गत काळात ज्यांच्यामुळे जीवन समृध्द झाले त्यांच्या प्रती कृतज्ञभाव म्हणजेच पितृपक्ष, श्राध्द महालय!

गत काळात ज्यांच्यामुळे जीवन समृध्द झाले त्यांच्या प्रती कृतज्ञभाव म्हणजेच पितृपक्ष, श्राध्द महालय!

Saturday September 09, 2017,

6 min Read

श्रध्देने जे केले जाते त्याला श्राध्द अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे.आता सुरू होत असलेल्या पितृपक्षाबाबत थोडी माहिती जाणून घेवुया.

मृत व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी ठराविक तिथीला किंवा ती माहिती नसेल तर सर्वपित्रीच्या दिवशी जे करतो त्याला सांवत्सरीक श्राध्द अशी संज्ञा आहे. पितृपक्षात जे श्राध्द करतात त्याला महालय श्राध्द अशी संज्ञा आहे. या मागे जसे आध्यात्मिक, पारंपारिक पुरातन संदर्भ आहेत, तसेच शास्त्रीय अर्थ आणि दृष्टीकोन देखील आहेत. ते या निमित्ताने जाणुन घेवूया!

आपले आकाश हे ३६अंश कल्पलेले असुन. सूर्य हा सहाव्या राशीत म्हणजे "कन्या "राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काऴ जो जवऴपास दोन महिने असतो तो पर्यंत महालय श्राध्द करता येते. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राध्द रोज करावे असे वचन आहे. सलग १५ दिवस श्राध्द करणे हे व्यावहारीक दृष्ट्या थोडे कठिण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला महालय श्राध्द एकदाच केले जाते.


image


सांवत्सरीक श्राध्दात त्रयीलाच उद्देशुन पिंडदान केले जाते (आई आजी पणजी किंवा वडिल आजोबा पणजोबा) परंतु महालय श्राध्दात सर्व नातेवाईकांना पिंडदान केले जाते. पितृत्रयी -वडिल आजोबा पणजोबा मातृत्रयी -आई आजी पणजी, मातामहत्रयी -आईचे वडिल आजोबा पणजोबा, मातामहित्रयी -आईची आई आजी पणजी, सापत्न मातु: -सावत्र आई,पत्नी - पत्नी निवर्तली असेल तर ,पुत्र -उपनयन झालेला पुत्र गेला असेल तर , दुहिता- विवाहित कन्या निवर्तली असेल तर पितृव्य - सख्खे काका (काकू गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा. चुलत भाउ गेला असेल तर ससूत असा सोबत उल्लेख करावा)

मातुल -सख्खा मामा (मामी गेली असेल तर सपत्नीक व मामेभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा),भ्रातु: -सख्खा भाउ (भावजय गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा)

पितृभगिनी -सख्खी आत्ये (आत्येचे यजमान गेले असतील तर सभर्तृ असा उल्लेख करावा व आत्येभाउ गेला असेल तर ससूत असे म्हणावे)

मातृभगिनी -सख्खी मावशी (यजमान गेले असतील तर सभर्तृ व मावसभाउ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)

आत्मभगिनी- सख्खी बहिण (तीचे यजमानहि निवर्तले असतील तर सभर्तृ असे संबोधावे),श्वशुर -सासरे (सासूबाई निवर्तल्या असतील तर सपत्नीक असे म्हणावे)

गुरु -ज्यांनी गायत्री उपदेश केला ते (वडिलांनी मुंज लावली असेल तर वडिल) अन्य कोणी मुंज लावली असेल तर ते गुरु.,आचार्यगुरु -ज्यांनी विद्या व शिक्षण दिले ,शिष्य-आपला विद्यार्थी,आप्त - वरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाहि परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबध होते व ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत या सर्वांना आप्त या संज्ञेत पिंडदान करु शकतो.

सर्व मृत नातेवाईंकांची नाव व गोत्रासहित एका वहित नोंद ठेवावी व पुरोहितांच्या सल्यानुसार वरील प्रमाणे सुसुत्रीत यादी बनवावी. या शिवाय चार धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे. मित्र, सखा, पशू, वृक्ष, जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचाकरता.जे आपल्याकडे आश्रीत होते त्यांचा करताहि धर्मपिंड आहे.

मातृवंशात, पितृवंशात गुरुंच्या वंशात किंवा अाप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाहिये त्यांचाकरता ज्यांचे क्रियाकर्म झाले नाहि.जे जन्मताच अंध, पंगु जन्मले त्यांचा करता व विरुपांकरता हि धर्मपिंड आहे. जे कुंभीपाक नामक नरकात पाप कर्मापुऴे खितपत पडले आहेत त्यांचाकरताहि धर्मपिंड आहे. असे चार धर्मपिंड महालयात दिले जातात.

महालय श्राध्द किती प्रकारात करता येईल? कारण अनेक श्रध्दावान आस्तीक असतात परंतु नोकरीमुऴे किंवा धावपळीमुऴे त्यांना काहिवेळा थोड कठिण होत त्यांचा करता

१ - दोन किंवा पाच ब्राह्मण, किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करुन श्राध्दस्वयंपाक करुन सपिंडक महालय

२ -आमान्न म्हणजे शिधा सामग्री योजना करुन आमश्राध्द

३-दूध, केऴ, अल्पोपहार यांची योजना करुन हिरण्यश्राध्द यात पिंडदान नसते

४ ब्रह्मार्पण - दोन, पाच ब्राह्मण व सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण (सुवासिनी) पूजन करुन अन्नसंतर्पण यात पिंडदान नसते.

५-एखाद्याची आर्थीक स्थिती नसेल किंवा मनुष्यबऴ वयोमानानुसार कमी असेल तर "शमीपत्रा "अेवढा पिंड दिलेलाही शास्त्र संमत आहे. शमीपत्र हे भाताच्या शिताएवढेच असते.

यातील काहिच जमत नसल्यास घोर वनात जावुन दक्षिणेकडे तोंड करुन उभे राहुन आपल्या दोन्हि काखा वर करुन माझी आर्थीक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राध्द करु शकत नाहि या बद्दल क्षमायाचना करुन पितरांचे स्मरण केले तरी श्राध्द होते.

श्राध्दात विकिर व प्रकीर असे दोन भाग दिले जातात .

अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध न झालेले गर्भस्त्रावात मृत झालेले ज्यांना रुपहि प्राप्त न झालेले या सर्वांनाहि अेक भाग श्राध्दात महालयात दिला जातो.

ज्या देवतांना सोमभाग मिऴत नाहि त्यांना हि अेक भाग श्राध्दात दिला जातो.रामचंद्रानी वनात असताना दशरथ राजाला कंदमुऴाचे पिंड दिले होते असाहि उल्लेख रामायणात आहे.

कन्याराशीत सूर्य गेल्यावर तुळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवऴ असतो.पितृगणांकरता दिलेले कव्य (अन्न भाग) हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो तिथुन तो चंद्रमंडलात जातो. चंद्रमंडल हे स्वयंप्रकाशीत नसुन सूर्यनारायणांची सुषुम्ना नाडि या चंद्र मंडलाला प्रकाशीत करते दर महिन्याच्या अमावास्येला चंद्रमंडल व सूर्यमंडल एकत्र येत असते त्यामुऴे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधीक जलद गतीने त्यांना प्राप्त होते. असा यामागचा होरा आहे.

कन्याराशीच्या १० अंशापासून ते तुळ राशीच्या १० अंशापर्यंतच काळात सूर्य व पृथ्वी या दरम्यानच्या अंतर सर्वात कमी असते त्यामुऴे पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न) पितरांपर्यंत लवकर पोचते.

श्राध्द हि व्यवस्था मनीऑर्डर प्रमाणे जाणावी.उदा.मी मुंबई पोस्ट ऑफीस मधे पाचशे रु.१ नोट गावाला भावाकडे पाठवली तर माझ्या भावाला मुंबईत तीच नोट मिऴेल का? नाहि ना.त्याला त्या पोस्टात उपलब्ध असलेले पाचशे रु.मुल्याचे चलन मिऴेल (१०० च्या पाच नोटा मिऴतील किंवा ५० च्या दहा नोटा मिऴतील) पण चलन तेवढेच मिऴेल. तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो त्याच वेऴी तेवढच अन्न आपल्या पुर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल त्या योनीला आवश्यक जो आहार असेल त्या रुपाने मिऴते. अशी श्रध्दा यामागे आहे तरी मूळ संकल्पना काय आहे की जे आज सोबत हयात नाहीत मात्र ज्यानी पूर्वीच्या जीवनात उपकार, मदत सोबत केली होती त्याचे पुण्यस्मरण करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा कर्मकांड वाटेल असा विधी शास्त्राचार आहे त्यात मानसिक शांती समाधान आणि गतपुण्यलोकांचे स्मरण यातून जीवनाला पुढे घेवून जाण्याच्या प्रेरणा प्रज्वलित करण्याचे ध्येय आहे.

आता श्राध्दात पितर खरेच जेवतात का? हा हल्लीचा फार मोठा प्रश्न आहे.आपण जेव्हा श्राध्दान्न जेवतो तेव्हा ते कितीहि अल्प जेवले तरी शरीराला एक प्रकारची सुस्ती व जडपणा अनुभवता येतो.परंतु एखाद्या यज्ञ किंवा मंदिरात कितीहि भरपेट प्रसाद घेतला तरी सुस्ती जडपणा जाणवत नाहि मंदिरातील प्रसादात कांदालसूण, गरममसाले वगैरे काहि नसल तरी तो चवीला सुमधुरच लागतो कारण त्या अन्नावर भगवंताची कृपा असते व श्राध्दान्नावर पितरांची "आसक्ती "असते.त्यामुऴे शरीराला जडत्व येत.एरवी खीर वडे खाल्ले तर सुस्ती येत नाही. हा अनुभव घ्यायला हरकत नसावी.स्वयंपाक हा घरीच केलेला असावा.भरपुर प्रकार केले नाहित तरी चालेल परंतु सात्विक पणे आपल्या पूर्वजांना आपल्या हातचे दिलेले अन्न हे अधीक प्रिय असते.त्यातली आपुलकी व कृतज्ञता हॉटेल किंवा कँटरींगच्या अन्नाला कधीच येणार नाहि.सूनांनी, लेकींनी केलेला वरणभात हा आई वडिलांना पंचपक्वानांपेक्षा अधिक प्रिय असतो हे सदैव ध्यानात ठेवावे

पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना संतुष्ट करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. अशी ही सर्वसाधारण माहिती संकलीत करून देताना त्यामागचा हेतू प्रबोधन आणि आपल्या धर्म कर्म विधी शास्त्रांसोबत सद्याच्या आधुनिक जीवनशैलीची सांगड घालणे हाच आहे त्यात तपशीलवार उणिवा असू शकतात त्या साठी क्षमस्व! परंतू आपल्या जीवनात गतकाळात पुण्यप्रभाव टाकणा-या पितरजनाना या निमित्ताने कृतज्ञभावाने स्मरण करण्याच्या उदात्त संस्कृतीचेही आभार मानूया! (संकलित माहिती)