रोजंदारीच्या ९ रुपये कमाईने स्वतःचे शिक्षण पूर्ण करणारी आरती आज इतर मुलांना देत आहे मोफत शिक्षण

0

मुंबईच्या झोपडपट्टीत रहाणारी एक मुलगी दहावी नापास झाल्यावर घरातील आर्थिक अडचणींमुळे पुढे शिकू शकली नाही. त्यानंतर नऊ रुपयाच्या रोजंदारीवर काम करून पुढे त्या पैशाने तिने आपले शिक्षण पूर्ण केले. आज तीच मुलगी आपल्या ‘सखी’ या संस्थेमार्फत झोपडपट्टीत राहणाऱ्या इतर मुलींना शिकवण्याचे काम करत आहे जेणेकरून त्या मुलींचे शिक्षण अपूर्ण रहाता कामा नये.

कोणत्याही समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाचे महत्वाचे योगदान आहे. स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतर सुद्धा आपल्या देशातील अनेक भागात शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. ७वी ८वी च्या मुलांचे  गणित व इंग्रजीचे शब्द या विषयांचे सामान्य ज्ञान बरेच कच्चे आहे. ज्यामुळे मुलं दहावीत नापास होतात. मुलांच्या याच अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे मुलुंड स्थित आरती नाईक. आरती आपली संस्था ‘सखी’द्वारे झोपडपट्टीत राहणाऱ्या ४०० मुलींना अभ्यासाची सामान्य माहिती देत आहे.

आरती सांगतात की, "मला ही संस्था सुरु करायची कल्पना तेव्हा आली जेव्हा मी १० वी नापास झाल्यावर आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण मला घेता आले नाही.  शिक्षण सुटल्यावर मी चार वर्ष घरीच राहून बांगडया व फ्रेंडशिप बँड तयार करण्याचे काम केले यासाठी मला रोज ९ रुपये मिळायचे. अशा प्रकारे चार वर्ष पैसे जमवल्यानंतर मी माझ्या पुढच्या शिक्षणाचा विचार केला व १२ वीत प्रथम क्रमांक पटकावला".

एवढ्यावरच न थांबता आरती या नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्रामध्ये बीएचा अभ्यासक्रम व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मांटेसरी टीचर ट्रेनिंगचा कोर्स करत आहे.

आरती सांगतात की, "सन २००८ मध्ये ५ मुलींना घेऊन आपली संस्था ‘सखी’ ची स्थापना केली. सुरवातीला फक्त मुलांना सामान्य ज्ञान देत असल्यामुळे बरेच पालक माझ्याकडे मुलांना पाठवत नव्हते. झोपडपट्टीत रहाणाऱ्या पालकांना वाटायचे की त्यांच्या मुली शाळेत शिकायला जातात हेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे".

एक वर्षानंतर याच मुलींबरोबर आरती यांनी एका रोड शो चे आयोजन केले. ज्याला त्यांनी नाव दिले ‘बाळ मेळावा’ यामध्ये मुलींच्या स्वप्नांचे मनोरे होते की त्या भविष्यात काय करणार आहे. यापैकी काही मुलींना शिक्षिका तर काहींना परिचारिका बनून लोकांची सेवा करायची होती. विशेष गोष्ट म्हणजे त्यांच्या या मोहिमेचा लोकांवर सकारात्मक परिणाम झाला तसेच या मुलींचा शाळेतील निकालही आशादायी लागला व त्यानंतर त्यांच्याकडे येणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली. आज त्या ४०० मुलींना दोन पाळ्यांमध्ये शिकवत आहे. पहिली पाळी संध्याकाळी ५ ते ७ व दुसरी पाळी ७ ते ९ वाजेपर्यंत असते.

आरती एका घटनेच्या आठवणीबद्दल सांगतात की, "एका साक्षी नावाच्या मुलीला आईने बाजारातून आणायला सांगितलेल्या वस्तू ती बाजारात पोहचेपर्यंत विसरून जात असे. तिच्या या सवयीमुळे त्रस्त झालेल्या आईला माझ्याकडे पाठवण्याबद्दल मी सुचवले. आज मी जवळजवळ पाच वर्षापासून तिला शिकवत असून आज ती ११वीत शिकत आहे".

अभ्यासाबरोबरच मुलींसाठी सन २०१० पासून त्यांनी बचत बँक सुरु केली आहे. मुलीं जवळ एक बचत पेटी आहे ज्यात त्यांना त्यांच्या बचतीचे पैसे टाकायचे असतात व महिना अखेर त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत पेटी उघडून जमा रक्कम मोजून तिची नोंद ठेवली जाते. मुलींना आपल्या शालेय गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या गल्ल्यातून पैसे काढण्याची परवानगी दिली आहे.

आरती सन २०११ पासून एक इंग्रजी वाचनालय पण चालवत आहे. ज्यात सामान्य ज्ञानाची ४०० पुस्तकं ठेवली आहे. मुलींना आळीपाळीने  दर आठवड्याला पुस्तक मिळतात. आरतीच्या या प्रामाणिक कार्याला सी.जे हेडन नावाची महिला मदत करत आहे. त्यांच्याच मदतीने आरती यांनी झोपडपट्टी भागात एक सार्वजनिक कार्यालय भाड्याने घेऊन तिथे वाचनालय उघडले आहे जिथे त्या भागातील मुली मोफत पुस्तकांचे वाचन करू शकतात.

आरती मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या खेळण्यावर पण भर देतात. मागच्या वर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गर्ल्स स्पोर्ट स्कूल ची स्थापना केली. यामध्ये त्या मुलींना इनडोर व आऊटडोर दोन्ही प्रकारचे खेळ शिकवतात. ज्या मध्ये कॅरम व बुद्धीबळ तसेच बॅडमिंटन, बॅलेंसिंग बलुनी व इतर अनेक खेळ सामील आहे. आरती या मुलांच्या अभ्यास व खेळण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेतात. दोन महिन्यापूर्वीच मुलींच्या चांगल्या शारीरिक विकासासाठी त्यांनी प्रोटीन कार्यशमता वाढवणाऱ्या पदार्थांची सूची तयार केली आहे व मुलांच्या पालकांना कोणत्या पदार्थामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त आहे याची माहिती त्या देतात.

आपल्या अडचणींना जाणून आरती सांगतात की, "जागेच्या कमतरतेमुळे ४५ मुलींना दोन पाळ्यांमध्ये शिकवण्याचे काम करावे लागते तर इतर ४०० मुलींना शनिवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यासात  येणाऱ्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करते तसेच गर्ल्स बुक बँकेतून पुस्तकांची सोयही त्यांना  उपलब्ध करवून देते. यासाठी दोघेजण त्यांना मदत करतात".

काही दिवसांपूर्वीच आरती यांची शिक्षण क्षेत्रातील प्रगती बघून मुंबईमध्ये आयोजित एशियन कॉन्फरन्समध्ये त्यांना वक्त्याच्या रुपात बोलावून चांदीच्या पारितोषिकाने सन्मानित केले. भविष्यातील योजनेबद्दल त्या सांगतात की अनेक गरजू मुलींना मदत करून त्यांच्यासाठी तीन प्रशिक्षण केंद्र व वाचनालयं उघडणार आहे. यासाठी त्या मदतनीस वाढवणार आहे कारण सध्या त्या एकट्यानेच सगळा कार्यभार सांभाळत आहे. पैशाच्या कमतरतेला बघून आरती या संस्थेसाठी निधी गोळा करीत आहे ज्यामुळे अनेक गरजू मुलींना त्यांच्या भविष्यात नक्कीच फायदा होईल.     

वेबसाइट : www.sakhiforgirlseducation.org

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 
आता वाचा संबंधित कथा :

अंधाने उघडली गरिबांसाठी शिक्षणाचे कवाडे

शिक्षणाला सहज आणि मनोरंजक बनवते “परवरिश, द म्युजियम स्कूल”!

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजीचा वर्ग- डोंबिवलीतील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

लेखक : हरीश 
अनुवाद : किरण ठाकरे