देणाऱ्याचे हात हजार......

देणाऱ्याचे हात हजार......

Monday October 26, 2015,

3 min Read

मदतीचा एक हात पुढे आला की त्या पाठोपाठ हजारो हात पुढे येतात. पुण्यातल्या युवकांनी सुरु केलेल्या हेल्पींग हॅन्ड,पुणे या ग्रुपमधल्या प्रत्येकाला हाच अनुभव येतोय. सध्या हा ग्रुप थंडीत रस्त्यावर झोपणाऱ्या गरीबांसाठी लोकरीचे कपडे जमा करण्यात व्यस्त आहे. दिवसरात्र या ग्रुपचे कार्यकर्ते पुण्यातल्या अनेक ठिकाणी हे जुने लोकरीचे कपडे जमा करतायत. व्हॉटसएपच्या ग्रुपमधून आपले जुने लोकरीचे कपडे या गरीबांसाठी दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुण्यात सुमारे पाच से सहा ठिकाणी हेल्पींग हॅन्डचे कार्यकर्ते हे जुने कपडे जमा करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतायत. शिवाय ज्यांना या ठिकाणी येऊन कपडे देणं शक्य नाही त्यांच्या घरी जाऊन हे कपडे घेण्यात येतायत. हिवाळ्यात पुण्यात चांगलीच थंडी पडते. इथं रस्त्यावर राहणाऱ्यांची संख्याही खुप आहे. त्यांचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी हा ग्रुप मोठी मेहनत घेतोय. दिवाळीच्या अगोदर या सर्व गरजूंना कपडे देण्यात येणार आहे.

image


हेल्पींग हॅन्ड पुणे हा ग्रुप अचानक सुरु झाला. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना. मदतीचा हात देणारे अनेक जण एकत्र आले आणि त्यांनी या ग्रुपला आकार दिला. मंदार गावडे या पुण्याच्या मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या युवकाच्या ओळखीतल्या एका गरीब कुटुंबातल्या दोन वर्षांच्या स्वराजच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. ज्यासाठी जवळपास लाखभर रुपये खर्च येणार होता. या गरीब कुटुंबाला हे परवडणारं नव्हतं. मंदारनं या कुटुंबाला मदत करायचं ठरवलं. त्यानं हेल्पींग हॅन्ड, पुणे हा व्हॉटसएप ग्रुप सुरु केला. या ग्रुपवरुन ओळखीच्या लोकांना मदतीचं आवाहन करण्यात आलं. बघता बघता या ग्रुपमधल्या मदत करणाऱ्या लोकांची संख्या वाढली आणि सुमारे पावणे दोन लाख रुपये जमा झाले. त्या दोन वर्षांच्या मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तो बचावला. हा मुलगा वाचला याचं समाधान आम्हा सर्वांना असल्याचं मंदार गावडे सांगतो.

image


हे घडलं एप्रिल महिन्यात. आता हेल्पींग हॅन्ड पुणे या ग्रुपनं आपलं समाजकार्य पुढे तसंच सुरु करायचं ठरवलं. हा ग्रुप वाढू लागला. गरीबांना मदत करण्याच्या धेय्यानं झपाटलेले अनेक जण या कार्यात स्वत:हून पुढे आले. हे सर्व सुशिक्षित, अनेक नामांकित कंपन्यामध्ये काम करणारे, काहींचे व्यवसाय ही आहेत. काही बांधकाम व्यावसायिक आहेत, तर काही पोलीसही आहेत. कुणाला मदत हवी असा एखादा मेसेज आला की ग्रुपमधले सर्वच धावतात. ज्याला जितकी शक्य असेल तितकी आर्थिक मदत करतात. अशातूनच लोणावळ्यातल्या कल्पश्री या सोळा वर्षांच्या मुलीला कायमचं अपंगत्व येण्यापासून वाचवण्यात आलं. अपघातात ट्रकनं उडवल्यानंतर या मुलीच्या एका पायाचे दोन तुकडेच झाले होते. तिच्या मणक्यालाही दुखापत झाली होती. हेल्पींग हॅन्ड पुणे, ग्रुपला ही माहीती मिळताच. त्या मुलीला हवी ती मदत देण्यात आली. तिचं रुग्णालयाचं बिल या ग्रुपनं भरलं आणि आज कल्पश्री आपल्या स्वत:च्या पायावर उभी राहू शकलेय.

image


आता हेल्पींग हॅन्ड पुणे ग्रुप वाढतोय. दर तीन महिन्यातून एकदा हे कार्यकर्ते भेटतात. पुढच्या कार्यक्रमाची आखणी करतात. सरकारीखात्यात नोंदणी नसलेला हा ग्रुप सध्या विश्वासावर चालतोय. त्यांनी केलेलं काम लक्षात घेऊन लोक विश्वासानं हेल्पींग हॅन्डला मदत करतायत. ही जमेची बाजू म्हणावी लागेल. महाराष्ट्रात आणि या देशात अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. त्यांचं कार्य ही मोठं आहे. पण ज्यांना मदत हवी आहे अशा व्यक्तीपर्यंत अनेकदा या संस्थाना पोचता येत नाही. आम्ही अशा गरजवंतापर्यंत पोचलो आणि त्यांना मदत करु शकलो याचं आम्हाला समाधान आहे, असं मंदार गावडे सांगतात. पुण्यातल्या जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोचण्याचा हेल्पींग हॅन्डचा प्रयत्न असल्याचं मंदार गावडे यांनी सांगितलं.