मैदानी खेळांना नवसंजीवनी देणारा क्रीडा क्षेत्रातील एक स्तुत्य उपक्रम ‘गेट अ गेम’

0

स्मार्ट फोनच्या जगात वावरणारी आजकालची लहान लहान मुलं खूप स्मार्टली मोबाईल गेम्स खेळतात. लिहिता वाचताही न येणाऱ्या मुलांची टच स्क्रीनवरुन सहज मात्र अचूक फिरणारी बोटे पाहून त्यांच्या आकलन शक्तीचे कौतुक वाटते. मात्र हे चित्र जितके कौतुकास्पद तितकेच मुलांच्या आरोग्यासाठी घातक आहे. आजकालच्या पिढीसाठी ‘गेम’ हा शब्द केवळ व्हिडिओ गेम, मोबाईल गेम पुरताच मर्यादित झाला आहे. मुलांच्या सर्वांगिण विकासाला मदत करणाऱ्या मैदानी खेळांपेक्षा आरोग्याला घातक ठरणाऱ्या या अशा गेम्समध्येच मुले जास्त रमतात. वाढत्या बांधकामांमुळे खेळायला मोकळ्या जागा उपलब्ध नसल्याचे कारण यासाठी अनेकदा दिले जाते. लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही आजकाल फावल्या वेळेत मोबाईलवर गेम खेळण्यात मग्न दिसतात. खरे तर सुदृढ जीवनशैलीसाठी लहान मुलांनीच नाही तर मोठ्या माणसांनीही शारीरिक व्यायाम करणे गरजेचे असते. मैदानी खेळ खेळणे हा शारीरिक व्यायामासाठीचा उत्तम पर्याय. मात्र शाळा कॉलेज संपल्यावर कामधंद्यामध्ये व्यस्त झालेल्या अनेकांच्या आयुष्यातून ‘खेळ’ हा शब्दच निघून जातो, तर ज्यांना खेळण्याची आवड असते, काम संपल्यावर अथवा सुट्टीच्या दिवशी खेळण्याची इच्छा असते अशांना परिसरात मैदान उपलब्ध नसणे, टीम नसणे अशा अनेक कारणांमुळे आपली आवड बाजूला ठेवावी लागते. ‘गेट अ गेम’च्या माध्यमातून कबीर मांद्रेकरने या सर्व समस्यांवर उपाय शोधून मैदानी खेळांना नवसंजीवनी देण्याचा आणि खेळू इच्छिणाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विडा उचलला आहे.


कबीरला स्वतःला खेळाची खूप आवड आहे. “शाळा-कॉलेजमध्ये असेपर्यंत सगळ्या खेळांमध्ये आवर्जून सहभागी व्हायचो. पुढे नोकरीधंदा सुरु झाला. त्यामुळे आधीच व्यस्त दिनक्रम आणि त्यात एखाद्या सुट्टीच्या दिवशी खेळावं असं वाटलं तरी ग्राऊंड उपलब्ध नसायचं, आपल्याबरोबर खेळायला आपल्या वेळेत मित्रांना वेळ मिळेलच असं नाही, मग कुणाबरोबर खेळायचं हा प्रश्न. यामुळे खेळ बाजूलाच पडायला लागला. यामधूनच ‘गेट अ गेम’ची संकल्पना सुचली,” असं कबीर सांगतो.

कबीर पुढे सांगतो, “अनेकदा खेळासाठी मैदानच उपलब्ध नाही असं म्हटलं जातं. मात्र खेळासाठी सज्ज असलेली अनेक मैदाने विशेषतः शाळा-कॉलेजांमधील मैदानांचा पूर्णपणे वापरच होत नाही. त्यामुळे नव्याने एखादं मैदान तयार करण्यापेक्षा या अशा मैदानांचा वापर करायचा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळण्यासाठी इच्छुक व्यक्तींना एकत्र आणायचं, लहान मुलांना मैदानी खेळांचं प्रशिक्षण द्यायचं, तसंच योगा आणि आऊटडोअर जिमच्या माध्यमातून लोकांना फीट राहण्यासाठी पर्याय पुरवायचा असं ठरवलं आणि मार्च २०१५ पासून त्यादिशेने काम करायला सुरुवात केली.”


सप्टेंबर २०१५ मध्ये पुण्यातील ऑर्चिड स्कूलच्या मैदानापासून कबीरने ‘गेट अ गेम’ची संकल्पना रुजवायला सुरुवात केली आहे. या शाळेच्या बास्केट बॉलच्या मैदानावर शाळा सुटल्यानंतर आणि सुट्ट्यांच्या दिवशी कोचिंग क्लासेस भरवले जातात. सध्या लहान मुलांसाठी बास्केट बॉलचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले असून लवकरच मोठ्यांसाठीही प्रशिक्षण वर्ग भरविले जाणार आहेत. आतापर्यंत ५० मुलांना येथे बास्केट बॉलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक येथे आहेत. एवढेच नाही तर या प्रशिक्षकांनी येथे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करण्यापूर्वी ‘गेट अ गेम’च्या हेड कोचमार्फत औंध येथील आनंदबन क्लबमध्ये त्यांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो. बास्केट बॉलच्या प्रशिक्षण वर्गांबरोबरच शाळेच्या इनडोअर हॉलमध्ये योगाचे प्रशिक्षण वर्गही ‘गेट अ गेम’मार्फत भरविले जातात.

बास्केट बॉल आणि योगाचे प्रशिक्षण वर्ग भरविण्याबरोबरच ‘गेट ग गेम’ने कधीतरी हौस म्हणून खेळू इच्छिणाऱ्यांनाही कॅज्युअल गेमच्या माध्यमातून खेळण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अशा इच्छूक खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी कबीरने सोशल मीडियाचा खुबीने वापर करुन घेतलाय. ‘गेट अ गेम’च्या संकल्पनेला प्रसिद्धी देण्यासाठी त्याने फेसबुकवरुन लोकांना खेळायचे असल्यास आपले नाव आणि नंबर ‘गेट अ गेम’च्या फेसबुक पेजवर टाकण्याचे आवाहन केले आहे आणि येथे संपर्क करणाऱ्या इच्छूक खेळाडूंचा एक वॉट्सऍप ग्रुप बनविला आहे. या ग्रुपमधील कुणाला बास्केट बॉल खेळण्याची इच्छा झाल्यास ती व्यक्ती ग्रुपवरील इतरांना खेळण्यासाठी आवाहन करते आणि इच्छुक व्यक्ती त्याला प्रतिसाद देतात. “यामधून एक टीम सहज तयार होते. गेट अ गेमच्या माध्यमातून ऑर्चिड स्कूलचे बास्केट बॉल कोर्ट त्यांना उपलब्ध असतेच आणि अशा प्रकारे खेळण्यासाठी टीम मेंबर्सही मिळतात. सध्या या ग्रुपवर ४० सदस्य आहेत. जे लोक कामानिमित्त किंवा इतर काही कारणाने आपले शहर सोडून पुण्यात स्थायिक झाले आहेत अशांना आणखी एक चांगली गोष्ट यामधून मिळते आणि ती म्हणजे खेळण्यासाठी टीम मेंबर मिळण्याबरोबरच त्यांना या नवीन शहरात मित्र मिळतात, ओळखी वाढतात,” कबीर सांगतो.

‘गेट अ गेम’ मार्फत प्रशिक्षण कार्यक्रम आणि कॅज्युअल गेमबरोबरच बास्केट बॉल टुर्नामेंटही आयोजित करण्यात येतात. या टुर्नामेंट्सना चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे कबीर सांगतो. नुकत्याच भरविण्यात आलेल्या स्कूल टूर्नामेंटमध्ये ६ शाळांनी सहभाग घेतला होता. तर ओपन क्लब टुर्नामेंटमध्ये ३० टीम सहभागी झाल्या होत्या. येत्या महिन्याभरात कोर्पोरेट टूर्नामेंट भरविण्यात येणार असल्याचं कबीर सांगतो. तसेच ‘गेट अ गेम’ कन्सेप्ट लीग ही एक नवीन संकल्पना घेऊन येतेय. “ही कन्सेप्ट लीग तीन महिन्यांसाठी भरविण्यात येणार आहे. यामध्ये आम्ही लॅडर लीग सिस्टीम विकसित करित आहोत. म्हणजे यामध्ये सहभागी होणाऱ्या टीमला त्यांच्या परफॉर्मन्सनुसार आम्ही रँक देणार. त्यानंतर एखाद्या टीमला वरची रँक मिळवायची असेल तर त्यासाठी ती टीम त्या रँकच्या टीमला आव्हान देऊ शकते. त्यानंतर दोन्ही टीममध्ये झालेल्या खेळाचा जो निर्णय लागेल त्यानुसार रँक बदलेल. यामुळे खेळ हा केवळ एका मॅचपुरता किंवा एका टुर्नामेंटपुरता मर्यादित न राहता स्पर्धात्मक होईल आणि खेळाडूंना त्यांची खेळण्याची आवड जोपासायची अधिकाधिक संधी मिळेल. त्याशिवाय यामधून आपल्या तोडीच्या टीमबरोबर खेळण्याचा आनंदही अनुभवता येईल,” असं कबीर सांगतो.

भविष्यात ऑर्चिड स्कूलप्रमाणेच आणखीही काही शाळांबरोबर करार करुन त्यांची मैदाने मिळविण्याचा ‘गेट अ गेम’चा प्रयत्न आहे. बास्केट बॉलबरोबरच हळूहळू शाळांची फुटबॉल ग्राऊंड मिळवून फुटबॉलचे प्रशिक्षण वर्ग आणि सामने भरविण्याचा ‘गेट अ गेम’चा मानस आहे. तसेच येत्या काळात आऊटडोअर जीम आणि बॉडी वेट ट्रेनिंगही सुरु करणार असल्याचं कबीर सांगतो.

‘गेट अ गेम’च्या या उपक्रमामुळे एरवी केवळ खेळाच्या तासाला अथवा मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या मैदानाचा आता पुरेपूर वापर होत आहे. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर मुलांना खेळाचे प्रशिक्षणही मिळत आहे. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांबरोबरच शाळेलाही फायदा होत आहे. शाळेला उत्पन्नाचे साधन प्राप्त झाले आहे. याद्वारे मिळणारे उत्पन्न शाळेतील क्रीडा सुविधांवर खर्च करण्यात येते. ‘गेट अ गेम’ दर महिन्याला मैदानावरील आवश्यक सुविधांविषयी शाळेला सूचित करते. त्यानुसार शाळा वेळोवेळी आपल्या मैदानामध्ये आवश्यक त्या सुधारणा करते. यामुळे विद्यार्थ्यांना आणि ‘गेट अ गेम’मार्फत इथे खेळणाऱ्या खेळाडूंना उत्तम दर्जाच्या क्रीडा सुविधांचा लाभ मिळत आहे. ‘गेट अ गेम’च्या या उपक्रमामुळे क्रीडा प्रशिक्षकांनाही करिअरची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. लहान मुले, हौशी खेळाडू, शाळा आणि प्रशिक्षक अशा अनेकांसाठी फायदेशीर ठरलेल्या ‘गेट अ गेम’च्या या उपक्रमामुळे मोबाईल गेम्समध्ये रमणाऱ्या मुलांना मैदानी खेळाकडे वळविण्यात नक्कीच मदत होईल.