English
 • English
 • हिन्दी
 • বাংলা
 • తెలుగు
 • தமிழ்
 • ಕನ್ನಡ
 • मराठी
 • മലയാളം
 • ଓଡିଆ
 • ગુજરાતી
 • ਪੰਜਾਬੀ
 • অসমীয়া
 • اردو

बंजारा समाजाच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करणारे 'मित्तल पटेल'

आपण कधी चाकुला धार करणाऱ्या माणसाला भेटलात किंवा दोरीवर चालणाऱ्या एखाद्या कलाकाराला बघितले किंवा कधी गारुड्याच्या खेळात सामील झालात का? आज भलेही काळाच्या ओघात अशा वल्ली कमी झाल्यात, पण आपला विश्वास बसणार नाही की आपल्या देशातल्या अशा लोकांची संख्या करोडोंमध्ये आहे, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची ओळख पण नाही. भारतातल्या सर्व सामान्य नागरिकांना ज्या सुख सोयी उपलब्ध आहे हे लोक त्या पासून दुरापास्त आहेत. ही जमात म्हणजे खानाबदोश (घरदार नसलेली ) किंवा बंजारा(वंजारी) या नावाने ओळखली जाते. गुजरातच्या अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या मित्तल पटेल या त्यांच्या हक्काच्या अधिकारासाठी आज लढत आहे. मित्तल पटेल या पत्रकारितेबरोबर युपीएससीच्या परीक्षेची तयारी पण करत होत्या. आज त्या बंजारा समुदायाच्या लोकांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्नच करत नाही तर त्यांच्या विकासासाठी नवीन आशेचा किरण दाखवत आहे.


मित्तल पटेल या पत्रकारितेच्या अभ्यासादरम्यान योगायोगाने अशा लोकांच्या संपर्कात आल्या. त्यांच्या माहिती प्रमाणे एकट्या गुजरात राज्यात २८ भटक्या जाती आहेत, उलट १२ अशा जाती अजून आहे ज्यांचा सरकारी खात्यात उल्लेख पण नाही. सदैव फिरस्तीवर असल्या कारणाने त्यांना सगळ्यात मोठे संकट होते ते म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाची ओळख. यांच्या जवळ आयकार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट यापैकी काहीही नव्हते.


कारण वर्षानुवर्षे ते एका गावाहून दुसऱ्या गावाला स्थलांतरीत होत असतात.कामाच्या अनिश्चिततेमुळे आणि सततच्या भटकंतीमुळे या लोकांना कायमस्वरूपी निवासस्थान उपलब्ध नाही. प्रारंभी मित्तल पटेल यांनी भटक्या जमातींसाठी काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संघटना आणि सरकारला त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विनंती केली. पण समस्येच्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्यांनी स्वतःच या क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला. त्यानंतर त्यांनी ‘विचरता समुदाय समर्थन मंच’ ची स्थापना केली. संस्थेच्या सुरवातीपासूनच बंजारा जमातीच्या लोकांच्या समस्या निवारण्यासाठी सन २००७ साली गुजरातचे तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून त्यांना जाणीव करून दिली की, अशा लोकांसाठी व्होटर आयकार्ड किती गरजेचे आहे. त्यानंतर आयोगाने त्यांच्या या प्रस्तावास संमती दिली. अशा प्रकारे त्यांनी २०,००० पेक्षाही जास्त भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांचे व्होटर आयकार्ड बनविले.


मित्तल पटेल यांच्या माहिती नुसार बऱ्याच लोकांना त्यांच्या कामाची कल्पना नव्हती. त्यांच्या माहितीप्रमाणे या जमातीचे लोक वर्षभर भटकंती करीत असतात पण पावसाळ्यात ते कोठेही फरत नाही. ते दरवर्षी आपुलकीने त्यांचे स्वागत करणाऱ्या गावात आश्रय घेतात. निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास ही गोष्ट आणली की या मौसमात दरवर्षी ज्या गावात त्यांचा मुक्काम असतो तोच त्यांचा स्थायी पत्ता समजावा. या प्रकारे गावात मिळणाऱ्या प्रत्येक सवलतींचे ते पण भागीदार झाले. अशा प्रकारे या लोकांना फक्त व्होटर आयकार्डच नाही तर रेशनकार्ड, इतर सरकारी योजनांचा पण लाभ झाला. आतापर्यंत मित्तल पटेल यांनी ७२,००० पेक्षा जास्त लोकांना व्होटर आयकार्ड बनवायला मदत केली. तसेच कँपचे आयोजन करून ५०० खानाबदोश लोकांचे व्होटर आयकार्ड बनविले.


पण एवढ्यावरच आपली जबाबदारी न संपविता मित्तल पटेल यांनी त्यांच्या विकासाची कास धरली. त्यांनी आपली संस्था ‘विचरता समुदाय समर्थन मंच’ च्या तर्फे अशा जागेवर तंबूतील शाळा सुरु केली की जिथे या जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर होती. आज गुजरात मध्ये यांची संस्था १३ ठिकाणावर तंबूतील शाळा चालवीत आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज गुजरात च्या ४० भटक्या जमाती पैकी १९ जातीतील मुलांनी प्राथमिक शिक्षण घेण्यास सुरवात केली आहे. या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था आहे.


भटकी जमात एका जागेवर स्थिर रहात नसतील तर त्यांची मुले एका जागेवर राहून शिक्षण कसे घेऊ शकतील ? या प्रश्नाचे उत्तर देतांना मित्तल पटेल सांगतात की,’भटक्या समाजातील लोकांची आपल्या मुलांना शिकवण्याची इच्छा असते पण आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे व भटकंतीमुळे त्यांना हे शक्य नाही. या समस्येवर तोडगा काढत त्यांनी सौराष्ट्र, अहमदाबाद, राजनपूर या ठिकाणी वसतीगृह सुरु केले. जिथे आज ७०० मुले राहत आहेत. भलेही त्यांचे आई वडील वर्षभर भटकत असले तरी त्यांची मुले येथे स्थिर राहून शिक्षण घेत आहेत. याच बरोबर मित्तल पटेल यांच्या निदर्शनास आले की, ‘पिढ्यानपिढ्या हा समाज एकाच प्रकारचे काम करीत आला आहे, जे आज काळानुसार पडद्या आड गेले आहे त्यामुळे रोजगार हमीचे एक नवीन संकट यांच्या समोर उभे ठाकले आहे. त्यामुळे या समाजातले लोक भीक मागून उदरनिर्वाह करतात. या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्यांनी या लोकांना व्होकेशनल ट्रेनिंग दिली. त्यांच्या प्रयत्नाने आता पर्यंत ३०० लोकांनी हे ट्रेनिंग घेतले. बंजारा समुदायच्या लोकांना कुणाच्या हाता खाली काम करणे पसंत नाही, म्हणून बऱ्याच लोकांनी व्होकेशनल ट्रेनिंग घेतले नाही. त्यांच्याशी चर्चेनंतर एक गोष्ट जाणवली की, त्यांना स्वतःचे काम करणे जास्त आवडते. या घटनेचा विचार करून मित्तल पटेल व त्यांच्या टीम ने बंजारा समुदायाच्या लोकांना रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी व्याज मुक्त कर्ज देण्याचे काम सुरु केले. या प्रकारे या लोकांनी चहाचे दुकान सुरु केले, भाजीपाला विक्री तसेच बांगड्या-टिकल्या विकण्याचे काम सुरु केले. मग उंट गाडी विकत घेण्यासाठी कर्ज घेतले की जेणे करून ते स्वतःच्या सामानची ने आण करू शकतील. या कामांची त्यांना आवड निर्माण झाली. मार्च २०१४ पासून आता पर्यंत ४३० बंजारा जमातींसाठी त्यांनी कर्जाचा प्रस्ताव मंजूर केला. त्यांना साडे तीन हजार पर्यंत ते ५० हजार पर्यंत कर्ज मंजूर केले जाते. आता पर्यंत ६५ हजार रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे आणि कर्जाचा हप्ता हा त्यांच्या कामाच्या स्वरूपावरून ठरविण्यात येतो.


एका निरीक्षणाच्या अनुमानाने एकट्या गुजरात मध्ये ६० लाख लोकसंख्या ही भटक्या जमातीची आहे. अशामूळे त्यांच्या रहात्या घराची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान होते. पण मित्तल पटेल व त्यांची टीम त्यांना तांत्रिकदृष्ट्याच नाही तर आर्थिकदृष्ट्या पण मदत करीत आहेत. या जमातीतील ज्या लोकांना सरकारकडून जमीन दिली जाते तिथे त्यांच्या घरासाठी आर्थिक मदत पण करतात आणि गरज पडल्यास बँकेतून सुद्धा कर्जाची सोय करतात.


मित्तल टीमचा यशस्वी प्रयत्न म्हणजे आजमितीला त्यांनी २६५ निवासी घर बनविले आणि ३०० घरांचे काम पुढे चालू आहे. आज गुजरातच्या ९ जिल्यात बंजारा समाजाच्या विकासासाठी मित्तल पटेल व त्याची टीम यशस्वी काम करीत आहे.

Website : www.vssmindia.org

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे

This is a YourStory community post, written by one of our readers.The images and content in this post belong to their respective owners. If you feel that any content posted here is a violation of your copyright, please write to us at mystory@yourstory.com and we will take it down. There has been no commercial exchange by YourStory for the publication of this article.

Related Stories

Stories by Team YS Marathi