सोनू निगम यांचा खटला मी लढण्यास तयार : मोहमद अली. ‘नेक दिल’ बाबूभाईंच्या कार्याला सलाम!

सोनू निगम यांचा खटला मी लढण्यास तयार : मोहमद अली. ‘नेक दिल’ बाबूभाईंच्या कार्याला सलाम!

Monday April 24, 2017,

4 min Read

कोणत्या तरी उद्दीष्टासाठी जगणारी माणसे आज विरळाच होत चालली आहेत. प्रवाहाच्या विरोधात ध्येयासाठी लढतानाही असामान्य हिंमत असावी लागते. त्यासाठी स्वत:ला नीट ओळखायला हवे. ६६वर्षांचे बाबूभाई म्हणजेच मोहमद अली खान असेच गृहस्थ आहेत, जे एका ध्येयासाठी जीवन पणाला लावत आहेत. त्यांचे ध्येय आहे लोकांना ख-या इस्लाम धर्माची ओळख करून देणे. मशिदींवर अजानसाठी कर्णे लावले जावू नयेत यासाठी गेली २४ वर्षे ते लढा देत आहेत. पार्श्वगायक सोनू निगमने याबाबत समूह संपर्क माध्यमातून वक्तव्य केल्यानंतर यावर देशभरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बाबूभाई त्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. इस्लामच्या ख-या शिकवणूकीसाठी आपला जीव गेला तरी चालेल, असे बाबूभाई सांगतात. त्याच्याशी केलेल्या बातचितीचा हा सारांश:

हा लढा आपण सुरू केला आहे, पण याचा शेवट काय अपेक्षित आहे? या पहिल्याच प्रश्नाला ते म्हणतात, “ हे पहा हे ईश्वराचे खुदाचे काम आहे त्याचा आशिर्वाद कायम माझ्यावर राहू दे आणखी काय? हे प्रामाणिकपणाचे काम माझ्या हातून होवो बस.” असे ते म्हणाले. मुस्लिम असून आपण मशिदींवरच्या कर्ण्याविरुध्द का लढत आहात, याचे आपल्या धर्मियांनाही आश्चर्य वाटले आहे या प्रश्नावर ते म्हणाले की, “यात आश्चर्य वाटायचे कारण नाही मी जे काही करतो आहे ते धर्माचेच काम आहे, कुणीही मला येवून दाखवावे की इस्लाममध्ये कुठे लिहिले आहे की अजानच्ता वेळी मोठ्या आवाजाचे कर्णे लावले पाहिजेत. इस्लाम हा १४शे वर्ष जूना धर्म आहे, पवित्र कुरान शरिफ मध्ये देखील नमाज कशी अदा करावी याची माहिती दिली आहे. ठिक आहे आता काही सामाजिक बदल अपेक्षित असतील तरी मशिदींवर मोठ्या आवाजाचे कर्णे लावणे धर्माच्या सुसंगत नाहीच. या कर्ण्याने बाकी धर्माच्या लोकांना त्रास होत असेल तर तर ते इस्लाममध्ये कसे बसू शकेल हेच मला समजत नाही. आमच्या कुरान आणि आयात यामध्ये या कर्ण्याला काहीच स्थान नाही” असे त्यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ सोनू निगम यांचा प्रतिवाद तुम्ही मान्य करता का असे विचारता ते म्हणाले की, “अर्थातच, मी शंभर टक्के त्यांच्या मताशी सहमत आहे, त्या मुलाने चूक आहे त्याला चूक म्हणून म्हणायची हिंमत दाखवली आहे. त्याचे मी कौतूक करतो. हा धर्माच्या पलिकडे पाहण्याचा विषय देखील आहे. कुणी त्याचे समर्थन करो किंवा न करो, मी मात्र त्याची साथ देण्यास तयार आहे. त्यासाठी कायदेशीर लढा द्यावा लागला तरी चालेल.” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की , “ त्या मुलाने काहीच चुकीचे सांगितले नाही, त्यासाठी त्याला कायदेशीर मार्गाने जायचे झाले तर त्याचे नेतृत्व मी करेन.”


image


त्यांनी माहिती दिली की, सन २०१४ पासून या मुद्यावर ते मुंबई उच्च न्यायालयात स्वत:चा खटला चालवित आहेत. मशिदींवरील भोंगे हटवा म्हणून ठाण्याचे डॉ महेश बेडेकर, आणि संतोष पाचलग यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयासमोर कुरानचा अर्थ मराठी भाषेत मीच सादर केला होता असे ते म्हणाले. त्यांनी पुढे माहिती दिली की, “ मौलवींचे ६४ फतवे, शरियत कायदा, आयात, यांच्याशी संदर्भित जे पूरावे आम्ही सादर केले त्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला की, भोंगे लावणे याचा धर्माशी काहीच संबंध नाही. न्यायालयाने स्पष्टपणे निर्णय दिला की, रात्री दहानंतर आणि सकाळी सहाच्या आधी भोंगे लावता येणार नाहीत. जर कुणी असे केले आणि ते सिध्द झाले तर त्याला पाच वर्ष तुरूंगवास आणि एक लाख रूपये दंड केला जावू शकतो. सकाळी सहा नंतरही भोंगे लावण्याची परवानगी घ्यावीच लागेल. त्यानंतरही त्यांचे आवाज ठराविक डेसीबलपेक्षा जास्त असता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल. १६ऑगस्ट २०१६ला हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. त्यानंतरही आपला लढा सुरूच आहे असे ते म्हणाले. मात्र या लढ्यात सोनूने मदत केली तर ती मात्र घेणार नाही असेही त्यांनी सांगून टाकले. ते म्हणाले की, “ अल्लाने माझ्यावर कृपा केली आहे, जर मी सोनू यांची मदत घेतली तर माझ्यावर ईश्वराचा कोप होईल, मला खरा इस्लाम लोकांना सांगायचा आहे. ज्यांना हा धर्म मुळापासून समजला नाही त्यांना ज्ञान द्यायचे आहे. सोनू यांच्या या विधानाशी मी सहमत आहे की विजेचा वापर कुणाही धर्मियाने इतरांना त्रास होईल असा करता कामा नये. खरा मुसलमान सर्व धर्मियांचा आदरच करतो.”

हे काम करताना बाबूभाई यांना अनेकांच्या धमक्या आल्या. पण प्रामाणिकपणाचे ईश्वरी काम करताना हे सारे सहन तर करावेच लागणार, ते म्हणाले की, “ शांतीप्रिय मुस्लिम बांधव माझ्या सूचनेचा आदर करतातच. ब-याच जणांनी मशिदीवरून भोंगे देखील उतरविले किंवा त्यांचे आवाज कमी केले आहेत. त्यात मुंबईच्या बेहरामपाडा येथील ४ ज्ञानेश्वर नगर येथील ३, भारत नगर आणि राजीव नगरात प्रत्येकी एक भोंगा उतरला आहे. नातेवाईक, परिचित यांच्या मदतीने मी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातही हे काम केले आहे अशी माहिती ते देतात. “ त्यांनी आनंदाने माझे म्हणणे मान्य केले”, असे ते म्हणाले. ते म्हणतात की, तुमचा हेतू पाक साफ असला तर त्याला यश येतेच. मात्र त्यासाठी संयम आणि मेहनत करावी लागते. वयाने वाढत जाणा-या बाबूभाई यांना जीवीत असे तोवर पुढच्या पिढी पर्यत हे काम घेवून जायचे आहे. त्यांच्या या नेक दिल प्रयत्नांना यश येवो.

    Share on
    close