ज्या समाजाने वाळीत टाकले त्याच समाजाच्या रोल माॅडेल बनल्या सुशीला कठात

0

समाजातील मुलभूत अंगांचा विचार करता अनेक लोक सत्याच्या मार्गावर चालण्यास सहजता अनुभवत नाही. त्यांना याचा अंदाज असतो की हा मार्ग नवीन नसला तरी सोपा नक्कीच नाही. गर्दीत स्वतःची ओळख विसरण्याची भीती वाटते. म्हणून असे लोक आपला वैयक्तिक मार्ग स्वतः निवडतात, सहाजिकच अशावेळी त्यांना अनेक अडचणींना सामोरे जाऊन समाजातील नामुष्की पत्करावी लागते. पण असे लोक त्यांच्या यशाने प्रशंसेस पात्र ठरतात. जर समाजाविरुद्ध लढण्याची कुणी हिंमत दाखवली तर समस्या अजून नाजूक बनते पण अशा परिस्थितीत वाटचाल करून यश मिळण्याचा आनंद अनेक पटींनी जास्त असतो.

२९ वर्षीय सुशीला कठात यांचे लग्न वयाच्या ५ व्या वर्षी झाले. पण जशी सुशीला सज्ञान झाली, तेव्हा त्यांनी आपल्या लग्नाविरुद्ध समाजाशी बंड पुकारले म्हणून पूर्ण समाजाने सुशीलाच्या कुटुंबाला वाळीत टाकले. त्याच सुशीला आज समाजासाठी रोल मॉडेल बनल्या आहे. प्रथमच कठात समाजातील एक रिक्षाचालक अहमद कठात यांची मुलगी सुशीला या राज्यस्थान सरकारच्या पोलिस विभागात सब इन्स्पेक्टरच्या पदावर कार्यरत आहेत.

राज्यस्थानच्या १२ लाख लोकसंख्या असलेल्या कठात समाजातील कोणतीही स्त्री ही शिक्षित नाही. राज्यस्थानच्या अजमेर,पाली व भिलवाडा जिल्यात स्थायीक असलेले कठात समाजातील सगळे लोक रिती-रिवाज हिंदू धर्मानुसारच पार पाडतात, पण मानतात इस्लाम धर्माला. प्रेताचा अग्नी संस्कार करण्यापासून ते हिंदूंचे सगळे सणवार साजरी करतात पण नमाज पठणाला महत्व देतात. इथे मुलीचे लग्न हे बालवयातच केले जाते, म्हणूनच कोणतीही मुलगी शाळेत जात नाही. पण याच समाजातील लासडिया गावातील सुशीला यांनी सासरी जाण्याऐवजी जवळच्याच शहरातील शाळेत जाण्याचा निर्णय घेतला. सुशीला सांगतात की, "आम्ही सात बहिणी, आईची इच्छा आम्हाला खूप शिकवण्याची होती. पण हे सोपे नव्हते. मी गावातील व समाजातील पहिली मुलगी होती जिने शाळेत जाण्यास प्रारंभ केला".

सुशीला राज्यस्थान पोलीस अॅकॅडमी मधून १४ महिन्याचे पोलीस प्रशिक्षण घेऊन पोलीस सब इन्स्पेक्टर बनल्या. सुशीला यांच्या या यशाला बघण्यासाठी त्यांची आई ह्यात नव्हती, सहा महिन्यांपूर्वीच त्यांचे देहांत झाले, पण मुलीचे यश बघून वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता. पासिंग परेडच्या दिवशी ट्रक्टर भाड्याने घेऊन पूर्ण गावाला पोलीस अॅकॅडमी मैदानावर ते घेऊन आले.

३००० लोकसंख्या असलेल्या लासडिया मध्ये कठात समाजाचे ३५० घरे आहेत. सुशीला यांचे वडिल अहमद हे रिक्षा चालवून तर आई शेत मजुरी करून ही दोघेही आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसा जोडत होते. वडिल अहमद सांगतात की, "सुशीलाच्या या यशाने कठात समाजाचे भाग्य बदलले आहे. आता लासडिया गावातील सगळ्या मुली शाळेत जावू लागल्या आहे. मी गावक-यांना सांगू इच्छितो की शिक्षणाने किती प्रगती होते".

सुशीलच्या अन्य बहिणी सुद्धा आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत तर काही शिकत आहे. आपल्या बहिणींच्या आठवणीनी सुशीलाचे डोळे पाणावतात की कशा प्रकारे शिक्षणासाठी शेजारील गावात व उच्च शिक्षणासाठी ब्यावर शहरात जावे लागायचे. या सगळ्यात आईची त्यांना मोलाची साथ मिळाली.

सुशीला आपल्या समाजातील पहिली मुलगी आहे, ज्यांनी शहरात जाऊन पदवी व पदव्यूत्तर शिक्षण संपादन करून एम.फिल व यूजीसी नेटची परीक्षा पास केली. सुशीला यांचा उद्देश हा समाजातील बाल विवाहाच्या प्रथेला मिटवण्याचा आहे. सुशीला सांगतात की, "माझा हाच प्रयत्न असेल की कोणत्याही वडिलांनी आपल्या मुलीचा बालविवाह करू नये. जर ही परंपरा संपुष्टात आली तर समाजातील अनेक मुली ह्या यशाचे शिखर गाठतील".

सुशीला यांना पहिली नेमणुक भिलवाडा ठाण्यात मिळाली, जिथे कठात समाजातील अनेक गावे आहेत, म्हणूनच त्यांनी आपल्या कामाची सुरवात इथूनच केली आहे.    

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

महिला सशक्तीकरणाचे दमदार उदाहरण म्हणजे उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्हा 

तगड्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकत गावाचा विकास साधणाऱ्या छवी राजावत   

रक्तदानातून मानवसेवेचे व्रत चालवणाऱ्या वंदना सिंह

लेखिका : रिम्पी कुमारी
अनुवाद : किरण ठाकरे