‘हमराग’..शास्त्रीय संगीताचा पुनर्जन्म !

भारतीय शास्त्रीय संगीताचं वैभव जगासमोर नव्या रूपात आणणा-या चित्रा श्रीकृष्ण आणि शोभा नारायण

0

ऑस्कर विजेते प्रसिद्ध भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान म्हणतात की संगीत जर शरीर आहे, तर भारतीय शास्त्रीय संगीत आणि त्याची श्रीमंती वाढवणारे राग त्याचा आत्मा आहेत. या रागांशिवाय सुमधुर संगीताची निर्मिती होणं अशक्य आहे.

‘मॉडर्न’ आणि पाश्चात्य संगीताच्या या आजच्या युगात भारतीय शास्त्रीय संगीत लुप्त होण्याची, त्याचं विस्मरण होण्याची धक्कादायक शक्यता निर्माण झालीये. मात्र हीच गोष्ट टाळण्यासाठी दोन भारतीय महिलांनी एक असं पाऊल उचललं, की ज्यामुळे या भारतीय प्राचीन संगीताला नवसंजीवनी मिळाली. एवढंच नव्हे, तर ते थेट सामान्य भारतीयांपर्यंत जाऊन पोहोचलं. या दोन महिलांनी शास्त्रीय संगीतात आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. भारताच्या प्राचीन शास्त्रीय संगीताचं जतन आणि संवर्धन करणा-या त्या आपल्या देशाची अमूल्य अशी संपत्ती आहेत.

असं म्हणतात की, भारतातली प्राचीन संस्कृती आणि परंपरांविषयी जर तुम्हाला खोलवर जाऊन काही जाणून घ्यायचं असेल, तर त्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे इथलं शास्त्रीय संगीत ! कारण इथे मनुष्याच्या जन्मापासून ते थेट मृत्यूपर्यंत म्हटल्या जाणा-या गाण्यांचा प्राचीन इतिहास आहे. या गाण्यांमध्ये तुम्हाला आनंद आणि प्रसन्नता मिळेल. अगदी भली पहाट असो, किंवा मग काळीकुट्ट रात्र, तुम्ही कोणत्याही स्थळ, काळ आणि वेळाचा अंदाज फक्त या गाण्यांचं संगीत आणि त्यात लावलेल्या अनेकविध रागांवरून लावू शकता. आपल्या भारत देशात तर असं म्हटलं जातं, की प्रत्येक १०० किलोमीटरवर पाणी बदलतं, आणि दर १० किलोमीटरवर संगीत. या देशातल्या प्रत्येक भागाला त्याचं स्वत:चं असं स्वतंत्र संगीत आहे आणि त्या संगीताचा स्वत:चा असा स्वतंत्र इतिहासही आहे.

इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणजेच भारतीय शास्त्रीय संगीताविषयी अशी आख्यायिका आहे की यांचा जन्म वेदांपासून झाला. आणि हे वेद आपल्या ऋषीमुनींनी थेट देवांकडून प्राप्त केले होते. शास्त्रीय संगीत विविध प्रकारच्या रागांनी मिळून बनतं. यातला प्रत्येक राग एका विशिष्ट वेळेसाठी, उत्सवासाठी किंवा ऋतूसाठी बनलेला असतो. लांबचंच कशाला, आपल्या सध्याच्या हिंदी गाण्यांमध्येही तुम्हाला भारतीय प्राचीन संगीतातल्या या रागांचा बेमालूमपणे वापर झालेला दिसेल. पण खरी समस्या इथेच आहे. आपल्यासारख्या सामान्य लोकांमधून आपलं हे प्राचीन संगीत आपलं अस्तित्वच गमावत चाललंय. आणि याच समस्येनं आणि संगीताविषयी अगाध प्रेम, भक्तीनं चित्रा श्रीकृष्णा आणि शोभा नारायण या दोन महिलांना प्रेरित केलं. अंस काहीतरी करण्यासाठी ज्यामुळे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेलं हे प्राचीन शास्त्रीय संगीत सामान्यांपर्यंत अगदी सहज पोहोचू शकेल. आणि तेही एका नव्या अनुभूतीसह, नव्या आविष्कारासह. आणि याच प्रेरणेतून जन्म झाला ‘हमराग’चा !

भारतीय शास्त्रीय संगीताचा पुनर्जन्म
भारतीय शास्त्रीय संगीताचा पुनर्जन्म

चित्रा श्रीकृष्ण या दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत अर्थात कार्नेटीक म्युझिकमध्ये पारंगत आहेत. लहानपणापासून, म्हणजे अगदी पाच वर्षांच्या असल्यापासून त्यांनी संगीत शिक्षणाला सुरुवात केली होती. महाविद्यालयात अनेक प्रसंगी त्यांनी त्यांच्या संगीत कलेचं सादरीकरणही केलं. जगातल्या काही नामवंत आणि पारंगत संगीतकार शिक्षकांकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले. सध्या त्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये विविध विषयांवर लेखन करतात. तर दुसरीकडे शोभा नारायण एक प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्याचबरोबर त्या ‘मान्सून डायरी’ या नावाजलेल्या पुस्तकाच्या लेखिकाही आहेत. या पुस्तकाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. शोभा नारायण अनेक साप्ताहिक आणि वर्तमानपत्रांमध्ये लेखन करतात.

या दोघींचंही शास्त्रीय संगीतावर जीवापाड प्रेम आहे. आणि त्यांच्या याच प्रेमाने ‘हमराग’चा भरभक्कम पाया रचला. त्याचा मूळ हेतू सार्थ ठरवण्यात मोलाची भूमिका बजावली. ‘हमराग’चा हेतू सध्याच्या प्रचलित संगीतामधून प्राचीन भारतीय राग शोधून त्यांना लोकांसमोर एका नव्या स्वरूपात मांडणं हा होता. किंवा दुस-या शब्दांत याला असंही म्हणता येईल की सध्याच्या संगीताचा आत्माच एका नव्या स्वरूपात लोकांसमोर ठेवण्याचं काम ‘हमराग’ करते.

चित्रा सर्वप्रथम एखाद्या प्रचलित संगीतामधून प्राचीन शास्त्रीय राग शोधून काढतात, आणि त्यावर आधारित एक शास्त्रीय गाणं स्वत:च्या आवाजात गातात. तर दुसरीकडे शोभा एखाद्या कसलेल्या सूत्रसंचालकाप्रमाणे, किंवा कथाकाराप्रमाणे ते गाणं, राग आणि त्याभोवतीचं सर्वकाही एका कथेच्या किंवा कवितेच्या माध्यमातून लोकांसमोर मांडतात. शोभा नारायण सांगतात की राग हे भारतीय शास्त्रीय संगीताचं महत्त्वपूर्ण अंग आहे. यात चार ते पाच स्वरांचा समावेश होतो, आणि त्यांच्या बेमालूम साखळीतून एक धुन अर्थात संगीत तयार होतं.

शास्त्रीय संगीत लुप्त न होऊ देण्याचा निर्धार
शास्त्रीय संगीत लुप्त न होऊ देण्याचा निर्धार

भारतीय शास्त्रीय संगीतात अशा शेकडो, हजारो, लाखो धुन तयार केल्या आहेत, ज्यात विभिन्न प्रकारचे राग आपल्याला ऐकायला मिळतील. हिंदी चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या रागांमधून सुप्रसिद्ध गाणी तयार झालेली पहायला मिळतात. उदाहरणच द्यायचं झालं, तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला प्रसिद्ध सिनेमा ‘देवदास’मध्ये ‘काहे छेड छेड मोहे’ हे गाणं आहे. हे गाणं शास्त्रीय संगीताच्या वसंत रागातून गायलं गेलंय. किंवा मग आणखी एक गाजलेला सिनेमा ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये ‘अलबेला सजन आयो रे’ हे गाणं शास्त्रीय संगीताच्या भैरव आणि अहिर या रागांचं मिळून बनलंय.

‘हमराग’च्या माध्यमातून एक अनोखी आणि विलक्षण प्रक्रिया लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे आपल्याला सध्याच्या गाण्यांमधल्या प्राचीन शास्त्रीय संगीताविषयीच माहिती मिळते असं नाही, तर त्याच्याशी संबंधित अनेक नवीन गोष्टीही आपल्याला माहिती होतात.

तसं पाहिलं तर ‘हमराग’ची अजून सुरूवातच आहे हे खरं आहे. पण ‘हमराग’च्या माध्यमातून रसिकांना शास्त्रीय संगीत, भक्तीगीत, लोकगीत या संगीत प्रकारांचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळते हेही तितकंच खरं आहे. एवढंच नाही तर कविता आणि कथेच्या रूपात सादर होणारे संगीत प्रकार रसिकांना अधिकच आकर्षक आणि नाविन्यपूर्ण वाटतात.

‘हमराग’नं आपलं पहिलं जाहीर सादरीकरण २०१४ च्या मार्च महिन्यात केलं. बंगळुरुच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये. ज्याला रसिक प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. रसिकांकडून मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शोभा आणि चित्रा या दोघींनाही प्रेरणा मिळाली. ‘हमराग’ची सुरुवात २०१४ च्या सप्टेंबर महिन्यात झाली. आणि आत्तापर्यंत त्यांनी देशाच्या विविध भागांमध्ये आपली कला सादर केलीये. प्रत्येक ठिकाणी रसिकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळालं, कौतुकाचा वर्षाव झाला. आत्तापर्यंत ‘हमराग’ने मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि पुण्यात कार्यक्रम केले आहेत आणि त्यांच्या या कार्यक्रमांना रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय.

Related Stories

Stories by Pravin M.