निश्चलिकरणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका कॅशलेस होतील- राज्यपाल

0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिकाधिक मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. ती देशभरातील निवडणुकांसाठी मार्गदर्शक ठरतील, असे गौरवोद्‌गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.

 सह्याद्री अतिथिगृहात राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार जागृतीसाठीच्या बोधचिन्हाचे (Mascot) अनावरण, ‘कॉप’ मोबाईल ॲप व ‘मिस्ड कॉल’ सुविधेची सुरुवात; तसेच ‘निवडणूक वार्ता’च्या विशेषांकाचे प्रकाशन मा. राज्यपाल यांच्या हस्ते व राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते.

निश्चलिकरणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका कॅशलेस होतील, असा विश्वास व्यक्त करून मा. राज्यपाल म्हणाले की, या निवडणुकांमध्ये प्रथमच आयकरसह विविध विभागांना सहभागी करण्यात आले आहे. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल. शिवाय निवडणूक प्रक्रिया लोकाभिमूख करण्याचा आयोगाचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे; परंतु शहरी भागातील मतदानाचे प्रमाण कमी असणे ही चिंतेची बाब आहे. त्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

राज्य निवडणूक आयोगाने विविध नावीन्यपूर्ण बाबींचा अवलंब करून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी संगणकीय व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे असे  सहारिया यांनी सांगितले.


मतदार जागृतीसाठी ‘वोटरमित्रा’

राज्यातील 10 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा व 283 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 16 व 21 फेब्रुवारी 2017 रोजी होणार आहेत. या निवडणुकांत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार जागृतीकरिता बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी या बोधचिन्हाचा सोशल मीडियावर ॲनिमेशनच्या स्वरूपात वापर करण्यात येणार आहे. सोशल मीडियाद्वारे ध्वनिचित्रफिती, जाहिराती, मान्यवरांचे आवाहन, घोषवाक्य आदींच्या  माध्यमातून मतदार जागृती करण्यात येणार आहे.

‘मिस्ड कॉल’ व ‘चाटबॉट’

मतदान करण्यासाठी प्रतिज्ञा करावयाची असल्यास मतदारांनी 9029901901 या क्रमांकावर ही मिस्ड कॉल करावा. हा मिस्ड कॉल म्हणजे संबंधित मतदाराने प्रतिज्ञा केल्याचे समजण्यात येईल. त्यानंतर मतदाराला लघु संदेश (एसएमएस) पाठविण्यात येईल. त्यात लिंकचा समावेश असेल. या लिंकवर गेल्यावर ‘महावोटर’ नावाने फेसबुकवर ‘चाटबॉट’ सुविधा उपलब्ध होईल. त्यावर मतदारांना विविध प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यात मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, मतदानाचा दिनांक, उमेदवारांसंदर्भातील माहिती आदींचा समावेश असेल.

राज्य निवडणूक आयोगाच्या या उपक्रमात बॉट तंत्रज्ञान विकसित करणारी जगप्रसिद्ध गपशप कंपनी, निवडणुकांसंदर्भात कार्यरत असलेली ऑपरेशन ब्लॅक डॉट ही स्वयंसेवी संस्था, सर्व घटकांत लोकप्रिय असलेली फेसबुक कंपनी, विविध विद्यापीठे व महानगरपालिका सहभागी झाल्या आहेत. तरूण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये हा उपक्रम अधिक लोकप्रिय होऊ शकतो. चाटबॉटच्या माध्यमातून मतदारांशी सुसंवाद साधला जाईल. निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण सक्रीय सहभागी असून मतदान करणे आवश्यक आहे, याची जाणीव या उपक्रमाच्या माध्यमातून मतदारांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

‘कॉप’ मोबाईल ॲप

महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी ‘कॉप’ (Citizens On Patrol) या मोबाईल ॲपचा वापर केला जाणार आहे. या ॲपच्या नावातच जनतेची गस्त किंवा नजर असा आशय समावला आहे. या ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारही निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवू शकतात. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी घटनेच्या ठिकाणावरून तात्काळ अत्यंत सुलभ व सहज पद्धतीने करता येतील. प्रचाराच्या कालावधीत काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो ॲपद्वारे तात्काळ निवडणूक यंत्रणांच्या निदर्शनास आणून देता येईल. त्यानंतर निवडणूक संनियंत्रण समिती त्यावर योग्य ती कार्यवाही करेल. या ॲपद्वारे तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था आहे.

‘निवडणूक वार्ता’चा विशेषांक

राज्य निवडणूक आयोगातर्फे ‘निवडणूक वार्ता’ नावाने सहामाही गृहपत्रिका प्रकाशित केली जाते. या गृहपत्रिकेच्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूक विशेषांकाचेही मा. राज्यपाल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यात निवडणुकांची तयारी, आचारसंहिता, निवडणूक खर्च, स्वेच्छा निधीचा वापर, मतदार जागृती आदींचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. या निवडणुकांची पूर्वपीठिकाही यात दिली आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा मागोवा आणि निकालही यात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रथमच राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचीही सचित्र माहिती या अंकात दिली आहे. (सौजन्य : महान्युज)