पोलिस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या नयना दिवेकर

0

जगामध्ये शेकडोजण जन्म घेतात आणि सेकंदाला हजारो लोक मृत्यू पावतात. व्यक्ती जन्माला येतानाच त्याचे मरण ही घेऊन येतो असे म्हणतात. पण ते मरण कधी, कुठे आणि कसे येईल या प्रश्‍नाचे उत्तर अजुन कोणी देऊ शकले नाही. ‘मुंबई मेरी जान’ म्हणणार्‍या मुंबईकरांना कधी लोकलचा प्रवास चुकलाय का? या प्रवासात दररोज कोणी ना कोणी रेल्वे रूळ ओलांडताना तर कोणी लोकलमधून पडून अपघातात मरण पावलेल्या घटना आपण पाहतो. अशा दुर्दैवी व्यक्तींमध्ये काही जणांची ओळख पटते तर काही जणांची ओळख पटली नसल्याने त्यांच्यावर बेवारसचा शिक्का मारला जातो. आपल्या समाजात गेल्या अनेक वर्षापासून मृतदेहाला पुरुषांनी खांदा द्यावा आणि मुलानेच मुखाग्नी द्यावा, अशी पूर्वापार परंपरा चालत आली आहे. परंतू नवी मुंबईतील एका जिद्दी मर्दानी महिला पोलिस कर्मचार्‍यानी ती प्रथा मोडीत काढली.

नयना दिवेकर.. नोकरी- मुंबईतील महिला पोलिस शिपाई. वय- ३५ वर्ष. शिक्षण- दहावी. व्यसन- कोणतेही नाही. कार्य- बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार... हा त्यांचा बायोडाटा पाहिला, की कोणालाही वेगळे असे काही वाटत नाही; पण त्यांच्या एकूण कार्याची माहिती घेतल्यानंतर प्रत्येकाला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटते. गेल्या अनेक वर्षापासून आपली पोलिस शिपाईची नोकरी सांभाळून रेल्वे अपघातातील ५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून समाजसेवेचे नवे उदाहरण त्यांनी समाजासमोर ठेवले. जेमतेम दहावीपर्यंत शिकलेल्या नयना दिवेकर या मुंबईतील चुनाभट्टी येथे राहणार्‍या आहेत. लहानपणापासूनच काही तरी वेगळे करण्याची धमक त्यांच्यात होती आणि तीच जिद्द कायम ठेवत २००० मध्ये नयना पोलीस दलात रुजू झाल्या. त्यांची पहिली पोस्टींग डोंबिवली रेल्वे स्थानक येथे झाल्यानंतर पुढील काही वर्षात पनवेल, कुर्ला, वाशी रेल्वे पोलिस स्थानकात झाली. यादरम्यान पोलिस शिपाईची नोकरी करीत असताना अनेक जण लोकलमधून पडून किंवा रेल्वे रूळ ओलांडून मृत्यू पावल्याच्या घटना घडत असलेल्या त्यांच्या पाहण्यात आल्या. छिन्न विछिन्न झालेले मृतदेह पाहून सुरवातीला त्यांच्या कपाळावर आट्या पडायच्या, असे नयना दिवेकर सांगतात. 

त्यानंतर २०११ साली त्यांची बदली वाशी रेल्वे स्थानक येथून दादर रेल्वे स्थानक झाली आणि तो त्यांच्या या अनोख्या कार्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या दरम्यान एडीआर म्हणजेच अपघात विभागात त्यांना काम करण्याविषयी त्यांना विचारले. हे काम आपणाला जमेल का? महिलांनी अंत्यसंस्काराचे काम करणे योग्य की अयोग्य, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात होते; पण धाडस करून नयना यांनी कामाला होकार दर्शवला. इतर सदस्यांच्या पाठिंब्याने काम सुरू केल्याचे नयना सांगतात. त्या या कामासाठी सक्षम आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी तेथील पोलिस निरीक्षकांनी त्यांना सुरवातीला पोस्टमॉटर्म झालेल्या मृतदेहांचे फोटोज काढण्यासाठी सांगितले. त्यांनी हे काम मोठ्या धाडसाने करून दाखविले. 

एरवी आपण फक्त शवगृहामधील ती स्मशानशांतता पाहूनच आत जाण्यासाठी घाबरतो. पण या महिलेने शवगृहात जाऊन पोस्टमॉटर्म केलेल्या छन्न विछन्न मृतदेहांचे फोटोज काढून वरिष्ट पोलिस निरीक्षकांना दाखविले. त्यानंतर एकदा एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. तिची ओळख पटविण्यासाठी तेथील पोलिसांनी अथक प्रयत्न केले. परंतू त्या मुलीची कोणतीही ओळख पटली नाही आणि तिला बेवारस घोषित करण्यात आले. त्या चिमुरडीचे कोमल वय पाहून आणि जीव नसलेले ते इवलेसे शरीर पाहून नयनाचे ह्दय पाझरले आणि तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी न डगमगता तोंडाला रूमाल बांधला आणि त्या कोमल मुलीचा मृतदेह कपड्यात बांधून स्मशानभूमीत नेला. त्या दिवसापासून सुरू झाली नयना यांची ही अनोखी समाजसेवा...रेल्वे अपघातात दिवसागणित मोठ्या प्रमाणात अपघात घडतात. यात रेल्वे खाली आल्याने छन्न विछन्न होऊन रक्तबंबाळ झालेले ते निर्जीव शरीर, मग यात लहान लहान चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्व जण असतात. काही अपघातात धड आणि शरीर वेगवेगळे झालेले असतात ते पाहून पुरूषांचाही थरकाप होतो. परंतू नयना दिवेकर मात्र त्या मृतदेहांचे फोटो काढणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, शवागरात त्यांची व्यवस्था करणे, माध्यमांना त्या मृतदेहांचे छायाचित्र पाठवणे, नातेवाइकांना ते मृतदेह दाखवणे आदी कामे निर्भयतेने करतात. 

याशिवाय पुढे जाऊन माणुसकी या नात्याने नयना त्या बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कारही विधीवत करण्याचे काम पार पाडतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला असता डॉक्टर व पोलिसांकडून तो कोणत्या धर्माचा असेल याची माहिती काढून त्यांच्या धर्मानुसारच अंत्यसंस्कार होईल, याबाबत त्या पुढाकार घेत असतात. रेल्वे अपघाताने मृत्यू पावलेल्या या बेवारस मृतदेहांवर सन्मानाने आणि विधीवत अंत्यसंस्कार घडविण्याचे कार्य माझ्या हातून घडते याचे मला समाधान वाटते, असे नयना सांगतात. शासकीय रुग्णालयात जाऊन बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन वाहनातून स्मशानभूमीपर्यंत नेणे, पाच फूट खोल, सहा फूट लांब व तीन फूट रुंद अशा आकाराचा खड्डा काढून त्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नयना यांना शासनाकडून मिळणार्‍या पैशात मृतदेहाला झाकण्यासाठी साधे कापडही येत नव्हते. अशा वेळी स्वतः पदरमोड करून त्यांनी ही निःस्वार्थी सेवा केली. पूर्वीच्या काळी महिलांना स्मशानभूमीतही प्रवेश दिला जात नव्हता. तर दुसरीकडे आज बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी टाळाटाळ करताना दिसून येते. अशाच पोलिस शिपाई नयना दिवेकर या आपल्या कामाचा भाग नसूनही स्वखर्चाने अनेक बेवारस मृतदेहांना विधीवत मुखाग्नी देण्याचे कार्य करीत आहेत, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.

"या कामाचे मला समाधान वाटते. निपचित पडलेल्या चेतनाहीन शरिराची काय भिती वाटणार? मी पुण्याचे काम करत आहे."                    -नयना दिवेकर, महिला पोलिस शिपाई, मुंबई.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

४६ वर्षापासून अविरतपणे निराधारांची मदत करणारे अमरजीत सिंह सूदन

आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजसेवेचा वसा चालवणाऱ्या भावना प्रधान

देहदानाविषयी जनजागृतीसाठी सक्रीय ‘दधीचि देहदान मंडळ’