शेतक-यांचे जीवनमान बदलण्याचे काम करत आहेत ‘ रुबी रे’!

सेंद्रीय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न. . . शेतक-यांकडून घेऊन कोलकाता येथे विकतात भाजीपाला. . . लोकांपर्यंत भाजी पोहोचवण्याचे काम करतात सहा विपणनकर्ती मुले. . .

0

ही गोष्ट आहे डिसेंबर २०१३मधील ज्यावेळी रुबी रे यांच्या जीवनात अचानक मोठा बदल झाला. हा तो काळ होता ज्यावेळी त्या आपले कुटूंबिय आणि मित्रांसह़ अंदमानला सुट्टीसाठी गेल्या होत्या जेणेकरून रोजच्या धावपळीच्या जीवनातून काही क्षण मोकळा श्वास घेता यावा. परंतू असे होऊ शकले नाही कारण कार्यालयातील कामाच्या दबावामुळे त्या स्वत:चा लॅपटॉप सोबत घेऊन गेल्या होत्या. त्यामुळे सारे जेंव्हा अंदमानच्या सौंदर्यांच्या स्थळांचा आनंद घेत असत त्यावेळी त्या मात्र एका बाजूला बसून कार्यालयीन काम करत होत्या. संपूर्ण दौ-यात बहुतांश वेळ रुबी आपल्या सोबतच्या लोकांपेक्षा लॅपटॉपसोबत जास्त वेळ घालवण्यास विवश झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे कुटूंबिय आणि मित्रपरिवार त्यांच्यावर  नाराज होते. त्यामुळे रुबी यांच्या मनात खंत होती की त्यांना मनासारखे फिरताही आले नाही आणि सोबतच्या लोकांची नाराजी देखील सहन करावी लागली. त्यामुळे कोलकाताला परत येण्यापूर्वीच त्यांनी सर्वाना धक्का देणारा निर्णय घेऊन टाकला. 

कोलकाताला येताच पुढल्याच दिवशी त्यांनी एक कागदाचा तुकडा घेतला आणि वरिष्ठांच्या दालनात गेल्या. त्यावर त्यांचा राजीनामा लिहिला होता. रुबी एका नामांकीत कंपनीत विपण नाचे काम पहात होत्या. परंतू त्यांनी ज्यावेळी वरिष्ठांच्या हाती तो कागद सोपविला तेव्हा काही वेळ त्यांनाही त्या असे का करत आहेत ते समजेनासे झाले. पण रुबी यांचा निर्णय झाला होता त्या आता नोकरी करणार नव्हत्या. त्यामुळे वरिष्ठांच्या समजावण्याचा काही उपयोग झाला नाही.

रुबी यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला होता, मात्र सुरुवातीच्या दोन महिन्यात त्या स्वत:ही हे समजू शकत नव्ह्त्या की त्या नक्की काय करणार आहेत. त्या दरम्यान त्या आपल्या  मैत्रिणीना भेटल्या आणि काही वेळ त्यांच्यासाठी काढला. त्या दरम्यान त्यांना वेगाने धावणा-या जीवनाला काहीसा विश्राम देणे शक्य झाले. त्या आपल्या सुट्टीचा आनंद घेत होत्या, आणि हे करताना त्यांना खूपच  समाधान होते. खरेतर असे सर्वांच्या नशिबात असतेच असे नाही, नक्कीच रुबी यांनाही असे कधी वाटले नसेल. काही दिवस रिकामे गेल्यावर रुबी यांना पुन्हा काही काम करावेसे वाटू लागले. त्यावेळी त्यांनी काहीतरी नवे करावे म्हणून काही धर्मादाय कामे सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाहिले की शहरात अनेक सेवाभावी संस्था आहेत ज्या वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम करतात, किंवा आरोग्य सेवांशी संबंधित कामे करतात.

त्या दरम्यान त्यांचा संपर्क डिआरसीएससी यांच्याशी झाला. जी एक सेवाभावी संस्था आहे.  ती शेतक-यांसाठी काम करते आणि त्यांना सेंद्रीय शेतीबाबत जागृत करते. याशिवाय ही संस्था अशा  शेतकयांनाही मदत करते ज्यांना त्यांच्या शेतात सेंद्रीय शेती करायची आहे. यामध्ये रुबी यांचे मन रमू लागले आणि त्यांनी त्यांच्यासोबत काम सुरु केले. या दरम्यान रुबी यांनी डिआरसीएससीच्या मदतीने शहरी बागायती आणि सेंद्रीय शेतीच्या पध्दतीबाबत माहिती घेतली. संस्थेच्या कामा दरम्यान रुबी यांना समजले की, पुरुलिया जिल्ह्यातील शेतकरी कशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जात आहेत.

रुबी यांनी डिआरसीएससीच्या सदस्यांना सोबत घेऊन या भागाची पाहणी केली त्यावेऴी त्यांना जाणवले की, या भागात लोकांनी बेसुमार वृक्षतोड करून शेतीयोग्य जमिनीला नापिक केले आहे. त्यानंतर त्यांनी शेतीचे असे पर्याय शोधून काढले की, कोणत्या जागी पेरणी केल्यास शेती केली जाऊ शकेल, जेथे निसर्गत: पाण्याचे स्त्रोत तीन स्तरावर मिळू शकतात. ज्यात पाण्याची बचत व्हावी. ही कल्पना अत्यंत यशस्वी झाली आणि शेतकरी पुन्हा एकदा सेंद्रिय पध्दतीने शेती करण्यात यशस्वी झाले.

रुबी यांचा पुरुलिया येथील शेतक-यांशी संबंध दिवसेंदिवस वाढला, त्यांनतर त्यांनी शेतक-यांचे उत्पादन सरळ खरेदी केले आणि कोलकाता येथे त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. रुबी यांचे म्हणणे आहे की, शेतकरी आपल्या गरजेपेक्षा जास्त उत्पादन घेतात मात्र बाकी राहिलेल्या शेतीचे त्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की त्या हा व्यवसाय करतील. त्यामुळे रुबी यांना ठोस काम मिळालेच होते, परंतू शेतक-यांनाही त्याचे उत्पन्न वाढविण्याचे साधन मिळाले होते.

सुरुवातीला त्यांनी शेतक-यांचा कृषीमाल आपल्या मित्रांना विकण्यास सुरुवात केली. त्यात भाज्या आणि दुस-या इतर वस्तु होत्या. रुबी प्रत्येक सप्ताहात आपल्या ग्राहकांना त्यांच्याजवळ असलेल्या उत्पादनांची माहिती देत असत आणि ग्राहक त्यांच्या गरजेनुसार त्यांना मागणी नोंदवित असत. ही यादी त्या शेतक-यांना देत असत आणि दुस-या दिवशी शेतकरी या मागण्यांनुसार वस्तू आणून देत असत. त्याचे वितरण रुबी नंतर करत असत. हे काम त्या फक्त कोलकातामध्येच करत असत. या कामासाठी त्यांनी सहा विपणन कर्मचारी ठेवले आहेत. जे सामान ने- आण करतात.

रुबी सांगतात की ज्यावेळी एखादे जास्तीचे उत्पादन होते त्यावेळी त्या ते घाऊक व्यापा-यांना विकतात. रुबी यांना एफएमसीजी आणि किरकोळ क्षेत्रातील विक्रीचा बारा वर्षांचा अनुभव आहे जो त्यांच्या या कामात उपयोगी पडतो. एकीकडे रुबी सेंद्रिय शेतीशी जोडल्या गेल्या आहेत तर दुसरीकडे आपल्या या विपणनाच्या कामाला संपूर्णत: डिजीटल करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या त्यांना याची काही घाई नाही पण सारेकाही असेच प्रगतीपथावर राहिले तर या क्षेत्रातील मोठ्या लोकांसोबत त्या हातमिळवणी करतील जेणेकरून त्यांना त्यांच्या उत्पादनाला एक ब्रांड म्हणून विकता येईल. खरेतर त्यांच्या मनात सेंद्रीय उत्पादनांसाठी वेगळे दुकान सुरू करण्याचे संकल्पही आहेत परंतू सध्या त्यांना त्यांचे काम विस्तारण्यावर जास्त लक्ष द्यायचे आहे.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.