डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून आयुष्याच्या कटु सत्याची ओळख करुन देणारे ‘कॉमन थ्रेड’

डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून आयुष्याच्या कटु सत्याची ओळख करुन देणारे ‘कॉमन थ्रेड’

Monday November 23, 2015,

5 min Read

रितु भारद्वाज ‘कॉमन थ्रेड’ची संस्थापिका आहे. ‘कॉमन थ्रेड’ स्वतंत्र फिल्म निर्मात्यांचा एक समूह आहे. जो पर्यावरण आणि सामाजिक विषयांना केंद्रस्थानी ठेऊन फिल्म बनवितो. रितुचे आजी-आजोबा १९४७ मध्ये झालेल्या फाळणीच्या झळा सोसून पाकिस्तानातून दिल्लीमध्ये आले होते. इथे आल्यानंतर त्यांनी निर्वासितांच्या छावणीलाच आपले घर बनविले होते.

रितुचे आई-बाबा दोघेही बेताच्या परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले. जीवनानुभव घेतलेल्या त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. त्यामुळे रितुला त्यांनी सर्वात चांगल्या शाळेत घातले आणि तिला तिच्या आवडीचे विषय अभ्यासण्याचे स्वातंत्र्यही दिले.

image


रितु सांगते, “मी लहानपणीच पत्रकारितेचे शिक्षण घ्यायचे निश्चित केले होते. कुठलीही गोष्ट माझी ही इच्छा पूर्ण करण्यापासून मला रोखू शकली नाही. जेव्हा मी लहान होती तेव्हा व्हिडिओ मला इतर माध्यमांच्या तुलनेत जास्त प्रेरित आणि प्रभावित करायचा. म्हणून मी फिल्म निर्मितीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्लूमबर्ग टीव्हीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. तिथे मी छोटे व्यवसाय, पर्यावरणीय मुद्दे, कृषि, सामाजिक मुद्दे इत्यादींशी संबंधित शॉर्ट फिल्म बनविण्याचं काम करायचे.” रितुसाठी हे सुरुवातीचे दिवस नवीन अनुभव देणारे होते. ज्याने तिला या क्षेत्रात आणखी काम करण्याची प्रेरणा दिली. “एका मोठ्या टीव्ही चॅनेलबरोबर काम करण्याचा दुसरा पैलू हा आहे की तिथे घटनाक्रम खूप जलदगतीने बदलत असतात आणि बातम्या जलद गतीने लोकांपर्यंत पोहचवाव्या लागतात. त्यामुळे आम्ही ज्या बातम्यांचे चित्रीकरण करत असतो त्यांच्याबद्दल विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी वेळच मिळत नाही.” याच कारणामुळे रितुने २०१० मध्ये ही नोकरी सोडली आणि स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली.

रितु सांगते, “त्यावेळी मी माझे लक्ष्य फिरण्यावर केंद्रित केले. मी दुर्गम गावांमध्ये रहायला जायचे, जिथे वीजही नसायची आणि पाण्याचाही तुटवडा असायचा. अशा परिस्थितीत मी तिथे कमीत कमी सुविधांसह राहण्याचा प्रयत्न करायचे. परिणमतः याचा मी माझ्यावर खूप चांगला प्रभाव पडलेला आणि माझ्यामध्ये खूप चांगला बदल झालेला पाहू शकत होते. कारण आता मी माझ्याकडे असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा आदर करणे शिकले होते. या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना भेटल्यावर मला स्वतःचा खूप अभिमान वाटायचा कारण ज्याला आपण जीवनातील समस्या मानतो ती गोष्ट या लोकांसाठी खूप सामान्य असायची”

image


जेव्हा ती पश्चिम बंगालमधील ग्रामीण भागातील शेतकरी महिलांना भेटली तेव्हा तिला जाणवले की तिने बनविलेले माहितीपट केवळ सूचना देण्याचे माध्यम नसून आणखीही बरंच काही सिद्ध होऊ शकतात. रितु सांगते, “त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातील विनम्रता आणि त्यांची ताकद पाहून मला वाटले की मी जे करत आहे ते आणखी जास्त प्रभावी होऊ शकतं. ते त्यांच्या जीवनाविषयी होतं. मला याच दृष्टीकोनाची आणि दिशेचीच तर आवश्यकता होती.”

२०१० मध्ये रितुने फिल्म निर्मात्यांचा एक समूह बनविण्याविषयी विचार केला आणि आपल्या सात मित्र आणि पूर्वीच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ‘कॉमन थ्रेड्स’ची स्थापना केली. “आमच्यातील कोणी छायांकनातील तज्ज्ञ होता तर कोणी पटकथा लेखनातील, फोटोग्राफी कोणाची विशेषता होती तर कोणाची शुटींग. मात्र आम्ही सर्वजण स्वतंत्र फिल्म निर्मात्याच्या रुपात एक समान संघर्ष आणि असुरक्षिततेच्या भावनेतून जात होतो. म्हणूनच ‘कॉमन थ्रेड्स’ हे नाव स्वीकारले,” असं रितु सांगते. काम सुरु केल्यापासून दुसऱ्याच वर्षात ते आपल्या कारभारात पाचपट वाढ करण्यात यशस्वी झाले आहेत आणि पुढच्या वर्षापर्यंत त्यांना तो दुप्पटीने वाढवायचा आहे. त्याचबरोबर या वर्षी २०१४ ची अखिल भारतीय पर्यावरण पत्रकारिता स्पर्धाही त्यांनी आपल्या नावे केली आहे.

‘कॉमन थ्रेड्स’ने आतापर्यंत भारतात सीमेवर राहणाऱ्या लोकांपर्यंत कायद्याची पोहोच, लहान मुलांच्या पुस्तकांचे लेखक, पंचायतींची दुनिया, जयपूर आणि दिल्लीच्या रहिवाश्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींना प्रभावित करणारे शहरीकरण आणि उत्तराखंडमध्ये बियाणे संरक्षण यासारख्या विविध विषयांना केंद्रस्थानी ठेऊन डॉक्यूमेंट्रीज बनविलेल्या आहेत. याशिवाय बीबीसीसाठी भारतीय भूगोलावर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी लंडनमधील एका प्रोडक्शन हाऊसबरोबर हातमिळवणी केली आहे. त्याचबरोबर लंडनच्या एका मुक्त विश्वविद्यालयासह शिक्षण शास्त्रावर आधारित डॉक्यूमेंट्रीही बनवित आहेत. हे मुक्त विश्वविद्यालय लंडनमधील २०१५ च्या ‘बाँड इनोव्हेशन पुरस्कारा’चे मानकरी ठरले आहे.

रितु सांगते, “माझ्या कामामध्ये सतत होणारे नवनवीन शोध मला पूर्णत्वाची भावना देतात ही मला माझ्या कामासंदर्भात सर्वात जास्त आवडणारी गोष्ट आहे. ही भावना माझ्या लोकांशी भेटीगाठी, त्यांच्यासोबत जोडले जाण्यापासून सुरु होते आणि जेव्हा गावांमध्ये माझे स्वागत केले जाते किंवा मी त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दल पूर्णपणे जाणू लागते तेव्हा ही भावना कायम राहते. ही एक निरंतर शिकण्याची प्रक्रिया आहे, जी त्यांच्याबरोबरीने घेतलेल्या प्रत्येक अनुभवाबरोबर सतत पुढे जात राहते आणि मग डॉक्युमेंट्री भले कुठल्याही विषयावर तयार होत असो, सर्वच खूप भावनात्मक असते. अनेकदा तर मी चित्रीकरणादरम्यान समोर आलेले वास्तव पाहून किंवा ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेमामुळे भावनात्मक रुपाने स्वतःला खूप कमजोर झालेले पहाते. ही प्रक्रिया थांबत नाही आणि मला निरंतर पुढे जाण्यासाठी प्रेरित करते.”

image


ती पुढे सांगते, “मला वाटते डॉक्युमेंट्री माझ्यासाठी शोधापेक्षाही काहीतरी अधिक आहे. सुरुवातीला मला डॉक्युमेंट्रीवर काम करायचे नव्हते. मी केवळ फिल्म्सवर आपले लक्ष्य केंद्रित करु इच्छित होते. मात्र ब्लूमबर्गबरोबरचा अनुभव घेतल्यानंतर वाटले की मी डॉक्युमेंट्रीच्या क्षेत्रात बरेच काही करु शकते. मला जाणवले की ज्याविषयी बोलता येईल असे अनेक महत्त्वपूर्ण विषय आहेत आणि असे प्रश्न जे मला आणि मला भेटणाऱ्या लोकांनाही पडतात त्यांची उत्तरं शोधण्यासाठी डॉक्युमेंट्री एक सशक्त माध्यम आहे.”

रितु कुठलेही रहस्य उघड करण्यासाठी माहितीपट बनवित नाही तर ती या माध्यमातून लोकांना मुळातच माहिती असलेल्या कथा विविध पद्धतीने मांडते. रितु सांगते, “पर्यावरणाविषयी सक्रियपणे काम करण्याची गरज समजणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि अनेक लोक याविषयी काहीतरी सकारात्मक करण्याच्या उद्देशाने पुढे येत आहेत. मात्र, मला वाटतं की या व्यतिरिक्त जलवायु परिवर्तनासारख्या इतर महत्त्वपूर्ण विषयांबाबतही जनजागृती व्हायला पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन एक व्यापक संदेश प्रसारित करण्याची गरज आहे. जेणेकरुन लोकांमध्ये या विषयांबाबतच्या न चर्चिल्या गलेल्या बाजूंविषयी जागृती निर्माण होईल. ”

आपला मुद्दा अधिक स्पष्टपणे मांडत रितु सांगते, “वैयक्तिकरित्या मला असे वाटते की पर्यावरणाचे समर्थन करणारे विकासविरोधी आहेत असा ‘प्रचार’ केला गेला आहे. मात्र या वादात आपण विकासाची खरी व्याख्या आणि संकल्पनेलाच मागे टाकत चाललो आहोत.”

ती पुढे सांगते, “आपण या मानसिकतेला बदलून एक नवी मानसिकता निर्माण करु शकतो, जर आपण सकारात्मक बातम्या दाखविल्या, आशेची भावना रुजविली, तरुणांना स्वतःबरोबर जोडले आणि लोकांपर्यंत जाऊन त्यांना समजावले की असं करणं बऱ्याच प्रमाणात शक्य आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते. नुकतंच उत्तर भारतातील राज्यांमध्ये आलेल्या भयानक वादळाने अनेक पिके नष्ट केली होती. उत्तराखंडही या राज्यांपैकी एक होते. मात्र अन्य राज्यांतील शेतकऱ्यांच्या तुलनेत तेथील अनेक शेतकऱ्यांना कमी नुकसान सहन करावे लागले. याचे एक प्रमुख कारण हे होते की इथल्या शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बियाणे संरक्षण करुन मातीच्या संरक्षणाच्या तंत्राचा वापर केला. हे प्रत्यक्षात झाले. मात्र वादळाशी संबंधित ९९ टक्के बातम्या त्याच्या विनाशकारी प्रभावासंबंधितच होत्या.”

किती वेळा असे होते की आपण आव्हान द्यायचा विचारही न करता समाजातील मुख्यप्रवाहाच्या दृष्टीकोनातून अशा प्रश्नांची उत्तरे शोधतो? चिमामंदा गोजी अदीजी यांनी एकदा म्हटले होते की एखादी गोष्ट केवळ एखाद्या कहाणीशीच संबंधित नसते, विविध कहाण्यांशी तिचा संबंध असतो, ज्या वेगवेगळ्या असूनही एकमेकांचा विरोध न करता एकत्र असतात. ‘कॉमन थ्रेड’ प्रकाशझोतात न येणाऱ्या कहाणीला दुनियेसमोर आणण्याचा प्रयत्न करते. ‘कॉमन थ्रेड’च्या डॉक्युमेंट्रीज पुढे जाऊन हा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतात की आपण या विकासाच्या आंधळ्या स्पर्धेत मागे बरेच काही सोडून तर जात नाही आहोत ना?

लेखक : फ्रान्सिका फेर्रारिओ

अनुवाद : अनुज्ञा निकम

    Share on
    close