सबा... भयाच्या सावटात फुटली शिक्षणाला पालवी...

सबा... भयाच्या सावटात फुटली शिक्षणाला पालवी...

Sunday October 25, 2015,

10 min Read

वर्ष होते २००८… अमरनाथमधून दंगलींना सुरवात झालेली होती. अवघ्या जम्मू-काश्मिरात दंगलीचे लोण पसरत होते आणि सबा हाजी आपल्या बंगळुरूतील कार्यालयात विषण्ण, असहाय अशा अवस्थेत नवीन काय वाईट बातमी येते, त्याकडे लक्ष ठेवून होत्या. जम्मूतील दोडा हे त्यांचे जन्मगाव. बातम्यांच्या माध्यमातून दोडातल्या परिस्थितीबद्दल त्यांना जी काही थोडीबहुत माहिती मिळाली, ती देखिल शहारे उभे करणारी होती. प्रत्यक्षात मग काय परिस्थिती असेल, नुसत्या विचारानेच त्यांचा थरकाप उडालेला होता.

सबा हा क्षण आठवताना सांगतात… ‘‘मी घरी फोन लावला आणि तिथे सगळेच जण आता पुढे नियतीने आपल्या ताटात आणखी कायकाय वाढून ठेवलेले आहे, याबद्दल साशंक, अनभिज्ञ आणि तरीही कमालीचे भयभीत होते. मोठ्या संख्येने लोक गावाच्या दिशेने चाल करून येत आहेत, एवढेच फोनवरून माझ्या आईने मला सांगितले.’’

सबा यावेळी केपीएमजीमध्ये ऑडिट प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला होत्या. परिस्थितीच अशी काही आहे, की आपण इथं बंगळुरूत थांबण्यात काही अर्थ नाही. आपण गावी परतायला हवे, असे सबाने ठरवले. सबा म्हणतात, ‘‘मी बंगळुरूतून आपलं सामानसुमान बांधलं आणि दोडाला निघाले. कडक थंडीचे ते दिवस होते.’’

image


डोंगराळ आणि दुर्गम क्षेत्र म्हणून दोडाची ओळख आहे. दोडाला स्वत:चा इतिहास आहे. संस्कृती आणि परंपराही आहे. दोडा एकुणातच असा परिसर आहे, की आत शिरल्यावर इथे रस्ते तुम्हाला सहजासहजी सापडत नाहीत. शहरी लोकांना तर ते खरोखर दुर्गम. आणि इथल्या ग्रामस्थांनी सबा आणि त्यांच्या कुटुंबीयांशी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात विचारणा केली.

सबा सांगतात, ‘‘माझे काका वेळोवेळी इथल्या गरजू लोकांना पैसे पाठवून त्यांची मदत करत असतात. तुम्ही इथे एक शाळा चालवू शकाल का, असे काकांनीच मला आणि माझ्या आईला विचारले. आम्हीही गावासाठी आपल्या परीने आपल्याला काही करता आले तर उत्तम, या विचारात होतोच. ही त्यासाठी एक चांगली संधी आहे म्हणून आम्ही होकार दिला.’’

…आणि डोंगरांमध्ये वसलेल्या ब्रेसवाना या छोट्याशा खेड्यात हाजी पब्लिक स्कूलचे कोनशिला अनावरण झाले.

शाळा सुरू झाली तसे शाळेच्या वाटेत नोकरशाहीकडून अडथळ्यांवर अडथळे अंथरायलाही सुरवात झाली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे हवे, ते नको असे अक्षरश: जेरीला आणले. सर्व अडचणींवर मात करत करत हाजी पब्लिक स्कूल वर्षागणिक प्रगतीपथावर आहे आणि प्रगतीचे नवनवे उच्चांकही गाठते आहे.

image


दोडातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यावर का म्हणून घेता आहात, असे विचारल्यावर सबा म्हणतात…

‘‘ग्रामीण भागातील सर्वच मुले सुशिक्षित व्हायला हवीत, साक्षर व्हायला हवीत. गेल्या ३० वर्षांपासून त्यासाठी कुणीही प्रयत्न केलेले नाहीत. आमच्याकडली अनेक मुले तुमच्याकडल्या दुय्यम दर्जाच्या विद्यार्थ्याच्या तुलनेत देखिल टिकाव धरू शकणार नाहीत, इतकी वाईट परिस्थिती इथे आहे.’’

भारतातल्या अनेक इतर राज्यांमध्ये जसे आहे त्यापेक्षाकाही वेगळे चित्र इथं जम्मू-काश्मिरात नाही. इथेही शिकलेले-सवरलेले लोक आपल्याच ऐटीत असतात. सबा सांगतात, ‘‘इथले सुशिक्षित लोक खेड्यात येतील. तेही इतक्या दुर्गम भागात आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना शिकवतील, असे होऊच शकत नाही. इथले शहरी शिक्षित तसा विचारच करू शकत नाहीत. म्हणून मग मी देशाच्या इतर भागांतून स्वयंसेवक बोलावले. साक्षरता, शिक्षण प्रचाराला समर्पित असे स्वयंसेवकांचे एक सैन्यच उभे केले.’’

स्वयंसेवकांच्या बळावर आता सबा यांचा हा सगळा उपक्रम चाललेला आहे. दोडातल्या दुर्गम भागाशी जुळवून घेणे जरा जिकिरीचेच जाते. सबा म्हणतात, ‘‘मनुष्यबळ हे आमच्या समोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. शिक्षक, कर्मचारी म्हणून कुणी उपलब्ध होणं आणि झालं तरी इथल्या वातावरणात टिकणं, हे सगळंच गुंतागुंतीचं आहे. संकटांशी दोन हाथ करण्याची जिद्द बाळगणारे काही युवक मात्र इथं किमान वर्षभर तरी मुक्काम ठोकतात. हो म्हणजे अशी उदाहरणेही बरीच आहेत. एकदा तुम्ही इथे राहण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार झालात ना, की मग राहण्यासाठी म्हणून इथल्यासारखी सुंदर अन्‌ छान जागा दुसरीकडे कुठे असू शकते, यावरही तुमचा विश्वास बसणार नाही.’’

image


सबा पुढे सांगतात, ‘‘तुम्ही माझ्या कुटुंबावर एक दृष्टिक्षेप टाकून बघा. घरात सगळे शिकलेले आहेत. शासकीय नोकरीसाठीच्या अर्हता पूर्ण करतात, असे बहुतांश आहेत. पण मला समजत नाही की जीवनातले निरंतर स्थैर्य म्हणजेच सगळं काही, असं जम्मू-काश्मिरातल्या लोकांना का वाटतं म्हणून. सरकारी नोकरी म्हणजे सगळं काही आहे काय? तुमच्याकडे जे काम सध्या उपलब्ध आहे, ते झोकून करा म्हणजे झाले. पण इथं असं नाही. इथले लोक एकतर ‘नंतर करूया’ म्हणून ते काम टाळतील किवा मग ते दुसऱ्या कुणाच्या तरी माथी मारतील. इथल्या बहुतांश लोकांमध्ये कामाच्या संदर्भात समर्पणाची अशी भावना नाहीच. मला नेमके हेच या लोकांचे आवडत नाही. अर्थात समर्पित भावनेने काम करणारे इथं अगदीच नाहीत, असेही नाही, पण त्यांची संख्या तुम्ही बोटांवर मोजू शकता. काम टाळणे, हीच इथं सामान्य बाब आहे. इथल्या लोकांची मानसिकता आहे.’’

अगदी सुरवातीपासूनच हाजी पब्लिक स्कूल म्हणजे उत्साही ग्रामस्थांच्या जिज्ञासेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू. शाळा भरली म्हणजे मुले-मुलीच येत, असे इथले चित्र नव्हते. आई-बाबा आणि बाकी मंडळीही येत असत. शाळा सुरू झाली म्हणजे वर्गात खिडकीतून डोकावून बघत. खिडकीतून डोकावून बघण्यासाठी रांग हमखास लागत असे, हे विशेष! कुणीतरी शिकवतं आहे आणि आपली मुलं शिकताहेत, हे दृश्य त्यांच्यासाठी दुर्लभ असेच होते.

image


सबा सांगतात, ‘‘आम्ही राज्याच्या निर्धारित अभ्यासक्रमाचे पालन करतो. आम्ही वेगवेगळे प्रयोगही करतो. विविध संस्कृती मानणारे, देशांतील विविध भागांतून एवढेच काय तर परदेशातूनही आमच्याकडे शिक्षक येत असतात. शाळेची आता स्वतंत्र लायब्ररीही आहे. विविध भागांतून येणारे स्वयंसेवक त्यांच्याकडले ज्ञान आणि माहिती घेऊन इथे येतात. संस्कृती, साहित्यापासून ते प्रौद्योगिकीपर्यंतचा परिचय इथल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून होतो. काही वर्षांपूर्वी मुलांना आपली मातृभाषादेखिल वाचता येत नव्हती. आता ते यात तरबेज झालेले आहेत. पूर्वी, अन्य देशांतील लोकांबाबत जाऊच द्या… परवापरवापर्यंत देशातल्या हिंदू लोकांबद्दलही मुलांना काही माहिती नव्हती. आमच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून इथल्या अनेक मुलांनी एखादा हिंदू व्यक्ती याची देही, याची डोळा असा पहिल्यांदा बघितलाय.’’

जुनाच इतिहास असलेल्या धर्माधिष्ठित राजकारण, सत्ताकारणाचा परिणाम म्हणून जम्मूत आजही हिंदू आणि मुसलमानांमध्ये पूर्वाग्रहांची एक भिंत स्पष्ट दिसते.

सबा म्हणतात, ‘‘दोन्ही समुदायांमध्ये हाडाचे वैर वगैरे मात्र नाही. पण भेदभाव स्वच्छ दिसतो. जेव्हा आमचे स्वयंसेवक इथे येऊ लागले तेव्हा मुलांनाही वाटले अरे काही तरी चुकीचे घडतेय. पण मुलांच्या दृष्टीने ‘बाहेरचे’ म्हणवले जाणारे हे स्वयंसेवक जेव्हा मुलांमध्ये मिसळले तेव्हा कुणीही ‘आतला’ किवा ‘बाहेरचा’ राहिला नाही. सगळे जणू एकात्म झालेले होते. प्रेम आणि आत्मीयतेच्या शक्तीसमोर सर्वव्यापक पारंपरिक पूर्वग्रह पत्त्याच्या इमारतीप्रमाणे कोसळून पडले.

आपल्या घरातही जेव्हा अन्य कुणी धार्मिक भेदभावांच्या गोष्टी करते तेव्हा ही मुले त्याला रोकतात आणि त्याची समजूतही काढतात.

आपल्या विद्यार्थ्यांच्या या सांस्कृतिक परिपक्वतेचा सबा यांना सर्वाधिक अभिमान वाटतो.

image


आता मुले ‘लॉर्ड ऑफ दी रिंग्स’ वाचतात आणि टॅरंटिनोचे संवादही ऐकतात. सबा म्हणतात, ‘‘कुणाला अपमानजनक वाटेल, असे काहीही आम्ही शाळेत घडू देत नाही. आमची सेंसरशिप असते. आम्ही वेळोवेळी जे चित्रपट मुलांना दाखवत असतो, ते आम्ही आधी पाहिलेले असतात. सांप्रदायिक सद्भावनेला तडा देणारे तर हे चित्रपट नाहीत ना, याची खात्री आम्ही केलेली असते.

छोट्याशा खेड्यातली ही छोटीशी शाळा मुलांना ते सगळं काही शिकवते, जे दररोजच्या जगण्याशी निगडित आहे. मुलांना संपूर्ण आत्मविश्वासानिशी प्रश्न उपस्थित करायला ही शाळा शिकवते. आपले म्हणणे इतरांसमोर ठामपणे मांडायला शिकवते. सबा म्हणतात, ‘‘अनेकदा तर आई-वडील काही म्हटले आणि मुलांना पटले नाही तर मुले त्यांच्या पुढ्यात आपले प्रश्न टाकतातच टाकतात. आणि मला वाटते हा एक सकारात्मक बदल आहे.’’

त्या पुढे म्हणतात, ‘‘क्रीडा या विषयाकडेही आम्ही गंभीरपणे पाहतो. डोंगराळ भागातल्या चढउतारांमुळे इथली मुले शारीरिकदृष्ट्या मजबूत असतात. २०१४ मध्ये आयोजित फिफा विश्व करंडक स्पर्धेदरम्यान शाळेने इथे एक उपक्रम राबवला. त्याअंतर्गत ८ हजार फूट उंचावरील एक मैदानापर्यंत पायी पोहोचून तिथे आमच्या शाळेतली मुले फुटबॉल खेळली.’’

सबा एक धक्कादायक खुलासा करतात, ‘‘मी कधीही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना शाळांचा दौरा करताना बघितलेले नाही. अधिकाऱ्यांचे सगळे दौरे कागदावर होतात.’’ राज्यातील बहुतांश शाळांची दुरवस्था झालेली आहे आणि जम्मू-काश्मिर सरकारची अनास्था त्याला कारणीभूत आहे, असे सबा यांचे स्पष्ट मत आहे.

खासगी शाळांसाठी तर इथली परिस्थिती म्हणजे अडथळ्यांची एक भलीमोठी शर्यतच आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची एक ठरलेली गती असते. ‘करू’, ‘पाहू’, असे चाललेले असते. टेबलाखालून काही घेतल्याशिवाय तुमचा कागद हे कर्मचारी पुढे सरकवतच नाहीत. सबा म्हणतात, ‘‘राजकीय उलथापालथ होते, तशी शासकीय कार्यवाहीची उलथापालथ होते. कागदं मग कुठे अडकतात आणि कुठे गायब होतात, काही पत्ता लागत नाही.’’

image



गेल्या ८ वर्षांच्या काळात या सुस्त सरकारी कर्मचाऱ्यांशी झगडण्यात आणि त्यांना शिक्षा ठोठावण्यात हाजी पब्लिक स्कूलला वेळोवेळी यश मिळाले आणि यातूनच शाळेच्या सर्वेसर्वा असलेल्या सबा यांचा परिसरातला दबदबाही वाढलेला आहे. सबा यांचे वडील आता या गावचे सरपंचही आहेत. बरीचशी सरकारी कामे आता तेच निस्तरतात.

सबा म्हणतात, ‘‘आम्ही आजही अनेक हास्यास्पद नियमांचे केवळ मजबुरीने पालन करतो. म्हणजे मुलाला तो नापास असूनही नापास करत नाही. सरकार सांगते तसे वरच्या वर्गात पाठवतो. समजा पालकही म्हणत असले, की आमचा मुलगा जर या इयत्तेत अद्याप कच्चा असेल तर त्याला वरच्या वर्गात पाठवू नका, तर आता मग सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारण काय? साक्षरता कागदावर वाढवून उपयोग काय?

नवे मार्ग, नव्या आशा आणि नव्या शक्यता यांची सोबत सबा यांनी सोडलेली नाही. जम्मू-काश्मिरातील तरुण पदवीधरांमध्ये ग्रामीण मुलांबाबत जबाबदारीची भावना सबा यांना रुजवायची आहे. तसे प्रयत्नही त्यांनी सुरू केलेले आहेत. जम्मू-काश्मिरातले पदवीधर तरुण आपल्या राज्यातील खेड्यांतून आणि लहान शहरांमध्ये येऊन इथल्या मुलांना शिकवत आहेत, हे दृश्य म्हणजे सबा यांच्या डोळ्यातील स्वप्न आहे. सबा म्हणतात, ‘‘इथे डॉक्टर आणि इंजिनिअर बनणे हीच सर्वांत मोठी गोष्ट आहे. ठीक आहे ना. तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर होऊन इथल्या लोकांसाठी काही करणार असाल तर तीही चांगलीच गोष्ट आहे.’’ पण नेमकी हीच भावना इथल्या बहुतांश लोकांमध्ये नाही.

सबा पुढे म्हणतात, ‘‘देशभरात कितीतरी चांगली महाविद्यालये आहेत, पण इथले युवक त्यासाठीही परदेशी जाणेच अधिक पसंत करतात. मूलभूत शिक्षणाची स्थिती तर इथे केवळ दयनीय आहे. कुणालाही इथल्या शाळांची पर्वा नाही. बाहेरून इथं येऊन कुणी शाळा काढणे तर दुरापास्त गोष्ट आहे.’’

जम्मू-काश्मिरात काही बरेवाईट घडले तेव्हाच इथल्या बातम्या उर्वरित जगात पसरत असतात. इथे जे काही चांगले घडते आहे, त्याबद्दल कुणी लिहित अगर दाखवत नाही, असे विषयांतर म्हणून सहज म्हटले असता सबा सांगतात, ‘‘खरं पाहिलं तर माध्यमे आणि इथल्या खेड्यांचा काहीही संबंध नाही. मुख्य गोष्ट म्हणजे घटनात्मक दृष्ट्या जम्मू-काश्मिर असे हे राज्य असले तरी जम्मूतल्या लोकांसाठी काश्मिर म्हणजे वेगळीच गोष्ट आहे. आमच्या नजरेने बघाल तर आम्ही राष्ट्राचे प्रहरी आहोत. आमची एक स्वतंत्र संस्कृती आहे. इथे कुठलीही भीती नाही. राजकीय दृष्ट्या आम्ही अस्पृश्य आहोत. मिडियाचे लक्षही आमच्याकडे तेव्हाच जाते जेव्हा सीमावर्ती परिसरांमध्ये काही गडबड होते. निवडणुकीच्या काळात मात्र जम्मू भागात बरीच रेलचेल असते. नवे चैतन्यच जणू इथे अवतरलेले असते. पुढारी आमच्यावर पैसे उडवतात. निवडणुकीत जितका पैसा गावकऱ्याच्या हातात खेळतो, तितका तो एरवी कधीही खेळत नाही. निवडणुकीचा अर्थ काय, असे तुम्ही त्यांना विचारले तर ते सांगतील, की आम्हाला पैसे मिळतात.’’

‘‘तसे पाहिले तर आमचा भाग बहुतांशी शांतच असतो, पण कधीकधी वातावरण तापते तेव्हा भागातील विविध गावांतील सरपंच मंडळी एकत्र जमते व तणाव निवळावा म्हणून प्रयत्न करते. गावकरी आपल्या मोबाईल फोनवर काहीबाही वाचतात आणि मग भयाची भावना पसरते. अफवांचा जन्म होतो. पण अशा स्थितीतही शाळेवर कुठलाही परिणाम होत नाही. एकुणात इथं तशी शांतताच आहे.’’ सबा सांगतात, ‘‘आता समजा बंगळुरूहून एखादा स्वयंसेवक इथं शिक्षक म्हणून आलाय, तर त्याचे आई-वडील चिंतित असतात. इथलं काही तिथे पेपरात वाचले, की फोन करतात. स्वयंसेवक अशा वेळी मजेत म्हणतात, बंगळुरूपेक्षा दोडा जास्त सुरक्षित आहे.’’

काश्मिर खोऱ्यातील बहुतांश परिसरांतून दु:खाचा दंश झाला नाही, असे एक घर नाही. जम्मूतील दोडासारखे काही भाग मात्र अजूनही भयंकर हिंसा आणि त्यातून उद्भवणाऱ्या उलथापालथींपासून सुरक्षित आहेत.

सबा सांगतात, ‘‘मोठाल्या इमारती म्हणजे शाळा असे काही नाही. एखाद्या झाडाखाली बसूनही उत्तम शिक्षण प्राप्त केले जाऊ शकते. चांगले शिक्षक हवेत बस.’’

हाजी पब्लिक स्कूलला मिळणाऱ्या देणग्यांतून आणि फीतून ७० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्ची पडते. पुस्तकांच्या खरेदीवर बाकी खर्च होतो. सबा यांचे काका आणि हाजी अमिना चॅरिटी ट्रस्टचे संस्थापक नासिर हाजी हेच शाळेचे सर्वांत मोठे देणगीदार आहेत. सातवीपर्यंतचे वर्ग या शाळेत भरतात. नंतर पुढील शिक्षणासाठी मुलांना चांगल्या शाळांतून दाखल करणे आणि अशा बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणे, की जेणेकरून पालकांना आर्थिकदृष्ट्या सोयीचे ठरावे, तेही शाळेकडून पाहिले जाते.

image


सध्या गावातील महिला आणि पुरुषांतून निवडलेला एक असा स्टाफ शाळेत आहे. यातल्या बऱ्याच जणांना पूर्वी इंग्रजीचा एक शब्दही बोलता येत नव्हता. अर्थात स्वयंसेवकांसाठीही मुलांना शिकवणे एवढे सोपे नाही. त्यांनाही अध्यापनाचे प्रशिक्षण दिले जाते. बहुतांश स्वयंसेवक तरुण असतात. जेवढा काळ ते शाळेला देतात, आपले सर्वस्व झोकून देतात. सबा म्हणतात, ‘‘मला घरचे रडगाणे ऐकवणारे स्वयंसेवक अजिबात पसंत नाहीत. हवापाण्याच्या तक्रारी करणाऱ्यांना तर मी उभेही करत नाही. आम्ही तुम्हाला जेवण देतो आणि एका राष्ट्रीय कार्याचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध करून देतो, यापलीकडे काही नाही.’’

स्वयंसेवकांना उद्देशून त्या पुढे म्हणतात, ‘‘जर तुम्ही चला आपण एका महिलेची मदत करू म्हणून येणार असला किंवा मग एक थ्रिल म्हणून येणार असाल, आत उसळत असलेले बंड शमवण्यासाठी येणार असलात तर अजिबात इथे येऊ नका. स्वयंसेवकांसदर्भातले एकदोन अनुभव तर फारच वाईट आहेत. अशा लोकांना शेवटी ‘चला निघा इथून’ सांगण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यासमोर नसतो.’’

सबा बंगळुरूला बरीच वर्षे होत्या. दुबईलाही होत्या. एका डोंगराळ भागात आपण शाळा चालवू, असे कधी वाटले होते काय, असे विचारले असता त्या म्हणतात, ‘‘अहो आम्ही खेड्यातलीच माणसं. दोडा शहरात राहण्याचा विचारही आम्ही कधी करत नाही.’’ उदाहरणार्थ सबा यांच्यासाठी ही नवी जागा नाहीच. बंगळुरू आणि दुबईत बरीच वर्षे घालवल्यानंतर इथं शाळा सुरू करणे त्यांच्यासाठी ‘घरवापसी’सारखेच आहे.

सबा म्हणतात, ‘‘माझ्या सगळ्या नातेवाइकांची मुलेच आज माझे विद्यार्थीगण आहेत. ज्यांचा शिक्षणाशी कवडीचा संबंध कधी आला नाही. हे लोक मुलांना शिकवून ते आयुष्यात काहीतरी बनतात का हे पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत, हे मलाच ठाऊक.’’

… आणि हीच एक भावना समुद्रसपाटीपासून ८ हजार फुट उंचावर मुलांना शिकवण्यासाठी सबा यांना प्रोत्साहित करते. त्यांचा उत्साह सेकंदभरही मावळू देत नाही.