मोठ्या शहरात अनोळखी वाटतंय? मग जाणून घ्या तुमचा परिसर बंगळुरुस्थित ओम्नीच्या माध्यमातून...

मोठ्या शहरात अनोळखी वाटतंय?  मग जाणून घ्या तुमचा परिसर बंगळुरुस्थित ओम्नीच्या माध्यमातून...

Saturday November 28, 2015,

5 min Read

लोक आपापल्या आयुष्यात प्रचंड व्यस्त झाल्याने, आज नेबरहुड सोशलायजेशन अर्थात आसपासच्या परिसरातील लोकांमधील संवाद आणि संपर्क ही केवळ एक भाषिक परिभाषा म्हणूनच उरली आहे. कटकसारख्या शहरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या जॅक्सन फर्नांडीस यांच्यासाठी अशा प्रकारचा अनोळखीपणा, हा नविनच अनुभव होता. कारण लहानपणापासूनच त्यांनी छोट्या शहरातील समाज संस्कृतीचा आनंद घेतला होते, जेथे लोकांचा एकमेकांशी संवाद असतो.

हा संवाद केवळ सामाजिकच नसतो तर या माध्यमातून माहितीचा एक खजिनाच तुम्हाला मिळू शकतो, जसे की परिसरात होणाऱ्या एखाद्या रंजक कार्यक्रमाची माहिती किंवा जवळच्या डॉक्टर किंवा वकीलाचे नाव किंवा खात्रीलायक प्लंबर, रंगारी किंवा घरकामगाराची माहिती किंवा एखाद्या घडलेल्या गुन्ह्याविषयीची माहिती, या संवादातून तुम्हाला सहजगत्या मिळून जाते.

image


एनआयटी त्रिची येथून अभियांत्रिकीची पदवी आणि एक्सएलआरआय, जमशेदपूरमधून व्यवस्थापनाची पदवी घेतल्यानंतर जॅक्सन बंगळुरुला आले. त्यावेळी येथे खूप मोठा शेजार असूनही त्यांच्यामधील संवाद कुठेतरी खुंटल्याचे त्यांना दिसून आले. महानगरांमध्ये लोक हे जागतिक स्तरावर जास्त संपर्क साधून असतात मात्र स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यात संवाद नसतो.

मात्र जेंव्हा त्यांच्या हे लक्षात आले की, स्थानिक पातळीवरील ही माहिती आणि बातम्या यांचा प्रभावी वापर केल्यास, दररोज कितीतरी घटना हाताळण्यासाठी ते एक ताकदवान आणि उपयुक्त साधन बनू शकते, तेंव्हा त्यांनी याबाबत काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. हा खंडीत झालेला सामाजिक संवाद पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी ओम्नीची स्थापना केली.

जॅक्सन सांगतात, “आम्ही शक्य ते उपाय शोधण्यास सुरुवात केली आणि आम्हाला बंगळुरु पोलीसांच्या ‘हॅलो नेबर’ या उपक्रमामधून खूप प्रेरणा मिळाली. त्यामुळे आम्ही अधिक विस्तारीत परिभाषेसह ओम्नीच्या उभारणीला सुरुवात केली. यामध्ये रहिवासी आणि अभ्यागतांबरोबरच सार्वजनिक संस्था, व्यवसाय, इत्यादी गोष्टींचाही समावेश करता येऊ शकणार होता.”

उद्योजक बनण्याची आस

अमेरिकेमध्ये धोरण सल्लागार म्हणून काम करत असतानाच जॅक्सन यांना उद्योजक बनण्याचा किडा चावला. आपले उद्योजक बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूनचे ते भारतात परतले. त्यांची पहिली स्टार्टअप होती ग्रॅबन, जिचा ताबा नुकताच स्नॅपडीलने घेतला आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगोडॉटकॉम च्या उभारणीसाठी आणि भारतातील ट्रॅव्हल मेटासर्च व्यवसायाच्या विस्तारासाठी मदत करण्याचाही प्रयत्न केला.

जॅक्सन सांगतात, “ हायपर लोकल क्षेत्रामध्ये मला असेलेली आवडच मला ओम्नीच्या दिशेने घेऊन गेली, फक्त अधिक व्यापक ध्येयासह....ग्लोबल मोबाईल इंटरनेट परिषदेत ओम्नीला बेस्ट इनोव्हेशन ऍवॉर्ड मिळाले, आम्हाला फेसबुकच्या होतकरू स्टार्टअप्ससाठीच्या कार्यक्रमातही स्थान मिळाले आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे टेकस्पार्कस् – भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान उद्योजकता शिखर परिषद – येथे आम्ही टेक ३० कंपन्यांमध्ये होतो.”

तुमच्या आसपासच्या परिसरातील लोकांशी संपर्कात रहाः

ओम्नी हे एक शेजार-आधारीत संवादाचे व्यासपीठ असून त्याद्वारे वापरकर्त्यांना परिसरातील सार्वजनिक संस्था आणि व्यवसाय, यासारख्या गोष्टींचा शोध घेण्यात आणि त्यांच्याशी संवाद साधण्यात मदत होते. या व्यासपीठामध्ये प्रसारण, अद्ययावत माहिती, समीक्षा/शिफारसी, चॅट, मेसेज बोर्ड, दक्षता इशारे आणि इतर बऱ्याच साधनांचा समावेश असून, त्यामुळे वापरकर्त्यांना एकसंध संवाद साधणे शक्य होते.

लोक ओम्नीचा वापर स्थानिक बातम्या एकमेकांना देण्यासाठी, गुन्ह्यांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी, एखाद्याचा हरविलेला पाळीव प्राणी शोधण्याच्या कामी मदत करण्यासाठी, स्वंतत्रपणे काम करणाऱ्यांसाठी किंवा जवळच्या परिसरात खरेदी विक्री करण्यासाठी आणि समान नागरी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने एखादा गट तयार करण्यासाठी करु शकतात. त्याचबरोबर प्लंबर, सुतार, घरकाम करणारे, इत्यादी स्थानिक सेवांबाबत शिफारसी मिळविण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो.

“ या व्यासपीठावर तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांचा शोध घेऊ शकता तसेच त्यांचा समावेशही यामध्ये करु शकता, त्यांच्याबरोबर जोडले जाऊ शकता आणि एकसंधपणे महत्वाच्या माहितीची देवाणघेवाण करु शकता. अर्थातच तुम्ही यामाध्यमातून मर्यादीत भौगोलिक परिसराबाबतच्याच अद्ययावत माहितीची देवाण-घेवाण करत असल्याने, यावर उपलब्ध होणारी माहिती ही विशिष्ट स्थळाशीच संबंधित, काही संदर्भ असलेली आणि निगडीतच असते,” जॅक्सन सांगतात.

तसेच परिसरातील इतर महत्वपूर्ण घटक, उदाहरणार्थ व्यवसाय आणि सार्वजनिक संस्था, ओम्नीचा उपयोग एक प्रभावी स्थानिक प्रसारणाचे साधन म्हणून करु शकतात. ते त्यांच्याबद्दलची माहिती त्यांच्या ओम्नी वाहिन्यांच्या माध्यमातून देऊ शकतात आणि परिसरातील सगळ्यांना ती माहिती ओम्नी ऍपच्या द्वारे मिळू शकते. त्यामुळे यामाध्यमातून स्थानिक उद्योगांना नविन सौदे/ऑफर्स, फ्लॅश डिस्काऊंटस्, नविन वस्तुसूची, इत्यादीची माहिती परिसरातील नागरीकांपर्यंत पोहचवता येते, खास करुन जेंव्हा त्यांचे ८० टक्के ग्राहक हे दुकानापासून काही मर्यादीत किलोमीटरच्याच परिसरात रहाणारे असतात.

जर एखादा व्यावसायिक, स्वतंत्रपणे काम करणारी व्यक्ती किंवा तत्सम कोणी ओम्नीचा वापर स्थानिक विपणनासाठी किंवा प्रसारणासाठी करु इच्छित असेल, तर ओम्नी त्यांच्यासाठी त्यांना हवी ती सर्व आवश्यक माहिती देणारे प्रोफाईल (एकप्रकारे संक्षिप्त वर्णन) बनवून देईल.

प्रत्येक गोष्ट ही स्थळ-समन्वयकाशी संबंधित असेल आणि प्रसारणाचे क्षेत्र हे मर्यादीत असेल (जेणेकरुन त्यावरील माहिती ही केवळ परिसरातच पोहचेल). मजकूर, ऑडीयो किंवा व्हिडीयोच्या रुपात वापरकर्ते माहिती प्रसारीत करु शकतात. त्या परिसरातील लोकांना ओम्नी ऍपवर ही माहिती आपोआप मिळू शकते.

“ आपल्या सध्याच्या ग्राहकांनी आपली शिफारस इतरांना करावी यासाठीही आमचे बरेसचे भागीदार विक्रेते ओम्नीचा वापर करत आहेत. सध्या आमचे बहुतेक भागीदार विक्रेते हे इंदिरानगर, कोरामंगला, जेपी नगर, व्हाईटफिल्ड येथे आहेत,”जॅक्सन सविस्तर माहिती देताना सांगतात.

जॅक्सन या गोष्टीकडे खास करुन लक्ष वेधतात की, व्यवसाय, स्वतंत्र काम करणारे, इत्यादींसाठी त्यांचा प्रसारण विभाग हा मोफत आहे. ओम्नीच्या टीमशी त्यांनी संपर्क साधल्यास त्यांना प्रसारण वाहिनी उभारण्यासाठी ही टीम मदत करेल आणि त्यानंतर त्याचा वापर ते प्रभावी स्थानिक विपणन साधन म्हणून करु शकतील.

“ आम्ही आणखी सुधारित क्षमता आणि संवादाच्या पर्यांयाचा समावेश करणार असून कोणत्याही प्रकारच्या स्थानिक संवादाच्या पर्यायाची पद्धत बनणे, हे आमचे लक्ष आहे,” जॅक्सन सांगतात.

आजपर्यंत वापरलेली शक्ती

स्थापनेपासून पहिल्या एक-दोन आठवड्यातच ओम्नीकडे त्यांच्या व्यासपीठावर एक हजारपेक्षा जास्त वापरकर्ते आणि १२०० विक्रेते होते. स्थानिक व्यावसायिक आणि स्वतंत्रपणे काम करणाऱ्या अशा दोघांकडूनही यामध्ये खूपच रस दाखविला गेला. आता या स्टार्टअपकडे दहा जणांची टीम आहे.

पुढे जाऊनः

ठराविक परिसराला जोडलेले चर्चा मंच यापूर्वीच अस्तित्वात आले आहेत, मात्र अजूनही बऱ्याच गोष्टींचा वेगाने समावेश करत असल्या कारणाने आपण इतरांपेक्षा वेगळे ठरत असल्याचा ओम्नीचा दावा आहे.

आसपासच्या परिसरासाठी संवादाचे एक व्यासपीठ असल्याने, वर्तमानपत्रातील मजकूर, समूदाय सूचना फलक, घोषणा फलक, व्हॉटस्ऍप ग्रुप्स, ध्वनीक्षेपक आणि आणखी काही, अशा सध्याच्या संवाद माध्यमांना मागे टाकण्याचा ओम्नीचा प्रयत्न आहे...

“ ओम्नीच्या माध्यमातून देशभरातील अव्वल ९ ते १० शहरांमधील परिसरांना त्यांची भरभराट करण्यासाठी सक्षम करण्याची आमची इच्छा आहे. आमचे प्राथमिक लक्ष आहे ते आमच्या ग्राहकांबरोबर आणि भागीदारांबरोबर काम करत, एक ताकदवान उत्पादनाची निर्मिती करणे, ज्या माध्यमातून परिसरात अतिशय एकसंध संवाद साधणे शक्य होईल आणि अशाप्रकारे एकमेकांशी जोडलेला, सहयोगाने काम करणारा आणि सुरक्षित परिसर उभारण्यात मदत होईल,” जॅक्सन सांगतात.

लेखक - अपराजिता चौधरी

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन