सर्व संकटांचा सामना करुन आपले स्वप्न साकारणारा प्रतिभावंत खेळाडू

सर्व संकटांचा सामना करुन आपले स्वप्न साकारणारा प्रतिभावंत खेळाडू

Sunday November 15, 2015,

4 min Read

ज्यांना आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी वाटेत येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करणे माहिती असते त्यांच्यापासून यश जास्त काळ दूर राहत नाही. मृणाल भोसले याला जानेवारी २०१५ आयुष्यभर लक्षात राहील. कारण हीच ती वेळ होती जेव्हा अनेक संकटांवर मात करुन अथक प्रयत्नाअंती मृणालचे स्वप्न साकार झाले होते. जानेवारी २०१५ मध्ये नागपूरला झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत मृणालने कांस्य पदक जिंकले. विशेष म्हणजे या स्पर्धेपूर्वी मृणालचा अपघात झाला होता. या अपघातामुळे मृणालच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक आला होता. त्यातच त्याला ट्रेनिंगची सुविधाही मिळत नव्हती आणि आर्थिक स्थितीही जेमतेम होती. मात्र मृणालने या सर्व संकटांचा धीराने सामना करत राष्ट्रीय स्तरावर हे यश प्राप्त केले.

image


पदक मिळविल्यानंतर मृणालला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले. आज मृणाल त्याच्या दैनंदिन गरजांसाठी संघर्ष करित आहेत. मृणालच्या परिवारात सहा सदस्य आहेत. त्याचे वडिल सेनेच्या एका वर्कशॉपमध्ये मजूर आहेत, तर आई घरकाम करते. त्याला दोन बहिणी आहेत ज्यातील एकीचे लग्न झालेले आहे आणि दुसरीला नुकतीच पोलीस खात्यात नोकरी लागली आहे. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असूनही मृणालने आपल्या स्वप्नांचा पिछ्छा सोडला नव्हता. आता ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे.

मृणाल सांगतो की लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला शाळा सुटल्यानंतरच्या मोकळ्या वेळेत क्रीडा किंवा इतर क्षेत्रावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्याने क्रीडा क्षेत्र निवडले, मात्र खेळासाठी लागणारे महाग साहित्य खरेदी करण्याची त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नव्हती. याच दरम्यान मृणालच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याला बॉक्सिंग करताना पाहिले आणि त्याला बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला. कारण खर्च कमी आणि चांगले करिअर करण्याची संधी यामध्ये होती. वयाच्या १२ व्या वर्षापासून मृणालने करिअर करण्याच्या दृष्टीने बॉक्सिंग खेळायला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच मृणालने ट्रेनिंग कॅम्प्समध्ये सहभागी व्हायला आणि खेळाडूंबरोबर ओळखी वाढवायला सुरुवात केली. या दरम्यान त्याच्या लक्षात आले की या खेळात नाव कमविण्याची चांगली संधी आहे.

आता त्याच्यासमोर ध्येयापर्यंत पोहचण्याचा सरळ मार्ग होता. त्यासाठी तो रात्रंदिवस खूप सराव करायचा. मात्र २००८ साली एका रस्ते अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याचे काही काळासाठी या खेळाशी नाते तुटले. २०१० मध्ये जेव्हा तो पुन्हा रिंगणात परतला तेव्हा ज्युनिअर स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे वय त्याने ओलांडले होते. आता त्याला त्याचे भविष्य अंधःकारमय दिसू लागले होते. तेव्हा त्याची भेट २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धांमधील सुवर्ण पदक विजेता मनोज कुमार आणि देशाला बॉक्सिंगमध्ये पहिले पदक मिळवून देणाऱ्या विजेंदर सिंहशी झाली. त्यांनी मृणालला केवळ खेळण्याची प्रेरणाच दिली नाही तर त्याला योग्य मार्गही दाखविला. त्यांना भेटल्यानंतर मृणालने सिनीअर स्तरावर का होईना पण पुन्हा रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

मृणालने पदक मिळविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. त्याने केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिकरित्याही पदक मिळविण्याचा ठाम निश्चय केला होता. त्याला विश्वास होता की ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला सरकारी नोकरी मिळू शकते, जी त्याच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणेल. त्याने तासंतास सराव करणाऱ्या रेल्वेच्या टीमला पाहिले होते. त्यांना पाहून प्रेरित झालेल्या मृणाललाही त्याचपद्धतीने सराव करायचा होता. यापूर्वी जेव्हा जेव्हा मृणालने सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता तेव्हा तेव्हा त्याला त्याचे वय जास्त असल्याचे सांगितले जायचे. मात्र आता पदक जिंकल्यानंतर सरकारी नोकरी मिळण्याच्या त्याच्या आशा वाढल्या आहेत. जेव्हा की तो अजूनही नोकरीच्या शोधात आहे. मृणाल लवकरच स्नातक पदवी प्राप्त करणार आहे, कारण तो जाणतो की कोणत्याही नोकरीसाठी पदवीसुद्धा तितकीच गरजेची आहे. मृणाल सांगतो, “ जेव्हा परीक्षा असते तेव्हाच सामने येत असल्यामुळे परीक्षा देणे शक्य होत नाही.” आपल्या सिनिअर्सकडून खेळाबाबत वाहवा मिळविलेल्या मृणालला शिक्षणाबाबत कुठलीही तडजोड मान्य नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची त्याची इच्छा आहे.

मृणाल सांगतो, “देशामध्ये क्रिकेटप्रमाणे इतर खेळांना प्रोत्साहन मिळत नाही. आयपीएलमध्ये खूप पैसा आहे. इथे प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळते. जे टीम बनवतात ते खेळत नाहीत, पैसे कमवतात. हे चित्र बॉक्सिंगमध्ये पहायला मिळत नाही.” मृणाल पुढे सांगतो की बॉक्सिंग खेळणारे खेळाडू जास्त ते गरीब घरांमधून आलेले असतात. दीर्घ काळ खेळण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो. सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि अशा गरीब खेळाडूंची आर्थिक मदत करायला पाहिजे. देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकू शकतील अशा प्रतिभावान खेळाडूंची देशात कमतरता नाही.”

मृणाल सांगतो की अनेक खेळाडूंनी हा खेळ मध्येच सोडून देण्यामागे तीन कारणे असतात. एक म्हणजे सुविधांचा अभाव, दुसरे म्हणजे आर्थिक स्थिरतेचा अभाव आणि दुखापतीनंतर येणारा खर्च. मृणालच्या खांद्याला दुखापत होऊनही तो आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करित राहिला कारण त्याने त्याच्या प्रशिक्षकांच्या मृत्यूनंतर त्यांना या पदकाच्या रुपात श्रद्धांजली अर्पण करण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर त्याने आपल्या सिनिअरकडून बॉक्सिंगचे धडे गिरविले. आज मृणाल फावल्या वेळात छोट्या मुलांना प्रशिक्षण देतो. आता त्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आपली ओळख बनविली आहे. त्याला वाटते की जे काम मनोज कुमारने त्याच्यासाठी केले ते काम आता त्याने दुसऱ्यांसाठी करावे.

मृणाल ज्या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे, भविष्यात त्याच ठिकाणी त्याने इतरांना शिकवावे हे त्याच्या प्रशिक्षकांचे स्वप्न पूर्ण करण्याची मृणालची इच्छा आहे. मृणालला आपले स्वप्न साकार करण्यासाठी प्रायोजकांची आवश्यकता आहे. सध्या मिलाप नावाची संस्था मृणालला खेळावर कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी पैसे जमा करीतआहे.

    Share on
    close