‘पॅटपॅई’ची हिरवीगार गोष्ट… ऋषभ अन्‌ रोपटे!

‘पॅटपॅई’ची हिरवीगार गोष्ट… ऋषभ अन्‌ रोपटे!

Tuesday November 10, 2015,

9 min Read

वसुंधरेला केवळ तीच वाचवू शकेल, अशा एका छोट्याशा गोष्टीवर बेतलेली ही गोष्ट आहे. रोपट्याची गोष्ट! रोपट्यात एक जीवनतत्व असते, पण त्याकडे एक वस्तू म्हणूनच बघितले जाते. एक रोप म्हणजे शुद्ध हवेसाठी एक सुंदर भविष्य आहे, ही बाब किती लोक लक्षात घेतात? अरे एक रोप म्हणजे एक अवघी संकल्पना आहे. तुम्ही जेव्हा कुणाला भेट म्हणून रोपटे देता, तेव्हा एक संकल्पनाच तुम्ही त्याच्या हाती दिलेली असते. जेव्हा तुम्ही एखादे रोपटे रुजवता, तेव्हा एका संकल्पनेचीच रुजवण तुम्ही केलेली असते. एक रोप तुम्ही जेव्हा जगवता, तेव्हा एक संकल्पनाच तुम्ही जगवलेली असते अन्‌ जागवलेलीही असते. मुंबई‘बेस्ड’ ‘पॅटपॅई’ रोपटे आणि त्याचे महत्त्व विषद करण्याच्या संकल्पनेचा पुरेपूर वापर करते. ‘प्लँट अ ट्री, प्लँट ॲन आयडिया’ हे या संस्थेचे नाव आणि ‘पॅटपॅई’ हे या नावाचे संक्षिप्त रूप!

‘पॅटपॅईडॉटकॉम’चे संस्थापक ऋषभ जैन सांगतात, ‘‘पॅटपॅईनेच मला शोधून काढले. मी पॅटपॅईला नव्हे!’’ फेब्रुवारी २०१३ मध्ये ते मुंबईला परतले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या एका कार्यक्रमात आपल्या छोटेखानी प्रशिक्षण कार्यक्रमाचा एका भाग म्हणून त्यांने रोपे वितरित करायची होती. एका वृद्ध दांपत्याला त्यांनी एक रोप भेट म्हणून दिले आणि सांगितले, की परदेशी राहणाऱ्या तुमच्या मुलाचे नाव या रोपाला द्या आणि रोज सकाळी या रोपासमवेत आई-वडील मिळून थोडा वेळ घालवा.

image


सप्टेंबर २०१३ मध्ये ध्यानधारणेत व्यग्र असताना ऋषभ यांच्या डोक्यात एक चित्र तरळले, ते आपल्या एका मित्राला रोप देताहेत आणि मग तो मित्र त्याच्या आणखी तीन मित्रांना तीन रोपे भेट म्हणून देतो आहे. त्याचे ते तिन्ही मित्रही असेच करताहेत. एक साखळी तयार झालेली आहे. सगळे तिचे अनुकरण, अनुसरण करताहेत. मग त्यांच्या डोक्यात त्या वृद्ध दांपत्याची प्रतिमा तरळली. त्यांना दिलेले रोप आता फळे देणारे डेरेदार झाड बनलेले होते. ध्यानभंगानंतर विसरायला नको म्हणून त्यांनी आपल्याच आवाजात हे सगळे रेकॉर्ड करून ठेवले.

‘‘जेव्हाही येतो कोट्यवधी संकल्पना घेऊन येतो, पण एक काळ लोटला, की सगळी वाऱ्यावरची वरात असते’’, अशी माझ्या मित्रांमध्ये माझी ओळख होती. ही देखील खरोखर एक संकल्पनाच होती… आणि मला ती आता सदैव स्मरणात ठेवायची होती. जे सुचले ते याच कारणाने रेकॉर्ड करून ठेवलेले होते.’’ ऋषभ हसत-हसतच सांगतात.

त्या खास दिवशी पुढे ते एका मित्राला भेटले आणि आपल्या डोक्यातल्या कल्पनेबाबत विषय काढला. मित्राने ही कल्पना डोक्यावर घेतली. लवकरच ऋषभ यांनी वेगवेगळ्या औचित्यांच्या पार्श्वभूमीवर आणि वेगवेगळी निमित्ते साधत मित्रांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना आणि परिचितांना सप्रेम भेट म्हणून रोपटी द्यायला सुरवात केली. नंतर लक्षात आले, की ज्यांना आपण रोपे देतोय, ते रोपांकडे फारसे लक्ष देत नाहीत. जणू त्यांच्याकडे आधीच रोपवाटिका आहे, आणि ते रोप त्या रोपवाटिकेतलेच एक. ऋषभ आणि त्यांच्या मित्राने (जो आता या उपक्रमाचा सहसंस्थापक आहे.) मग शक्कल लढवली, की रोप तर द्यायचेच, पण ज्याला द्यायचेय त्याला रोपाचे मूल्य कळलेच पाहिजे. आपण रोप दिले आणि त्याने दिले ते कुठेतरी कोपऱ्यात लावून वा टाकून, असे व्हायला नको.

ऋषभ सांगतात, ‘‘मला कल्पना आहे. सहसंस्थापक प्रतीक जैन एक पट्टीचे समीक्षक आहेत. यातूनच त्यांच्या आणि माझ्या विचारांची टक्कर होते, पण त्यातूनच सर्वोत्तम विचार जन्माला येतो.’’

रोपटीही एक ‘सजीव’ असली तरी शांतचित्त असतात. काही बोलत नाही. का कू करत नाहीत. माणसांसारखी आणि जनावरांसारखी नसतात ती. तक्रार करायला काही मागायला या बिचाऱ्यांकडे आवाजच नाही. मग आपण या रोपांना एक चेहरा द्यायचा का? एक नाव द्यायचे का? ऋषभ आणि प्रतीकने मिळून मग मार्ग काढला. कुंडी रंगवल्या. लोकांचे रोपट्याशी थेट नाते जोडायचे असे ठरवले. रोपट्याला मानवी चेहरा नाही, पण भाव तर आपण देऊच शकतो, ही ती कल्पना होती.

‘‘एका घराची कल्पना करा. काळ्या-सफेद कुंड्यांमध्ये इथे २० रोपटी आहेत समजा. आणि तिथेच एका कुंडीत एकच रोपटे आहे. कुंडीवर ‘हास्य’ चितारलेले आहे. हसणारी कुंडी तुमचे लक्ष लगेच वेधून घेईल ना. म्हणून मग रोपट्यांकडे लक्ष वेधले जावे म्हणून आम्ही वेगवेगळ्या डिझाइन त्यावर रंगवलेल्या आहेत.’’

image


टीम अशी काम करते…

संस्थापक तसेच रोप-विशेषज्ञ ऋषभ तसेच नवकल्पनांचे भांडार असलेले सहसंस्थापक प्रतीक, ऋषभच्या मातोश्री आरती जैन आवक-जावक, जमा-खर्च सांभाळतात. दिलीप जैन सल्लागार आहेत, अशी ही सुरवातीची टीम. वस्तू जागच्याजागी असायला हव्यात, हे खरंतर एक आव्हानच असतं, पण आरतीजी यात वाकबगार आहेत. ऋषभ यांनी आपल्या संकल्पनेचे रूपांतर जेव्हा कंपनीत करायचे ठरवले, तेव्हाच त्यांनी ‘स्टॉक किपिंग’ आणि ‘अकाउंटिंग’साठी आईच असे गृहित धरलेले होते.

ऋषभ सांगतात, ‘‘सृजनक्षम लोक अकाउंटमध्ये नेहमीच ‘ढ’ असतात. कुठल्याही कंपनीसाठी अकाउंट महत्त्वाचेच असते. रेंगाळणारे कुठलेही काम आई बरोबर वेळेवर करते.’’ चार लोक समोर दिसत असले तरी पडद्यामागे आणखी पंधरा लोक आहेत. विविध जबाबदाऱ्या ही मंडळी पार पाडत असते.

ऋषभ सांगतात, ‘‘माझ्या या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी म्हणून अडथळे उभे केले, त्या सर्वांचे देव भले करो. आणि ज्यांनी माझ्या कल्पना ऐकून घेतल्या. मला पाठबळ दिले. माझ्या गैरहजेरीतही माझा हा उपक्रम आपला म्हणून सांभाळला, अशा सगळ्याच जणांच्या ऋणात मला कायम राहायचे आहे. करिश्मा रजनी, प्रक्षल परमार, निकिता देसाई, गुंजन उतरेजा, अनिशा खट्टर, निशा लुल्ला, सरोज झवेरी, हितेश अमरसेदा, प्रियंका धामालिया, भूमी शाह, नेहाल, श्रेय आणि निकुन या टिममधील सगळ्या सहकाऱ्यांचे योगदानही मोठे आहे.’’

रोपट्यांच्या संवर्धनाबाबत जागतिक स्तरावर जागरूकता आणण्याचे ‘पॅटपॅई’चे उद्दिष्ट आहे. हेच मिशनही आहे. रोपट्यांची काळजी प्रत्येकानेच वाहायला हवी. रोपे हवा शुद्ध करतात. आम्ही या हवेत श्वास घेतो. आमचे आरोग्य त्यावर अवलंबून आहे. रोपे आम्हाला खाऊ देतात. फळे देतात. आमचे जगणे सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे. मुलांचे, प्राण्यांचे लाड आपण घेतो… का? तर ते खुदकन हसतात म्हणून… शेपुट हलवतात म्हणून… रोपांकडे एवढ्यासाठी आपण दुर्लक्ष करतो, की हे सगळं ते करत नाहीत. अर्थात प्रेम ही तर निरपेक्ष भावना आहे. कुठल्याही अपेक्षेशिवाय केले जाते ते खरे प्रेम, बाकी तर सगळाच मतलबीपणा. पण बघा रोपे तर आम्हाला खुप काही देतात. बदल्यात काहीही मागत नाहीत बिचारी. रोपे आमच्यावर निरपेक्ष प्रेम करतात. खरे प्रेम करतात. आम्हीच नतद्रष्ट. आम्हाला इतकं काही देणाऱ्या रोपांवरही प्रेम करू शकत नाही. रोपं दिखाऊ प्रेम करत नाहीत ना म्हणून आम्ही असे वागतो. रोप आपल्यावर किती प्रेम करते, फक्त दाखवू शकत नाही, हा त्याचा दोष काय? नव्हे तो तर रोपाचा सद्गुण आहे. रोपाची काळजी वाहणे, त्याला वाढवणे हे खरंतर एक आध्यात्मिक कार्य आहे.

ऋषभ सांगतात, ‘‘एक रोपटे फुटबॉलएवढी जागा व्यापते. ब्रश करण्यात, व्हॉटस्अपवर आम्ही कितीतरी वेळ वाया घालवतो, पण रोपाला पाणी द्यायला मोजून ३० सेकंद वेळ काढू शकत नाही. जागा आणि वेळ हा मुळात प्रश्नच नाही. मनात जागा असेल तर घरात जागा होते. आवड असेल तर सवड निघते. माझे हे म्हणणे बिलकूल नाही, की एक रोप मुंबईचे सगळे प्रदूषण संपुष्टात आणेल. पण प्रत्येक मुंबईकर जर एक रोप लावेल आणि त्याची काळजी वाहील तर विचार करा… २५ दशलक्ष रोपे होतील. मुंबईला ती शुद्ध हवा देतील. मुंबई वाचवतील. असा विचार का करत नाही तुम्ही?’’

आमचा हेतू जितके शक्य होईल तितका लोकांपर्यंत पोहोचण्याचा आहे. ‘पॅटपॅई’चा पसारा वाढवायचा आहे. आम्हाला पुरेशी साधने हवीत फक्त. आम्ही रोपांच्या किमती परवडतील, अशा ठेवलेल्या आहेत. आम्हाला उच्चभ्रू वर्गापासून ते तळगाळापर्यंत जाऊन भिडायचे आहे. आमच्या रोपांची किंमत १५० ते ३५० रुपयांपर्यंत आहे. साहेब असोत वा कामगार असोत प्रत्येकाच्या घरातल्या हवेशीर जागेत एका सुबक अशा कुंडीत रोपटे असायला हवे. दीडशे रुपयात रोप, रंगवलेली कुंडी आणि पॅकिंग असे सगळे. विचार करा आम्ही कसे भागवत असू. आम्हाला काय उरत असेल. प्रचंड प्रमाणात रोपे विकली गेली तरच आम्हाला हे परवडू शकते आणि तोच आमचा हेतूही आहे.

image


‘पॅटपॅई’ बिझनेस मॉडेल

बी टू बी- कॉर्पोरेट्स आपल्या यंत्रणेत रोपांना समाविष्ट करू शकते कारण त्यांचा व्याप, संलग्न लोकांची संख्या, आर्थिक सामर्थ्य हे सगळेच विशाल असे आहे. किंबहुना कॉर्पोरेट्सनी आपल्या ‘सीएसआर’ कार्यमोहिमेचा एक टक्टा जरी रोपण अभियानावर खर्च केला तरी एक महान कार्य घडू शकते. आपल्या पोलादी, काचेच्या इमारत रोपांनी सजवाव्या, की कर्मचाऱ्यांना भेट म्हणून रोपे द्यावीत, हे कॉर्पोरेट्सनी ठरवायचे आहे.

बी टू एस- ‘पॅटपॅई’ समाजापर्यंत पोहोचते आहे. अपार्टमेंटस् आणि सामाजिक संस्थान आपल्या स्वरूपात हिरवाईचा प्रयोग करतील तर हा ‘बी टू सी’ आणि ‘बी टू बीरू’वर एक चांगला परिणाम ठरेल.

बी टू सी – कुणी कुठेही अगदी एखाद्याच्या घरी किंवा कार्यालयात आपल्याकडे बघून हसत असलेल्या ‘पॅटपॅई’च्या रोपाकडे पाहतो आणि अरे कुठून आणले हे म्हणतो आणि मलाही ते हवे आहे म्हणून ऑर्डर नोंदवतो.

‘पॅटपॅई’ने ज्या आव्हानांचा मुकाबला केला, त्या प्रमुख घडामोडींबद्दलही ऋषभ माहिती देतात. ‘पॅटपॅई’चा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा म्हणून ई-कॉमर्सचे माध्यमही ते वापरत आहेत, पण विक्री केंद्र मुंबईपुरतेच मर्यादित आहे. आता कुठे आमची सुरवात आहे. माल म्हणून रोपांचे असलेले नाशवंत स्वरूप तसेच सरकारच्या काही धोरणांमुळे कुरियर कंपन्या रोपांना हातही लावत नाहीत. वितरणप्रणाली सहजसुलभ व्हावी म्हणून आमचे प्रयत्न चाललेले आहेत, पण त्याला वेळ लागेल. सध्या आम्ही ई-कॉमर्सच्या माध्यमातूनच व्यवसाय वाढवत आहोत.

कलेतून रोपांना चेहरा...

राजुल मेहता ‘पॅटपॅई’च्या मुख्य आर्टिस्ट आहेत आणि आर्ट डिपार्टमेंटच्या प्रमुखही त्याच आहेत. कितीतरी कुंड्या त्यांच्या हातच्या रंगवलेल्या आहेत. बिल्लाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्या शिक्षिकाही आहेत. वेळेची मोठी अडचण त्यांच्यासमोर असते, पण याउपरही त्यांनी १००० कुंड्या रंगवलेल्या आहेत.

ऋषभ सांगतात, ‘‘कलाकारांसाठी आमची दारे खुली आहेत. पूजा गुलछा शाहजामन आणि ॲलेथिया फर्नाडिस या दोन गुणी कलावंतही आता आमच्यासोबत आहेत. दोन्ही कॉर्पोरेटमध्ये कामाला आहेत. त्यांच्यासमोरही वेळेची अडचण आहेत. पण मी म्हणतो, तसे आवड असल्याने त्या सवड काढतातच. ग्राहकांच्या आवडी-निवडी या कलावंतांना चांगल्या कळतात. आजपर्यंत एक ग्राहक असा मला भेटला नाही, ज्याने कुंडीवरल्या पेंटिंगला सुमार म्हटले असेल. प्रत्येक पेंटिंगवर ग्राहकांनी आपली स्तुतिसुमने उधळलेली आहेत. आमच्या प्रदर्शनातून लोकांचा प्रतिसाद जर तुम्ही पाहिला तर थक्कच व्हाल. आमचे रोप लोकांशी जणू बोलायला करते. बोलते म्हणा हवं तर. लोक एखाद्या रोपाकडे टक लावून बघतात, तेव्हा ते रोपही जणू लोकांकडे टक लावून बघत असते. एखादे रोप विशिष्ट पेहराव केलेले आहे, हे बघूनही लोक चाट पडतात. ऑर्डरनुसारही आम्ही माल देतो. मला चांगले आठवते, की एका मुलीने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाबद्दल मला नवऱ्याला देण्यासाठी म्हणून रोप ऑर्डर केले होते. रोपाचा तोरा आणि कुंडीवरल्या पेंटिगच्या माध्यमातून लाजण्या-हसण्याचा नजारा असा काही सुरेख जमला होता, की मुलगी जाम खुश होती. आणि नंतर कळले, की तिचा नवरा ही भेट बघून आनंदाने वेडा झाला होता!

भावनांनी भारलेली ‘पॅटपॅई’

पॅटपॅई टिम अस्तित्वात आली, तेव्हा या सगळ्याच जणांना शाळेत शिकायला मिळाली तेवढीच रोपे माहिती होती. आता त्यांच्याकडे याबाबतच्या ज्ञानाचे आणि माहितीचे भांडार आहे. इनडोअर, आउटडोर, फ्लॉवरिंग, नॉनफ्लॉवरिंग त्यातल्या उपश्रेणी उदाहरणार्थ उपयोगात पडणाऱ्या आणि केवळ प्रदर्शनाच्या, असे सगळे या टिमला तोंडपाठ आहे. हाताळायला आणि वाढवायला सोपे असलेल्या रोपाला पॅटपॅईचे प्राधान्य असते. एखाद्याने पहिल्यांदा रोप विकत घेतले आणि लावले. ते मरून गेले तर मग पुन्हा त्याची रोप विकत घेण्याची इच्छा होत नाही. असे व्हायला नको म्हणून जगण्यात चिवट असलेल्या प्रकारातील रोपे पॅटपॅईकडून पुरवली जातात. पॅटपॅईतील रोपांना सामान्य सूर्यप्रकाश आणि माफक पाणी जगायला, बहरायला पुरेसे असते. सौंदर्य हा या रोपांचा दुसरा एक गुण असतो. जागेची शोभा ते वाढवतातच.

पहिल्या रोपाच्या खरेदीनंतर त्याची निगा राखण्याची आवड लागली, की आणखी रोपे घेण्याची वृत्ती ग्राहकामध्ये वाढीस लागावी, असा ‘पॅटपॅई’चा रोख असतो. विविध उपयोगी गुण असलेल्या रोपांबद्दलही पॅटपॅईकडे विचारणा अलीकडे वाढलेली आहे. औषधी वनस्पतींची मागणी लोक नोंदवू लागलेले आहेत. मच्छर, चिलटं पळवणारी झुडपे, सुगंधी रोपे, हवा शुद्ध करणारी विशिष्ट रोपेही लोकांना हवी आहेत.

image


आणि शेवटी सगळ्यांनाच उद्देशून ऋषभ यांचे हे सांगणे आहे…

‘‘समजा झाडांमध्ये वायफायला सिग्नल देण्याची क्षमता असती, तर मग आम्ही इतकी झाडे लावली असती, की पृथ्वीचे कल्याणच झाले असते. पण ती बिचारी तर प्राणवायू उत्सर्जित करतात. ऑक्सिजन देतात. जो श्वास आम्ही घेतो, तो झाडांकडून आम्हाला मिळतो. तुम्ही जर आता हा लेख वाचत असाल तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. एक रोप दत्तक घ्या. त्याला चेहरा द्या. नाव द्या. कमीत कमी ४० दिवस त्याची काळजी घ्या. पाणी घाला. जगवण्याच्या-जागवण्याच्या आनंदाचे वाटेकरी व्हा. बघा समष्टीचे कल्याण यातच सामावलेले आहे.’’