बंगळुरु ते धारावी, टेसरॅक्टच्या यशस्वी प्रवासाची गोष्ट... 

0

भारतात कंपनी सुरु करणे आणि ती चालविणे ही काही सोपी गोष्ट नाही. जागतिक बॅंकेच्या २०१५ च्या अहवालानुसार इज ऑफ डुईंग बिझनेसचा विचार करता, १८९ देशांमध्ये भारत १३० व्या क्रमांकावर होता. ‘स्टार्टअप इंडिया’ या सरकारच्या नवीन उपक्रमासह, २०१६ हे जरी अधिक चांगले दिसत असले, तरीही देशामध्ये स्टार्टअप्ससाठी हितकारक वातावरण आहे, असे मानण्यास अजूनही बराच काळ जावा लागणार आहे.

या सर्व समस्यांची जाणीव असूनही, क्षितिज मारवाह यांनी स्वतःची हार्डवेअर कंपनी – टेसरॅक्ट (Tesseract) – भारतातच सुरु करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आपली कंपनी स्थापण्यासाठी म्हणून ते व्यवसायासाठी अधिक चांगले वातावरण असलेल्या अमेरिकेसारख्या देशाची निवड सहज करु शकले असते. पण त्यांनी भारताचीच निवड केली आणि अगदी शून्यातून उभारणी केली एका ३६० डिग्री कॅमेऱ्याची.... क्षितिज आणि त्यांच्या टीमच्या यशाची ही रंजक कथा...

कथा आतापर्यंत

क्षितिज मारवाह(२८) यांचा प्रवास आयआयटी-दिल्लीपासून सुरु झाला. हावर्ड मेडीकल स्कुल आणि स्टॅंडफोर्ड मध्ये व्यतित केलेला काही काळ आणि इंटर्नशीप्स त्यांच्यासाठी खूपच महत्वाच्या ठरल्या. कारण याच अनुभवातून तंत्रज्ञान आणि कल्पकतेचे जग त्यांच्यासमोर खुले झाले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भविष्यातील कारकिर्दीसाठी त्यांनी मळलेल्या वाटेनेच न चालण्याचा निश्चय केला आणि सहा महिन्यांसाठी युरोपमध्ये भटकंती केली. या काळात त्यांनी स्वतःला छायाचित्रणात गुंतवून घेतले. भारतात परतल्यानंतर, मित्राच्या सल्ल्यावरुन त्यांनी एमआयटी मिडीया लॅब्ससाठी अर्ज केला आणि त्यांची निवडही झाली.

एमआयटीमधील अतिशय सुंदर अनुभवानंतर ते एमआयटी मिडीया लॅब इंडिया इनिशिएटीव्हचे प्रमुख म्हणून मुंबईत परतले आणि त्यांची पहिली डिजाईन कार्यशाळा सुरु केली. मुंबई, दिल्ली आणि बंगळुरु येथे या कार्यशाळा आयोजित करण्याच्या निमित्ताने त्यांना डिजाईनर्स, तंत्रज्ञ आणि उत्पादकांना एकत्र आणणे शक्य झाले. त्यानंतर त्यांनी ३६० डिग्री कॅमेरा उभारण्यासाठी म्हणून लाईट फिल्ड कॅमेरा (एलएफसी) तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरुवात केली.

क्षितिज आणि टेसरॅक्टमधील त्यांच्या टीमने ३६० डिग्री कॅमेरा विकसित करण्यावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ घालविला. त्यांचे लक्ष्य होते ते असा एक कॅमेरा तयार करण्याचे ज्याद्वारे ३६०/थ्रीडी/व्हर्च्युअल रिऍलिटी मध्ये फोटो आणि वॉकथ्रूज तयार करता येतील, ज्यामुळे दर्शकांना घर, रस्ता, हॉटेल, रेस्टॉरंट किंवा परिसराच्या वास्तवाचा आभासी अनुभव देता येईल.

संकल्पना ते नमुना

बंगळुरुपासून सुरुवात करताना, टीमने विविध प्रकारच्या डिजाईन कल्पनांचा शोध घेतला – गोलाकार पृष्ठभागावरील सहा कॅमेऱ्यांच्या रचनेपासून ते विविध पातळ्यांवरील पाच कॅमेऱ्यांपर्यंत..... आणि त्यानंतर अखेर त्यांना चार-कॅमेरा डिजाईनसह एक काम करण्यायोग्य मॉडेल मिळाले. पण हा सेटअप चालविण्यासाठी तीन जणांची गरज लागत असल्याने, हे खूपच गैरसोयीचे होते.

तसेच त्यांना हेदेखील जाणविले की हे कॅमेरे एकमेकांपासून लांब असल्यामुळे या सेटअपमध्ये दृष्टीभेदाच्या त्रुटीही होत्या. विविध सॉफ्टवेअर उपाय करुनही ही समस्या सोडविता येत नव्हती. तर हार्डवेअरच्या दृष्टीनेही चार वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचे कॅलिब्रेटींग करणे हे एक आव्हानच होते.

त्यांनी तीन कॅमेरे आणि त्यानंतर दोन कॅमेऱ्यांसहदेखील प्रयत्न करुन पाहिले, पण दोन्ही प्रयत्न अपयशी ठरले. अखेर सखोल संशोधनानंतर त्यांच्या लक्षात आले की, विशिष्ट अंशात फिरविल्यास एक कॅमेरा डिजाईनच सर्वोत्तमपणे काम करते. त्यांनी या उपकरणाचे नामकरण केले – मिथेन (Methane). त्यानंतरचे आव्हान होते ते हा कॅमेरा चालविण्यासाठी सर्वात योग्य बॅटरी संरचना शोधण्याचे... एक महिनाभर विविध प्रकारच्या बॅटरी आणि चार्चिंग सर्कीटस् ची चाचणी घेतल्यानंतर शेवटी ते यामध्ये यशस्वी झाले.

क्षितिज आणि त्यांच्या टीमला मुंबईतील असे प्रिंटेड सर्कीट बोर्ड (पीसीबी) फॅब्रिकेटर्स शोधण्यात यश आले, जे त्यांच्यासाठी हे बोर्ड बनविण्याचे काम तीन दिवसांपेक्षाही कमी काळात पूर्ण करुन देऊ शकत होते. टीमने काळ्या आणि लाल मॅट फिनिश रिंग्जसह ऍनोडाईस्ड ऍल्युमिनियम फिनिश वापरण्याचा निर्णय घेतला. तर मिलिंग प्रोसेसचे (आकार देण्याचे) काम त्यांच्या मुंबई कार्यालयामागील इंडस्ट्रीयल पार्कमध्येच होऊ शकेल, हे त्यांच्या लक्षात आले.

कंपनीच्या ब्लॉग पोस्टमध्ये क्षितिज पुढे सांगतात, “ जर तुम्हाला काम करण्यायोग्य नमुना तयार करण्यासाठी ‘एक्स’ एवढा वेळ लागला असेल, तर उत्पादन प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘१०एक्स’ एवढा वेळ लागेल आणि जर तुम्ही विकएन्डलादेखील सुट्टी न घेता दररोज २० तास काम केलेत तर यासाठी लागणारा वेळ ‘५एक्स’ एवढा असेल.”

अंतिम पल्ला

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अभियंत्यांच्यासह ग्राफीक डिजायनर्स आणि प्रॉडक्ट आर्कीटेक्टस् ही पाठोपाठ कामाला लागल्याने, क्षितिज यांचा मिथेन भारतातच तयार होऊ शकते यावर विश्वास बसला. टीमने कॅमेरा लेन्सेस तयार करुन घेतल्या आणि बॅटरी व्यवस्थापन, बॅटरी मॉनिटरींग, मोटर ड्रायव्हर्स आणि स्टेटस इंडीकेटर्ससाठीचे कस्टम हार्डवेअर एकत्रित केलेले उपकरण चालविण्यासाठी १जीबी रॅमसह ड्युएल कोअर 1GHz प्रोसेसर मिळविले. त्याचबरोबर मिथेनसाठी रिमोट कंट्रोलप्रमाणे काम करु शकेल असे एक मोबाईल अॅपही विकसित केले.

उत्पादनाचे पॅकेजिंग हा त्यांचा पुढील अंजेडा होता. अॅपलने उत्पादनाच्या पॅकेजिंगसाठी खर्च केलेला मोठा वेळ, कष्ट आणि पैसा याबाबतच्या कथा क्षितिज यांनी वाचल्या होत्या आणि त्यावरुनच त्यांनी सर्व पर्यांयांचा विचार करुनच पॅकेजिंगसाठी शक्य तो सर्वोत्तम पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला.

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीमध्ये त्यांना त्यांचे उत्तर मिळाले. खरं तर क्षितिज यांच्यासाठी हा आश्चर्याचा धक्काच होता, पण त्यांच्या लक्षात आले की धारावीमध्ये लेदर, हार्डबोर्ड पॅकेजिंग, इंजेक्शन मोल्डींग आणि अगदी ग्राहकोपयोगी वस्तूंचा मोठा जोमदार उद्योग होता. क्षितिज पुढे सांगतात, “ त्यामुळे आम्ही धारावीमधून आमच्या उत्पादनाचे बॉक्सेस तुलनेने कमी खर्चात तयार करुन घेतले, जे लेदर फिनिशसह होते आणि त्यावर टेसरॅक्टचा लोगो गोल्ड एम्बॉस करण्यात आला होता आणि त्यावर कोरलेले होते ‘मेड इन इंडिया’...”

त्यानंतर ते गुणवत्ता आणि नियंत्रणाच्या टप्प्यावर जाऊन पोहचले. आता आपल्याला शेवटचा अडथळा पार करायचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले – कॅमेऱ्यावरील वाय-फाय हॉटस्पॉट हे कमी ताकदीचे सिग्नल्स ट्रान्समिट करत होते. यावर थोडे काम केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, २०११ मध्ये आयफोनलाही अशाच प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला होता – ऍल्युमिनियम बॉडी वायफाय सिग्नल शोषून घेत होती. त्यामुळे मग अॅपलप्रमाणेच त्यांनी देखील संपूर्ण बॉडीचेच एक ऍंटेनामध्ये रुपांतर करत, ही समस्या सोडविली.

बऱ्याच महिन्यांनंतर, अनेक पुनरावृत्तींनंतर, जुगाड आणि अनेक टीम्सबरोबरील समन्वयानंतर हे उत्पादन पाठविण्यासाठी तयार झाले. नुकत्याच झालेल्या टीईडीएक्स हैदराबाद टॉल्कमध्ये क्षितिज म्हणाले, “ या संपूर्ण प्रवासातील सर्वात सुंदर भाग हा होता तो म्हणजे भारतातच आम्ही या उत्पादनाची संपूर्ण निर्मिती करु शकलो. हे उत्पादन सुरुवातीपासून शेवटापर्यंत – हार्डवेअरपासून ते सॉफ्टवेअर ते उत्पादन डिजाईन आणि प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत सर्व काही भारतातील विविध शहरांमध्येच करण्यात आले आहे.”

भविष्यातील योजना

दहा सदस्यांच्या टीमसह, टेसरॅक्ट सध्या भारताबरोबरच ब्राझील, अमेरिका, चायना, युके, डेन्मार्क आणि जपानमधील ग्राहकांपर्यंत मिथेन पोहचवत आहे. जरी त्यांचे बहुतेक ग्राहक हे प्रवासी आणि हॉस्पिटॅलिटी, रिएल इस्टेट आणि मॅपिंग क्षेत्रातील असले, तरी हा छंद जोपसाणाऱ्यांना आणि वैयक्तिक व्यावसायिकांनाही या उत्पादनात रुची असल्याचे दिसून येत आहे.

सध्या मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी तीन आठवड्यांचा अवधी लागतो. मिथेन दोन रुपांमध्ये उपलब्ध असून, बेसिक व्हर्जन १.५ लाख किमतीचे आहे तर अधिक ऍडव्हान्स प्रो व्हर्जन (थ्रीडी सेन्सर्ससह) दोन लाख रुपयांना उपलब्ध आहे.

सध्या तरी टेसरॅक्ट स्वतःच्याच भांडवलासह काम करत असून बाहेरील भांडवल उभारणीच्या शोधात नाही. एंजल आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यामध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे क्षितिज सांगतात, पण स्टार्टअपने सध्या लक्ष केंद्रीत केले आहे ते त्यांचे सध्याचे उत्पादन आणि येऊ घातलेले उत्पादन – व्हायकॅम (ViCAM), ३६० डिगरी व्हर्च्युअल व्हिडीओ कॅमेऱ्याच्या संशोधन आणि विकासावर... क्षितिज सांगतात, “ सध्या आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे ते व्यवसायांबरोबरील संबंध मजबूत करण्यावर आणि भविष्यात जेंव्हा आम्ही बीटूसी क्षेत्राचा विचार करु, तेंव्हा आम्ही कदाचित क्राऊडफंडींगचा विचार करु शकतो, ज्यातून आम्हाला मागण्या सुकर करण्यात आणि पैसे उभारण्यात मदत मिळू शकते.”

त्यांच्या पहिल्या उत्पादनाच्या निर्मितीतून मिळालेल्या धड्याच्या आधारावर टेसरॅक्टचे नवीन उत्पादन व्हायकॅम हे अधिक लहान आणि तुकतुकीत असेल आणि त्यामध्ये अधिक इंटर्नल स्टोअरेज कपॅसिटी असेल. मार्केट रिसर्चवर आधारित  आणि संभाव्य ग्राहकांशी चर्चा केल्यानंतर, सिनेमा निर्माण आणि व्हिडीओ शुटींगसाठी या उत्पादनाला मोठी मागणी असल्याचे दिसून आले आहे.

ऑग्युमेंटेड रियॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानामध्ये आणि ३६० डिग्री कॅमेरा तंत्रज्ञानामध्ये सध्या जागतिक स्तरावर प्रचंड रस दिसून येत आहे. फेसबुकच्या मते ३६० डिग्री व्हिडीओ भविष्यात कंपनीच्या सोशल नेटवर्कच्या केंद्रस्थानी असतील आणि सध्या ते व्हिडीओवर खूप जोर देत आहेत. सॅंमसंगने नुकतेच त्यांचा गिअर ३६० कॅमेरा आणला आहे, जो दोन लेन्सेसह आहे. तर याच क्षेत्रात पॅनऑपरेटर, ३६०फ्लाय आणि ३६०हिरोज (पेअर्ड विथ गोप्रो कॅमेराज) हे खेळाडू देखील आहेत.

भारत आणि अमेरिकेतील स्टार्टअपसाठीचे वातावरण अनुभवल्यानंतर, क्षितिज यांना पूर्ण विश्वास आहे की परदेशाकडे वळण्याचे काहीच कारण नाही. ते सांगतात, “भारतात पुरेशी गुणवत्ता आणि आवेश आहे. जरी काही बाबतीत कठीण समस्या असल्या तरी आपल्याला शून्यातून यशस्वी हार्डवेअर स्टार्टअप उभारण्यासाठी पश्चिमेकडे जाण्याची गरज नाही. हे भारतातच होऊ शकते.”

यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

हेल्थनेक्स्टजनद्वारे गंभीर आजारांचे अनुमान

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

'एम-इंडिकेटर'द्वारे मुंबईकरांच्या घरोघरी पोहोचलेले सचिन टेके


लेखक – हर्षित माल्या
अनुवाद – सुप्रिया पटवर्धन