ज्येष्ठांचा जीवन-आनंद म्हणजे 'ओल्ड इज गोल्ड'

ज्येष्ठांचा जीवन-आनंद म्हणजे 'ओल्ड इज गोल्ड'

Thursday October 29, 2015,

6 min Read

वार्धक्याने खचलेली आई बिछान्यावर सारखी पडून होती. तिला उठताही येत नव्हते. एकप्रकारे लाचारीचेच जीवन आईच्या वाट्याला आलेले होते. आईला या हतबल अवस्थेतून दिलासा देतील, तिला हालचाल करायला आणि तिच्या स्वावलंबी जगण्याला उपयुक्त ठरतील अशा काही वस्तू सोमदेव पृथ्वीराज यांनी मग धुंडाळायला सुरवात केली. बाजारात त्या विकत मिळतात काय म्हणून शोधही सुरू केला. पण अपेक्षित वस्तू तर जाऊच द्या, वयोवृद्धांसाठी आवश्यक असेही काही बाजारात मिळाले नाही. त्याक्षणी त्यांच्या डोक्यात ‘ओल्ड इज गोल्ड’ हा विचार... विजेसारखा चमकून... कडाडून गेला.

पृथ्वीराज यांनी देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ओल्ड इज गोल्ड’ हे स्टोअर सुरू केले. स्टोअरमागची प्रेरणा म्हणजे त्यांचा स्वत:च्या आईसंदर्भातील उपरोक्त अनुभव.

image


पृथ्वीराज यांच्या ‘ओल्ड इज गोल्ड’ स्टोअरमध्ये ज्येष्ठ नागरिकांना जे जे म्हणून उपयुक्त ठरू शकते, ते ते सगळे उपलब्ध असते. वृद्धांना चालण्यात मदत करणारे, शौचालयात सहाय्यक ठरतील असे आणि सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील अशा विविध उपकरणांची, साहित्याची एक मालिकाच इथे उपलब्ध आहे. ज्येष्ठांच्या इतर मदतीची उपकरणेही आहेतच, सोयीचे कपडेही आहेत. शिवाय मधुमेह, सांधेदुखी आदी आजारांवर उपयुक्त ठरेल अशी वैयक्तिक मदतही इथे उपलब्ध करून दिली जाते. बाथरूमशी निगडित उत्पादने तसेच ज्येष्ठांना सोयीचे ठरेल असे फर्निचरही येथे मिळते.

‘ओल्ड इज गोल्ड’चे ई-कॉमर्स प्रमुख संजय दत्तात्रेय सांगतात, ‘‘वयोवृद्ध आजी-आजोबांची काळजी वाहण्याची गोष्ट जेव्हा जेव्हा पुढ्यात येते. त्यांच्या सेवा-शुश्रुषेचा विषय असतो, तेव्हा खरं म्हणजे व्यवहार नावापुरता उरतो. मायेचा पाझर असतो. वात्सल्य ओसंडून वाहात असते. बऱ्याच वेळा असे असते, की वयोवृद्ध आई-वडील भारतात असतात आणि त्यांची मुले परदेशी. मुले कामात व्यग्र असतात. सुटीची समस्या असते. आई-बाबांची काळजीही असतेच, मग परदेशातली ही मुले आपल्या वयस्कर आई-बाबांना सोयीचे ठरतील, त्यांचा ताण कमी करतील, अशा वस्तू आमच्याकडून खरेदी करतात. खरं म्हणजे आमच्या ग्राहकांमध्ये अशी मंडळीच जास्तीत जास्त आहे.’’

सध्याच्या परिस्थितीत एका ई-स्टोअर व्यतिरिक्त ‘ओल्ड इज गोल्ड’चे चेन्नईत दोन ऑनलाइन स्टोअर्सही छान चाललेले आहेत. ज्येष्ठांच्या सेवेतील दीर्घ अनुभव आणि दररोज डोळ्यासमोर येणारी नवनवीन उदाहरणे या सगळ्यांतून...

image


ज्येष्ठांचे उर्वरित आयुष्य मजेत कसे जाईल, ज्येष्ठांच्या आयुष्याची सायंकाळ अधिकाधिक समृद्ध कशी होईल, याच विचारात आणि प्रयत्नांत पृथ्वीराज नेहमी असतात.

पृथ्वीराज यांच्या सौ. केपी जयश्री यांनीही स्वत:ला पतीच्या या कामात स्वत:ला वाहून घेतलेले आहे. पृथ्वीराज यांनी संगणक आणि पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर काही दिवस विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरी केली. वृद्ध आईच्या आजारपणातून ज्येष्ठांच्या सेवेचा संकल्प असाच अचानक सुटला आणि पुढे केव्हा त्यालाच व्यवसायाचे रूप आले, हे खरं तर स्वत: पृथ्वीराज यांनाही कळले नाही. म्हणजे हे सगळे त्या ओघात झाले. पृथ्वीराज यांचा तसा कुठलाही प्लॅन वगैरे नव्हता. आता विविध देशांतून त्यांना ऑर्डर्स मिळतात. या अर्थाने ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे विक्रेते आहेतच, पण या सगळ्या यशाच्या मुळाशी आपला सेवाभावच आहे, असे त्यांना मनोमन वाटते आणि म्हणूनच ज्येष्ठांबद्दलच्या आत्मीयतेचा धागा त्यांनी कधीही सुटू दिलेला नाही.

पृथ्वीराज भारत सांगतात, ‘‘ऑनलाइन वगैरे ठिक आहे, पण आमचे किरकोळ विक्रीचेही दुकान आहे, पण खरं सांगतो आजवर एकही चोरी आमच्या दुकानातून झालेली नाही. अगदी किरकोळ चोरीसुद्धा नाही. वस्तू बरेचदा अशा मोकळ्या पडलेल्या असतात. आम्ही इकडे-तिकडे झालेले असतो, पण कुणीही कधीही कशालाही हात लावलेला नाही. चुकून, जाणून-बुजून कुणीही आमच्या स्टोअरमधून कधी काही घेऊन गेलेले नाही. एवढ्या वर्षांत कुणी आम्हाला बिल म्हणून चेक दिला आणि तो वटला नाही, असेही कधी घडले नाही. भारतात प्रत्येक व्यावसायिकाला एकतरी असा अनुभव येतो. सुदैवाने म्हणा, किंवा आमच्या व्यवसायाच्या मुळाशी असलेली सेवावृत्ती म्हणा, आमच्या वाट्याला असा एकही अनुभव आजवरच्या प्रवासात आलेला नाही.’’

image


पृथ्वीराज यांनी सुरवात एका ऑफलाइन स्टोअरनेच केली होती. लवकरच पुढे त्यांना ऑनलाइन स्टोअर सुरू करावे लागले. चेन्नईतील अडयार आणि अन्नानगर परिसरातील दोन्ही दुकाने सुरू झाली आणि दुसऱ्याच दिवशी ऑनलाइन विक्रीही सुरू झाली. जुने कौटुंबिक स्नेही संजय दत्तात्रेय यांनी ई-कॉमर्सची धुरा सांभाळली. खरं म्हणजे दत्तात्रेय यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ऑनलाइन विक्री सुरू केलेली होती.

ऑनलाइन विक्रीही हळूहळू वाढली. पृथ्वीराज यांच्याकडल्या वस्तूच अशा आहेत, की विकत घेण्यापूर्वी कुणालाही आधी बघाव्याशा वाटतील. उदाहरणार्थ चाके असलेली खुर्ची असेल तर खुर्चीत बसून ती चालवून बघावीशी वाटेल. आणि म्हणून ऑनलाइन खरेदीपेक्षा कुणालाही प्रत्यक्ष खरेदीच अधिक प्रशस्त वाटेल. दररोज २० ते ३० ग्राहक दुकानावर प्रत्यक्ष येतात. इतक्याच ऑर्डर दूरध्वनीवरून येतात आणि ऑनलाइन ऑर्डर दिवसाला १० ते १५ असतातच.

तीन वर्षांच्या लहानशा काळात ‘ओल्ड इज गोल्ड’ने आपल्या विविध उत्पादनांच्या माध्यमातून तब्बल १५ ते २० हजार ग्राहकांचे मनस्वी समाधान केलेले आहे.

दत्तात्रेय म्हणतात, ‘‘आमचा रोल महत्त्वाचा आहेच. आम्ही लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देतोच, त्यासह वयोवृद्धांना सुरक्षित आणि आरामशिर कसे वाटेल, तेही बघतो. आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांची उत्तम प्रकारे काळजी घेण्यास मुलांना प्रवृत्त करतो. कारण यातले बरेच वृद्ध हे शस्त्रक्रियेनंतरच्या परिस्थितीचा सामना करत असतात. त्यासाठी वापरावयाच्या वस्तू आम्ही पुरवतो.’’

स्टोअरमध्ये पाऊल ठेवणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही खरेदी करतेच, असेही नाही. बरेच लोक उत्सुकता म्हणून बघायला येतात. पण लोक येतात, हेच आपल्या उत्पादनाबद्दल लोकांमध्ये वाढत असलेल्या जागरूकतेचे लक्षण म्हणून पृथ्वीराज यांच्यासह दुकानाशी निगडित सगळ्यांनाच मनस्वी आनंद होतो. येणाऱ्यांचा कंटाळा ही मंडळी म्हणूनच कधी करत नाही. दुकानात येणारा वस्तू खरेदी करो अथवा न करो, पृथ्वीराज यांचे स्टोअर आपले माहिती देण्याचे आणि वस्तूंबद्दल समजवण्याचे काम चोखपणे पार पाडते.

image


उत्तराखंड, उत्तर-पूर्व भारत, गुजरातसह देशाच्या अनेक भागांतून ‘ओल्ड इज गोल्ड’ची उत्पादने मागवली जातात. अंदमान-निकोबारमध्येही यांचे ग्राहक आहेत. परदेशात राहणारी मुले ऑनलाइन बिल भरून देतात आणि मग पृथ्वीराज यांच्याकडून इथं भारतात राहाणाऱ्या त्यांच्या (मुलांच्या) आई-वडिलांना वस्तू पोहोचत्या केल्या जातात.

दत्तात्रेय म्हणतात, ‘‘म्हातारपणात ठरलेला त्रास काही चुकत नाही. म्हातारपण हे खरंतर आव्हान आहे. यशस्वीरित्या त्याचा सामना करून ते पार पाडणे, हेच आपल्या हाती असते. वृद्धांसाठी डायपरचा विषय काढण्याचीही अनेकांना शरम वाटते. आता यात काय लाजायचे? वृद्धांना डायपर वापरासाठी तयार करणे, हे आमच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरलेले आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहिलेलो आहोत.’’

वयोवृद्धांचा स्वत:बद्दलचा दृष्टिकोन हा आणखी एक त्रास आहे. असे म्हणतात, की बालपणी आई प्रिय वाटते. तरुणपणी बायको आणि म्हातारपणी पैसा. ‘चामडी गेली तरी चालेल, पण दमडी जाता कामा नये’, अशी मानसिकता बहुतांश वृद्धांची असते. विशेष म्हणजे स्वत:वर पैसा खर्च करायलाही ते तयार नसतात. मुले जरी त्यांच्यासाठी काही विकत घेऊन देत असतील, तरी मुलांना अशा खरेदीपासून ते रोखतात. वृद्धांसाठी त्यांच्या सोयीची उत्पादने बनवणारी कुठलीही कंपनी नाही. म्हणून ‘ओल्ड इज गोल्ड’ला जवळपास सगळाच माल चीनहून मागवावा लागतो.

दत्तात्रेय म्हणतात, ‘‘वयोवृद्धांना उपयुक्त ठरू शकतील, अशा उत्पादनांच्या शोधात आम्ही नेहमी असतो. खुप काही यातून शिकायलाही मिळालेले आहे.’’

‘ओल्ड इज गोल्ड’ने अशातच वयोवृद्धांसाठी उपयुक्त ठरतील अशा कपड्यांच्या निर्मितीत पाउल टाकलेले आहे. वयोवृद्ध तसेच अपंगांसाठी खास असे कपडे कंपनी तयार करणार आहे. वयोवृद्धांची भारतात वाढत असलेली संख्या पाहाता येणाऱ्या दिवसांमध्ये एक भलीमोठी बाजारपेठ ‘ओल्ड इज गोल्ड’ची वाट बघतेच आहे.

दत्तात्रेय सांगतात, ‘‘आमचे बहुतांश ग्राहक हे सेवानिवृत्त असतात. निवृत्तीवेतनावर त्यांची गुजराण चालते. आणि म्हणून वस्तूंची किंमत वाजवी ठेवणे आम्हाला क्रमप्राप्त ठरते. किंबहुना प्रत्येक वस्तूचा दर स्वस्तात स्वस्त किती ठेवता येऊ शकतो, त्याचे आम्ही अक्षरश: टोक गाठलेले असते. फार किरकोळ नफ्यावर आम्ही व्यवसाय करतो. घाऊक विक्री हा आमचा विषय नाहीच.’’ पृथ्वीराज, केपी जयश्री आणि दत्तात्रेय या तिघांचेच भांडवल या व्यवसायात गुंतलेले आहे. बाहेरून एक पैसाही या व्यवसायात लागलेला नाही.