळे या हालचालीमुळे मूत्राशय आणि किडनी यामधील पाण्याचा समतोल राखला जातो किंवा पाणी शरीरात खेळते राहते.

अस्वल: या व्यायाम प्रकारातील तिसरा प्राणी आहे अस्वल. हा प्राणी पृथ्वीशी संबंधित आहे. आणि याचा ऋतू उन्हाळा आहे. पोट आणि प्लीहा या अवयवांशी हा जोडला गेला आहे. आपण जे अन्न खातो ते पचवणं आणि त्यापासून शरीराला आवश्यक उर्जा निर्मिती करणं हे या अवयवांचं काम आहे. अस्वल हा प्राणी वजनदार आणि त्याच्या हालचाली अवघडलेल्या असतात. त्याप्रमाणे यामध्येही पोटाची हालचाल केली जाते ज्यामुळे पोटाचे कार्य सुधारते.

चौथा प्राणी आहे माकड. या प्राण्याचा ऋतू उन्हाळा आहे आणि अग्नी या घटकाशी तो संबंधित आहे. तो हृदय आणि छोटं आतडं या अवयवांशी जोडला गेला आहे. शरीरात रक्त पुरवठा कायम ठेवणं हे हृदयाचं कार्य आहे. ज्याप्रमाणे ज्योत तेवत असते, किंवा माकड सतत हालचाल करत असतं. त्याप्रमाणे शरीरात रक्तपुरवठा सतत होत राहावा यासाठी माकडाची हालचाल केली जाते.


image


सारस पक्षी: हा यामधील पाचवा प्राणी आहे, किंवा पक्षी आहे. धातू या घटकाशी हा संबंधित असून, पानगळ हा त्याचा ऋतू आहे. फुफ्फुस आणि मोठं आतडं याचाशी संबंधित हा व्यायाम प्रकार आहे. सरस पक्षी ज्याप्रमाणे उडतो त्या प्रमाणे शरीराच्या हालचाली कराव्या लागतात, तसंच श्वसनाकडेही लक्ष द्यावं लागतं. तसंच यामध्ये हात वर करून एका पायावर उभं राहावं लागतं. फुफ्फुसाची जशी उघडझाप होते त्याप्रमाणे हातांचीही उघडझाप या व्यायाम प्रकारात केली जाते. यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.

अशा पद्धतीने प्रत्येक प्राण्याची हालचाल ही प्रत्येक अवयवाशी संबंधित आहे. या पाच प्राण्यांबरोबरच इतरही प्राण्यांचा यामध्ये समावेश आहे. ते म्हणजे ड्रॅगन, हत्ती, घोडा बैल, बिबट्या, अजगर, कोब्रा, गरुड, विंचू, सिंह, कुत्रा बदक, बेडूक, कोंबडा, ससाणा, कावळा, कासव आणि पाल हे प्राणी आणि पक्षीही यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

यापैकी पाच प्राण्यांच्या हालचाली रोज लयबद्ध पद्धतीने संगीताच्या तालावर केल्या जातात. यामुळे साधारण हा व्यायाम प्रकार करायला साधारण पाच ते सहा मिनिटे लागतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला वेळ मिळत नाही. पण त्यावर वू छिन क्षि हा उत्तम पर्याय आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज पाच मिनिटं द्यायला काहीच हरकत नाही.