स्वखर्चाने कुपनलिका खोदून पाणीटंचाई निवारण्याचा एक यशस्वी प्रयत्न

0

पाणीटंचाई हा आजच्या काळातला परवलीचा शब्द झाला आहे. तिसरे महायुद्ध झालेच तर त्याचे मूळ हे पाणी असेल. गोड्या पाण्याची वाढती कमतरता आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे खाऱ्या पाण्याची म्हणजे समुद्राची वाढती पातळी हे जागतिक पातळीवर एक मोठे प्रश्नचिन्ह बनू पाहत आहे. पाण्याच्या वाढत्या समस्येमुळे आपले अस्तित्व ऐरणीला लागले आहे. आपल्या देशात पाण्याच्या समस्येने इतके विक्राळ स्वरूप धारण केले आहे की वेळेवर या समस्येचे निवारण केले गेले नाही तर आपल्याला सगळ्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. पाणी प्रश्न हा एक किंवा दोन राज्यांपुरता मर्यादित नसून तो भारतातल्या गावागावात तसेच शहरात मोठ्या चर्चेचा विषय आहे. दरवर्षी देशातील अनेक भागात कोरडा दुष्काळ पडत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करीतच आहे पण पाण्याचे संकट इतके व्यापक प्रमाणात आहे की त्यासाठीच्या उपाययोजना कमी पडत आहेत.


राजस्थान हे भारतातले असे राज्य आहे की जेथे पाण्याची कमतरता नेहमी आणि नियमितपणे भासते. उन्हाळ्यात हा प्रश्न जरा जास्तच डोके वर काढतो. अशातच राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातले राहणारे बाबूलाल मागच्या अनेक वर्षापासून पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

बाबूलाल कुंभार यांचा जन्म राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात झाला. त्यांची कर्ताकरविता कर्मभूमी हीच आहे. ते एलआयसी एजंट म्हणून काम करतात. पैत्रिक गाव हे त्यांच्या मुळ निवासस्थानापासून २६ किलोमीटर दूर पण बुंदी जिल्ह्यातच आहे. बालपण तिथेच व्यतित झाल्यावर त्यांनी नोकरीसाठी शहराची वाट धरली. लोकांना पाण्यासाठी त्रस्त होतांना बघून त्यांना मनोमन दुख व्हायचे. त्यांना वाटायचे की पाणी ही अशी गोष्ट आहे की ज्यावर सगळ्या नागरिकांचा अधिकार असला पाहिजे व ज्या पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना अनेक अडचणी येतात जसे पाण्यासाठी त्यांना कितीतरी किलोमीटर लांब पायपीट करून तासंतास रांगेत उभे राहावे लागते. बाबूलाल यांनी विचार केला की आपल्या छोट्याशा योगदानाने आपण त्यांच्या समस्येचे निवारण करू शकतो. बाबुलालने आपल्या घरात कुपनलिका खोदली आणि आपल्या घरातून लोकांना पाणी वाटप सुरु केले. ही एक नि:स्वार्थ व निशुल्क सेवा होती. लोक आपल्या गरजेनुसार तेथून पाणी नेऊ लागले.


बाबूलाल सन २००८ पासून अविरतपणे लोकांना मोफत पाणी वाटत आहेत. कुपनलिकेच्या पंपाचे वीजबिल ते स्वखर्चाने भरतात आणि जवळजवळ १५०० लोकांना बाबुलालच्या या उपक्रमाचा फायदा होत आहे. याचदरम्यान बाबूलाल एकदा आपल्या गावाला गेले असतांना तेथे त्यांना हाच प्रश्न भेडसावला. गावातल्या विहिरीमधल्या पाण्यात क्लोराइडची मात्र जास्त प्रमाणात होती जे लोकांच्या आजाराचे मुळ कारण होते. बऱ्याच लोकांना आरोग्याच्या अनेक छोट्यामोठ्या तक्रारी तसेच सांधेदुखी यांचा त्रास होता. बाबूलाल लगेच आपल्या गावकऱ्यांच्या मदतीला धावले. बाबूलाल यांची स्वतःची एक विहीर होती जी नदीच्या जवळ असल्यामुळे तिचे पाणी थोडे स्वच्छ होते. बाबुलालनी सरकारी कार्यालयात चकरा मारून बऱ्याच प्रयत्नांनी संसदेमधून ८० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून घेवून, विहिरीवर पंप बसवून, गावापर्यंत पाईपलाईन टाकून तसेच गावात पाण्याच्या दोन टाक्या बांधून त्यातील स्वच्छ पाणी गावकऱ्यांच्या उपयोगाला आणले. आज जवळजवळ ५०० गावकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांच्या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एक मागासलेला भाग आहे, तिथे बाबूलाल यांनी आपल्या प्रयत्नांनी सरकारचे लक्ष वेधून पाण्याचा पंप बसविला, तेथून आलेले स्वच्छ पाणी सरळ टाकीत पडत आहे व ते पाणी लोक उपयोगात आणत आहेत.

बाबुलालच्या या प्रयत्नाना त्यांची धर्मपत्नी कमलेशकुमारी यांची मोलाची साथ आहे. बाबूलालच्या गैरहजेरीत त्यांची पत्नी पाण्याची सगळी व्यवस्था बघते. त्यांनी सतत बाबूलाल यांना प्रोत्साहन दिले तसेच कठीण प्रसंगी त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.

बाबूलाल सांगतात की,समाजातल्या प्रत्येक वर्गाने सुसूत्रता राखून प्रत्येकाला मदत केली पाहिजे. आपण सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष राहून स्नेहभावाने आयुष्य जगले पाहिजे. आपल्या देशात अनेक समस्या मूळ धरून आहेत पण आपण स्वतः एकमेकांच्या मदतीसाठी पुढे येत नाही तोपर्यंत सरकारी प्रयत्नपण विफल ठरतील. आता वेळ आली आहे, आपण सगळे मिळून देशाच्या प्रगतीचा आधारस्तंभ बनण्याची.

लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे