समाजाचा विरोध पत्करुन, अविनाश नकट यांनी पत्नीच्या तेराव्यात पैसे खर्च न करता, गावातील शाळेसाठी दिले दीड लाख रुपये !

समाजाचा विरोध पत्करुन, अविनाश नकट यांनी पत्नीच्या तेराव्यात पैसे खर्च न करता, गावातील शाळेसाठी दिले दीड लाख रुपये !

Monday March 07, 2016,

4 min Read

आयुष्य कधी कुठल्या रस्त्यावर कुणाची साथ सोडेल सांगता येत नाही, असे असूनही काही लोक असे असतात जे आपल्या व्यक्तीने साथ सोडल्यानंतरही समाजाचा विचार करतात आणि समाजासाठी काहीतरी करून दु:खातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी समाजाने देखील साथ दिली नाही तरी ते आपल्या कर्तव्यापासून मागे हटत नाहीत. असेच काहीतरी महाराष्ट्राच्या अकोलामध्ये राहणा-या अविनाश नकट यांनी केले आहे. यावर्षी पाच फेब्रुवारीला जेव्हा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांनी निश्चय केला की, ते आपल्या पत्नीच्या तेराव्याला खर्च होणा-या पैशांचा वापर गावातील शाळेला डिजिटल बनविण्यासाठी करतील. असे असूनही समाजातील अधिकाधिक लोकांनी त्याचा विरोध केला, मात्र ठाम निश्चय केलेल्या अविनाश यांनी आपले पाय डगमगू दिले नाहीत, त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला आणि जवळपास दीड लाख रुपयांच्या मदतीने त्यांनी आपल्या गावातील शाळेला डिजिटल केले. याचा परिणाम असा झाला की, कालपर्यंत जे लोक त्यांच्या या निर्णयाचा विरोध करत होते, तेच लोक आता त्यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत. 

image


अविनाश अकोल्याच्या तांडली बजरक नावाच्या गावात राहतात. त्यांचे एक हसते खेळते कुटुंब होते. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी रुपाली, दोन मुली समृध्दी आणि आनंदी होत्या. मात्र या कुटुंबात एक असे वादळ आले की, सर्व काही बदलले. अविनाश यांनी ‘युवर स्टोरी’ला सांगितले की, “३ फेब्रुवारी पर्यंत सर्वकाही सामान्य होते, माझी पत्नी त्याच दिवशी स्वतःच घरातील सामान बाजारातून घेऊन आली होती. सोबतच मुलांना शाळेतून घरी देखील तिनेच आणले होते. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी तिची प्रकृती थोडी खराब झाली, ज्यानंतर रुपाली हिचा भाऊ जे स्वत: एक डॉक्टर आहेत, त्यांनी अशी काही औषधे दिली जे साधारणत: डॉक्टर प्राथमिक उपचारासाठी देतात. मात्र रुपाली हिची प्रकृती चांगली झाली नाही आणि ताप देखील कमी झाला नाही. आम्ही दोघांनी निश्चय केला की, आम्ही संध्याकाळी डॉक्टरांकडे जाऊ, त्याच दरम्यान रुपालीच्या नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली आणि काही वेळानंतर रक्त थांबले. परिस्थितीच्या गंभीरतेला समजून मी रुपालीला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. जेव्हा रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा समजले की रुपालीला ल्यूकोमिया झाले आहे.” 

image


ल्यूकोमिया याचा उपचार अकोला येथे होणे शक्य नव्हते, त्यामुळे अविनाश यांनी रुपाली यांना नागपूरमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अविनाश यांनी रुग्णवाहिका बोलाविली आणि रुपाली सोबत रुपालीचे भाऊ आणि आपल्या भाच्यासोबत ते नागपूरसाठी रवाना झाले. असे असूनही अविनाश यांनी रुपाली यांना आजाराबाबत काहीच सांगितले नव्हते. रस्त्यात दोन्ही पति – पत्नी एकमेकांसोबत बोलत होते आणि काही वेळानंतर रुपालीचे डोळे हळू हळू बंद होण्यास सुरुवात झाली. तेव्हा अविनाश यांना वाटले की, रुपाली यांना कदाचित झोप येत असावी, याप्रकारे जोपर्यंत ते नागपूरला पोहोचले तोपर्यंत रुपाली यांनी या जगाला अलविदा केले होते. डॉक्टरांनी सांगितले की, रुपाली यांचा मृत्यू ब्रेन हॅमरेज मुळे झाला आहे. 

image


आपली पत्नी रुपालीवर जीवापाड प्रेम करणारे अविनाश मनातून ढासळले होते, मात्र आपल्या दोन मुलींसाठी त्यांनी स्वतःला सावरले आणि घरी पोहोचले. अविनाश सांगतात की, “मी जेव्हा अंत्यसंस्कारासाठी घरी पोहोचलो तेव्हा घरात खूप गर्दी होती. ते पाहून मी विचार केला की, जर घरात मी असाच रडत गेलो तर, त्याचा परिणाम माझ्या मुलींवर होईल. मी सर्वाना सांगितले की, मी उद्यापासून कामावर जाणार आहे आणि मुलीदेखील उद्यापासून शाळेत जातील. सोबतच मी सर्वाना सांगितले की, मृत्यूनंतर होणा-या कोणत्याही क्रिया आता केल्या जाणार नाहीत. मी निश्चय केला की, आपल्या पत्नीच्या तेराव्यासाठी खर्च होणारा पैसा मी गावातील शाळेवर खर्च करणार आहे, जीची परिस्थिती खूप खराब आहे.” 

image


अविनाश यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती खूप खराब होती. ही शाळा पहिल्या वर्गापासून सातव्या वर्गापर्यंत आहे, मी देखील याच शाळेत शिकलो आहे. आमच्याकाळी या शाळेत पहिल्या वर्गात ३५ मुले शिकत होती. मात्र आज साधनांच्या कमतरतेमुळे संपूर्ण शाळेत ३५ ते ४०मुले शिकतात. त्यामुळे मी या शाळेसाठी पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला.”

याप्रकारे अविनाश यांनी आपली पत्नी रुपाली यांच्या पाचव्या दिवसा नंतर दुरुस्तीचे काम सुरु केले आणि भिंतींना कार्टूनने सजविले, जेणेकरून मुले त्यांना पाहून शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील, त्यांनी शाळेत पंखे, संगणक, प्रोजेक्टर, सतरंजी इत्यादी लावले. सुरुवातीला त्यांच्या या कामाचा विरोध झाला, विशेषकरून महिला त्यांना असे न करण्यासाठी खूप समजवत होत्या, मात्र अविनाश यांनी त्यांचे काहीच ऐकले नाही. 

image


अविनाश सांगतात की, “आमच्या गावात खूप गरिबी आहे आणि तेथील अधिकाधिक लोक शेतकरी आहेत, दुष्काळामुळे तेथे शेतकरी आत्महत्या देखील करतात, तेव्हा मी त्यांना समजाविले होते की, पैसे नाहीत तर, कर्ज करून मृत्यूनंतर होणा-या क्रिया का करायच्या, कारण जाणारा तर गेला आहे. त्यामुळे या पैशाचा उपयोग आपण गावाच्या विकासासाठी केला तर, गावाचाच विकास होईल.” लोकांना या प्रकारचा सल्ला देणा-या अविनाश यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांच्यासोबत ही घटना घडली तेव्हा त्यांनी निश्चय केला की, ते लोकांना त्यासाठी प्रोत्साहित करतील आणि जर त्यांनी स्वतः असे केले नाही तर ते चुकीचे असेल. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की, ते या पैशाचा उपयोग गावाच्या विकासासाठी करतील. 

image


अविनाश जुन्या गोष्टींना उजाळा देताना सांगतात की, जवळपास दोन महिन्यांपूर्वी त्यांची त्यांच्या पत्नीसोबत शाळेच्या सुधारणेबाबत चर्चा झाली होती, मात्र जेव्हा अचानक ही घटना घडली तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्याबाबत विचार केला. अविनाश सांगतात की, त्यावेळी त्यांच्या या निर्णयासोबत केवळ एखाद दोन कुटुंब उभे असले तरी, आज संपूर्ण गाव त्यांच्यासोबत उभा आहे.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

बक-या विकून घरात शौचालय बनविणा-या १०४ वर्षाच्या कुंवरबाई यांच्या पायाला हात लावून पंतप्रधानानी घेतला आशीर्वाद !

छतीसगढच्या ६५ वर्षीय विश्वनाथ पाणीग्रहींनी गावागावात राबविली स्वच्छता ग्राम अभियान मोहीम 

विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’

लेखक : हरिश

अनुवाद : किशोर आपटे.