कौशल्य विकास करून अपंगांना मोठ्या कंपन्यांचे दरवाजे खुले करणारी ‘यूथ 4 जॉब्स’

कौशल्य विकास करून अपंगांना मोठ्या कंपन्यांचे दरवाजे खुले करणारी ‘यूथ 4 जॉब्स’

Thursday November 19, 2015,

4 min Read

अपंगांना समाजाच्या मुख्यप्रवाहात येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण आज अशा काही संस्था आहेत ज्यांच्या मदतीनं अपंगांनी स्वबळावर विकास साधलाय. यापैकीच आहे 'यूथ 4 जॉब्ज' ही संस्था...

नऊ महिन्यांची असताना मल्लिका रेड्डीला पोलिओ झाला. मल्लिका मोठी होत होती तशा तिच्या समस्याही वाढत होत्या. आर्थिक अडचणी त्यातच तिच्या वडिलांना झालेला अर्धांगवायू आणि आईचा कॅन्सर यामुळे तिचं कुटुंबच उध्वस्त झालं. पण अडचणींचा एवढा डोंगर असूनही मल्लिका निराश झाली नाही...उलट तिनं आपल्या कुटुंबियांना अभिमान वाटेल असं काम केलंय. मल्लिका शरीरानं अपंग आहे, पण तिची स्वप्नं अपंग नाहीत. आज मल्लिका आंध्र प्रदेशात सरकारी प्रोजेक्ट ईजूएमएमएम मध्ये ट्रेनर म्हणून काम करत आहे. स्वत:च्या पायावर उभी असलेली मल्लिका आज महिन्याला १२ हजार रुपये कमावत आहे. मल्लिकाला या संघर्षात साथ लाभली ती यूथ ४ जॉब्ज या संस्थेची...मल्लिकासारख्या अनेकजणांसाठी ही संस्था आशेचा किरण ठरली आहे. ही संस्था बाजारात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांसाठी उमेदवारांना आवश्यक ती कौशल्यं विकसित करण्यासाठी मदत करते.


image


२०११ च्या जनगणनेनुसार देशभरात २.६८ कोटी अपंग आहेत. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोकसंख्या अपंग आहे. यामध्ये १९ ते २९ वर्ष वयोगटातील ४१ लाख तरूण आहेत. यामध्ये फक्त दोन टक्के अपंग साक्षर आहे तर फक्त एक टक्का अपंग रोजगार मिळवू शकतात. रोजगारासाठी आवश्यक ती कौशल्यं नसल्यानं एवढ्या प्रचंड लोकसंख्येला रोजगार मिळू शकत नाही. अशाच लोकांसाठी यूथ 4 जॉब्स काम करते. यूथ 4 जॉब्स ही एक स्वयंसेवी संस्था आहे. अपंग व्यक्तींना रोजगार मिळण्यासाठी आवश्यक ती कौशल्यं विकसित करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. यूथ 4 जॉब्समुळे हजारो अपंग तरुणांची स्वप्नं पूर्ण होत आहेत. अपंग व्यक्तिंमध्ये कौशल्य विकास करून त्यांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी यूथ 4 जॉब्स मदत करते. प्रशिक्षणानंतर अपंग व्यक्तींना लगेचच रोजगार मिळू शकेल अशा पद्धतीनेच या संस्थेचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीनं यूथ 4 जॉब्स प्रशिक्षण देते. मीरा शिनॉय यांचा यामध्ये मोलाचा सहभाग आहे. ग्रामीण भागातून आलेल्या आणि तुलनेनं कमी शिकलेल्या तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मीरा शिनॉय यांनी या संस्थेची सुरुवात केली. विविध प्रकारचं अपंगत्व लक्षात घेऊन त्यादृष्टीनं संस्थेनं प्रशिक्षण कार्यक्रम तयार केले आहेत. एका केंद्रापासून सुरुवात झालेल्या या संस्थेची आता ९ राज्यांमध्ये १८ केंद्रं आहेत. अपंगांना मुख्य प्रवाहातील रोजगारामध्ये आणणं हा यूथ 4 जॉब्सचा मुख्य हेतू आहे असं मीरा शिनॉय सांगतात. त्यासाठी दोन प्रकारे काम केले जाते. संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामधून अपंगांना प्रशिक्षणासोबतच प्रोत्साहन दिलं जातं आणि संघटित क्षेत्रांमध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर दुसऱ्या स्तरावर बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी मदत केली जाते.


image


सुरुवातीला यूथ 4 जॉब्सलाही संघर्ष करावाच लागला. सगळ्यांनाच हे अशक्य आहे असं वाटत होतं. आपली मुलं काहीच कामाची नाहीत, ती कधीच स्वत:च्या पायावर उभी राहू शकणार नाहीत असं या मुलांच्या पालकांना वाटत होतं. दुसरीकडे तरुणांमध्येही स्वाभिमानाची कमतरता होतीच. तर या अपंग व्यक्तींमधल्या कौशल्यांबद्दल कंपन्यांना काहीच माहिती नव्हतं. ‘करू शकत नाही या मानसिकतेऐवजी करू शकतो’ अशी मानसिकता बदलण्यात प्रचंड मेहनत घ्यावी लागली, असं मीरा शिनॉय सांगतात.

संस्थेच्या उभारणीसाठी सुरुवातीला वाधवानी फाऊंडेशननं निधी दिला. त्यानंतर ऍक्सिस बँकेनं मदत केली. बँकेच्या व्यवस्थापक शिखा शर्मा यांनी संस्थेच्या कार्यक्रमांची देशभरात सुरुवात केली. अपंगांमधले गुण हेरण्यासाठी बँकेच्या मदतीनं संस्थेनं देशभरात केंद्र उघडली. त्याशिवाय टेक महिंद्रा फाऊंडेशन आणि चेन्नईच्या युनायटेड वेनंसुद्धा संस्थेला आर्थिक सहाय्य केलं आहे.


image


प्रशिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजे तरुणांना प्रशिक्षण केंद्रात एकत्र आणणं. संस्था अनेक सरकारी, निमसरकारी, अपंग, ग्रामीण संघटनांसोबत काम करते. त्यामुळे या सर्वांशी संपर्क साधून अपंग तरुणांना एकत्र केलं जातं. कॉम्प्यूटर आणि किमान कौशल्यांबाबत इंग्रजीमधून प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेल्या कौशल्यांवर विशेष लक्ष दिलं जातं. त्यानंतर त्यांना ऑन जॉब प्रशिक्षण दिलं जातं. शिक्षण आणि त्यांची स्वप्नं, ध्येय यानुसार प्रशिक्षण दिलं जातं. शिकलेल्या तरुणांना सेवा क्षेत्रात नोकरी मिळते तर थोडं कमी शिकलेल्या तरुणांना उत्पादन क्षेत्रात रोजगार मिळतो.

आतापर्यंत यूथ 4 जॉब्समधून सात हजार तरुणांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे. यामध्ये ६५ टक्के अपंग आता संघटित क्षेत्रात काम करत आहेत. प्रशिक्षण घेतलेल्यांमध्ये ४० टक्के मुलीही आहेत. ग्रामीण भागातील जवळपास ८५ टक्के तरुणांना यूथ 4 जॉब्समधून प्रशिक्षण दिलं जातं.

अपंग लोकही संघटीत क्षेत्रात नियमित नोकरी करू शकतात हे या संस्थेच्या मॉडेलनं सिद्ध केलं आहे. त्याशिवाय जिथे थेट ग्राहकांशी संपर्क येतो अशा ठिकाणीही म्हणजे एखाद्या स्टोअरमध्ये कॅशिअर म्हणूनही अपंग व्यक्ती काम करू शकतात. भविष्यात या संस्थेला देशातल्या सर्व राज्यांमध्ये केंद्रं उघडायची आहेत. अपंग व्यक्ती या समाजावरील ओझे नाहीत तर संपत्ती आहेत, हे सर्वांपर्यंत पोहोचावं असा संस्थेचा प्रयत्न आहे. तरच अपंग मुख्य प्रवाहात येतील. आतापर्यंत यूथ 4 जॉब्सला चार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

यूथ 4 जॉब्सची वेबसाइट-

www.youth4jobs.org


लेखक- आमीर अन्सारी

अनुवाद- सचिन जोशी